भंडारा जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या ईशान्य कोप-यातील, नागपूर विभागातील एक जिल्हा, विस्तार २०◦ 39′ उ. ते २१◦ ३८’ उ. अंक्षाश व ७९◦ २७’ पू.ते ८०◦ ४२’ पू. रेखांश यादरम्यान. काहीसा कासवासारखा आकार असलेल्या या जिल्हयाची पूर्व-पश्चिम लांबी सु. १२९ किमी. व उत्तर-दक्षिण रुंदी सु. १०९ किमी. आहे. क्षेत्रफळ ९.२१४ चौ.किमी. (महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या २.९९%). लोकसंख्या १८,३६,२३४-१९८१ ( महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या २.९४%). भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेस गडचिरोली व चंद्रपूर, पश्चिमेस नागपूर हे महाराष्ट्रातील जिल्हे, तर उत्तरेस बालाघाट, पुर्वेस दुर्ग हे मद्य प्रदेश राज्यातील जिल्हे आहेत. भंडारा, गोंदिया व साकोली हे जिल्ह्याचे तीन तालुके आहेत. उत्तरेकडे बालाघाट व भंडारा जिल्ह्यांदरम्यान बावनथरी, वैनगंगा व वाघ या नद्यांची नैसर्गिक सरहद्द आहे. तसेच नैऋत्येस नागपूर-भंडारा व दक्षिणेस चंद्रपूर-भंडारा यांदरम्यानची काही सरहद्द वैनगंगा नदीमुळे निर्माण झालेली आहे. भंडारा शहर ( लोक. ५६,०२९-१९८१ ) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

भंडारा जिल्ह्याचा प्राचीन इतिहास विशेष ज्ञात नाही. पूर्वी या प्रदेशावर गवळ्यांचे राज्य असावे. इ.स. सातव्या शतकापासून येथील काही भागावर हैह्य़वंशीय राजपूत राजांचे अधिराज्य होते व त्यांची राजधानी नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे असावी, असे मध्य प्रदेश राज्याच्या बिलासपुर जिल्हयातील रतनपुर येथे सापडलेल्या शिलालेखावरुन (इ.स. ११८४) दिसून येते. बाराव्यात ते सोळाव्या शतकांपर्यंतच्या कालावधीत राजपूतांच्या सत्तेचा -हास होत जाऊन तेथे गोडांची सत्ता प्रस्थापित झाली. सतराव्या शतकात येथील काही भाग छिदवाडा जिल्ह्यातील देवगड येथील बख्त बुलंदशहाच्या अंमलाखाली होता. या काळात या प्रदेशाची बरीच प्रगती झाली. बख्त बुलंदनंतर चांद सुलतान, रघुजी भोसले, आप्पासाहेब भोसले व नंतर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली हा भाग आला. राजे रघुजी भोसले यांच्या कारकीर्दीत शेतीला व उद्योगध्यांना उत्तेजन मिळाले. त्यामुळे या प्रदेशाची भरभराट होऊन प्रजा सुखी व संपन्न होती, असा उल्लेख आढळतो. तसेच त्यांनी पेंढा-य़ांचा जनतेला होणार त्रास कमी करण्यासाठी पवनी, सान-गडी, कामठा, लाजी इ. ठिकाणी गढ्या बांधून घेतल्या. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत राज्यकारभाराचे मुख्य ठिकाण भंडारा केले व पूर्वीच्या वैनगंगा प्रांत भंडारा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला.

भूवर्णन : भंडारा जिल्हा पूर्णपणे वैनगंगा नदीखो-यात येतो.जिल्ह्याच भूप्रदेश सामान्यपणे सपाट असून अधूनमधून त्यावर सुट्या डोंगररांगा पसरलेल्या आढळतात. जिल्हयाचा वायव्य व पूर्व भाग डोंगराळ आहे. भूरचनेच्या दृष्टीने जिल्ह्याचे प्रामुख्याने चार स्वाभाविक विभाग पाडले जातात : (१) गायमुख व अंबागड डोंगररांगांचा प्रदेश, (२) गायखुरी व प्रतापगड डोंगररांगांचा प्रदेश, (३) वैनगंगा नदीचे खोरे आणि (४) वाघ व पांगोली नद्यांची खोरी.

जिल्ह्याच्या वायव्य भागात असलेली अंबागड डोंगररांग (सरासरी रुंदी ३ किमी. व लांबी ३० किमी.) ही सातपुडा पर्वताचाच विस्तारित भाग आहे. हित गायमुख, अंबागड व चांदपूर टेकड्य़ा असून १७०० मध्य़े बांधलेली अंबागड गढीही आहे. या डोंगररांगेमुळे बावन थरी नदीखोरे जिल्ह्याच्या बाकीच्या भागापासून अलग झालेले आहे.

