भारतीय सर्वेक्षण संस्था : अधिकृत नाव भारतीय सर्वेक्षण विभाग, प्रादेशिक निरीक्षण, भूमापन आणि मानचित्रीकरण करणारी भारतातील एक जुनी शासकीय संस्था. या संस्थेच्या जडण-घडणीचा इतिहास उल्लेखनीय आहे.

ईस्ट इंडिया कंपनीचा कलकत्त्याचा गव्हर्नर लॉर्ड क्लाइव्ह (१७२५-७४) याच्याकडे रॉबर्ट ऑर्म या अँग्लो-इंडियन इतिहासाकराने बंगालची बारकाईने माहिती देणारा विस्तृत नकाशा मागितला होता. तो तयार करण्यासाठी क्लाइव्हने मेजर जेम्स रेनल याची कंपनी सरकारतर्फे १७६७ मध्ये नेमणूक केली. हाच भारतीय सर्वेक्षण संस्थेचा प्रारंभ होय. बंगालच्या नकाशाचे (मानचित्राचे) काम समाधानकारकपणे पार पाडल्यानंतर रेनलची बंगालचा मुख्य सर्वेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई आणि मद्रास प्रांतांनीही असे विभाग अनुक्रमे १७९६ आणि १८१० मध्ये सुरू केले. या तीनही प्रांतांचे विभाग १८१५ मध्ये एकत्र करण्यात येऊन कर्नल कॉलिन मॅकेंझी याची भारताचा महासर्वेक्षक म्हणून नेमणूक झाली. १८०२ मध्ये हिंदुस्थानच्या त्रिकोणमितीय सर्वेक्षणास कर्नल विल्यम लॅम्प याने आरंभ केला. मद्रासचे रेखावृत्त पायाभूत धरून भूपृष्ठमापनासाठी विशिष्ट बिंदू निश्चित करून देशाच्या बृहत् त्रिकोणमितीय सर्वेक्षणास आरंभ केला. सैनिकी दृष्टया महत्त्वाच्या स्थलवर्णनात्मक नकाशांबरोबरच महसुली नकाशांचेही काम चालू झाले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात दक्षिण भारतात प्रादेशिक भूमापनासमवेत अनेक सांस्कृतिक महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करण्याचे उल्लेखनीय कार्य कर्नल मॅकेंझी याच्या नेतृत्वाखाली पार पडले. मूर्ती, ताम्रपट, शिलालेख, तालपत्रे इ. उपलब्ध सामग्री लंडन, कलकत्ता व मद्रास येथे रवाना झाली. १८२४ मध्ये ‘ॲटलास ऑफ इंडिया’ या योजनेखाली एका इंचास चार मैल या प्रमाणात देशातील सर्व प्रदेशांचे नकाशे तयार करण्याचे ठरले. १८२७ मध्ये त्यांच्या प्रकाशनास आरंभ झाला. भारतात नकाशे तयार करून ते लंडनला कोरले जात, पण १८६७ नंतर भारतातच ते कोरले जाऊन मुद्रित होऊ लागले. १८४७ मध्ये एका इंचास एक मैल या प्रमाणानुसार नकाशे तयार करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार १८८३ पर्यंत बऱ्याच मोठ्या भूभागाच्या मानचित्रमालिका तयार झाल्या परंतु तोपर्यंत विशिष्ट आकारात नकाशे तयार करण्याचे धोरण नव्हते तथापि १८८३ पासून रेखांशाच्या ३० कला X अक्षांशाच्या १५ कला या क्षेत्राच्या मापाचे नकाशे तयार होऊ लागले. १८७८ मध्ये त्रिकोणमितीय, स्थलवर्णनात्मक आणि महसुली ह्या तीनही विभागांचे काम एकत्र करण्यात आले. पुढे खात्यावरील स्थलवर्णनात्मक नकाशांच्या कामाचा बोजा फार वाढून, १९०५ मध्ये महसुली नकाशांचे काम प्रांतिक शासनांकडे सोपविण्यात आले. त्या वर्षीच एक व्यापक व प्रगत योजना या संस्थेतर्फे हाती घेण्यात आली. विशेषतः द. आशियाचे नकाशे संकेत क्रमांक ठरवून वेगवेगळ्या आकारांत व प्रमाणांत तयार करण्याचा कार्यक्रम त्या योजनेत अंतर्भूत होता. संस्थेने प्रकाशित केलेल्या आधुनिक नकाशांचा मूलाधार म्हणजे ही योजना होय, असे आजही मानले जाते. तेव्हापासून नकाशांचे एकरंगी, उठाव रेषांनी (हॅश्युअर) प्रादेशिक उच्चता दाखविणारे रूक्ष स्वरूप बदलून अनेकरंगी, समोच्चरेषा दाखविणारे नकाशे तयार होऊ लागले. तसेच मद्रास रेखांशाची पूर्वी धरलेली संख्या आणि अद्ययावत अचूक मापनाने प्रस्थापित झालेली संख्या यांतील २ कला आणि २७.१८ विकलांचा फरक त्यापुढे दुरुस्त करून घेण्याचे ठरले. जगातील उत्कृष्ट दर्जाच्या नकाशांच्या श्रेणीत या संस्थेच्या नकाशांची गणना होऊ लागली. १९२७ पासून भूपृष्ठाची हवाई छायाचित्रे घेण्याचे काम चालू झाले. दुसऱ्या महायुद्धात (१९३९-४५) या संस्थेने तयार केलेल्या नकाशांचा पश्चिम आशियातील (इराक) आणि पूर्व आशियातील (सिंगापूर-ब्रह्मदेश) आघाड्या लढविताना फार उपयोग झाला. याच कालखंडात संस्थेचे मुख्य कार्यालय कलकत्त्याहून डेहराडून येथे हलविण्यात आले.

