ग्रेट फॉल्‌स : अमेरिकेच्या माँटॅना राज्यातील सर्वांत मोठे व प्रमुख औद्योगिक शहर. लोकसंख्या ६o,o९१ (१९७o). हे मिसूरी नदीकाठी हेलेनाच्या ईशान्येस सु. १२o किमी. तसेच मिसूरी धबधब्यापासून सु.२o किमी.वर आहे. येथे निर्माण होणाऱ्या विद्युत्‌शक्तीवर सर्व उद्योगधंदे चालतात. तांबे व जस्त यांच्या खाणी व शुद्धीकरण कारखाने, तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा बनविणे, तेलशुद्धीकरण कारखाने, मांस डबाबंद करणे, लोखंडी वस्तू तयार करणे, विटा, फरशा इत्यादींचे कारखाने चालतात. शेती उत्पादन आणि नानाविध उद्योगधंद्यांनी हे शहर गजबजलेले आहे. येथे राज्यमत्स्योत्पादन केंद्र असून आसमंतात गरम पाण्याचे झरे आहेत. विमानवाहतूक व लोहमार्गाचे हे केंद्र असून येथील आंधळे व बहिरे यांच्याकरिता असलेले विद्यालय, स्टुडिओ व वस्तुसंग्रहालय प्रेक्षणीय आहेत.

लिमये, दि. ह.