जिल्ह्याच्या मद्याभागात भंडारा शहराच्या पूर्व भागापासून ईशान्येस गोंदिया रेल्वे स्थानकापर्यंत गायखुरी डोंगररांग पसरली असुन तिच्यात कोका, गायखुरी, गंगाझरी या टेकड्या येतात. येथे अनेक कमी उंचीची, काहीशी वृक्षाच्छादित शिखरे तसेच टेकाडे आढळतात. भंडारा शहराजवळच पश्चिमेश बल्लाही डोंगररांग आहे. तीत काही वालुकामांच्या टेकड्यांवर ग्रॅनाइट खडक आहेत. जिल्ह्याच्या अतिपूर्व भागात दरेकसा टेकड्या असून त्य़ा दाट असण्य़ांनी आच्छादलेल्य़ा आहेत. पश्र्चिमेकडील टेकड्यां पेक्षा यांची उंचीही काहीशी जास्त आहे. आग्नेय भागात नवेगाव डोंगरमाला असून तीत प्रतापगड, नवेगाव, पळसगाव व चिंचगड टेकड्यांचा समावेश होतो. नवेगाव डोंगरांगांच्या पश्चिमेस चुलबंद नदीच्या दोन्ही काठांवरील प्रदेशात सांगडी, अड्यार व पुरकाबीन टेकड्या आहेत. गायमुख, चांदपुर व अंबागड ही डोंगरांची नावे जवळच्या गावांवरुन पडली आहेत.

वैनगंगा, बाबनथरी, वाघ-पांगोली व चुलबंद या नद्यांच्या खो-यांचा प्रदेश सपाट असून काही ठिकाणी अधूनमधून अवशिष्ट टेकड्या आढळतात. जिल्ह्यात काळी कन्हार, सिहार, मोरंद, खरडी, भरडी हे मृदाप्रकार आढळतात. कन्हार जमिनीचे (गाळाची सुपीक जमीन) प्रमाणात जास्त असून ती चिकण दुमट पोताची, खोल, चोपण व ओलावा टिकवून धरणारी असल्याने तीमधून वर्षातून दोन पिके काढली जातात. नद्यांपासून दूर थोड्या उंचवट्याच्या भागात मोरंद ही भरड पोताची जमीन आहे. या मृदेत वाळू, चुना किंवा दोहोंचेही मिश्रण आढळते. कन्हार व मोरंद मृदामुख्यत: वैनगंगा व चुलबंद खो-यात आणि जिल्ह्याच्या दक्षिण भागात आढळतात. सिहार मृदा तांबडी-पिवळसर रंगाची असून ती स्फटिकमय खडकापासून ऑक्सिडीकरणाने निर्माण झालेली आहे. खरडी जमीन गर्द रंगाची व चुनखडीमिश्रित असून ती कमी सुपीक आहे. कमी प्रतीच्या सिहार जमिनीला ‘खरडी’ म्हणतात. लागवडीखालील बरीचशी जमीन मोरंद व सिहारप्रकारची आहे. या दोन्हीही जमिनी अम्लीय प्रकारच्या आहेत. सिहार ही भाताच्या पिकास उत्तम आहे, तर मोरंद ही प्रामुख्याने गहू, अळशी या रब्बी पिकांसाठी व खरीप ज्वारीसाठी चांगली आहे. डोंगरपायथ्याच्या व उताराच्या प्रदेशात कमी प्रतीची वरडी, तर नदीकाठांवरील भागात काळी कछार, तांबडी, वाळुमिश्रित मरहनी व रेताडी अशा प्रकारची जमीन आहे. मरहनी जमीन बागायती पिकांसाठी वापरली जाते. काळया रेगूर मृदेने फारच कमी प्रदेश व्यापला आहे.

जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे धातुक मँगॅनीज हे असून डोंगरी बुझुर्ग, सितासावंगी व कुरमुडा-चिकला हे मँगॅनीजच्या साठयांचे तीन प्रमुख पट्टे आहेत. याशिवाय क्रोमाइट, कायनाइट, सिलिमनाइट, कुरूविंद हीही खनिजे महत्त्वाची आहेत. लोखंड,अँटिमनी, सोने, अभ्रक, संगजिरे, शिसे यांची खनिजे तसेच काही किरणोत्सर्गी खनिजेही जिल्ह्यात सापडतात. पवनीजवळ क्रोमाइट, अँटिमनी व शिसे पोहरा येथे सिलिमनाइट पोहराजवळील टेकडयांच्या पायथ्याशी कुरूविंद दहेगाव ते पिंपळगावदरम्यान तसेच गिरोली, पारडी, मोगरा, दिघोरी, गारजाभोंगा, मिरेगाव येथे कायनाइट,सिलिमनाइट कोखाजवळ सोने पारसोरीच्या वायव्येस पाच किमी. वर युरेनियम ऑक्साइड गोगिमेर व पहुगावजवळ हेमॅटाइट-कॉर्ट् झाइट मोहळगावजवळ हिरवे अभ्रक आणि साकोली तालुक्यात संगजिरे सापडते.