स्वातंत्र्योत्तर काळात पंचवार्षिक योजना आणि बहुलक्ष्यी विकासप्रकल्प यांसाठी विशेष सर्वेक्षणे करण्याची जबाबदारी या संस्थेने पेलली. तेव्हापासूनच या संस्थेने ‘आसेतुहिमाचलम्’ हे बोधवाक्य धारण केल. चिनी आक्रमणानंतर (१९६२) हिमालयीन सीमाप्रदेशाचे व्यापक सर्वेक्षण करण्याचे खडतर कार्य या संस्थेने पार पाडले. १९७० मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमांचे साहाय्य घेऊन भारतीय सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण आणि मानचित्रनिर्मिती यांचे प्रशिक्षण देणारे आशिया खंडातील पहिले केंद्र आणि संशोधन विभाग हैदराबाद येथे चालू केले. फिलिमोअर यांनी या संस्थेच्या आऱंभापासूनच्या सु. १५० वर्षांच्या कागदपत्रांवरून संस्थेची सटीप ऐतिहासिक लेखापत्रे पाच खंडांत प्रसिद्ध केली.

भारतीय सर्वेक्षण संस्थेची रचना सैनिकी धर्तीवर केलेली आहे आणि तिचा अधिकारीवर्गही प्रामुख्याने सुरक्षा दलातूनच नेमलेला असतो. या विभागामध्येच स्वतंत्र भारतीय सैनिकी सर्वेक्षण विभागही आहे. देशाची विभागणी वायव्य (चंडीगढ), पश्चिम (जयपूर), मध्ये (जबलपूर), दक्षिणमध्य (हैदराबाद), दक्षिण (बंगलोर), आग्नेय (भुवनेश्वर), पूर्व (कलकत्ता) आणि ईशान्य (शिलाँग) अशा मुख्य मंडलांमध्ये केलेली असून त्यांची आणि वेगवेगळ्या विभागांची कामे वेगवेगळे निदेशक पाहतात. एका मंडलामध्ये काही शाखा आणि अनेक क्षेत्र कार्यकर्त्यांचे गट असतात. दक्षिणमध्य मंडलातील दोन शाखा महाराष्ट्रात पुणे आणि नागपूर येथे आहेत. मानचित्र मुद्रणाचे काम डेहराडून, कलकत्ता आणि हैदराबाद येथे होते. या संस्थेतर्फेच डेहराडून येथे भारतीय भालेखअंतर्बोध संस्था आणि हैदराबाद येथे प्रशिक्षा व संशोधन केंद्र ही चालविली जातात. 


संस्थेची कार्ये : भू-गणितीय नियमनबिंदू निश्चिती आणि भूप्राकृतिक सर्वेक्षण  हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांतील सुएझ ते सिंगापूर यांदरम्यानच्या ४० बंदरांतील जललहरींविषयी अंदाज वर्तविणे, स्थलवर्णनात्मक सर्वेक्षण आणि नकाशेनिर्मिती, भौगोलिक तसेच विमानचालकांसाठी मार्गदर्शक नकाशेनिर्मिती, विकास-प्रकल्पांची विशेष सर्वेक्षणे, भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांची आणि अंतर्गत प्रादेशिक सीमांची अंकन निश्चिती, स्थाननामांची लेखननिश्चिती आणि तत्संबंधीत विद्या, तंत्रे व कला यांतील संशोधन व विकास साधणे, ही या संस्थेची प्रमुख कार्ये होत.

