टोलीडो : अमेरिकेच्या ओहायओ राज्यातील महत्त्वाचे व्यापारी, औद्योगिक आणि वाहतूक केंद्र. लोकसंख्या ३,८३,८१८ महानगरी ४,८७,७८९ (१९७०). ईअरी सरोवरातील मॉमी नदीच्या मुखावरील हे शहर सेंट लॉरेन्स सी वे या प्रसिद्ध जलमार्गावरील महत्त्वाचे बंदर आहे. येथील कोळशाची निर्यात सर्वांत मोठी आहे. आयातीत लोखंड सर्वांत महत्त्वाचे आहे. जहाजे बांधणे, तेलशुद्धी, मोटारी व त्यांचे सुटे भाग, विजेचे साहित्य, काचेच्या वस्तू, पोलाद, सिमेंट, अचूक यंत्रे, रसायने, रंग, कापड, कागद, अन्नपदार्थ इ. उत्पादने होतात. दारुगोळ्याचा कारखाना व कोठारही आहे. टोलीडो विद्यापीठ, मॅन्से हे स्त्रियांचे महाविद्यालय इ. शिक्षणसंस्था आहेत. रेल्वे, कालवे, खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे, कोळसा क्षेत्र यांमुळे शहराचे महत्त्व वाढत गेले.

लिमये, दि. ह.