भंडारा जिल्ह्याचे जलवाहन वैनगंगा व तिच्या वाघ, बावनथरी, चुलबंद, गाढवी या उपनद्यांनी केलेले आहे. उत्तरेकडून मध्य प्रदेश राज्यातून वाहत आलेली वैनगंगा नदी प्रथम काही अंतर जिल्ह्याच्य़ा उत्तर सीमेवरुन व पुढे जिल्ह्याच्य़ा वायव्य भागातून, पश्र्चिम सरहद्दीवरून, जिल्ह्याच्या नैऋत्य भागातून व शेवटी जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरून वाहत गेल्यावर पुढे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाते. या नदीने जिल्ह्याच्या प.भागाचेच अधिक जलवाहन केले आहे. वाघ (लांबी सु. १६६ किमी.) ही वैनगंगेची प्रमुख उपनदी पूर्वी जिल्ह्याच्या पूर्व भागाचे जलवाहन करते.आग्नेय भागातील चिचगड टेकडयांत उगम पावून अरण्यमय प्रदेशातून उत्तरेस वाहत गेल्यानंतर उत्तर सरहद्दीजवळ काटी गावाजवळ ती वैनगंगेला मिळते. कुआघस ही उजव्या तीरावरील, तर सातवाहिनी, पांगोली ह्या डाव्या तीरावरील वाघ नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. बावनथरी ही वैनगंगेची उपनदी जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून, पूर्वेस ४८ किमी. वाहत जाऊन वैनगंगेला मिळते. बोदलकसा व तोंडा ह्या बावनथरीच्या प्रमुख उपनद्या होत. अंबागड, गायमुख, सुर, कन्हान या नद्या वैनगंगेला उजवीकडून, तर बोदलकसा व चोरखमारा या वैनगंगेला डावीकडून येऊन मिळतात.

चुलबंद (लांबी ११४ किमी.) ही जिल्ह्याच्या मध्यातून वाहणारी प्रमुख दक्षिणवाहिनी नदी आहे. गायखुरी डोंगररांगांत उगम पावणारी ही नदी जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवर वैनगंगेला मिळते. आग्नेय भागातील चिचगड पठारावर उगम पावणारी गाढवी नदी खोल व अरूंद द-या-निद-यांतून प्रथम पश्चिमेस व पुढे नैऋत्येस वाहत जाऊन दक्षिणेकडे जिल्ह्याच्या बाहेर वैनगंगेला मिळते.

जिल्ह्याचा बराच प्रदेश पट्टिताश्म व सुभाजा खडकांनी बनलेला असल्याने येथे कायम स्वरूपाच्या पाण्याचे झरे फारच कमी आहेत. वायव्येस अंबागड डोंगरातील गायमुख झरा, पूर्वेस दरेकसाच्या उत्तरेस दलदली झरा आणि चुलबंद नदीच्या वरच्या टप्यातील टाटेकासा व उमरझरी हे प्रमुख झरे आहेत.

जिल्ह्यात ५८० मोठे आणि १३,७५८ लहान व मध्यम आकाराचे तलाव आहेत. म्हणूनच ‘महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा’ अशी भंडारा जिल्ह्याची ख्याती आहे. येथील तलाव दोन प्रकारचे आहेत. पहिला प्रकार म्हणजे डोंगराळ प्रदेशात, विशेषतः गायखुरी, नवेगाव व पळसगाव डोंगररांगांमधील अर्धचंद्राकार खोलगट भागातील तलावांचा. हे तलाव आकाराने मोठे असले, तरी त्यांचा विस्तार अनियमित असून या तलावांचे काठ घनवेष्टित, ओबडधोबड टेकडयांनी बनलेले असल्यामुळे त्यांवरील पाणी तलावात जमा होते. या तलावाची बांधनी कोहली जमातीच्या आदिवासींनी केली असून बांधकामामध्ये कसल्याही योजनाबद्ध तंत्राचा वा अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर केलेला नाही.

