जिआंगसू : किआंगसू. चीनच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत. क्षेत्रफळ १,०२,३०० चौ. किमी. लोकसंख्या ५,७८,००,००० (१९७३). याच्या उत्तरेस शँटुंग, पूर्वेस पीत समुद्र व पूर्व चिनी समुद्र, दक्षिणेस जजिआंग व पश्चिमेस आन्हवे प्रांत आहे. राजधानी नानकिंग. गाळ आणणाऱ्या नद्या, सरोवरे, कालवे व यांगत्सीचा त्रिभुज प्रदेश यांमुळे सर्व भूमी अतिशय सपाट व सुपीक झाली आहे. हिवाळ्यात ०° से. ते २·२° से. व उन्हाळ्यात २८° से. तपमान व ६० ते १२० सेंमी. पाऊस यांमुळे उत्तर भागात गहू, मका, सोयाबीन, वाटाणा, केओलिआंग, अनेक हलकी धान्ये व दक्षिण भागात तांदूळ, कापूस, ऊस, चहा, बार्ली इ. पिके भरपूर होतात. नैसर्गिक वनस्पती शिल्लकच नाहीत कारण अत्यंत दाट वस्तीसाठी सर्वच जमीन लागवडीखाली आणलेली आहे. प्राण्यांना अन्न या दृष्टीने महत्त्व आहे. काही भागात लोकवस्तीची घनता दर चौ. किमी.ला ५३८ पेक्षाही जास्त आहे. दक्षिण भागात रेशमाचे उत्पादनही होते. मासे विपुल मिळतात. जिआंगसूमधून यांगत्सी, तिच्या उपनद्या आणि ग्रँड कालव्याचा बराच भाग वाहत असल्याने दळणवळण व व्यापार सुलभतेने चालतो. शांघाय–नानकिंग लोहमार्गही उपयुक्त आहे. चीनचा बराच आयात-निर्यात व्यापार शांघाय बंदरातून होतो. जिआंगसू औद्योगिक दृष्ट्या पुढारलेला असून रेशमी व सुती कापड, मालमोटारी, खते, पोलाद, यंत्रे व यंत्रोपकरणे, विद्युत्‌सामग्री, अन्नप्रक्रिया, तेलशुद्धी इ. कारखाने आहेत.

समाजरचना, १९४९ नंतर शेती आणि उद्योगधंदे यांत फार मोठा बदल घडून आला आहे. १९६६ ते १९७० पर्यंत कोळशाच्या ३५ नवीन खाणी, ६८ छोटी जलविद्युत्‌ केंद्रे व २५० नवीन कारखाने १३ स्थानिक कारभारी विभागांत उघडण्यात आले. सहकारी, सामुदायिक व शासकीय शेते आहेत. सामुदायिक जीवन असले, तरी प्रत्येक घराला लागून छोट्याशा जमिनीवर गुरे, डुकरे व कोंबड्या पाळल्या जातात. मासेमारी व मत्स्योत्पादन यांवरही भर असून रस्ते बांधणी, तलाव, वृक्षारोपण इ. मोठ्या कार्यक्रमांमुळे ग्रामीण बेकारीला आळा घातला आहे. शांघाय, नानकिंग, सूजो, वूशी, जंगजो, जिंज्यांग, यांगजो व इतर मोठमोठ्या शहरांतून औद्योगिक विकासाबरोबरच प्राचीन कला, व्यवसाय इत्यादींचे रक्षण व विकास करण्यात येत आहे.  

प्राचीन काळी जिआंगसू प्रांत वू व चौ राज्यात होता. १८४२ च्या नानकिंगच्या तहानंतर यूरोपीयांचा व्यापार सुरू झाला. १९३७ मध्ये जपानने जिआंगसू घेतल्याने मोठा धोका निर्माण झाला होता परंतु १९४५ मध्ये चिनी राष्ट्रीय सैन्याने जपानला हुसकावून लावले. १९४९ मध्ये कम्युनिस्ट सत्ता स्थापन झाली. 

ओक, द. ह.