स्क्रँटन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पेनसिल्व्हेनिया राज्या- तील लॅकवॉना परगण्याचे मुख्यालय. हे फिलाडेल्फियाच्या उत्तरेस १९३ किमी., न्यूयॉर्कच्या वायव्येस २१७ किमी., लॅकवॉना नदीकाठी वसलेले आहे. लोकसंख्या ७६,०८९ (२०१०). शहराच्या आग्नेयीस प्रसिद्ध पोकानो पर्वत आहे. हे राज्यातील प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

लॅकवॉना नदीखोर्‍यातील हे शहर १७८८ पासूनचे असून त्याचे ‘डीप हॉलो’ असे नाव होते. तसेच स्क्रँटन प्रारंभी युन्यनव्हिल, स्लॉकम हॉलो, हॅरिसन, स्क्रँटोनिया या नावाने ओळखले जात असे. १८५१ पासून याचे स्क्रँटन असे नाव आहे. येथे ग्रीस्ट, लाकूड यांच्या गिरण्या व लाकडी कोळशाची भट्टी होती. जॉर्ज व सेल्डन या स्क्रँटन बंधूंनी येथे लोखंड उद्योग सुरू केला. स्क्रँटन स्टील कंपनी १८८० मध्ये येथे उभारण्यात आली. ही कंपनी लॅकवॉना आयर्न अँड कोल कंपनीत समाविष्ट होऊन लॅकवॉना आयर्न अँड स्टील कंपनी झाली. १९०२ मध्ये ही कंपनी न्यूयॉर्कमधील बफालो येथे स्थलांतरित झाली. त्यावेळी याचा शहराच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. परंतु स्क्रँटन कोळसा खाणीमुळे हे पुन्हा भरभराटीस आले व अँथ्रॅसाइटची राजधानी म्हणून ओळखले जाऊ लागले मात्र कोळसा उद्योगातील अधोगतीमुळे शहराचे महत्त्व कमी होऊ लागले होते. स्क्रँटन योजनेमुळे शहराच्या उद्योगांस चालना मिळाली. १८६६ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला.

येथे कापड, विद्युत् साहित्य, छपाई व प्रसिद्धी, फर्निचर, कातडी वस्तू , रसायने, अन्नपदार्थ, कागद इ. उद्योगधंदे चालतात. येथील नॉटिंगहॅम लेस, सुती, रेशमी व लोकरीच्या वस्तू प्रसिद्ध आहेत. येथे स्क्रँटन विद्यापीठ (१८८८), मेरीवूड महाविद्यालय (१९१५), पेनसिल्व्हेनिया स्टेट विद्यापीठाची एक शाखा आहे. येथील प्राणिसंग्रहालय, वनस्पती उद्यान, कोळसा खाणीचा नमुना यासाठी प्रसिद्ध असलेले नय ऑगपार्क, एव्हर्हार्ट संग्रहालय ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.