दुस-या प्रकारच्या तलावांची बांधणी सामान्यपणे डोंगरपायथ्याच्या उतारावर किंवा दरीच्या सामान्य उताराच्या भागात मातीचे बांध घालून केलेली आढळते. यात प्रामुख्याने पावसाचे पाणी साठते. यांचे पाणलोट क्षेत्रही कमीच आहे. त्यामुळे यांचे स्वरूप हंगामी असून उन्हाळ्यात किंवा अवर्षणकाळात पाणीपुरवठयासाठी यांचा उपयोग होऊ शकत नाही. तरीही जलसिंचनाच्या व मत्स्यपालनाच्या दृष्टीने त्यांना महत्त्व आहे.

नवेगाव, शिवनी, खैरबांडा(खळबंदा), बोदलकसा, चोरखमारा, चांदपूर हे जिल्ह्यातील प्रमुख तलाव होत. नवापूर गावाच्या पूर्वेस नवेगाव हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तलाव (परिघ २७ किमी., सरासरी खोली १२मी.,क्षेत्रफळ २० चौ. किमी. आणि पाणलोट क्षेत्र ९०चौ. किमी.) आहे. ‘सात बहिणी’ (सेव्हन सिस्टसर्स) म्हणून ओळखल्या जाणा-या सात टेकडयांनी तलाव वेढला असून सर्व परिसर निसर्गरम्य आहे. तलावाच्या मध्यभागी मालडोंगरी नावचे बेट असून आसपासच्या खेडयांतील श्रीमंत शेतक-यांचे पेंढा-यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी याचा उपयोग केला जात असल्याचे सांगितले जाते.

साकोली गावाच्या दक्षिणेस १० किमी. वरील शिवनी तलावाच्या तीन बाजू वनाच्छादित टेकडयांनी वेढलेल्या असून चौथ्या बाजूवर १९०मी. लांबीचा बांध आहे. जिल्ह्याच्या उत्तरमध्य भागात गायखुरी डोंगररांगातील दोन टेकडयांमध्ये खैरवांडा तलाव व त्याच्या साधारण दक्षिणेस बोदलकसा हा इंग्रजी ‘जी’ अक्षराच्या आकाराचा तलाव असून याचा उत्प्रवाह बोदलकसा नदीद्वारे वैनगंगेत जातो. बोदलकसा तलावाच्या नैऋत्येस १० किमी. वर चोरखमारा तलाव असून याचा उत्प्रवाह गोरखमारा नदीद्वारे वैनगंगेत मिळतो. याशिवाय चांदपूर गावाजवळचा चांदपूर तलाव, नवेगाव तलाव महत्त्वाचे आहेत. बहुतेक तलावांपासून कालवे काढण्यात आले असून त्यांचा उपयोग जलसिंचनासाठी केला जातो.

हवामान : समुद्रकिना-यापासून जिल्हा दूर असल्यामुळे येथील हवामान विषम आहे. सामान्यपणे जानेवारी हा सर्वात थंड, तर मे हा सर्वात उष्ण महिना असतो. मात्र शेजारच्या नागपूर जिल्ह्याइतके येथील हवामान उष्ण नसते. डिसेंबर व जानेवारी या थंड महिन्यांत दैनिक सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे ४२.१◦ से. व २८.९◦ से. असते.गोंदिया येथे ४६.१◦ से. (२६ मे १९५४) इतक्या सर्वात जास्त तपमानाची व ६◦ से.(३ जानेवारी १९५१) इतक्या कमी तपमानाची नोंद झालेली आहे.जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १४७ सेंमी. आहे. एकूण पर्जन्यापैकी ९०% पर्जन्य नैऋत्येस मोसमी वा-यांच्या काळात मिळतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढलेले आढळते. चोवीस तासांतीलकमाल पर्जन्याचा उच्चांक (३९.५२सेंमी.) पांगरी येथील आहे (२५ जुलै १९३७). बंगालच्या उपसागरात निर्माण होणा-या चक्री वादळाचा जिल्ह्याच्या हवामानावर अधूनमधून परिणाम होत असतो. उन्हाळ्यात धुळीची वादळे, तर उन्हाळ्यात व नैऋत्य मोसमी वा-यांच्या काळात झंझावात येतात.

