गिनी : आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक गणतंत्र. ८ प. ते १५ प. आणि ७ ३५’ उ. ते १२ ३०’ उ क्षेत्रफळ २,४५,८५७ चौ. किमी लोकसंख्या ५१,४३,२८४ (१९७२ अंदाज). याच्या वायव्येस गिनी बिसाऊ व सेनेगल, पश्चिमेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस सिएरा लिओन व लायबीरिया, आग्नेयीस आयव्हरी कोस्ट आणि उत्तरेला माली हे देश आहेत. देशाला २७२ किमी. समुद्रकिनारा लाभला असून वायव्य-आग्नेय जास्तीत जास्त रुंदी ७६८ किमी. आहे. कोनाक्री (लोकसंख्या ५,२५,६७१—१९७२). ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन : भौगोलिक दृष्ट्या गिनीचे चार विभाग पडतात : किनारपट्टी त्याच्या उत्तरेकडील फूटा जालन हा विस्तीर्ण पठारी प्रदेश ईशान्येकडील सॅव्हानाचा गवताळ प्रदेश व आग्नेयीकडील वनाच्छादित डोंगराळ प्रदेश. दक्षिणेकडील किनारी प्रदेश सखल असून किनारपट्टी ४८ ते ८० किमी. रुंदीची आहे. समुद्रकिनारा जवळजवळ सरळ असून त्यावर काही नद्यांचे त्रिभुजप्रदेश आहेत. किनारी प्रदेशाची समुद्रसपाटीपासूनची उंची २०० मी. आहे. किनाऱ्याजवळ काही बेटे असून त्यांपैकी लॉस हे प्रमुख आहे, तर टोंबो बेटावर कोनाक्री वसले आहे. उत्तरेकडील अंतर्गत भागात प्रदेशाची उंची ५०० मी.पर्यंत आणि त्यानंतर फूटा जालन पठाराची उंची ५००—९१२ मी.पर्यंत वाढलेली आहे. फूटा जालन पठाराच्या उत्तरेकडे प्रदेशाची उंची ३०० मी.पर्यंत कमी झालेली आहे. फूटा जालन हे पठार वायव्येकडून आग्नेयीकडे पसरलेले असून त्याने देशाचा मध्यभाग व्यापलेला आहे. फूटा जालन पठारावर अनेक नद्या उगम पावतात. त्यांपैकी काही उत्तरेकडे व ईशान्येकडे आणि काही दक्षिणेकडे व नैर्ऋत्येकडे वाहत येऊन गिनीच्या आखातास मिळतात. फूटा जालन पठारानेच नद्यांतील जलविभाजक क्षेत्र निर्माण केले आहे. पठारी प्रदेशामुळे धबधबे निर्माण होऊन नद्या जलवाहतुकीस निरुपयोगी झाल्या आहेत. ईशान्येकडील गवताळ प्रदेश सरासरी ३०० मी. उंचीचा मधूनमधून खडकाळ डोंगर असलेला मैदानी प्रदेश आहे, तर आग्नेयीकडील भाग हा घनदाट जंगलांचा डोंगराळ प्रदेश आहे, निंबा (सु. १,८२४ मी.) हे देशातील सर्वांत उंच शिखर याच भागात आहे. नायजर व तिची उपनदी मिलो यांचा उगम याच भागात आहे. संपूर्ण प्रदेश संमिश्र स्फटिकमय खडकांपासून निर्माण झालेला आहे. त्यावर काही प्रदेशात स्तरित खडकांचे, ग्रॅनाइट व नीस खडकांचे संचयन झालेले दिसून येते. कँब्रियनपूर्व