रतलाम : मध्य प्रदेश राज्याच्या रतलाम जिल्ह्याचे मुख्य शहर. लोकसंख्या १,५६,४९० (१९८१). ते इंदूरच्या वायव्येस १०४ किमी. अंतरावर पश्चिम माळवा पठारावर सस.पासून ४८२ मी. उंचीवर वसले आहे. पूर्वीच्या रतलाम संस्थानाची राजधानी येथेच होती.

रतलाम हे लोहमार्ग प्रस्थानक असून कापूस, ज्वारी, गहू, अफू ही पिके याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. परिणामी रतलाम ही गहू, ज्वारी, अफू यांची मोठी बाजारपेठ समजली जाते. शहरात सूत व सुती कापड, रेशीम, साखर इत्यादींच्या गिरण्या असून कापड व वस्त्रे, कागद, पुठ्ठे व तज्जन्य वस्तू, छत्र्या, अफू इत्यादींचे उत्पादन होते.

रतलाममधील ऐतिहासिक वास्तूंमध्ये राजप्रासाद, जैन देवालये इत्यादींचा अंतर्भाव होतो. शहरात प्राणिसंग्रहोद्यान, संगीत अभ्यास केंद्र, तसेच विक्रम विद्यापीठाशी संलग्न अशी महाविद्यालये आहेत.

गद्रे, वि. रा.