भूमध्य समुद्र : एक अंतर्देशीय समुद्र. यूरोप, आफ्रिका व आशिया या खंडांनी वेष्टिलेला हा समुद्र ३०° उ. ते ४६° उ. अक्षांश व ५° ५०’ प. रेखांश ते ३६° पू. रेखांश यांदरम्यान असून, इतर सागरी भागांशी फारच कमी प्रमाणात जोडला गेल्याने एक प्रमुख अंतर्देशीय समुद्र समजला जातो. मार्मारा समुद्र व काळा समुद्र यांचाही भूमध्य समुद्रामध्ये समावेश केला जात असून, याचे क्षेत्रफळ २९,६६,००० चौ. किमी. आहे. याची पूर्व-पश्चिम लांबी सु. ४,००० किमी., तर दक्षिणोत्तर रूंदी सु. १,६०० किमी आहे. हा समुद्र जिब्राल्टर सामुद्रधुनीने अटलांचिक महासगराशी, दार्दानेल्स आणि बॉस्पोरस सामुद्रधुनीने अनुक्रमे मार्माराशी व काळ्या समुद्राशी,तर मानवनिर्मित सुएझ कालव्याने तांबड्या समुद्राशी व पर्यायाने हिंदी महासागराशी जोडलेला आहे. या तिन्ही सागरी मार्गांना दळणवळण, व्यापार व लष्करी दृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ब्रिटिश, फ्रेंच, ऱशियन, इटालियन इत्यादींमध्ये या मार्गावर सत्ता प्रस्थापिण्यासाठी नेहमी स्पर्धा चाललेली असते. पूर्वेकडे अरल समुद्रापर्यंत व उत्तरेकडे डॅन्यूब नदीखोऱ्यापर्यंत पूर्वी मोठा समुद्र होता असे मानतात. खंडविप्लव, वलीकाम विभंजन, ज्वालामुखी, उत्थान इ. क्रियांमुळे त्या समुद्राचा विस्तार कमी होऊन अरल, कॅस्पियन, काळा, मार्मारा, भूमध्य या समुद्रांची निर्मिती झाली असे म्हणतात.

या समुद्राचा किनारी भाग पुष्कळशा प्रामाणात सलग असा आढळत नसल्याने कमी-अधिक रूदींचे पुष्कळ सागरी भाग निर्माण झालेले असून त्यांना वेगवेगळी नावे आहेत उदा., लिग्यूरियन समुद्र, टिरीनियन समुद्र, एड्रिअँटिक समुद्र, आयोनियन समुद्र, इजीअन समुद्र, क्रीट समुद्र, तसेच यामध्ये अनेक आखाते व उपसागर असून, त्यांपैकी आलीकांते आखात, लीऑ आखात, ट्युनिसचे आखात, सिद्राचे आखात इ.आखाते उपरोक्त समुद्रांपेक्षाही मोठी आहेत.

सिसली ते बॉन भूशिर (ट्युनिशिया) यांदरम्यानच्या ‘अँडव्हेंचर बँक’ आणि इटली व सिसिलीचा ‘कॅलेब्रियन सेक्शन’ यांमुळे भूमध्य समुद्राचे पश्चिम व पूर्व अशा दोन भागांत विभाजन झालेले आहे. पश्चिम भागाचे आल्व्होरान बेसिन, अल्जीरियन बेसिन, टिरीनियन बेसिन हे तीन उपविभाग, तर पूर्व भागाचे आयोनियन बेसिन व लोव्हांतीने बेसिन हे दोन उपविभाग केले जातात. पश्चिम भागाची सरासरी खोली १,४३० मी. असून सर्वाधिक खोली या भागातच केप मॅटापॅन येथे सु. ४,३९० मी. आढळते, तर एड्रिअँटिक समुद्र हा उथळ भागम्हणून ओळखला जात असून

भूमध्य समुद्र

त्याची सरासरी खोली २४२ मी. आहे. पूर्वेकडील सागरी भागापेक्षा पश्चिमेकडील भागातील पाणी थंड व गोडे असते. या भागात पृष्ठभागावरील पाण्याचे तपमान फेब्रुवारीत ११° से. व ऑगस्टमध्ये २३° से. असते, तर पूर्व भागात फेब्रुवारीत १६° से. व ऑगस्टमध्ये २६° से. असते. लीआँचे आखात हा या सागराचा भाग म्हणजे अतिथंड व दाट धुक्याचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे तर लिबियाच्या किनारी भागात सिद्राच्या आखातात सर्वाधिक तपमान आढळते.