भंडारा जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४५.८१% क्षेत्र वनाच्छादित आहे. एकूण वनांपैकी ३१.२४% वने राखीव, ५०.४१% वने संरक्षित व १८.३५% वने महसूल विभागाच्या अखत्यारीतील आहेत. वनाच्छादित प्रदेश प्रामुख्याने डोंगररांगावर आढळतात. येथील अरण्ये उष्ण कटिबंधीय पानझडी प्रकारची असून मिश्र व साग अरण्ये असे त्याचे दोन प्रकार पडतात. साग हा येथील आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष असून या वृक्षाच्या अरण्यांनी एकूण ५% क्षेत्र व्यापले आहे. साग, हालडा, टिनसा,शिसव, हुआ, धावडा, तेंडू, लेंडिया, आवळा, आचार, मोयेन, बिजा, मिरा, मोह, खालई, मोखा, धामण, सेमाल, हालदू, तिवस, रोहान, खैर, डिकेमाली, गारारी इ. व्यापारी दृष्टया महत्त्वाचे वृक्ष आहेत.

अरण्यांत प्राणीही बरेच आहेत. काळीवलालमाकडे, वाघ, सांबर, चितळे, बिबळया, रानमांजर, तरस, कोल्हा, गवा, रानकुत्रा, अस्वल, बिजू, रानडुक्कर, ससा, सायाळ, मुंगुस, भेकरा, माउस डीअर, नीलगाय, काळवीट, चिंकारा, चारशिंगी हरिण, घोरपड, करडी, खार, विविध प्रकारचे साप हे प्राणी व हळदी, सुतारपक्षी, मोर, ग्राउझ, करडे तितर, हिरवे कबूतर, लावा, होला इ. पक्षी अरण्यात, तर बदक, टील, पाणकोळी, करकोचा, बक इ. तलावांचा व तलाव परिसरात आढळतात.

आर्थिक स्थिती :  शेती हा जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून उदरनिर्वाहासाठी ७०.५५% लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. १९७४-७५ च्या अखेरीस एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी लागवडीखालील स्थूल क्षेत्र ५४.४१% होते. लागवडीखालील निव्वळ क्षेत्रापैकी ३२.१२% क्षेत्रात एकापेक्षा अधिक पिके घेण्यात आली. जलसिंचनाच्या अल्प सोयी, अपुरा पर्जन्य, जमिनीची मोठया प्रमाणावर होणारी धूप, कमी आकाराचे धारणक्षेत्र या कारणांमुळे जमिनीची उत्पादकता कमी आहे. भात हे येथील प्रमुख पिक असून गहू, ज्वारी, हरभरा, तूर, भुईमूग, तृणधान्य़े, कडधाण्ये हीही पिके घेतली जातात. गहू व हरभरा वगळता इतर पिकांचे १९६०-६१ च्या उत्पादनाच्या तुलनेत १९७४-७५ चे दर हेक्टरी उत्पादन कमी झालेले आढळते.९१.०५% क्षेत्रातून अन्नधान्याच्या व ८.९५% क्षेत्रातून बिगर-अन्नधान्याची पिके घेतली गेली (१९७४-७५).

निव्वळ लागवडीखालील (३,८२,२०० हे.) जमिनीपैकी ३९.८८% (१,५२,४२७ हे.) जमिन जलसिंचनाखाली आहे. साकोली तालुक्याच्या बाबतीत मात्र हे प्रमाण ६२.९८% आहे (१९७४-७५). १९६०-६१ मध्ये हेच प्रमाण जिल्ह्याच्या बाबतीत ३२.६६% आणि साकोली तालुक्याच्या बाबतीत ३६.२४% होते. एकूण १,५२,४२७ हे. इतक्या निव्वळ जलसिंचिंत क्षेत्रापैकी १,०६५६९ हे. तलावांद्वारे ३३,९९४ हे. सरकारी कालव्यांद्वारे ७,४९३ हे. विहिरींद्वारे व ४,३७१ हे. क्षेत्राला इतर मार्गांनी जलसिंचन केले गेले (१९७४-७५). वाघ नदीप्रकल्प व इटिडाहो प्रकल्प हे प्रमुख प्रकल्प, तर वाघेडा तलाव, सोरणा तलाव, बोदलकसा तलाव, चांदपूर तलाव, चोरखमारा तलाव, खैरबांडा तलाव, मानगड तलाव, संग्रामपूर, चुलबंद तलाव, बेलेकर बोथाली तलाव, कालीसारार हे जिल्ह्यातील मध्यम स्वरुपाचे प्रकल्प आहेत.

जिल्ह्यात १९७२ मध्ये पशुधन पुढीलप्रमाणे होतेः ६,४७,१८७ गुरे १,०९०५१ म्हशी २,३८६ मेंढया १,७९,४८६ शेळ्या ५,००,०२१ कोंबडया १,००० घोडे व खेचरे आणि १०,००० इतर प्राणी.१९७२-७६ साली पशुरुग्णालये ६५ होती. जिल्ह्याला वनांपासून ४,६७,३४,७५६ रुपये उत्पन्न मिळाले (१९७५-७६). मत्स्योद्योग विकासास बराच वाव आहे.

