म्यूलूझ : ईशान्य फ्रान्समधील एक औद्योगिक शहर (कम्यून). ते अँल्सेस-लॉरेन भूप्रदेशात व रँ विभागात बाझेल या स्वित्झर्लंडमधील शहराच्या वायव्येस सु. २७ किमी. वर व कॉल्मार शहराच्या दक्षिणेला एल नदीकाठी ऱ्होन ऱ्होइन कालव्यावर वसले आहे. लोकसंख्या १,१२,००० (१९८२).

म्यूलूझचा आठव्या शतकात प्रथम उल्लेख (७१७) आढळतो. ते १२७३ मध्ये खुले नगर होते. पुढे पंधराव्या शतकात त्याने स्वित्झर्लंडबरोबर मैत्रीचा तह केला. ते सोळाव्या शतकात (१५८६) एक तटस्थ गणयंत्र होते. हा तह १७९८ मध्ये संपुष्टात येऊन म्यूलूझच्या नागरिकांनी स्वेच्छेने फ्रान्समध्ये राहण्याचे ठरविले. फ्रँको-जर्मन (प्रशिया) युद्धानंतर (१८७१), हा भाग अल्सेसबरोबर जर्मनीला देण्यात आला. पुढे १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धानंतर तो पुन्हा फ्रान्सला मिळाला. पण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्याच्यावर जर्मनीचे आधिपत्य होते आणि युद्धकाळात लष्करी कारवायांमुळे शहराचे आतोनात नुकसान झाले. १९४५ नंतर तेथे पुन्हा फ्रेंचांचे वर्चस्व प्रस्थापित होऊन भग्न इमारतींची डागडुजी करण्यात आली.

म्यूलूझ ही मध्ययुगापासून एक महत्त्वाची व्यापारपेठ तसेच लघुउद्योगांचे केंद्र आहे. वस्त्रनिर्मिती आणि त्यांवर वेगवेगळ्या आकृतिबंधांचे ठसे उमटविणे हा धंदा फार मोठ्या प्रमाणावर चालतो. तलम कापडांवरील छपाईचा कारखाना येथे १७४६ मध्ये सुरू झाला. याशिवाय रेल्वे, रूळ, यंत्रसामुग्री, पोलादी नळ्या, प्लॅस्टिके, रसायने इत्यादींचे उत्पादन होते. या कामावरील मजुरांची आदर्श वसाहत प्रसिद्ध असून, तिचे नियोजन डॉल्फस या मानवतावादी महापौराने शहराच्या वायव्य कोपऱ्यात १८५३ मध्ये कले. तेथे प्राणीशास्रविषयक मोठे उद्यान आहे. फ्रान्समधील पोटॅशच्या सर्वांत मोठ्या खाणी म्यूलूझच्या परीसरात आहेत. शहरात सोळाव्या शतकातील एक नगरभवन असून, प्राचीन घरांचे अवशेष आढळतात.

देशपांडे. सु. र.