काळात या खडकांना घड्या पडलेल्या असून मध्य व तृतीय युगांत गाळाच्या खडकांची निर्मिती झाली आहे. गिनीच्या दक्षिणभागात जांभ्याची माती, मध्यभागात उष्णकटिबंधीय लाल व पिवळ्या रंगांची आणि उत्तरभागात चर्नोझम व चेस्टनट माती दिसून येते. लोह, ॲल्युमिनियम व मँगॅनीज या धातूंच्या प्राणिदांमुळे मातीला लालसर पिवळा रंग प्राप्त झालेला दिसतो. पिकांच्या लागवडीमुळे या मातीची सुपीकता लवकरच नाहीशी होते पण कठीण वृक्षांच्या वाढीसाठी ही माती अनुकूल आहे. काँकूरे, नायजर (जलिबा), गँबिया, बाफँग, बाकोई आणि काझामांस या गिनीतून वाहणाऱ्या प्रमुख नद्या होत. गिनीचे हवामान विषुववृत्तीय प्रकारचेच असले, तरी उंचीप्रमाणे हवामानात फरक पडत जातो. किनारी प्रदेशाच्या हवामानावर गिनीच्या उष्ण प्रवाहाचा परिणाम होऊन उष्ण व दमट वारे गिनीच्या आखातावरून आतील प्रदेशात वाहू लागतात. त्यापासून किनारी प्रदेशात ४०० सेंमी.वर पाऊस पडतो. जास्त पाऊस, २६—३०से. तपमान, दमट हवा यांमुळे किनारी प्रदेशातील हवामान आरोग्यदायी नसून प्रदेशही बराच दलदलीचा आहे. पर्जन्याचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे २००—१५० सेंमी.पर्यंत कमीकमी होत जाते. गिनी हा देश मुख्यत्वे ईशान्य व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येतो. जानेवारीत जास्त भाराचे क्षेत्र उत्तर आफ्रिकेत तयार होते व ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे व्यापारी वारे वाहू लागतात. हे जमिनीवरून वाहणारे वारे असल्यामुळे कोरडे असतात. पण जुलैमध्ये गिनी आखातात जास्त वायुभाराचे केंद्र असते, तर सहाराच्या मध्यभागात वायुभार कमी असतो. म्हणून उन्हाळ्यात गिनीच्या आखाताकडून बाष्पयुक्त वारे वाहू लागतात व गिनीमध्ये उन्हाळ्यात त्यांपासून पाऊस पडतो. अतिपर्जन्यामुळे किनारी प्रदेशाच्या दलदली भागात कच्छवनश्री विपुल प्रमाणात उगवते. आग्नेय गिनीमध्ये घनदाट हिरवीगार विषुववृत्तीय अरण्ये निर्माण झाली आहेत. जगात न सापडणाऱ्या काही वनस्पतींचे प्रकार येथे आढळतात. त्याशिवाय मॉहॉगनी, एबनी, रोजवुड इ. कठीण लाकडाचे वृक्ष, गवत, बाभूळ, निलगिरी, चिंच, बोर, तेल्याताड, गोरखचिंच. शीनट इ. वृक्ष आहेत. गिनीमध्ये तृणभक्षक व मांसभक्षक असे दोन्ही प्रकारचे प्राणी विपुल आहेत. अरण्यांत व गवताळभागांत हत्ती, वाघ, सिंह, जिराफ, तरस, लांडगे, हरिण, झेब्रा, मगरी, माकडे, सुसरी, साप इ. प्राणी विपुल आहेत.

