आरबीला : इराकमधील मोसूलच्या पूर्वेस ८० किमी. वरील प्राचीन स्थळ. लोकसंख्या ३,६०,२८५ (१९६५). इर्बिल अथवा एरबिल अशीही याची नावे आहेत. इ. स. पू. तीन हजार वर्षांपूर्वीचे सुमेरियन लोकांचे हे शहर. हे ॲसिरियन कालखंडात भरभराटलेले होते. येथे इश्तार देवतेचे सुप्रसिद्ध मंदिर होते. सेनॅकरिब राजाने या मंदिरात कालव्याने पाणी आणले होते. ॲकिमेनिडी साम्राज्यात हे दळणवळणाचे केंद्र होते. येथून सुमारे ४८ किमी. पूर्वेकडील गॉगामीला येथे अलेक्‍लांडरने तिसरा डरायस याचा पराभव केला. ही लढाई आरबीलाची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या ही आरबीला प्रांताची राजधानी असून शेतमालाची व्यापारपेठ आहे. येथून बगदादला लोहमार्ग जातो.

जोशी, चंद्रहास