बीडचे खंडेश्वरी मंदिरबीड शहर: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ८०,२८६ (१९८१). हे बिंदुसरा नदीकाठावर सस. पासून ५१६ मी. उंचीवर वसले असून सुभ्याचे ठाणे म्हणून प्राचीन काळापासून महत्त्वाचे आहे. बीड शहर जालना, अहमदनगर, औरंगाबाद, बार्शी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद अशा महत्त्वाच्या शहरांशी रस्त्यांनी जोडलेले आहे. जालना हे याचे जवळचे (१०२ किमी.) लोहमार्ग स्थानक आहे.

बीड शहराच्या नावाविषयी दोन व्युत्पत्ती सांगण्यात येतात: बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदी खोऱ्यात खळग्याप्रमाणे किंवा बिळाप्रमाणे असलेल्या भागात हे शहर वसल्याने ‘बीळ’ वरून ‘बीड’ अशी संज्ञा रूढ झाली असावी. याची दुसरी व्युत्पत्ती अशी करण्यात येते की, ‘पाणी’ या अर्थाच्या ‘मीर’ या फार्सी शब्दावरून इतिहासकाळात मुसलमानी प्रशासकांनी बीड हे नाव त्यास ठेवले असावे. कारण या प्रदेशात भूगर्भात थोड्या अंतरावरच पाणी लागते व ते कधीही कमी होत नाही.

सीताहरण करणाऱ्या रावणाशी लढून मरणोन्मुख झालेल्या पक्षिराज जटायूने रामाला घडलेली हकीकत येथेच निवेदन करून प्राण सोडला, अशी आख्यायिका आहे. या दंतकथेला आधार म्हणजे शहराच्या मध्यभागी असलेले यादवकालीन जटाशंकराचे देऊळ होय. पांडवकाळी या नगरीचे नाव दुर्गावती व नंतर बलनी होते. चालुक्य विक्रमादित्याच्या भगिनीने चंपावतीने हे घेतल्यानंतर त्याला चंपावतीनगर असे नाव दिले. प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य येथीलच, असा समज आहे. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलकाने हे यादवांकडून जिंकून चंपावतीनगराऐवजी बीड नाव देऊन सुभ्याची राजधानी केली. त्या अमदानीत जुना खान या सुभेदाराने येथे बऱ्याच सुधारणा केल्या. बिंदुसरा नदीचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वळविण्याचे श्रेय त्याला देण्यात येते. तुघलकांनंतरच्या बहमनी काळात शहराला तटबंदी करण्यात आली. त्या काळातच बीडचा जहागिरदार हबीब-उल्ला व हुमायूनशाह जालीम यांच्यात एक निकराची लढाई होऊन बरेच लोक मारले गेले. त्यांच्या कबरी कनकालेश्वर (कंकालेश्वर) मंदिराच्या आसपास दिसतात. १६३५ मध्ये हा मुलूख मोगलांनी जिंकला, तेव्हा तेथे खान जहानची छावणी होती. शाहजहानच्या अमदानीत (कार. १६२८-५८) बीडच्या आसपास निजामशाही व आदिलशाही फौजांशी मोगलांच्या अनेक लढाया झाल्या. औरंगजेब दक्षिणेच्या सुभ्यावर असताना त्याने नायबसुभा म्हणून नेमलेल्या मुहम्मद सदरशाहने शहराची आखणी करून अनेक सुधारणा केल्या. १९५२ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली.

