हरद्वार : ब्रह्मकुंड (हरीकी पौडी).

हरद्वार : हरिद्वार. भारताच्या उत्तराखंड (उत्तरांचल) राज्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या २,२५,२३५ (२०११). हे डेहराडूनच्या दक्षिणेस सु. ६६ किमी.वर गंगा नदीच्या उजव्या काठावर वसलेले आहे. ते हिमालयातील शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी असून हिंदूंच्या पवित्र सप्ततीर्थांपैकी एक मानले जाते. हिमालयाच्या कडेकपारींतून अत्यंत वेगाने खाली येणारा सु. २५३ किमी. लांबीचा गंगेचा प्रवाह एका खिंडीतून सपाट मैदानी प्रदेशात येतो व या ठिकाणापासून पुढे संथ होतो. त्यामुळे या स्थानाला गंगाद्वार असेही म्हणतात. अनेकवेळा याच्या परिसरातील कुशावर्त, मायापुरी, कनखल, ज्वालापूर व भीमगोडा यांना मिळून हरद्वार म्हटले जाते. हे शहर दिल्ली, कोलकाता तसेच देशातील अन्य मोठ्या शहरांशी रेल्वे व रस्त्याने जोडलेले आहे.

हर म्हणजे शिव आणि हरि म्हणजे विष्णू. हिमालयातील शिव आणि विष्णूच्या अनेक स्थानांना (उदा., केदारनाथ, गंगोत्री, बद्रीनाथ इ.) जाण्यासाठी येथून सुरुवात होते. त्यामुळे याला हरद्वार किंवा हरिद्वार असे नाव पडले असावे. याच्या स्थानमाहात्म्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. सूर्यवंशी राजा भगीरथ याने स्वर्गातून गंगा पृथ्वीतलावर आणली; परंतु तिच्या वेगवान प्रवाहामुळे पृथ्वी विदीर्ण होऊ नये म्हणून भगीरथाच्या विनंतीवरून शिवाने तो प्रवाह प्रथम आपल्या मस्तकावर घेतला व संथ प्रवाह हरद्वार येथे पृथ्वीवर सोडला. शिवासंबंधीच्या अनेक कथा या स्थानाशी निगडित असल्याने शिवभक्त याला शैव क्षेत्र मानतात. गंगाद्वाराजवळ एका खडकावर विष्णुपद कोरलेले असून हे स्थान हरिची पायरी (हरीकी पौडी किंवा पैडी) या नावाने प्रख्यात आहे. हिमालयातून गंगा हरिच्या पायाजवळ अवतरली म्हणून विष्णुभक्त या क्षेत्राला वैष्णव क्षेत्र अथवा हरिद्वार म्हणतात. आणखी एका कथेनुसारविक्रमादित्य राजाचा भाऊ भर्तृहरी याने येथे तप केले व अखेर येथेच देह ठेवला. त्याच्या स्मरणार्थ राजाने येथे एक मोठे सरोवर निर्माण केले व त्याच्या काठावर घाटही बांधला. त्या घाटाला हरिची पायरीव सरोवराला ब्रह्मकुंड म्हणतात. देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकुंभातील अमृताचे काही थेंब या ठिकाणी सांडले. त्यामुळे येथील गंगास्नान पवित्र मानले जाते व त्यामुळे मोक्षप्राप्ती होते, अशी याची ख्याती आहे. पुराणांमध्ये याचा कपिलस्थान, मायापुरी इ. नावांनी उल्लेख आढळतो. अगस्त्य व कपिलमुनी यांच्या येथील निवासाविषयीही अनेक कथा प्रचलित आहेत. गंगाद्वार, कुशावर्त, विल्वकेश्वर, नील पर्वत व कनखल ही येथील प्रमुख पाच तीर्थस्थाने प्रसिद्ध असून तेथील स्नान तसेच या क्षेत्री श्राद्ध, पिंडदान इ. क्रियाकर्मे करणे हे पुण्यप्रद मानले जाते.

