कोहीमा : भारताच्या पूर्व सीमेवरील नागालँड राज्याची राजधानी. लोकसंख्या २१,५४५ (१९७१). हे शहर शिलाँगच्या पूर्वेस २२२ किमी., कोहीमा डोंगररांगेत, १,५६१ मी. उंचीवर वसले आहे. थंड व सुखद हवामान असल्याने हे पूर्वीपासूनच लष्करी ठाणे म्हणून प्रसिद्ध होते. आसाम-मणिपूर व पुढे ब्रह्मदेशाकडे रस्ता कोहीमावरून जात असल्याने कोहीमास महत्त्व आले.

निसर्गरम्य कोहीमा

दुसऱ्‍या महायुद्धात जपान्यांच्या साहाय्याने आझाद हिंद सेनेने कोहीमा व्यापले होते. येथे तांदूळ, कापूस, संत्री, बटाटे, लाकूड, बांबू, वेत, नागा लोकांच्या विविध कलाकृती इ. मालांचा व्यापार चालतो. गावात शासकीय कचेऱ्या, रुग्णालय, कृषिकेंद्र, हस्तकलाउद्योग भांडार, नागासंस्कृती संशोधन संस्था, तीन महाविद्यालये व विमानतळ आहे.

ओक, शा. नि.