वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी वायव्येकडील एक संपन्न पॅसिफिक राज्य. येथील वनसंपदेमुळे त्याचा सदाहरित राज्य तसेच चिनूक लोकांवरून चिनूक राज्य या उपनावांनीही उल्लेख करतात. राज्याचा अक्षयवृत्तीय विस्तार ४५° ३२’ उ. ते ४९° उ. व रेखावृत्तीय विस्तार ११६° ५७’ प. ते १२४° ४८’ प. असा आहे. राज्याचा पूर्व-पश्चिम विस्तार ५७६ किमी. आणि दक्षिणोत्तर ३८६ किमी. असून त्यास २५३ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. उत्तरेस कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया राज्य, पूर्वेस आयडाहो राज्य, दक्षिणेस ऑरेगन राज्य आणि पश्चिमेस पॅसिफिक महासागर यांनी हे राज्य सीमित झाले आहे. राज्याचे क्षेत्रफळ १,७६,४७९ चौ.किमी. असून त्याची लोकसंख्या ४८,६६,६९२ (१९९०) होती. ऑलिंपिया (३३,८४०-१९९०) ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या राज्याचे ऑलिंपिक द्वीपकल्प, पॅसिफिक किनारपट्टीची रांग, प्यूजित साउंड (द्रोणी), कॅस्केड पर्वतश्रेणी, कोलंबिया पठार आणि रॉकी पर्वतश्रेणी असे सहा भाग पडतात. ऑलिंपिक द्वीपकल्प राज्याच्या वायव्य कोपऱ्यात पसरले असून त्याच्या उत्तरेस ह्वान द फ्यूका सामुद्रधुनी आणि पश्चिमेस पॅसिफिकक महासागर आहे. हा बहुतेक सर्व प्रदेश ऑलिंपिक राष्ट्रीय उद्यानात मोडतो. यातील बर्फाच्छादित ऑलिंपिक पर्वत हा अमेरिकेतील एक महत्त्वाचा हिंस्त्र श्वापदांचा भाग समजला जातो. पर्वताच्या पायथ्याला लाकडांचा मोठा उद्योग चालतो. राज्याच्या नैर्ऋत्येकडील किनारपट्टीजवळील विलापा टेकड्या आणि विलापा उपसागर यांतून अनुक्रमे लाकूड कापणी व मच्छीमारी हे प्रमुख उद्योग आढळतात. राज्याचा प्यूजित साउंड सखल प्रदेश हा ऑलिंपिक पर्वतश्रेणी कॅस्केड पर्वतरांग यांमध्ये असून तो उत्तरेकडे ब्रिटिश कोलंबियापर्यंत आणि दक्षिणेस ऑरेगन राज्यापर्यंत पसरला आहे. चिहेलस नदीचे खोरे या भूप्रदेशातच मोडते. या प्रदेशाची किनारपट्टी अनियमित असून आखातात लहानमोठी सु. ३०० बेटे आहेत. मोठ्या बेटांपैकी विड्‌बी हे प्रसिद्ध असून आखातात अनेक बंदरे व खोल पाणी असलेले उपसागर आहेत. या प्रदेशात राज्यातील तीनपंचमांश लोकसंख्या आढळते.

प्यूजित सांउडच्या पूर्वेस कॅनडाच्या सीमेपासून कोलंबिया नदीपर्यंत उत्तर-दक्षिण कॅस्केड पर्वताची रांग आहे. तिने राज्याचे पूर्व-पश्चिम असे दोन प्रमुख प्राकृतिक भाग पाडले आहेत. त्यांतील पूर्वेकडील भाग निमओसाड असून पश्चिमेकडील भागात घनदाट अरण्य आहे. कॅसकेड पर्वतश्रेणीत अनेक निद्रिस्त ज्वालामुखी शिखरे असून त्यांपैकी सेंट हेलन्झ ज्वालामुखीचा १९८० मध्ये उद्रेक झाला होता. मौंट बेकर, ग्लेशियर, मौंट ॲडम्स, मौंट रेनीयर ही आणखी काही शिखरे असून रेनीयर हे राज्यातील सर्वोच्च (४,३९२ मी.) शिखर आहे. या सर्व शिखरांवरून हिमनद्या वाहतात. शिखरांच्या खालच्या उतारांवर आणि पर्वतांच्या पायथ्याशी घनदाट जंगले आहेत. राज्याच्या आग्नेयीस आणि मध्यभागी कोलंबिया नदीचे सुपीक खोरे व कोलंबिया पठार आहे. त्याच्या आग्नेयीस पॅलाउस कंट्री नावाचा या पठाराचा भाग गव्हाच्या पिकासाठी ख्यातनाम आहे. राज्याच्या ईशान्य कोपऱ्यात रॉकी पर्वताची रांग आहे. त्यातील ओकॅनोगॅन पहाडी प्रदेश हा रॉकी पर्वताचाच विस्तार असून या पर्वतरांगांतील दऱ्यांचा भाग सुपीक आहे.