मौर्य, कुशाण यांच्या काळांतही या धार्मिक स्थळाला महत्त्व असल्याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. चिनी प्रवासी ह्युएनत्संग याने याचा उल्लेख मो यु लो असा केल्याचे दिसते. त्याने येथील तत्कालीन मंदिरांचाही उल्लेख आपल्या प्रवासवर्णनात केलेला आहे. इ. स. १३९९ मध्ये तैमूरलंगाने हे शहर घेतले होते. १५०४ मध्ये शिखांचे पहिले धर्मगुरू गुरुनानक यांनी येथे स्नान केल्याचे सांगितले जाते. त्याप्रीत्यर्थ येथील कुशवान घाटावर गुरुद्वाराची स्थापना करण्यात आली आहे. सोळाव्या शतकात मोगल सम्राट अकबराच्या काळात आईन-इ-अकबरी या ग्रंथात हरद्वाराचा उल्लेख माया असा केलेला आढळतो. येथील चैत्री यात्रेचे उल्लेख त्या ग्रंथात दिसून येतात. अकबराची तांब्याच्या नाण्यांची टांकसाळही येथे होती, असे उल्लेख आहेत. याच्या कारकीर्दीत राजा मानसिंगाने आजच्या हरद्वार शहराचा पाया घातला व हरीकी पौडी या घाटाचे नूतनीकरण केल्याचे उल्लेख मिळतात. मानसिंगाच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थींचे विसर्जन अकबर बादशहाने येथील ब्रह्मकुंडात केल्याचे सांगितले जाते. जहांगीर बादशहाच्या कारकीर्दीत (१६०५–२७) ब्रिटिश पर्यटक थॉमस कुरियन याने हरद्वारला भेट दिल्याचा उल्लेख मिळतो. कुशावर्त तीर्थाभोवती अठराव्या शतकात अहिल्याबाईने सुंदर घाट बांधले आहेत. १८६८ मध्ये हरद्वार, मायापुरी व कनखल यांची मिळून संयुक्त नगरपालिका स्थापन करण्यात आली आहे. १८८६ मध्ये हे शहर इतर शहरांशी रेल्वेने जोडले गेले.

हरद्वार हे प्राचीन काळापासून अनेक कला, विज्ञान आणि संस्कृतींच्या अध्यापनाचे केंद्र आहे. आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी हे प्रसिद्ध असून गुरुकुल शिक्षण पद्धतीचे हे मूलस्थान आहे. १९६० मध्ये हरद्वारजवळ राणीपूर येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. या कंपनीची स्थापना करण्यात आली. त्या अनुषंगाने याच्या सभोवतालच्या प्रदेशात अनेक लहानमोठ्या उद्योगधंद्यांचा विकास झाला असून याची औद्योगिक शहर म्हणूनही ख्याती झाली आहे. अखिल वैश्विक गायत्री परिवार ही आध्यात्मिक व सामाजिक संस्था भारतीय संस्कृती, धर्मविज्ञान, योगविज्ञान इत्यादींच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले देव संस्कृती विश्वविद्यालय स्वामी रामदेवबाबा यांनी स्थापन केलेले पतंजली विद्यापीठ इत्यादींमुळेही या शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे.

येथील ब्रह्मकुंड (हरीकी पौडी), गऊघाट, कुशावर्तघाट, रामघाट, विष्णुघाट, नारायणी शिला, नीलधारा इ. तीर्थे व कालीमाता, चण्डीदेवी, मनसादेवी, अंजनीमाता, गौरीशंकर, विल्वकेश्वर, दक्षेश्वर, सत्यनारायण, वीरभद्रेश्वर इ. मंदिरे, अनेक आश्रम व धार्मिक ठिकाणे प्रसिद्ध असून त्यांसंबंधीच्या विविध कथाही प्रचलित आहेत. गुरू कुंभ राशीत व सूर्य मेष राशीत प्रवेश करतो, तेव्हा दर बारा वर्षांनी व सहा वर्षांनी येथे कुंभ व अर्धकुंभ मेळे भरतात. या कुंभपर्वात विविध पंथांचे हजारो साधू व लाखो भाविक गंगास्नानाचा लाभ घेतात. येथील अनेक पंड्यांनी उत्तर भारतातील अनेक हिंदू कुटुंबीयांच्या वंशावळीच्या नोंदी केलेल्या असून आजही ते हे काम सातत्याने करीत आहेत.

चौधरी, शंकर रामदास; चौंडे, मा. ल.