जिल्ह्यातील उद्योग प्रामुख्याने कृषी व वनोत्पादनावर आधारित आहेत. शेतीमधून निघणारी भात, तेलबिया ही प्रमुख व्यापारी पिके, वने वनोत्पादने, मँगॅनीज, लोह व इतर खनिजांचे साठे इत्यादींच्या विपुलतेमुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासास खूपच वाव आहे. खापरखेडा, तुमसर या विद्युतनिर्मिती केंद्रांकडून येथील कारखान्यांना विद्युतपुरवठा केला जातो. कवडसी येथेही एक उपविद्युत् निर्मिती केद्र उभारले जात आहे. अलीकडे भांडवल पुरवठाही अधिक झाला आहे. शासनांचेही औद्योगिक विकासाचे प्रय़त्न चालू असून भंडारा येथे स्थापन केलेली औद्योगिक वसाहत, हा त्या दृष्टीने केलेला प्रयत्न महत्वाचा ठरतो.

जिल्ह्यात एकूण १३१ कारखाने असून त्यांतील कामगारांची संख्या २,४०४ होती (१९७४). खाणकाम, लाख, तपकीर, काच, प्लॅस्टिक, विडी व कागदनिर्मिती, भातसडीच्या व लाकूड कापण्याच्या गिरण्या इ. प्रमुख उद्दोग चालतात. मँगॅनीज हे जिल्हातील प्रमुख खनिज असून त्याचे उत्पादन १९०० पासून घेतले जाते. विडीनिर्मितीसाठी लागणारी तेंडूची पाने जंगलात मोठया प्रमाणावर मिळत असल्याने विडीनिर्मिती उद्योग मोठया प्रमाणावर चालतो. भंडारा, गोंदिया, तिरोडा, अर्जुनी, सहरी, वारठी व तुमसर ही विडीनिर्मितीची प्रमुख केंद्रे होत. भात हे प्रमुख कृषी उत्पादन असल्याने भातसडीच्या गिरण्यांची संख्याही बरीच आहे. तुमसर, भंडारा, अडयार, वरठी, सिहोरा, गोदिंया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, मुंडीकोटा ही याची प्रमुख केंद्रे आहेत. पितळी भाडयांच्या निर्मितीसाठी तर हा जिल्ह्या प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध आहे. मोटारदुरुस्ती व अभियांत्रिकी उद्योगांसाठी गोंदिया, भंडारा काच उद्योगांसाठी गोंदिया, भंडारा काच उद्दोगासाठी गोंदिया लाकूड कापण्य़ाच्य़ा गिरण्य़ांसाठी गोंदिया, तुमसर, तिरोडा व आमगाव अशी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. सुती व लोकरी कापड विणकाम, सुतार व लोहारकाम, मातीची भांडी, विटा आणि कौले, वने व बांधकाम, विडी, नीरा, गूळ तयार करणे इ. कुटिरोद्योग चालतात. सर्व प्रकारच्या सहकारी सोसायटयांची एकूण संख्या १,२८४ असून सभासदसंख्या १०,४७,००० व खेळते भांडवल ५,८२,८२,०००रु. होते. (१९७५-७६).

भंडारा जिल्ह्यात १९७६ साली एकूण २,९१९.३१ किमी.लांबीचे रस्ते असून त्यांपैकी राष्ट्रीय महामार्ग ९७.३७ किमी. राज्य महामार्ग २९९.११ किमी. प्रमुख जिल्हा रस्ते ४७९.८१ किमी. इतर जिल्हा रस्ते १३७.११ किमी. ग्रामरस्ते १,८९१.९६ किमी. व इतर रस्ते १३.९५ किमी. लांबीचे असून लोहमार्ग २६० किमी. लांबीचे होते. मुंबई-कलकत्ता रुंदमापी लोहमार्ग (१३२ किमी.) जिल्ह्यातून पश्चिम-पूर्व दिशेत जात असून याची तुमसर रोडपासून मध्य प्रदेश राज्यातील तिरोडीपर्यंत २९ किमी. लांबीची एक शाखा आहे. जबलपूर-चंद्रपूर हा अरुंदमापी लोहमार्ग (११८किमी.) जिल्ह्यातून उत्तर-दक्षिण दिशेने जातो, तर नैऋत्य कोप-यातून नागपूर-चंद्रपूर (१० किमी.) हा अरुंदमापी लोहमार्ग जातो. जिल्ह्यात २३२ डाकघरे, ३३ दूरध्वनी कार्यालये, १,५३१ दूरध्वनी संच व २१,७४१ परवानाधारक रेडिओसंच आहेत. लोकवाणी, भंडारा टाइम्स,ग्रामीण समाचार, अंकुश, भंडारा दर्शन, टाइम बाँब, सत्यदर्शन, तिरोडा टाइम्स ही साप्ताहिके जिल्ह्यातून प्रसिद्ध होतात.

