कॉटन बेल्ट : अमेरिकेतील कापूस पिकवणारा पट्टा. हा सु. ३० उ. ते ३७° उ. या भागात जेथे वार्षिक सरासरी तपमान सु. २१°–२२° से. व वार्षिक सरासरी पाऊस सु. ५० सेंमी. ते १५० सेंमी. असतो व वर्षातील निदान २०० दिवस बिनदहिवराचे मिळतात. अशा भागात, अटलांटिकपासून रॉकी पर्वताच्या पायथ्यापर्यंत पसरलेला आहे. यात दक्षिण व उत्तर कॅरोलायना, ॲलाबॅमा, जॉर्जिया, मिसिसिपी, प. टेनेसी, पू. व. द. आर्‌कॅन्सॉ, पू. टेक्सेस, लुइझिॲना, द. ओक्लाहोमा इ. प्रदेश येतात. हा कापूस विभाग हळूहळू पश्चिमेकडे सरकत असल्याचे दिसते. कापसाव्यतिरिक्त या प्रदेशात मका, गहू, तंबाखू, भुईमूग ही उत्पादने असून पशुपालनही मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिमेकडील कमी पावसाच्या भागात पाणीपुरवठा करावा लागतो व सपाट भागांत यंत्रांचा उपयोग शेताच्या कामी होतो. टेक्सस, मिसिसिपी व आर्‌कॅन्सॉ हे कापूस उत्पादनात आघाडीवर आहेत. अलीकडे न्यू मेक्सिको, ॲरिझोना व कॅलिफोर्निया येथेही पाणीपुरवठ्याच्या साहाय्याने कापूस पिकवितात.

 

लिमये, दि. ह.