ग्वादर : पाकिस्तानचे बलुचिस्तान किनाऱ्यावरील बंदर. लोकसंख्या ८,१४६ (१९६१). हे अरबी समुद्राच्या मकरान किनाऱ्यावर कराचीपासून सु. ४५९ किमी. आहे. हे भारत व पाकिस्तान यांच्या इराणचे आखात व यूरोप यांकडे जाणाऱ्या तारायंत्रमार्गावर आहे. येथे मासे, खजूर, मीठ, लोकर यांचा व्यापार चालतो. अठराव्या शतकाच्या अखेरीस ग्वादर कलातकडून ओमानकडे आले व ८ सप्टेंबर १९५८ रोजी सभोवतालच्या सु. ७८० चौ.किमी. प्रदेशासह ते पाकिस्तानला मिळाले. याचे प्राचीन नाव बार्ना होते आणि १५८१ मध्ये पोर्तुगीजांनी जाळपोळ करून ते उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता.                                                     

ओक, द. ह.