कुंतल : भारतातील प्राचीन जनपद. कुंतलविषय, कर्नाट, कंदलोइ (टॉलेमी) आणि उपहालक अशी याची नामांतरे आढळतात. प्राचीन व मध्ययुगीन साहित्यातून आणि शिलालेखांतून कुंतल देशाचे बनवासी, कुंडिदेश, बेल्वोळ, तोरगळे, लक्किगुंडि, कुहुंडि, विजयानगर आणि अजिंठा असे उपविभाग असल्याचे दिसते. यावरून कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र या सध्याच्या राज्यांत कुंतलचा विस्तार होता मात्र कुंतलचा मूळ गाभा कृष्णा, भीमा व तुंगभद्रा या नद्यांच्या दरम्यान होता. महाभारतकालात श्रीकृष्णाने कर्णाला वश करण्यासाठी कुंतल देशाचे राज्य देऊ केले होते, असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजे स्वत:ला कुंतलाधिपती म्हणवीत असत. पश्चिम चालुक्य, राष्ट्रकूट, वाकाटक आणि यादव राजांच्या काळी कुंतल देश त्या त्या साम्राज्यात समाविष्ट झाला होता.

गंगा-यमुना नद्यांच्या दक्षिणेकडील चुनार भागात तसेच मेरू पर्वतावरील सीता नदीकाठीही कुंतल देश असल्याचे उल्लेख पुराणांत मिळतात.

जोशी, चंद्रहास