ग्रिंडेलव्हाल्त : मध्य स्वित्झर्लंडमधील एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र. लोकसंख्या ३,५११ (१९७o). याच नावाच्या बर्नीज आल्प्समधील दरीत हे वसले असून त्याच्या दक्षिणेकडील वेटरहॉर्न, मेटेनबर्ग व आयगर या शिखरांवरून ग्रिंडेलव्हाल्त नावाच्या दोन हिमनद्या उगम पावतात. २१ किमी. वायव्येकडील इंटरलाकेन शहराशी हे ‘रॅक’ पद्धतीच्या रेल्वेने जोडलेले असून युंग फ्राऊ पर्वतावरील यूरोपातील सर्वोच्च ठिकाणी (३,४५o मी.) जाणरी तसेच यूरोपातील सर्वांत लांब व प्रथमच बांधलेली झुलत्या पाळण्याची रेल्वे येथूनचे निघते. गिंडेलव्हाल्त परिसरात उत्तम चराऊ कुरणे व फळझाडे असल्याने पर्यटन व्यवसायाशिवाय पशुपालन व कृषी हेही व्यवसाय आहेत.

ओक, द. ह.