ओखा : गुजरातच्या सौराष्ट्र विभागात, जामनगर जिल्ह्यातील ओखामंडल तालुक्यात, कच्छ आखाताच्या मुखाशी, खोल पाण्याचे उत्तम बंदर. बंदरविभाग, परिसर आणि उपनगर मिळून ओखाची लोकसंख्या १९७१ मध्ये १०,६८७ होती. पश्चिम रेल्वेने अहमदाबादहून राजकोटमार्गे ओखा बंदर ४९७ किमी. आहे. द्वारकाक्षेत्राच्या वायव्येस २९ किमी. असलेल्या या ठिकाणाचे नाव श्रीकृष्णाची नातसून अनिरुद्धपत्‍नी उषा हिच्यावरून पडले, अशी समजूत आहे. ओखा हे व्यापार, मच्छीमारी व मीठ उद्योगांचे केंद्र आहे. येथे मोटारींचे सुटे भाग जोडण्याचा कारखाना व नैर्ऋत्येस आठ किमी. वरील मीठापूर येथे सोडा ॲश व ब्‍लीचिंग पावडरचा मोठा रासानिक कारखाना आहे. स्वातंत्र्यापूर्वी हा बडोदे संस्थानातील एक भाग असून संस्थानाचे ते प्रसिद्ध बंदर होते.

ओक, शा. नि.