देवनहळ्ळी : कर्नाटक राज्याच्या बंगलोर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ११,९७८ (१९७१). हे बंगलोरच्या उत्तर ईशान्येस सु. ३५ किमी. असून रस्ते आणि लोहमार्गांचे केंद्र आहे. १५०१ मध्ये अवती घराण्यातील एका पुरुषाने येथे किल्ला बांधला. १७४९ मध्ये म्हैसूरच्या राजांनी, तर १७९१ मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने हे शहर आपल्या ताब्यात घेतले. हैदर अलीचा मुलगा टिपू याचा जन्म येथेच झाला. १८७० पासून येथे नगरपालिका आहे. शहरात भातसडीच्या गिरण्या असून लाखेच्या वस्तू, विडी, मातीची भांडी इ. हस्तव्यवसाय चालतात.

सावंत, प्र. रा.