इतिहास : गिनीच्या किनाऱ्यावर पिग्मी व निग्रो लोकांनी प्रथम वसाहती केल्या. आतील अरण्ये तोडून त्यांनी स्थलांतरित स्वरूपाची शेती करण्यास सुरुवात केली. उत्तरेकडून बर्बर लोक, ईजिप्त व सूदानमधूनही काही वन्य टोळ्या या देशाच्या उत्तर भागात येऊन स्थायिक झालेल्या आहेत. १५ उत्तर अक्षांश ते १५ दक्षिण अक्षांशापर्यंतचा संपूर्ण प्रदेश पूर्वी गिनी म्हणून ओळखला जात असे. सेनेगलमधील व्हर्द भूशिरापासून अंगोलातील मोसॅमीडीपर्यंतचा किनारी प्रदेश यात येत असे. नकाशामध्ये १३५० पासूनच गिनी किनारा दर्शविण्यात येत होता तथापि पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत यूरोपमध्ये गिनी नावाचा उपयोग केला जात नसे. नायजर नदीच्या पूर्व खोऱ्यातील धिनी-जेन्नी किंवा डेन्नी या शहराच्या नावावरूनच आठव्या शतकातच या प्रदेशास गिनी हे नाव देण्यात आले असावे, असे एक मत आहे. १४८३ मध्ये फ्रेंच लोकांचे या प्रदेशाकडे प्रथम लक्ष गेले.अकरावा लुई या फ्रान्समधील राजाने महारोगावरील औषधाच्या शोधासाठी काही जहाजे या भागाकडे पाठविली होती पण ती जहाजे परत येण्यापूर्वीच लुई वारला. १५५८ मध्ये सेनेगलमधील सेंट लूईस येथे फ्रेंचांनी पहिली व्यापारी वसाहत स्थापन केली. १६३४ मध्ये फ्रेंचांनी सेनेगल व गँबियाशी व्यापार करण्यास सुरुवात केली. व्हर्द भूशिर ते काँगो नदीच्या मुखापर्यंतच्या प्रदेशात फ्रेंच सरकारने तीन व्यापारी कंपन्यांना वसाहती स्थापण्यास परवानगी दिली. फ्रेंचांशिवाय पोर्तुगीज, इंग्रज, डच व स्पॅनिश व्यापारीदेखील चौदाव्या ते पंधराव्या शतकांतच या भागाकडे येऊ लागले. या संपूर्ण किनाऱ्याच्या विविध भागांना तेथील उत्पन्नावरून निरनिराळी नावे देण्यात आली होती उदा., पालमस भूशिर ते सिएरा लिओनच्या किनाऱ्यास ‘ग्रेनकोस्ट’ हे नाव तेथे उत्पन्न होणाऱ्या मिऱ्याच्या बियांवरून त्यापुढील किनाऱ्यास हस्तिदंतावरून ‘आयव्हरी कोस्ट’ पालमस भूशिराच्या पूर्वेकडील किनाऱ्यास तेथे आढळणाऱ्या सोन्यावरून ‘गोल्डकोस्ट’, तर व्होल्टा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यास तेथे चालत असलेल्या गुलामांच्या व्यापारामुळे ‘स्लेव्हकोस्ट’ अशी नावे देण्यात आली होती. १७९४ मध्ये कायद्याने गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला. त्यानंतर गिनीमधील नद्यांतून चोरून गुलामांची वाहतूक सुरू झाली. तोपर्यत गिनीमधील प्रदेशाकडे फारसे लक्ष नव्हते. १८१४ च्या तहाने येथील फ्रेंचांचे व्यापारहक्क सुरक्षित झाले. बोके शहर व त्याच्या आसपासच्या शहरांवर फ्रान्सने आपला संरक्षित प्रदेश १८४९ साली निर्माण केला. फूटा जालन पठारावरील टोळीवाल्यांत १७२५ साली धर्मयुद्धे होऊन फुलानी या इस्लामी टोळीवाल्यांनी मालिंकेंचा पराभव करून साम्राज्य स्थापले. फुलानींनी १८६१ साली फ्रेंच संरक्षित प्रदेशास मान्यता दिली. १८६४ पासून फुलानींमध्ये यादवी सुरू झाली. १८८१ साली नायजर नदीच्या पश्चिमेकडील मुलूख फ्रेंच संरक्षणाखाली देण्यास फुलानी राजाने मान्यता दिली पण त्याने शब्द बदलल्याने फ्रेंचांनी त्याची १८९१—९३ मध्ये हकालपट्टी केली. नायजरच्या पूर्व भागात, मिलो नदीकाठच्या कांकान शहरी, १८७९ पासून मालिंके टोळीवाल्यांचे राज्य होते. १८९८ पर्यंत फ्रेंचांनी त्यांचाही बीमोड केला. १८९० साली सध्याच्या गिनी प्रदेशाचे स्वरूप निर्माण झाले. १८९१ मध्ये त्याची सेनेगलपासून फारकत झाली आणि ‘रिव्ह्येअर द्यू स्यूद ’ या नावात बदल करून फ्रेंच गिनी हे नाव मिळाले.