लोक व समाजजीवनः जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी १५,९५,५८१ ग्रामीण व २,४०,६५३ नागरी लोकसंख्या असून ९,१९,२३७ पुरुष व ९,१६,९९७ स्त्रिया होत्या(१९८१). दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९९८ होते. साक्षरतेचे प्रमाण ४३.८६% (पुरुषांच्या बाबतीत ५८.२४% व स्त्रियांच्या बाबतीत २९.४४%. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स १९९ असून एकूण लोकसंख्येपैकी कामकरी लोकसंख्या ४५.६५% एवढी आहे कामकरी लोकसंख्येचे वितरण पुढीलप्रमाणे आहे : शेतकरी ४५.३५% शेतमजूर २७.१६% व घरगुती उदयोगधंदे ११.३५% व इतर कामगार इमारत लोकसंख्या १६.१४% १९७१ च्या जनगणेनुसार वस्ती असलेली १,५०० व वस्ती नसलेली १५९ खेडी होती. मराठी या प्रमुख मापेशिवाय हिंदी, गोंडी, पोवारी, उर्दू, सिंधी, गुजराती, होलिया, तेलुगू, कोष्ठी, कालारी इ. भाषा बोलल्या जातात. अनुसूचित जातीची संख्या १८ आहे. १९७१-८१ या दशकातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण १५.८१ % आहे.

लोकांचे मुख्य अन्न भात भाताच्या जोडीला चूण असते. जेवणात भाकरी अगर पोळी, लाखोळीचे वरण व भाजी असते. जवसाच्या तेलाचा वापर बराच केला जातो. तलावातून शिंगाडे मिळतात. तलावातून शिंगाडे काढण्याकरीता डोंग्याचा वापर केला जातो. शिंगाड्याचे पदार्थ प्रामुख्याने उपवासासाठी खातात.

प्रत्येक गावात मारूतीचे तसेच मुतूया देवाचे मंदिर आढळते. दिवाळीच्या दिवशी गोवारी लोक मुतूया मंदिराजवळ गुरे उभी करूण ढोल वाजवून नाच-गाणी करतात. शेतामध्ये सेवा-या नावाच्या देवाची स्थापना केलेली असते. भिमसेन हा गोंड लोंकाचा देव आहे. घराघरात धुलादेव असतो. धुलादेवाची पूजा वर्षातून एकदा व तीही फक्त पुरूषच करतात. घाटावर किंवा नदी व नाला उतरण्याच्या ठिकाणी धीवर लोंकाचा बेल समु्द्रराजा नावाचा देव असतो. गोंधळ व दंढार तसेच करमा हा गोंडचा नृत्यप्रकार इ. जिल्यात ब-याच प्रमाणात आढळतात.

गोंदिया येथील शारदा वाचनालय (१९२७-२८), महिला समाज (१९३३), श्रीमती सरस्वती महिला विद्यालय (१९४६), राष्ट्रीय शिक्षण संस्था (१९५५), दाई बेन मधुकांता क्षय़ रूग्णालय (१९५६) गोंदिया एज्युकेशन सोसायटी (१९५८), कुन्वर टिळकसिंह रूग्णालय (१९६२) अडयारचे गुरूदेव सेवा मंडळ (१९३०) व प्रकाश हायस्कूल (१९५७) अर्जुनी मोरगाव येथील महिला मंडळ (१९५९) साकोलीचे महिला मंडळ (१९५६) लाखणीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह (१९६३) आमगावचा सरस्वती महिला समाज (१९६०) इ. संस्था जिल्ह्यात समाजसेवेचे व शिक्षणाचे कार्य करतात. एकूण पोलिस दल ९८८, पोलिस ठाणी १७, चौक्या ६ व अटक-कोठड्या १७ होत्या (१९७५-७६) जिल्ह्यात कायमची सिनेमागृहे ४ होती (१९७५).