कोलंबिया ही राज्यातील सर्वांत मोठी (सु. १,२०० किमी.) नदी असून ती राज्याच्या मध्यातून आणि दक्षिण सीमेवरून वाहत जाऊन पॅसिफिक महासागराला मिळते. तिला वाटेत स्पोकॅन, यॅकमॉ, लेविस, वाला वाला, काउलट्‌स, स्नेक, ओकॅनोगॅन वगैरे नद्या येऊन मिळतात. कोलंबिया पठार सस.पासून सु. १५० ते ५०० मी. उंच आहे. राज्यात जलसंपत्ती (भूगर्भात व भूपृष्ठावर) विपुल प्रमाणात असून त्याद्वारे जलसिंचन व जलविद्युत् निर्मिती होते. वॉशिंग्टन राज्याचा बराचसा पाणीपुरवठा या नद्यांतून केला जातो. ग्रँड कूली हे काँक्रीटचे मोठे धरण कोलंबिया नदीवर याच राज्यात बांधले आहे. या धरणामुळे ओकॅनोगॅन पहाडी प्रदेशात फ्रँक्लिन रूझवेल्ट हे कृत्रिम सरोवर (२४२ किमी. लांब) झाले असून राज्यात नैसर्गिक लाहन मोठी ९४८ सरोवरे आहेत. त्यांपैकी शलन, ओकॅनोगॅन, वॉशिंग्टन वगैरे मोठी असून प्रेक्षणीय आहेत. ग्रँड कूलीव्यतिरिक्त बॉनव्हिल, रॉकी रिच, प्रिस्ट रॅपिड्‌स, वॅटम, डॅलस, जॉन डे मॅकनरी ही आणखी काही प्रसिद्ध धरणे असून ही सर्व धरणे जलसिंचन, वीजनिर्मिती व जलवाहतूक या बहुविध दृष्टिकोनांतून बांधली आहेत. कोलंबिया नदीच्या उपयुक्ततेमुळे या नदीचा तेथील जनजीवनावर तसेच उद्योगधंद्यांवर मोठा प्रभाव आढळतो.

मृदा : कॅस्केड पर्वतश्रेणीच्या पश्चिमेस कोलंबिया व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात प्रामुख्याने पुराने वाहत आलेली गाळयुक्त मृदा आढळते. येथील बेसाल्ट पठार लाव्हारसापासून बनले असून हा भाग समृद्ध पिकांचा झाला आहे. याउलट राज्याच्या पूर्व भागातील मृदा ही अग्निजन्य खडकांच्या ठिसूळपणातून निर्माण झालेली असून तिच्यात खनिजयुक्त द्रव्ये आहेत. त्यामुळे जलसिंचन आणि नायट्रोजनयुक्त खते यांचा उपयोग करून तेथे भरपूर पिके घेतली जातात, मात्र जमिनीची धूप ही गंभीर समस्या झाली आहे.

खनिजे : राज्यातील खनिजे विविध प्रकारची असून पश्चिम वॉशिंग्टनच्या पॅसिफिक किनारपट्टीत दगडी कोळशाचे विपुल साठे आहेत. तज्ञांच्या अंदाजानुसार ५०० अब्ज मेट्रिक टन एवढे हे साठे असून लेविस कौंटी हे त्याचे प्रमुख केंद्र आहे. चिहेलसजवळ मॅग्नेसाइट खनिजाचे साठे असून सोने कॅस्केड पर्वतश्रेणीच्या पूर्व उतारावर आणि ओकॅनोगॅन पर्वतरांगांत आढळते. जस्त आणि शिसे यांच्या धातुकांचे साठे ईशान्य भागात असून चिकणमाती, संगमरवर, चुनखडी, ग्रॅनाइट, वाळू इत्यादींचे साठे आहेत.

हवामान : पश्चिमी वारे आणि पॅसिफिक महासागराचे सान्निध्य तसेच कॅस्केड पर्वतश्रेणी यांचा येथील हवामानावर परिणाम दिसून येतो. प्रदेशपरत्वे अथवा प्राकृतिक विभिन्नतेमुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे हवामानात लक्षणीय बदल आढळतात.

कॅस्केड पर्वतरांगेच्या पश्चिमेकडील भागात पॅसिफिक महासागरावरून येणारे पश्चिमी वारे आणि जपानी उष्ण प्रवाह यांमुळे वर्षभर समशीतोष्ण सौम्य हवामान आढळते. हिवाळ्यात विशेषतः जानेवारीत, पश्चिम वॉशिंग्टनचे सरासरी तापमान २° ते ४° से. असते, तर उन्हाळ्यात, विशेषतः जुलै महिन्यात, १६° ते २१° से. असते. हिवाळ्यात ऑलिंपिक आणि कॅस्केड पर्वतशिखरांवर बर्फ पडते. या भागात सरासरी ९१४ मिमी. पाऊस पडतो. ऑलिंपिक पर्वतश्रेणीत सर्वांत जास्त ३,६०७ मिमी. एवढा पाऊस पडतो. राज्याच्या पूर्व भागात पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत नीरस हवामान असून तापमानात विषमता आढळते. हिवाळ्यात सरासरी-४° से. ते -२° से. तापमान असून उन्हाळ्यात ते १७° ते २५° से. असते आणि सरासरी पर्जन्यमान २५४ ते ५०८ मिमी. आढळते. हिवाळ्यात हिमवर्षाव होतो.


वनस्पती : राज्यातील ५०% भूमी वनाच्छादित असून १९८२ मध्ये सु. ९३,८१,००० हे. जमीन जंगलांनी व्यापली होती. डोंगरउतार, हवामानातील चढउतार आणि विपुल पाऊस यांमुळे राज्यात वनस्पतींची विभिन्नता आढळते. राज्यात एकूण ३,००० जातींच्या वनस्पती असून दुर्मिळ जातींची फुले पर्वतांवर दिसतात. फ्लेट्‌स व्हायलेट, पायपर ब्लू बेल, ब्लू पाइन, स्यूसान आणि गोल्डन रॉड हे फुलांचे प्रकार सामान्यतः सर्वत्र असून पश्चिमी डॉगवुड आणि ऱ्होडोडेंड्रॉन हे प्रकार पर्वतश्रेणीत आणि जंगलातून दिसतात. पश्चिमेकडील भरपूर पावसाच्या भागात हेमलॉक, डग्लस फर, रेड सीडार हा प्रमुख वृक्षप्रकार आढळतात. पूर्वेकडील भागात डग्लस फर हा प्रमुख वृक्षप्रकार असून त्याशिवाय पाँडेरोझा, पाइन लार्च आणि लॉजपोल पाइन हे प्रकार आढळतात. राज्यातील कठीण कणखर लाकूड प्रकारांत अल्डर, ॲस्पेन, कॉटनवुड आणि मॅपल या प्रकारांची गणना होते. जंगलाच्या संवर्धन-संरक्षणाचे काम अनेक खाजगी संस्था, राज्य शासन व केंद्र शासन करीत असून अमेरिकन ट्री फार्म सिस्टम आणि कीप अमेरिका ग्रीन या दोन संस्थांनी त्यामध्ये विशेष पुढाकार घेतला आहे.

