सोव्हिएट युनियन : अधिकृत नाव युनियन ऑफ सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिक्स. १९९१ पूर्वीचे जगातील एक सामर्थ्यशाली साम्यवादी राष्ट्र. रशियन भाषेतील सोव्हिएट याचा अर्थ मंडळ (कौन्सिल). यावरून अनेक स्वायत्त मंडळांचा समूह या अर्थी देशाला ‘सोव्हिएट युनियन’ हे नाव देण्यात आले. १९२२ मध्ये याची अधिकृतरीत्या निर्मिती झाली होती. १९२२ ते १९९१ या कालावधीत ते अस्तित्वात होते. १९४० ते १९८० या कालावधीत अमेरिका व सोव्हिएट युनियन हे जगातील दोन बलाढ्य देश होते. (मराठी विश्वकोशामध्ये रशिया या रूढ नावाने तसेच १५ प्रजासत्ताकांच्या स्वतंत्र नोंदी यथास्थळी आहेत). त्यांच्या सर्वच क्षेत्रांतील स्पर्धेमुळे जगाच्या इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटनांची नोंद झाली आहे. सोव्हिएट युनियन हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठा व लोकसंख्येने तिसरा देश होता. १९४० पर्यंत या देशात १५ प्रजासत्ताकांशिवाय अन्य २० स्वायत्त राज्यांचा, अनेक स्वायत्त प्रदेशांचा व क्षेत्रांचा समावेश झाला होता. याची मॉस्को ही राजधानी होती.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष गोर्बाचॉव्ह (जन्म २ मार्च १९३१) यांचे उदारमतवादी धोरण व परदेश नीती यांमुळे देशातील शीतयुद्ध संपुष्टात आले. देशाबाहेर त्यांची लोकप्रियता वाढली. मात्र देशांतर्गत विरोध झाला. परंपरावादी कम्युनिस्ट व देशातील परंपरावाद्यांनी त्यांना धारेवर धरले. गोर्बाचॉव्हांनी प्रसंगी लष्कराद्वारे फुटीर गटांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु याचे पर्यवसान रशियाची आर्थिक घडी विस्कळित होण्यात झाले. परिणामतः वाढत्या विरोधाला तोंड देऊन त्यांनी १९९० मध्ये आपली सत्ता बळकट होण्यासाठी कायदा केला. परंतु सोव्हिएट युनियनचे तुकडे होणार या भीतीने १९९१ मध्ये गोर्बाचॉव्हांना सत्तेवरून दूर करून क्रिमियामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले. गोर्बाचॉव्हांनी राजकीय समझोता करून राजकारणात पुनश्च प्रवेश केला. परिणामी त्यांच्या विरोधकांचा प्रभाव वाढला. सोव्हिएट युनियनचे सार्वभौम राज्य म्हणून दर्जा टिकविण्याचा गोर्बाचॉव्ह यांनी अटोकाट प्रयत्न केला परंतु अखेरीस त्यांना पक्षप्रमुख व राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. ‘सुप्रीम सोव्हिएट’ ने कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व कृतींना अमर्याद काळासाठी प्रलंबित केले. १९९१ मध्ये १५ प्रजासत्ताकांनी स्वातंत्र्य जाहीर केले व सामर्थ्यशाली एकसंध सोव्हिएट युनियनचे तुकडे पडले.

पहा : रशिया.

चौंडे, मा. ल.