हूनान : चीनचा दक्षिण-मध्य भागातील एक भूवेष्टित प्रांत. क्षेत्रफळ २,१०,५०० चौ. किमी. लोकसंख्या ६,५६,८३,७२२ (२०१०अंदाज) . यागत्सी नदी खोऱ्याच्या दक्षिणेस हा प्रांत आहे. हूनान प्रांताच्या उत्तरेस हुपे, पूर्वेस किआंगसी, आग्नेयीस स्वांगटुंग, पश्चिमेस शेचवान व क्वेईगॉव हे प्रांत आणि नैर्ऋत्येस स्वांगत्सीचा चुआंग हा स्वायत्त प्रदेशआहे. या प्रांताची राजधानी चांगशा असून लोकसंख्या २४,१४,९२० (२०१० अंदाज) आहे. हूनान या नावातील हू म्हणजे सरोवर आणिनान म्हणजे सरोवराच्या दक्षिणेकडील भूमी असा अर्थ होतो, यावरून या प्रांताला हूनान असे संबोधतात. 

 

हूनान प्रांत बहुतांशी पर्वतमय असून याचा सु. १/४ पेक्षा जास्त भाग स.स. पासून ५०० मी. पेक्षा जास्त उंचीवर आहे. हूनान प्रांताच्या पश्चिम व वायव्य भागात ईशान्य-नैर्ऋत्य दिशेस पसरलेले सुएवेंज आणि वुलिंज हे पर्वत आहेत. पूर्वेकडे किआंगसी प्रांताच्या सरहद्दीवर वुकूंग व चू-कुआंग हे पर्वत असून चू-कुआंग पर्वतांची उंची २०१२ मी. दरम्यान आहे. प्रांताच्या दक्षिण भागात नानकिंग पर्वताच्या रांगा पूर्व-पश्चिम पसरलेल्या आहेत. हूनान प्रांताच्या उत्तरेस तुंगतिंग सरोवराच्या किनारी सखल मैदानी प्रदेश असून याने सु. ९, ८४२ चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. 

 

तुंगतिंग (क्षेत्रफळ ३,७५५ चौ. किमी.) हे प्रांतातील मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. सिआंग ही प्रांतातील महत्त्वाची नदी असून हिची लांबी १,१६० किमी. आहे. याशिवाय प्रांतात यूआन, त्सू आणि ली या प्रमुख नद्या आहेत. 

 

हूनानमधील हिवाळे थंड व उन्हाळे उष्ण व दमट असतात. येथे हिवाळ्यातील सरासरी किमान तपमान ६° से. व उन्हाळ्यातील कमाल तपमान ३०° से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १४२.२ सेंमी. पर्यंत असते. पश्चिम-पूर्व या दिशेत वाहणाऱ्या चक्रवाताच्या टप्प्यात हूनान प्रांत येत असल्याने अनेकदा चक्रवातामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो व पूर येतो. कित्येकदा हिवाळ्यात मंगोलियातील थंड वारे हूनानकडे वाहत येतात. त्याचा वाईट परिणाम येथील चहामळे व फळ बागांवर होतो. येथील जंगलात फर, सीडार, बांबू इ. वृक्ष आढळतात. 

 

हूनान प्रांत जौ राजवटीत इ. स. पू. ३५० ते २२० पर्यंत व इ. स. पू. २२९ ते २०६ पर्यंत चीन राज्यात समाविष्ट होता. या कालावधीत येथे अनेक भटक्या टोळ्यांची वसाहत होती. ते लोक शिकार, मासेमारी, स्थलांतरीत शेती, खाणकाम इ. व्यवसाय करत होते. चीन राज्याचे र्‍हासानंतर हान वंशाच्या चीन साम्राज्यात इ.स.पू. २०६ ते इ. स.२२० पर्यंत होता. युआन राजवंशाच्या राजवटीत (१२७९ ते १३६८) हूनान, गुआंगजंग, गुआंगसी हे हुकवांग या नावे समाविष्ट होते. च्यिंग (मांचू) साम्राज्यात शून ची सम्राटाच्या कारकीर्दीत हूनान हा स्वतंत्र प्रांत करण्यात आला. च्यिंग (मांचू) राजवट नष्ट करून शांततेचे साम्राज्य स्थापण्याच्या दृष्टीने ताइपिंग (थायफींग) बंड चीनमध्ये १८४८–६८ मध्ये झाले होते.हे बंड हूनान प्रांतातही झाले. चीन व जपानमधील शांघायच्या तहानंतर १९०४ मध्ये हूनान परदेशी व्यापारासाठी खुला झाला. १९४९ नंतर हाप्रांत कम्युनिस्ट चीनमध्ये समाविष्ट झाला. हूनानमधील हू को फेंग, ल्यव शावच्यी, माओ-त्से तुंग यांचा चीनच्या राजकारणावर प्रभाव होता. 