प्राणी : वनस्पतींप्रमाणेच राज्यात प्राणिसंपदा वैविध्यपूर्ण आहे. शिकारीसाठी काही जंगले राखून ठेवलेली आहेत. शिकारीच्या पक्ष्यांमध्ये अनेक जातींचे तीतर, फेझंट, रानटी बदके, लांडोर इत्यादींचा समावेश होतो. एल्क, हरिण, अस्वल आणि रानमेंढा हे शिकारीचे प्रमुख प्राणी होत. मार्टेन, बीव्हर, चिचुंद्री, स्कंक, मिंक, वीझल आणि ऊदमांजर हे फर असणारे प्रमुख प्राणी असून रॅकून, बिजू, मार्टेन हेही प्राणी आढळतात. राज्यात खाण्याला योग्य अशा सु. २०० माशांच्या जाती आढळतात व मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. येथील नद्या-सरोवरे यांतील गोड्या पाण्यातून सामनच्या अनेक जाती तसेच ऑलिंपिया, रॉक ऑयस्टर, कालव, खेकडे इ. प्रकार आढळतात. रेनबो, सिल्व्हर, ट्राउट व व्हाइटफिश ह्या येथील प्रमुख जाती असून ट्यूना, फ्लाउंडर, रेड स्नॅपर, ब्लॅक कॉड हे आणखी प्रसिद्ध जलचर येथे सापडतात. राज्यात १९८३ मध्ये सु. ७५,००० टन जलचर पकडण्यात आले व त्यांपासून ६१३ लक्ष डॉलर एवढे उत्पन्न मिळाले.

इतिहास : वॉशिंग्टनच्या भूप्रदेशात गोऱ्या लोकांच्या समन्वेषणाच्या वेळी (पंधराव्या-सोळाव्या शतकांत) अनेक अमेरिकन इंडियन जमातींचे वास्तव्य होते. त्यांपैकी चिनूक, क्लॅलम, क्लॅटसप, निझक्लाली, नुकसॅक इ. इंडियन जमाती मच्छीमारी, शिकार व जंगलातील कंदमुळे-फळे गोळा करून उदरनिर्वाह करीत. त्यांची वस्ती प्रामुख्याने कोलंबिया नदीचे खोरे, प्यूजित साउंड आणि वायव्य किनारपट्टीवर होती. या प्रदेशात प्रथम स्पॅनिश आणि नंतर इंग्लिश समन्वेषकांनी सोळाव्या शतकात प्रवेश केला. पुढे कॅप्टन जेम्स कुक हा इंग्रज समन्वेषक १७७८ मध्ये तिथे पोहोचला, त्यानंतर कॅप्टन जॉर्ज व्हँकूव्हर या इंग्रज समन्वेषकाने प्यूजित साउंड आणि जॉर्जिया आखात यांचे १७९२-९४ दरम्यान सर्वेक्षण केले. इंग्लंडने कुक आणि व्हँकूव्हर यांच्या समन्वेषणाचा आधार घेऊन त्यांनी शोधलेल्या भूप्रदेशावर मालकी हक्काचा दावा केला. याच साली कॅप्टन रॉबर्ट ग्रे या बॉस्अन कंपनीच्या अमेरिकन व्यापाऱ्याने सफर काढून कोलंबिया नदीमुखापर्यंत धडक मारली. त्याच्या या प्रवासामुळे अमेरिकेने या भूप्रदेशावर मालकी हक्काचा दावा केला. १८०५ मध्ये मेरीवेदर ल्यूइस आणि विल्यम क्लार्क या दोन समन्वेषकांनी रॉकी पर्वत ओलांडला आणि कोलंबिया नदीतून ते पॅसिफिक महासागरापर्यंत येऊन पोहोचले. या त्यांच्या जलप्रवासामुळे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी वायव्य सरहद्द प्रांतावर पुन्हा आपला हक्क नोंदविला. त्यानंतर १८०७ आणि १८११ यांदरम्यान डेव्हिड टॉमसन या समन्वेषक व भूगोलवेत्त्याने कोलंबिया नदीतून पॅसिफिक महासागरापर्यंत जलप्रवास केला. त्यामुळे ब्रिटिश तेथे आपला हक्क सांगू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिश आणि अमेरिकन फरचे व्यापारी या प्रदेशात वावरत होते. अमेरिकन इंडियन लोकांबरोबर व्यापार करण्यासाठी कॅनडियन नॉर्थ वेस्ट कंपनीने विद्यमान स्पोकॅनजवळ स्पोकॅनगृह स्थापन केले, तर अमेरिकन व्यापारी जॉन जॅकब ॲस्टरने विद्यमान ऑरेगनमधील ॲस्टोरिया येथे केंद्र उघडले. ॲस्टर समूहाने फोर्ट ओकॅनोगॅन या वॉशिंग्टनमधील भागात स्थायी स्वरूपाची वसाहत स्थापन केली. ग्रेट ब्रिटन व अमेरिका यांमधील १८१२ च्या युद्धात, ॲस्टर समूहाने आपली सर्व व्यापारी केंद्रे सोडली. युद्धानंतर दोन्ही देशांत सीमेविषयी मतैक्य घडेना, तेव्हा १८१८ मध्ये दोघांत तह होऊन दोन्ही प्रदेशांतील नागरिकांनी एकमेकांच्या भूप्रदेशात व्यापार करावा व त्यानिमित्त राहावे, असे ठरले. तिला पुढे ऑरेगन क्षेत्र प्रदेश हे नाव मिळाले. हडसन बे या ब्रिटिश व्यापारी कंपनीच्या जॉन मॅकल्हिलन याने व्हँकूव्हर किल्ला कोलंबिया नदीकाठी बांधला (१८२५).