भारतीय सर्वेक्षण संस्थेची काही उल्लेखनीय प्रकाशने पुढीलप्रमाणे :

स्थलवर्णानात्मक नकाशे :  हे नकाशे विविध प्रमाणे घेऊन तयार केलेले आहेत. (अ) एका इंचास एक मैल वा १ :  ६३,३६० या प्रमाणाचे, (आ) एका इंचास दोन मैल अथवा १ :   १,२६,७२० या प्रमाणाचे (डिग्री शीट्स वा एकांशी अंशक), (इ) एका इंचास चार मैल अथवा १ :  २,५३,४४० या प्रमाणाचे १९६० पासून १-अ ही माला, (ई) १ : ५०,००० या दशमानिक प्रमाणात आणि १-इ ही माला, (उ) १ : २,५०,००० या प्रमाणात जवळजवळ पूर्णपणे परिवर्तित केली असून नवीन सर्वेक्षणावृत्तीसह १ : २५,००० या प्रमाणातील नकाशे प्रकाशनाचे काम वेगाने चालू आहे. १-आ या मालेतील नकाशे नव्याने छापणे बंद केले आहे. याहूनही मोठ्या प्रमाणांचे (१ : १,००० आणि समोच्चरेषांमधील मर्यादांतर ०.५ मी. येथपर्यंतही) नकाशे वेगवेगळ्या स्थानांचे वेगवेगळ्या उद्दिष्टांनुसार प्रसिद्ध केले जातात.

भौगोलिक नकाशे : (अ) भारतीय साम्राज्याचा नकाशासंग्रह (इंपीरियल ॲटलास ऑफ इंडिया) एका इंचास ८ मैल या प्रमाणात हे नकाशे काढलेले आहेत, (आ) भारत आणि समीपवर्ती देश नकाशासंग्रह (इंडिया अँड ॲडजसंट कंट्रीज सेरीज). यात १ : १०,००,००० या प्रमाणातील १९०५ च्या योजनेनुसार इराण ते मलेशियापर्यंतचे ४० नकाशे असून त्यांत अक्षांश – रेखांशांच्या प्रत्येकी ४ लांबी – रुंदीच्या चौकोनाएवढे क्षेत्र असते (इ) जगाचा आंतरराष्ट्रीय नकाशासंग्रह (ला कार्ट इंटरनॅसिओनेल ड्यू माँडे). आंतरराष्ट्रीय समितीच्या १९०९ च्या लंडनला झालेल्या बैठकीत निर्धारित निकषांच्या शिफारशींप्रमाणे या संस्थेवर टाकलेल्या जबाबदारीनुसार तयार केलेले दक्षिण आशिया विभागाचे १ : १०.००,००० या प्रमाणाचे नकाशे यात आहेत. यांचीच विमान मार्गदर्शक आवृत्तीही स्वतंत्र आहे, (ई) दक्षिण आशिया माला (सदर्न एशिया सेरीज). १ : २०,००,००० या प्रमाणातील १२ रेखांश X ८ अक्षांश या क्षेत्राचे नकाशे यात आहेत, (उ) १ : २०,००,००० या पुढील लहान प्रमाणाचे भारत, दक्षिण आशिया व इतर भूप्रदेश यांचे नकाशे, (ऊ) भारतातील राज्यांचे १ : १०,००,००० या प्रमाणातील नकाशे, (ए) महत्वपूर्ण नगरांचे वा स्थळांचे १ : २५,००० हून मोठ्या प्रमाणातील मार्गदर्शक नकाशे, (ऐ) संकीर्ण स्वरूपाचे विशिष्ट उद्दिष्टांचे (उदा. लोहमार्ग, रस्ते इ.) वेगवेगळे नकाशे, (ओ) सर ऑरेलस्टेन यांच्या नेतृत्वाने सर्वेक्षण करून तयार केलेले चिनी तुर्कस्तान (सिंक्यांग) आणि गान्सू या प्रदेशांचे १ : ५,००,००० या प्रमाणातील नकाशे, भारताची आंतरराष्ट्रीय सीमा आणि सागरतट यांच्या आतील सु. १०० किमी. पर्यंतचे १ : २,५०,००० या व त्यापुढील मोठ्या प्रमाणावरील स्थलवर्णनात्मक मानचित्रे विशेष अनुमतीशिवाय उपलब्ध केली जात नाहीत. कोणतेही स्थलवर्णनात्मक नकाशे भारताबाहेर नेता येत नाहीत.

भारतीय सर्वेक्षण संस्थेने तयार केलेले नकाशे दर्जैदार, विश्वसनीय व प्रमाणभूत मानले जातात. नकाशानिर्मितीचे प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून ही संस्था सतत नवेनवे प्रकल्प हाती घेत असते. मुद्रणातील व्हँडाइक पद्धतीचा शोध या संस्थेनेच लावला. तसेच भारतीय नतिमापक, समतलफलक (प्लेन टेबल) यांचे विकसन करण्याचे कार्यही संस्थेने केले. तसेच भूकवचाच्या समेकस्थितीच्या सिद्धांताचे निरूपण व व्यासंग या संस्थेनेच केला. भारतीय टपाल खात्याच्या प्रारंभकाळातील तिकिटांचे मुद्रणही या संस्थेचे केले. या संस्थेच्या जॉर्ज एव्हरेस्ट या महासर्वेक्षकाच्या नावावरून हिमालयातील सर्वोच्च शिखरास एव्हरेस्ट (गौरीशंकर) हे नाव पडले. हिमालयातील इतर शिखरांचेही मापन या संस्थेतर्फे केले जाते. अनेक उपयुक्त पुस्तके, पत्रके, सूच्या व सारण्या या संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत.

चितळे, अ. भा