भंडारा जिल्ह्यात १९७५ मध्ये ८ रुग्णालये, ११७ दवाखाने, ३८ प्रसूतिगृहे, २३ आरोग्यकेंद्रे, ३९८ खाटा, ९५ डॉक्टर व २६१ परिचारिका होत्या. जन्मप्रमाण २७.४ % व मृत्यु- प्रमाण १०.८% असून या एका वर्षात ३१,१११ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याच वर्षात १४,९८५ लोक मृत्यू पावले,

भंडारा जिल्ह्यातील एकूण ६ पूर्व-प्राथमिक शाळांमध्ये ३३८ वद्यार्थी व ९ शिक्षक १,३३८ प्राथमिक शाळांत १,८७,०९५ विद्यार्थी व ५,९२८ शिक्षक १६१ माध्यमिक शाळांत ६०,१०१ विद्यार्थी व २,३१४ शिक्षक आणि १२ उच्च शैक्षणिक संस्थांत ४,४२३ विद्यार्थी व २०४ शिक्षक होते (१९७५-७६).

महत्वाची स्थळे : भंडारा हे जिल्ह्याचे व याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण पितळी भांड्यांविषयी विशेष प्रसिध्द आहे, गोंदिया (लोक, १,००,३४२-१९८१) हे गोंदिया तालुक्याचे, तर साकोली (६,६५४-१९७१) हे साकोली तालुक्याचे ठिकाण आहे. साकोली भंडार-याच्या पूर्व-आग्नेयीस सु. ३८ किमी. नागपूर-कलकत्ता महामार्गावर आहे. सरकारी दवाखाना आणि कुष्ठरोगाचे उपकेंद्र येथे आहे. भंङारा तालुक्यातील अड्यार (७,४९६-१९७१) हे भंडार-याच्या दक्षिणेस २२ किमी. भंडारा-पवनी रोड रस्त्यावर आहे. येथे हनुमानाचे एक पुरातन मंदिर असून त्यातील मूर्ती स्वयंभू आहे. एका इमारतीचा पाया खोदताना पारसनाथाची एक मूर्ती येथे सापडली. गावात गांडली जीतीच्या लोकांची वस्ती आधिक आहे. गोंदिया तालुक्यातील आमगाव (७,२२८-१९७१) गुरांच्या बाजारासाठी महत्वाचे असून येथेच वाघ नदिवर एक जलसिंचन प्रकल्प आहे. भंडारा तालुक्यातील आंधळगाव (५,१६४,१९७१ ) रेशमी काठाच्या साड्यांसाठी प्रसिध्द आहे. चांदपूर गावाजवळ चांदपूर तलाव असून त्याचा परिसर निसरर्गम्य आहे. जवळच १० किमी. वरील चिखला येथे मँगॅनीजचे साठे आहेत. गावात गवळी लोकांची संख्या जास्त आहे. गोंदिया तालुक्यातील दरेकसा या लहानशा जंगली गावाजवळील चांदसुरज पहाडावर एक वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहे. गायमुख गावाजवळील पाण्याचा झरा प्रसिध्द असून शिवरात्रीस तेथे मोठी यात्रा भरते, अंबागड गाव आणि किल्ल्याच्या परिसरात आंब्याची बरिच झाडे होती. त्यांवरुन अंबागड हे नाव पडले असावे. याचा परिसर निसर्गसुंदर आहे. नवेगाव व सिवनी व सिवनी बांधही प्रेक्षणीय आहेत. तुमसर (३४,८१७-१९८१) हे व्यापाराचे व उद्दोगधंद्दांचे प्रमुख केंद्र असून याच्या परिसरात आंबा,पेरु,मोसंबी आणि नारिंगांच्या बागा तसेच मँगॅनीजच्या खाणी आहेत. याशिवाय पवनी(पदमावती १८,६९९-१९८१), तिरोडा(१८,४५०), ढिवरा, कर्डी, काटी, दिघोरी, प्रतापगढ, लाखणी, वोंडगाव, कामठा ही भंडारा जिल्हातील महत्वाची ठिकाणे होत.

चौधरी,वसंत

जिल्ह्यातील महत्त्वाचा हातमाग रेशिमकापड-उद्योग, गणेशपूर (तकीयाटोला). 
भंडारा शहर, एक दृश्य. 
बौद्धकालीन स्तूपाच्या दगडी खांबावरील नक्षीकाम, पौनी. 
पौनीचा इतिहासप्रसिद्ध भुईकोट किल्ला व भातलावणी, एक दृश्य. 
पुरातन गरुडखांब, पौनी. 
विणकर महिला, गणेशपूर (तकीयाटोला). 
पितळी भांड्याच्या कारखान्यातील दृश्य, भंडारा शहर. 
मॅंगॅनीज खाणकामगार, चिखला.