अनेक अमेरिकनांनी ऑरेगन भूक्षेत्रात १८४०-५० दरम्यान घरे बांधली. राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका यांतील सीमातंटा विकोपाला गेला (१८४४). जेम्स के. पोक या उमेदवाराने आपल्या प्रचारात ५४°४०’ अक्षांशापलीकडील दक्षिणेस असलेला सर्व भूप्रदेश अमेरिकेच्या मालकीचा आहे असा दावा केला. पुढे राष्ट्राध्यक्ष पोकने-ग्रेट ब्रिटनबरोबर १८४६ मध्ये तह करून ४९° अक्षांश ही उत्तरेकडील सीमा ठरविली. मात्र त्यामुळे व्हँकूव्हर हे बेट इंग्लंडच्या अधिपत्याखाली राहिले. तत्कालीन वॉशिंग्टन क्षेत्र १८४८ च्या काँग्रेसने निर्मिलेल्या ऑरेगन क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले.

यानंतर प्यूजित साउंडमधील सीमा निश्चित करण्यात आली (१८५०). स्वतंत्र कोलंबिया क्षेत्राची मागणी होऊ लागली. परिणामतः अमेरिकन काँग्रेसने मार्च १८५३ मध्ये ती मान्य केली आणि कोलंबिया नदीच्या उत्तरेकडील त्या स्वतंत्र क्षेत्राचे नाव जॉर्ज-वॉशिंग्टनच्या नावावरून ‘वॉशिंग्टन’ असे ठेवले. या क्षेत्रात उत्तर आयडाहो व पश्चिम माँटॅना या भूप्रदेशांचा अंतर्भाव करण्यात आला. त्यावेळी त्यात ३,९६५ गोऱ्या रहिवाशांचे वास्तव्य होते. आयझॅक इंगल्स स्टीव्हन्झ याची पहिला गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात येऊन (२८ नोव्हेंबर १८५३) ऑलिंपिया ही राजधानी ठरविण्यात आली. स्टीव्हन्झने मूळ इंडियनांबरोबर तह करून गोऱ्या वसाहतकारांना अधिक क्षेत्र मिळवून दिले. किनारपट्टीवरील इंडियनांनी तह केले परंतु पठारावरील इंडियनांनी, विशेषतः यॅकमॉ लोकांनी, कामियाकिन या जमात प्रमुखाच्या नेतृत्वाखाली युद्ध पुकारले. त्यात यॅकमाँचा पराभव झाला (१८५८). इंडियनांना आरक्षित क्षेत्रात राहावे लागले. १८५९ मध्ये आयडाहो आणि वायोमिंग हे प्रदेश वॉशिंग्टनमध्ये अंतर्भूत करण्यात आले. मात्र १८६३ मध्ये आयडाहो राज्य वेगळे झाले. रेल्वेचा विस्तार, सोन्याच्या खाणींचा शोध यांमुळे लोकसंख्या वाढू लागली. कामगार आणि शेतकरी यांनी उत्पादन वाढविले. परिणामतः वॉशिंग्टनची लोकसंख्या १८९० मध्ये ३,६०,००० झाली. तत्पूर्वी ११ नोव्हेंबर १८८९ रोजी वॉशिंग्टनला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ४२ व्या घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि रिपब्लिकन पक्षाचा एलिशा पी. फेरी हा राज्याचा पहिला गव्हर्नर झाला. त्यावेळी राज्यात रिपब्लिकन पक्षाबरोबरच पॉप्युलिस्ट पक्ष जोरदारपणे राजकारणात पुढे आला. यात कामगार व शेतकरी समूहांतील लोक होते, मात्र १८९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पॉप्युलिस्ट, डेमॉक्रॅट्‌स आणि रिपब्लिकन या तिन्हींचा फ्युझनिस्ट पक्ष सु. चार वर्षे सत्तेवर होता. विधायक सुधारणांमुळे त्याची कारकीर्द गाजली परंतु पुन्हा रिपब्लिकन पक्षाने १९०१ मध्ये सत्ता मिळविली. यापूर्वी १८९३ मध्ये ग्रेट नॉर्दर्न रेलरोड सिॲटलपर्यंत पूर्ण झाला होता. त्यामुळे वाहतूक वाढली, शेती-फळबागांना उत्तेजन मिळाले. जहाजबांधणी उद्योग, मच्छीमारी, खाण-उद्योग व लाकूड उद्योग वाढले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी (१९१४-१७) प्यूजित गोदीचा विस्तार तसेच कँप लेव्हिस लष्कर ठाण्याचाही विस्तार झाला. महायुद्धानंतर बेकारी वाढली आणि उत्पादन घटले. परिणामतः कामगारांनी संप केले. त्यांतून १९१९ ची क्रांती उद्‌भवली आणि साठ हजार कामगारांनी कामावर बहिष्कार घातला. १९३० च्या मंदीच्या लाटेचा तडाखा वॉशिंग्टनलाही बसला. अन्नप्रक्रिया हाच फक्त स्थिर उद्योग राहिला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी (१९३९-४५) वॉशिंग्टनच्या लष्कराला बोटी आणि विमाने पुरविली. १९४३ मध्ये वॉशिंग्टनच्या आग्नेय भागातील हॅनफर्ड येथे अणुकेंद्रीय ऊर्जा उत्पादन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात अमेरिकेचा पहिला अणुबाँब बनविण्यात आला. १९६० मध्ये यातून विद्युत् उत्पादन करण्यात येऊ लागले. पुढे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचा ‘हॅनफर्ड प्रकल्प’ बनला. महायुद्धानंतर वॉशिंग्टन राज्यातील अनेक शहरे व नगरे लष्करी ठाणी म्हणूनच विकसित झाली. १९५० ते १९८० दरम्यान कोलंबिया, स्नेक वगैरे प्रमुख नद्यांवर धरणे बांधण्यात येऊन त्यांपासून जलविद्युत् उत्पादन, जलसिंचन वगैरे योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे शेतीचे, विशेषतः गव्हाचे, उत्पादन वाढले ॲल्युमिनियमचे कारखाने निघाले. प्रसिद्ध लष्करी बोईंग विमान बनविण्याचा कारखाना स्थापण्यात आला. वीजनिर्मितीसाठी अलीकडे वॉशिंग्टनमध्ये अनेक अणुकेंद्रीय ऊर्जा प्रकल्प बांधण्याचे काम चालू आहे.