या समुद्रात लाटांचे प्रमाण कमी असले, तरी पौर्णिमेच्या वेळी काही उपसागर व अरूंद सामुद्रधुन्या यांमध्ये लाटांचे प्रमाण अधिक असते. या समुद्रात नाईल, एब्रो, ऱ्होन, द्यूरांस, आर्नो, टायबर, पो, वार्दर, स्त्रूमा, नेस्तॉस इ. नद्या मिळतात. या नद्यांद्वारे मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण तसेच अटलांटिक महासागर व काळा समुद्र यांतून भूमध्य समुद्राकडे होणाऱ्या पाण्याचे वहन उन्हाळा वगळता इतर वेळी कमी असते. त्यामुळे येथील पाण्याची क्षारता जास्त असून ती दर हजारी ३८ आहे. या क्षारतेचे प्रमाण पश्चिम भागापेक्षा पूर्व भागात जास्त असते. पावसाळ्यात मात्र सागराच्या क्षारतेत घट झाल्याचे आढळते.

भूमध्य समुद्रात आल्व्होरान, बॅलीअँरिक, कॉर्सिका, सार्डिनिया, सिसिली, क्रीट, सायप्रस, मॉल्टा, एल्बा, कॅप्री, आयोनियन, रोड्‌झ, डोडेकानीझ इ. लहानमोठी बेटे असून, यांमधील बहुतेक बेटे ज्वालामुखीजन्य आहेत. या समुद्रात माशांची पैदास कमी होत असली, तरी आर्थिक दृष्ट्या येथील सागरी मासेमारी व्यवसाय महत्त्वाचा आहे. येथे अँकोव्ही, सार्डिन, हेक, ट्यूना इ. मासे व शेवंडा, खेकडा इ. जलचर सापडतात. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश असे भूमध्य सामुद्रिक हवामान तसेच निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे असल्यामुळे अनेक पर्यटक या सागरकिनारी भागास भेट देतात.

जगप्रसिद्ध ईजिप्शियन व बॅबिलन यांसारख्या संस्कृतींचा उगम व विकास यांच्या किनारी भागात झाला. त्यामुळेच यास ‘क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन’ असे संबोधले जाते. लष्करी दृष्ट्या या समुद्रास जगाच्या इतिहासात महत्त्व आहे. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत तसेच दुसऱ्या महायुद्धापर्यंत या समुद्रातील जिब्राल्टर सामुद्रधुनी, मॉल्टा बेट, सुएझ कालवा यांसारख्या मोक्याच्या ठिकाणांवर ग्रेट ब्रिटनचा अंमल होता. त्यामुळे इंग्रजांना आपल्या अखत्यारीतील पूर्वेकडील देशांशी तात्काळ संपर्क साधणे शक्य होते. तसेच रशियाच्या दृष्टीने काळ्या समुद्रमार्गे अटलांटिककडे तसेच आफ्रिकेशी संपर्क साधण्यात भूमध्य समुद्र हा प्रमुख दुवा होता, त्यामुळे यावर आपली सत्ता प्रस्थापिण्याचा त्याचा सदोदित प्रयत्न होता. अमेरिकेनेही दुसऱ्या महायुद्धानंतर येथील प्रमुख मार्गांवर नाविक दल ठेवून रशियाच्या या भागातील शिरकावास कसोशीने प्रतिबंध केला. असे असले, तरी रशियास येथे शिरकाव करण्यास १९५० मधील इस्राएल-अरब यांच्या वादामुळे यश प्राप्त झाले.

आशियाई देशांशी व्यापार करण्याच्या दृष्टीने प्रमुख सागरी मार्ग म्हणून भूमध्य समुद्र प्रसिद्ध होता परंतु पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात वास्को द गामाने केप ऑफ गुड होप मार्गाचा शोध लावल्यामुळे याचे महत्त्व कमी झाले. १८६९ मध्ये सुएझ कालवा वाहतुकीस खुला झाल्याने या सागरी मार्गास पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे.

भूमध्य समुद्रातील वनस्पती, प्राणिजीव, जलस्थित्यंतर यांविषयी संशोधनाचे प्रयत्न चालू आहेत. १९०८-१० दरम्यान डॅनिश लोकांनी यासाठी प्रयत्न केले. दुसऱ्या महायुद्धानंतर याबाबतीत विशेष प्रयत्न झाल्याचे दिसते. १९५७-६३ दरम्यान फ्रेंचांनी याबाबत प्रयत्न केले. ‘इंटर-गव्हर्नमेंटल ओशनॉग्राफिक कमिशन’, ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर द सायंटिफिक एक्स्प्लोरेशन ऑफ द मेडिटेरेनियन सी’, ‘द जनरल फिशरीज कौन्सिल फॉर द मेडिटेरेनियन’ या संस्थांच्या सहकार्याने १९६९ मध्ये संशोधनमोहीम हाती घेण्यात आली असून तीद्वारे सागराची भूरचना, प्राणिजीवन इत्यादींबाबत संशोधन करण्याचे ठरले आहे.

गाडे, ना. स.