खंडोबा मंदिरातील अष्टकोनी शिल्पांकित दीपमाळ, बीडमहाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने बीडच्या औद्योगिक विकासासाठी १०० हे. जमीन घेतली असून या क्षेत्रात वेगवेगळे औद्योगिक प्रकल्प स्थापन होत आहेत. येथे १ कोटी ३२ लाख रुपये खर्चून प्रतिदिन १ लाख २० लिटर दूध हाताळण्याची क्षमता असलेला दुग्धप्रकल्प उभारण्यात आला असून तेथून मुंबई, पुणे, नगर या शहरांना दूधपुरवठा केला जातो. मराठवाडा विकास महामंडळातर्फे येथे ६५ लाख रुपये खर्चून चर्मोद्योग प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे. त्यातील बरेचसे उत्पादन निर्यात केले जाते. विविध शेतमालाची येथे घाऊक बाजारपेठ असून कापूस, भुईमूग शेंग, ज्वारी, बाजरी, मूग, हरभरा यांचा व्यापार चालतो. तेलगिरण्या तसेच कापूस पिंजण्याचे व दाबण्याचे कारखाने आहेत. हातमाग व्यवसायही महत्त्वाचा आहे. येथील ’छागल’ नावाचे चामड्याचे बुधले तसेच गुप्त्या प्रसिद्ध आहेत.

बिंदुसरा नदीच्या पूर्वतीरी शहरापासून सु. २०० मी. वर एका तळ्याच्या मध्यभागी असलेले कनकालेश्वराचे यादवकालीन मंदिर प्रेक्षणीय आहे. मंदिराचा आकार ताऱ्यासारखा असून त्यातील वेरूळ शैलीतील भरगच्च नक्षीकाम भग्नावस्थेतही आकर्षक वाटते. दरवर्षी महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा भरते. शहराच्या पूर्व सीमेवर उंच भागी बीडचा एक जहागिरदार सुलतानजी निंबाळकर याने बांधलेले हेमाडपंथी शैलीचे खंडोबाचे देऊळ आहे. त्याच्यापुढील दोन अष्टकोनी दीपमाळा २१.३३ मी. उंच आहेत. खंडोबापासून सु. एक किमी. अंतरावरील खंडेश्वरीचे प्राचीन देवालय कालोजीनामक धनगराने बांधलेले आहे. नवरात्रात तेथे यात्रा भरते. शहराच्या पश्चिमेस पाटोदा रस्त्यावर सव्वा मीटर उंचीचा एक रणखांब असून त्याच्यावर मराठी व उर्दू कोरीव लेख आहेत. शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे. शहराजवळच थोड्या उंचीवर भव्य शहेनशावली दर्गा, त्याची रंगीबेरंगी संगमरवरी फरशी, दुहेरी घुमटाखालील कबर आणि प्रशस्त परिसर मनोवेधक आहे. बीड-अहमदनगर रस्त्यावर शहरापासून सु, एक किमी. वरील बालाशाह दर्ग्याच्या भिंती दगडी जाळीच्या असून त्याचे छत खुले आहे. दोन्ही ठिकाणी दरवर्षी मोठा उरूस भरतो. नगरविभागातील मन्सूरशाहचा दर्गा, त्यातील घुमट व संगमरवरी खांब यांसाठी प्रसिद्ध आहे. मुहम्मदशाह गाझीच्या अमदानीत १७२२ मध्ये बांधलेली इआरी मशीदही येथे आहे. शहराच्या राजुरी, कोतवाली, काझी आणि गनी अशा वेशींपैकी नदीकिनारी असलेल्या कोतवाली वेशीच्या बाजूचे तट व सात बुरूज पाहण्यासारखे आहेत. बीडच्या दक्षिणेस चार किमी. वर पाली या खेड्यात मुहम्मद तुघलकाच्या दाताची कबर आहे. बीड शहराजवळ खजाना नावाची एक मोठी विहीर असून तिच्यातील पाणी वर्षभर सारखे वाहत असते. प्रवाशांसाठी सरकारी डाक बंगल्याखेरीज धर्मशाळा,पथिकाश्रम आहेत. शहरात रुग्णालय, २३ दवाखाने, ४ प्रसूतिगृहे, कुटुंब नियोजन केंद्र यांशिवाय महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, सार्वजनिक बागा व वाचनालये, चित्रपटगृहे, नाट्यगृह इ. सोयी आहेत.

चौधरी, वसंत