राजकीय स्थिती : राज्याच्या स्थापनेबरोबरच १८८९ मध्ये संविधान बनविण्यात आले. १९१२ मध्ये संविधान दुरुस्ती करण्यात येऊन त्यात उपक्रमाधिकार, जनमतपृच्छा आणि प्रत्यावाहन यांची तरतूद करण्यात आली. १९८४ पर्यंत सु. ७४ संविधान दुरुस्त्या झाल्या. गव्हर्नरला अनेक विशेष अधिकार असून रोधाधिकारही आहे. गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नर, राज्यसचिव, लेखापाल, खजिनदार, ॲटर्नी जनरल, जमिनींचा आयुक्त आणि सुपरिटेंडेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन्स मिळून कार्यकारी मंडळ बनते. हे अधिकारी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळी चार वर्षांसाठी निवडून येतात. गव्हर्नर बारा प्रशासकीय विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करतो. राज्य विधिमंडळ द्विसदनी असून त्यात सीनेटचे ४९ सभासद व कनिष्ठ प्रतिनिधिगृहाचे ९८ सभासद असतात. सीनेटच्या सभासदांची चार वर्षे मुदत असून त्यांपैकी एकद्वितीयांश सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. लेफ्टनंट गव्हर्नर सीनेटचा अध्यक्ष असतो. प्रतिनिधिगृह सभापती निवडते. राज्यातून केंद्रीय सीनेटवर दोन सभासद आणि कनिष्ठ प्रतिनिधी मंडळावर आठ प्रतिनिधी निवडून दिले जातात. प्रशासकीय सोयीसाठी राज्याचे ४९ विविधमंडळ जिल्ह्यांत आणि ३९ काउंटींमध्ये विभाजन केलेले आहे. प्रत्येक काउंटीचा कारभार त्रिसदस्य मंडळ पाहते.

आर्थिक स्थिती : सुपीक जमीन, जलसिंचन योजना आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या साहाय्यामुळे वॉशिंग्टन राज्यातील कृषिव्यवसाय किफायतशीर ठरला आहे. राज्यातील एकूण लागवडीखाली असलेल्या ६७ लक्ष हे. भूक्षेत्रापैकी कृषियोग्य क्षेत्र देशाच्या तुलनेत कमी असले, तरी कृषि-उत्पादनाच्या दृष्टीने देशातील विशेषतः उत्तर अमेरिकेतील, ते अग्रेसर राज्य आहे. उत्पादन मूल्याच्या दृष्टीने दुग्धशाळांचा उत्पन्नात सर्वांत वरचा क्रमांक लागतो. त्याखालोखाल सफरचंदे, गुरे, बटाटे, गहू व अंडी यांचा क्रम लागतो. १९८२ मध्ये ६,४७,००० हे. कृषिक्षेत्र जलसिंचनाखाली होते. गहू, बटाटा, वाटाणा, सातू, घेवडा, साखरबीट, अलुबुखार ही प्रमुख पिके असून सफरचंद, द्राक्षे, हॉपफळे, नासपती, स्ट्रॉबेरी इत्यादी महत्त्वाची फळे येतात. राज्याचे कृषिव्यवसायाच्या दृष्टीने तीन विभाग केलेले आहेत. पश्चिम वॉशिंग्टन भागात गवताची प्रशस्त कुरणे असून तेथे कुक्कुटपाल तसेच अन्य पशुपालन व दुग्धोत्पादन यांचा मोठा व्यवसाय चालतो. या भागात क्रॅनबेरी, स्ट्रॉबेरी, बटाटे व शतावरी ही प्रमुख पिके असून फळभाज्यांचे उत्पन्न चांगले आहे. मध्ये वॉशिंग्टन भागात सफरचंदाच्या विस्तीर्ण बागा असून द्राक्षे, बेरी वगैरे अन्य फळेही घेतली जातात. पूर्व वॅशिंग्टन भागात पशुपालन हा प्रमुख व्यवसाय असून गव्हाचे उत्पादन विपुल आहे. तसेच वाटाणा, घेवडा, सातू, बटाटे ही पिकेही घेतली जातात. १९८४ मध्ये कृषि उत्पन्न २९० अब्ज डॉलर एवढे होते. राज्याचा सफरचंद, द्राक्षे, चेरी या फळांच्या उत्पादनात देशामध्ये पहिला क्रमांक, तर गव्हाच्या उत्पादना दुसरा क्रमांक लागतो. उत्पन्नाच्या दृष्टीने १९८५ मध्ये राज्यात २,११,००० दुभत्या गाई १४,७०,००० गुरे ५३,००० मेंढ्या आणि ४५,००० वराह एवढे पशुधन होते.

