गोकाक : कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या २९,९६० (१९७१). हे बेळगावच्या आग्नेयीस सु. ४८ किमी.वर असून मिरज — बेळगाव लोहमार्गावरील घटप्रभा स्थानकापासून सु. १४ किमी. अंतरावर आहे. येथे आदिलशाहीतील इतिहासप्रसिद्ध किल्ला, जुनी देवळे, सावनूरच्या नबाबाने बांधलेली मशीद व गंजीखाना इ. प्रेक्षणीय स्थळे असून पूर्वी येथे कापड रंगविणे व विणणे ह धंदा जोरात चाले. हल्ली हे कागद, रंगीत लाकडी फळे व खेळणी यांकरिता प्रसिद्ध आहे.

गोकाक धबधबा

गोकाकच्या वायव्येस सु. ५ किमी. अंतरावर घटप्रभा नदीचा सु. ५२ मी. उंचीचा सुप्रसिद्ध गोकाकचा धबधबा आहे. त्याची शोभा ऑक्टोबर ते डिसेंबरअखेर पाहण्यासारखी असते. घटप्रभेच्या उजव्या तीरावर, धबधब्याजवळच एक कापड गिरणी असून येथील पाण्याच्या साठ्याचा उपयोग विद्युत् निर्मिती व शेती यांकरिता होतो. धबधब्याजवळचे खडक भूवैज्ञानिक दृष्ट्या अभ्यसनीय आहेत.

कापडी, सुलभा