झांशी :  उत्तर प्रदेश राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे प्रमुख ठाणे. लोकसंख्या झांशी शहर १,७३,२९२ आणि छावणी व रेल्वे वसाहतीसह १,९८,१३५ (१९७१). हे आग्र्याच्या दक्षिणेस सु. २१० किमी. असून लोहमार्ग प्रस्थानक व सडकांचे मोठे केंद्र आहे. १८५७ च्या उठावातील राणी लक्ष्मीबाईमुळे हे विशष प्रसिद्ध आहे. शहर ९ वेशींसह तटबंदीयुक्त, सुरेख, टुमदार असून त्याभोवती अनेक तळी आहेत. याचा उल्लेख कधी कधी बळवंतनगर असाही केला जातो. ओर्छाचा राजा वीरसिंगदेव याने १६१३ मध्ये येथे बळकट किल्ला बांधला.

जिल्ह्यातील अन्नधान्याची ही प्रमुख बाजारपेठ आहे. येथे पितळी भांडी, गालिचे, रेशमी वस्त्रे, चित्रकला, कांबळी, विडी, साबण, तेल, सुगंधी तंबाखू, शेती यंत्रे, फळसंरक्षण, आयुर्वेदिक औषधे इ. विविध व्यवसाय असून मोठी रेल्वे कर्मशाळा आहे.

 

येथील प्रेक्षणीय स्थळांत शहराच्या पश्चिमेच्या छोट्या डोंगरावरील किल्ला, लक्ष्मीमंदिर, दुर्गामंदिर, मुरलीमनोहर आणि राणीमहाल यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

कापडी, सुलभा