राज्यातील खजिन संपत्ती विपुल असून औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची आहे. तिसांहून अधिक खनिजांचे उत्खनन व व्यापारदृष्ट्या उत्पादन होते. राज्यात लोह, तांबे, जस्त, शिसे, चांदी, सोने, अँटिमनी, बॅराइट, मँगॅनीज ही धातुखनिजे अस्फाल्ट, रेती, जिप्सम, चुनखडक, संगमरवर, वाळू, अभ्रक, ग्रॅनाइट, संगजिरे, शंखजिरे, बेसाल्ट डोलोमाइट इ. अधातू खनिजे आणि कोळसा, तेल, नैसर्गिक वायू ही ऊर्जासाधने यांचे उत्पादन होते. चुनखडीपासून पोर्टलंड सिमेंट बनविण्याचे कारखाने असून चिकणमातीपासून सुबक मृदपात्रे बनविण्याचा उद्योग चालतो. १९८३ मध्ये राज्यात २४,५२,७५,००० डॉलर एवढे उत्पन्न खनिजांपासून मिळाले.

उद्योग : विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, विशेषतः जंगले, तसेच अल्प किंमतीत उपलब्ध होणारा जलविद्यूत् पुरवठा, वाहतुकीची सुलभ व्यवस्था, मोठ्या लोकसंख्येमुळे झालेले श्रमिक बळ इ. घटकांमुळे वॉशिंग्टन राज्य हे उत्तर अमेरिकेतील निर्मितीउद्योगांचे एक प्रमुख केंद्र बनले आहे. कॅस्केड पर्वतश्रेणीने राज्याचे दोन आर्थिक विभाग पाडले असून कॅस्केडच्या पूर्वेकडील भाग हा कृषिक्षेत्राचा आहे. तेथे गहू आणि फळे ही प्रमुख पिके निघतात आणि पशुपालन व मांस व मासे डबाबंदीकरणाचा उद्योग चालतो. येथील स्पोकॅन ही आर्थिक उलाढालींची मोठी व्यापारपेठ आहे. याउलट कॅस्केडच्या पश्चिमेकडील भागात सर्व उद्योगधंद्यांचे एकत्रीकरण झाले असून सिॲटल, टाकोमा व अन्य बंदरे ही व्यापार-उद्योग व विविध मालांची प्रमुख निर्मिती केंद्रे आहेत.

एकूण उत्पादनांपैकी ७८% वस्तुनिर्मितीमधून, १९% कृषी उत्पादनातून आणि १% मत्स्य उत्पादनातून १९८४ मध्ये राज्याला मिळाले. अवकाश उद्योग आणि जहाजबांधणी हे राज्याचे महत्त्वाचे व किफायतशीर उद्योगधंदे असून बोइंग कंपनीचे मुख्यालय सिॲटल येथे आहे. यांतून लढाऊ विमाने तयार केली जातात. एव्हरेट येथे व्यापारी विमाने बांधण्याचे काम चालते. १९८४ मध्ये राज्यातील या उद्योगात सु. ८४,००० कामगार काम करीत होते. राज्यात एकूण ५,५३,००० कामगार होते (१९८०). जहाजबांधणी उद्योग प्रामुख्याने सिॲटल, ब्रेमर्टन आणि टाकोमा येथे चालतो. ब्रेमर्टन येथील द प्यूजित साउंड नेव्हल शिपयार्ड कारखाना हा पॅसिफिक किनाऱ्यावरील जगातील मोठा कारखाना आहे. लाकूड उद्योगधंद्यातही राज्याने आघाडी मारलेली असून लाकूड कापणी, फर्निचर व प्लायवुड बनविण्याचे तसेच कागद तयार करण्याचे कारखाने आहेत. राज्याच्या निर्मितिउद्योगांमध्ये प्रक्रिया उद्योगाला फार महत्त्व आहे. येथील खाद्यपदार्थांचा प्रक्रिया उद्योग हा एक प्रमुख उद्योग असून बटाटे, मासे, मांस, फळे यांचे शीतकरण आणि डबाबंदीकरण हे प्रमुख उद्योग चालतात. त्यांपाठोपाठ विद्युत् यंत्रसामग्री व यंत्रे यांचे निर्मितिउद्योग, रसायने व तत्संबंधित इतर उत्पादने, वाहतूक साधने आणि ॲल्युमिनियम, कागद, प्लॅस्टिक नळ तयार करण्याचे येथे कारखाने असून खनिज तेल शुद्धीकरण व नैसर्गिक वायू उत्पादन उद्योगही येथे आहेत. राज्याची जलविद्युत्‍उत्पादनक्षमता मोठी आहे.