 

हूनान प्रांतात १९४९ पासून खाणकाम व उद्योगधंद्यांत वाढ झाली असली, तरी येथील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. येथील शेतकरी शेतीत जलसिंचनाच्या सोयी, रासायनिक खते, आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी–बियाणे, कीटकनाशके इत्यादींचा उपयोग करतात. अधिकांश क्षेत्र तांदळाच्या पिकाखाली आहे. तांदुळाची येथे दोन पिके होतात. येथील तांदुळाच्या मोठ्या प्रमाणातील उत्पन्नामुळे यास चीनचे तांदुळाचे कोठार असे समजले जाते. यांशिवाय येथे रताळी, बार्ली, गहू, मका, केओलिआंग, कापूस, ताग, तंबाखू, चहा, तेलबिया, तुंग, लिंबुवर्गीय फळे, पेअर, पीच इ. उत्पादने घेतली जातात. सरोवरे, नद्यांत कार्प, सिल्व्हर कार्प ह्या प्रकारचे मासे आढळतात. वराहपालन हा शेतीला पूरक व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हूनान प्रांत खनिजदृष्ट्या समृद्ध असून येथे उच्च प्रतीचा कोळसा, लोह, जस्त, शिसे, टंगस्टन, मँगॅनीज, अँटिमनी, पारा इ. खनिजे आहेत. हूनानच्या दक्षिण भागात कोळसा चांगशा व सिअँगटन शहरांच्या पूर्व व दक्षिणेकडील डोंगराळ भागात लोह त्सू व युआन नद्यांमधील डोंगराळ भागात टंगस्टन, सिअँगटन नजीक शुइकोऊशान येथे मँगनीज, शिसे व जस्त मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जलविद्युत व खनिजद्रव्ये यांच्या उपलब्धतेमुळे येथे उद्योगांचा विकास झाला आहे. येथे लोह-पोलाद, विद्युत-उपकरणे, यंत्रसामग्री, ॲल्युमिनिअम अन्नप्रक्रिया, भातगिरण्या, कापड इ. उद्योग भरभराटीस आले आहेत. तसेच हस्तोद्योग, नक्षीकाम, चिनी मातीची भांडी हेही उद्योग चालतात. रस्ते, लोहमार्ग व जलवाहतुकीस हूनान प्रांतास महत्त्व आहे. पीकिंग-कँटन हा लोहमार्ग प्रांतातून जातो. तसेच चांगशा, हेंगयांग, चू-चाऊ ही प्रमुख लोहमार्ग प्रस्थानके आहेत. सिआंग नदीचे जलवाहतुकीस महत्त्वाचे योगदान आहे. 

 

प्रांतात बहुसंख्य चिनी लोक आहेत. येथे सिआंग ही बोली बोलतात. ही बोलीभाषा मँडरीनशी मिळती आहे. चांगशा हे प्रांताच्या राजधानीचे शहर असून हे ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक व व्यापार केंद्र आहे. येथील हूनान विद्यापीठ प्रसिद्ध आहे. यांशिवाय हेंगयांग, च्यांगदे, शॉऊयांग, चू–चाऊ इ. अन्य मोठी शहरे आहेत. 

ठाकूरदेसाई, सुरेंद्र