रत्नागिरी शहर : महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४७,०३६ (१९८१). मुंबईच्या साधारण दक्षिणेस सु. २२० किमी. मुंबई-गोवा

वरचे : भागेश्वर मंदिर : खालचे : पतितपावन मंदिर.

या १७ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गापासून आत १३ किमी. अंतरावर हे शहर वसलेले आहे. सोळाव्या शतकात विजापूरच्या मुसलमानांची ही प्रशासकीय राजधानी होती. १७३१ मध्ये रत्नागिरी साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांच्या अधिकाराखाली आले. १७८३ मध्ये पेशव्यांच्या एका जिल्ह्याचे ते मुख्य ठाणे होते. १८१८ मध्ये ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. १८२२ मध्ये त्यांनी जिल्ह्याचे मुख्य ठाणे म्हणून रत्नागिरी निश्चित केले. १८६३ मध्ये येथे औद्योगिक प्रशिक्षण विद्यालय, १८६७ मध्ये दीपगृह उभारणी, तर १८७६ मध्ये नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. ब्रह्मदेशाचा राजा थिबा याला ब्रिटिशांनी येथे स्थानबद्ध केले होते. स्वा. सावरकर यांचे त्यांच्या बंदिकाळात (१९२१–३७) येथेच वास्तव्य होते. लोकमान्य टिळकांचे हे जन्मठिकाण असून त्यांचे तेथे स्मारकही आहे. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. शहरात महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यांशिवाय एक सागरजीव संशोधन संस्था, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय व विधी महाविद्यालय आहे. शहरात सिमेंट, सिमेंटच्या विविध वस्तू, लोखंडी खिडक्या, दरवाजे, ट्रंका, पोलादी कानशी इ. तयार करणे, होड्या बांधणे, आंबे, आंब्याचे पदार्थ व मासे डबाबंदीकरण इ. उद्योगधंदे चालतात. शहराजवळील मिरजोळे येथील औद्योगिक वसाहतीत अनेक लहान-मोठे उद्योग केंद्रित झालेले आहेत. भगवती बंदराचा विकास केल्यामुळे शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय रुग्णालयाशिवाय येथे एक मनोरुग्णालयही आहे. येथील रत्नदुर्ग किल्ल्यावरून दिसणारा सागराचा नयनमनोहर देखावा, किनाऱ्यावरील मऊ पांढरी वाळू, पार्श्र्वभागी असलेली माडांची दाट झाडी, भगवती बंदर, मासेमारीच्या सोयीसाठी नव्याने बांधले जात असलेले बंदर, धक्का, मोठमोठे कारखाने, मिऱ्या येथील जहाजबांधणी कारखाना, लोकमान्य टिळक स्मारक, थिबा राजवाडा (१९१०-११), भागेश्वर, राधाकृष्ण, पतितपावन (१९३०), राम इ. मंदिरे, गीताभवन, किल्ला, मत्स्यालय, दीपगृह इत्यादींमुळे रत्नागिरीला दरवर्षी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. येथे एक विमानतळ, आकाशवाणी केंद्र (१९८६), अल्पशक्त्तीचे दूरदर्शन केंद्र (१९८७) आहे.

कोकणभागातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित उद्योगधंदे उभारून कोकणचा औद्योगिक विकास साधण्याच्या दृष्टीने रत्नागिरी येथे २१–२३ मे १९८७ अशी तीन दिवस आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषद संपन्न झाली. कोकण विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य व केंद्र शासन यांच्या संयुक्त्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या या परिषदेत खनिज तेल रसायने, सागरातून तेलनिर्मिती, फळबागायत व पर्यटन या उद्योगांचा परदेशी उद्योजकांच्या सहकार्याने विकास घडवून आणण्याबाबत विचार झाला.

लेखक : पटवर्धन, मधुसूदन; चौधरी, वसंत.