वाहतूक व संदेशवहन : सुरुवातीच्या काळात प्यूजित साउंड आणि कोलंबिया नदी यांमधून जलवाहतूक करण्यात येई. ती अद्यापि अस्तित्वात आहे. पुढे खंडांतर्गत नॉर्दने पॅसिफिक (१८८३), ग्रेट नॉर्दर्न (१८९३) आणि मिलवॉकी (१९०९) हे लोहमार्ग कार्यान्वित झाले. राज्यात सु. ६५०० किमी. लांबीचे लोहमार्गांचे जाळे पसरले होते (१९८४). यांशिवाय पूर्व-पश्चिम असे पाच व दक्षिणोत्तर तीन महामार्ग आहेत. राज्यात एकूण १,६१,००० किमी. लांबीचे रस्ते असून त्यांतील १,१३५ किमी. चा आंतरराज्य महामार्ग १९८३ मध्ये पूर्ण करण्यात आला. राज्यांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हवाई वाहतूक विकसित झाली असून वायव्येकडील सिॲटल-टाकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रमुख अग्रवर्ती हवाईतळ आहे. स्पोकॅन व यॅकमॉ येथे अन्य प्रमुख विमानतळ आहेत. १९८३ मध्ये राज्यात सार्वजनिक १२० व खाजगी मालकीचे २४५ विमानतळ होते. वॉशिंग्टन सरोवरात पडावांच्या साहाय्याने तयार केलेले दोन मोठे झुलते पूल आहेत. राज्यात जलवाहतूकही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. द कोलंबियन हे पहिले दैनिक १८५२ मध्ये सुरू झाले. १९८३ मध्ये राज्यात २८ दैनिके आणि १३० साप्ताहिके होती. येथे पहिले नभोवाणी केंद्र (१९२०) आणि पहिले दूरचित्रवाणी केंद्र (१९४८) सुरू झाले व या माध्यमांचा विस्तार झपाट्याने झाला. १९८५ मध्ये सु. १६४ नभोवाणी केंद्रे आणि २० दूरचित्रवाणी केंद्रे येथे होती.

लोक व समाजजीवन : लोकसंख्येने विसाव्या क्रमांकावर असलेल्या या राज्याचे इंडियन हे मूळ रहिवासी होत. त्यांची संख्या ६०,७७१ (१९८०) होती. यॅकमॉ इंडियन सर्वांत जास्त असून त्यांचे आरक्षित क्षेत्र ४,५९,०७० हे आहे. चिनूक, क्लॅटसप, निझक्वाली, कोलव्हिल, ओकॅनोगॅन, स्पोकॅन इ. इंडियन वीस आरक्षित प्रदेशांत व संघीय राज्याचे अनुदानित केलेल्या तीन क्षेत्रांत राहतात. उरलेल्या लोकसंख्येपैकी कॅनेडियन आणि स्कँडिनेव्हियन हे सर्वांत अधिक परकीय लोक होत. राज्यात रोमन कॅथलिक चर्चचे सर्वा अधिक अनुयायी असून ल्यूथरन आणि मेथडिस्ट हे दोन मोठे प्रॉटेस्टंट अनुयायी समूह आहेत. यांशिवाय बॅप्टिस्ट, मॉर्मन, प्रेस्बिटेरियन, एपिस्कोपेलियन हे अन्य पंथीय धार्मिक समूह आढळतात. वॉशिंग्टन राज्यातील ४०% लोकसंख्या सिॲटल-एव्हरेट या महानगरीय क्षेत्रात राहते. या व्यतिरिक्त राज्यात आणखी नऊ महानगरीय क्षेत्रे आहेत.

एकूण ४१,३२,१८० लोकसंख्येपैकी गोरे व निग्रो यांची संख्या अनुक्रमे ३८,००,००० आणि १,०६,००० एवढी होती आणि राज्याचे दरडोई उत्पन्न १४,६२५ डॉ. (१९८६) होते.

शिक्षण : वॉशिंग्टनला राज्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्यात प्रागतिक शिक्षणपद्धती अंमलात आली. तत्पूर्वी वॉशिंग्टन हे शैक्षणिक दृष्ट्या तसे मागासलेलेच क्षेत्र होते, कारण या भूप्रेदशात १८३२ मध्ये पहिले विद्यालय फोर्ट-व्हँकूव्हर येथे निघाले आणि अमेरिकन मिशनऱ्यांनी पूर्व वॉशिंग्टनमधील (स्पोकॅन व वाला वालाजवळ) इंडियन जमातींना शिकविण्यास प्रारंभ केला. पुढे वाला वाला येथेच उच्चशिक्षण देणारे राज्यातील पहिले व्हिटमन महाविद्यालय सुरू करण्यात आले (१८५९). सांविधानिक तरतुदीनुसार चीनी, एलन्झबर्ग आणि बेलिंगहॅम येथे १८९० ते १८९३ मध्ये राज्य शिक्षक प्रशिक्षण विद्यालये सुरू करण्यात आली. त्याचीच पुढे विसाव्या शतकात अनुक्रमे ईस्टर्न वॉशिंग्टन, सेंट्रल वॉशिंग्टन आणि वेस्टर्न वॉशिंग्टन या राज्यस्तरीय विद्यापीठांत रूपांतरे झाली. पब्लिक स्कूल ही संकल्पना १८९५ मध्ये राज्यात प्रविष्ट झाली आणि शैक्षणिक संस्थांना शासकीय अनुदानही मिळू लागले. निर्वाचित राज्य अधीक्षक आणि राज्यमंडळ पब्लिक स्कूलवर देखरेख करीत असे. आठ ते पंधरा वर्षे वयोगटांतील मुलामुलींना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. राज्यात एकूण दहा विद्यापीठे आहेत. राज्यात एकूण प्राथमिक शाळांत (बालक मंदिरांसह) आणि माध्यमिक विद्यालयांत १९८२-८३ या शैक्षणिक वर्षात अनुक्रमे ५,०७,००० व २,३२,००० विद्यार्थी शिकत होते. रिचलँड येथील हॅनफर्ड केंद्रात अणुकेंद्रीय अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची व्यवस्था आहे.

ऑलिंपिया येथे राज्य ग्रंथालय (स्था. १८५३) असून देशात सु. ७५ सार्वजनिक ग्रंथालये आहेत. यांपैकी सिॲटल येथील सार्वजनिक ग्रंथालय व वॉशिंग्टन विद्यापीठाचे ग्रंथालय यांमध्ये वैमानिकी आणि महासागरविज्ञान यांवरील अत्याधुनिक संशोधनात्मक दुर्मिळ ग्रंथ आहेत.

स्पोकॅन, टाकोमा, चिनी, सिॲटल वगैरे ठिकाणी संग्रहालये असून सिॲटलच्या कला संग्रहालयात पौर्वात्य देशांतील अनेक कलात्मक नमुने पहावयास मिळतात.

प्रेक्षणीय स्थळे : हे राज्य पर्यटकांचे नंदनवन मानण्यात येते. येथील काही स्थळे मासेमारी व शिकार या खेळांकरिता प्रसिद्ध असून हौशी मच्छीमार पॅसिफिक किनाऱ्यावर साधारणतः एका वर्षात दहा लाखांहून अधिक सामन माशांची शिकार करतात. बर्फाच्छादित पर्वतराजीत बर्फावरील खेळ, विशेषतः स्कीइंग, डिसेंबरपासून उन्हाळ्यापर्यंत चालतो. यांशिवाय स्पोकॅनच्या पश्चिमेकडील ग्रँड कूली धरण, क्लार्क आणि डेव्हिस या समन्वेषकांच्या मिसूरी व पॅसिफिक किनारा यांवरील सफरींचे देखावे, मेरी हिल कॅसल व त्यातील कलाभवन, सिॲटल येथील १८५ मी. उंचीची स्पेसनीड्ल (अवकाशसुई), मौंट रेनीयर, नॉर्थ कॅस्केड्स व ऑलिंपिक ही राष्ट्रीय उद्याने आणि विकसित केलेली शंभर राज्यस्तरीय उद्याने, राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळे (व्हिटमनचे स्मारक, व्हँकूव्हरचा किल्ला इ.) महत्त्वाची आहेत.

सिॲटल हे वॉशिंग्टनमधील सर्वांत मोठे शहर (४,९१,३००-१९८७ अंदाज) आणि औद्योगिक बंदर एलीट उपसागर व वॉशिंग्टन सरोवरादरम्यानच्या सात टेकड्यांवर वसले आहे. तेथून पूर्व देशांशी अमेरिकेचा सागरी व्यापार चालतो. विमाने बनविणे व जहाजबांधणी यांचे कारखाने येथे असून हे अन्नप्रक्रिया उद्योगाचे एक प्रमुख ठिकाण आहे. यांशिवाय रासायनिक द्रव्ये, फर्निचर, यंत्रसामग्री, वस्त्रे इ. निर्मिती व लाकूड कटाई हे उद्योगधंदे येथे चालतात. हे शहर सांस्कृतिक दृष्ट्या प्रसिद्ध असून तेथून पर्यटनदृष्ट्या अनेक राष्ट्रीय उद्याने, महत्त्वाची शिखरे जवळ आहेत. १९६२ मध्ये येथे मोठी जागतिक जत्रा (सेंचरी २१ एक्स्पोझिशन) भरली होती.

टाकोमा (१,५८,९००-१९८७ अंदाज) हे पश्चिम वॉशिंग्टनमधील एक औद्योगिक शहर असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. एकेकाळी ते अमेरिकेचे ‘लंबर कॅपिटल’ म्हणून प्रसिद्ध होते. आजही लाकूड काटकामाचे ते महत्त्वाचे केंद्र असून तेथे रसायने, खते, रंग, अवजारे, फर्निचर, यंत्रसामग्री, विद्युत् उपकरणे, जहाजबांधणी, खाद्यपदार्थ प्रक्रिया इत्यादींचे कारखाने आहेत.शहरात वॉशिंग्टन स्मारकापेक्षा उंच असलेले टाकोमा स्मेल्टर, अलास्कन इंडियनांचा गणचिन्हस्तंभ, प्राणिसंग्रहालय, मत्स्यालय, वनसंग्रहालय, उद्याने ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. दरवर्षी एप्रिलमध्ये येथे डॅफोडिल फुलांचे प्रदर्शन भरते.

ऑलिंपिया हे राजधानीचे शहर व बंदर प्यूजित साउंड आखाताच्या दक्षिण टोकास वसले आहे. तेथे लाकडाच्या वस्तूंची प्रामुख्याने निर्मिती होत असून बीरच्या आसवन्या आणि मच्छीमारीचा धंदा चालतो. ऐतिहासिक संग्रहालय व राज्य ग्रंथालय येथे असून उत्तरेस जवळच ऑलिंपिया शिखर व पूर्वेस रेनीयर शिखर आहे. यांवर हिवाळ्यात बर्फावरील खेळ चालतात.

स्पोकॅन हे पूर्व वॉशिंग्टनमधील एकमेव मोठे औद्योगिक शहर (१,७२,१००-१९८७ अंदाज) असून ते स्पोकॅन धबधब्याच्या पायथ्याशी वसले आहे. कोलंबिया पठारावरील सुपीक प्रदेशामुळे येथे धान्याची घाऊक बाजारपेठ आहे. पशुपालन, धातुखनिजे आणि गव्हाचे आगार यांमुळे तसेच फळफळावळ उत्पादनामुळे शहराचे महत्त्व वाढले आहे. शहरात खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग,  ॲल्युमिनियम धातुशुद्धीकरण, कागद आणि पोर्टलंड सिमेंट यांचे कारखाने आहेत.

संदर्भ : 1. Alkeson, Ray A. Portrait of Washington,

            2. Alwin John A. Between the Mountains: A Portrait of Eastern Washington, 1984.

            3. Carpenter, Allan, Washington, Chicago, 1979.

           4. Clark, Norman H. Washington, Norston, 1976.

           5. Fradin, Dennis B. Washington in Words and Pictures, Chicago, 1980.

           6. Ogden, Daniel M. Bone, Hugh A. Washington Politics,1981.

           7. Satterfield, Archie, Backroads of Washington, 1980.

           8. Swanson, T. Political life in Washington, Pullman, 1985.

           9. Williams, Burton, J. Washington, Readings in the History of the Evergreen State, Coronado Press, 1977.

देशपांडे, सु. र.