१९५८ पर्यत गिनी हा फ्रान्सच्या फ्रेंच वेस्ट आफ्रिका वसाहतीचा एक भाग राहिला. १९५८ मध्ये जनरल द गॉल फ्रान्सच्या अध्यक्षपदावर आल्यावर त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेत बदल घडवून आणला. वसाहतीसमोर त्याने तीन पर्याय ठेवले : फ्रान्सच्या राज्यव्यवस्थेतील त्यांचे आहे तेच स्थान त्यांनी कायम ठेवावे, फ्रान्सची समुद्रबाह्य वसाहत किंवा घटकराज्य म्हणून राहावे व फ्रेंच राष्ट्रकुलाचे (कम्युनिटी) सभासद राष्ट्र म्हणून राहावे अथवा संपूर्ण स्वतंत्र व्हावे. त्यानुसार २८ सप्टेंबर १९५८ रोजी गिनीने फ्रान्सची सत्ता झुगारून संपूर्णतः स्वतंत्र व सार्वभौम राज्य म्हणून स्वतःस घोषित केले. फ्रेंचांची सत्ता गिनीने झुगारून दिल्यानंतर फ्रान्सशी गिनीचे सर्वच संबंध तुटले त्यामुळे गिनीला मदतीसाठी अन्य राष्ट्रांकडे जावे लागले. गिनीने १२ नोव्हेंबर १९५८ रोजी संविधान मंजूर केले. त्यानुसार हे स्वतंत्र सार्वभौम, निधर्मी लोकशाही प्रजासत्ताक राज्य बनले. गिनी या प्रजासत्ताक राज्याने १९५८ मध्ये आर्थिक मदतीसाठी घानाशी व १९६० मध्ये माली देशाशी करार केले. मे १९६३ मध्ये गिनीने फ्रान्सशी परत आर्थिक व सांस्कृतिक संबंध जोडले. १९६६ मध्ये गिनीने घानाचा पदच्युत अध्यक्ष एन्‌ क्रूमाहला आसरा दिला. १९७० साली पोर्तुगालने केलेल्या आक्रमणाला संयुक्त राष्ट्रांची मदत घेऊन गिनीने तोंड दिले. आफ्रिकन राष्ट्रांतील एकता कायम राखण्यासाठी सार्वभौमत्वाला घटनेद्वाराच सवलती देण्यात आल्या आहेत. शासनासाठी देशात एक मध्यवर्ती विधिमंडळ स्थापण्यात आले आहे. विधिमंडळाची सभासदसंख्या ७५ आहे. विधिमंडळाची पहिली निवडणूक १९६३ मध्ये व दुसरी १९६८ मध्ये झाली. देमोक्रातिक द गिनी (पीडीजी) हा एकच राजकीय पक्ष सध्या येथे आहे. एकूण सभासदांमध्ये चौदा जागा स्त्रियांसाठी राखीव असतात. सार्वत्रिक प्रौढ मतदारांनी सात वर्षांकरिता निवडलेल्या अध्यक्षाला राज्यकारभाराविषयक व कायदाविषयक बरेच अधिकार संविधानाने दिले आहेत. सेकू तौरे याची १९६८ साली पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली असून तो मंत्र्यांच्या साहाय्याने शासनव्यवस्था पाहतो. २१ वर्षावरील सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. शासनव्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण देशाचे २९ विभाग पाडण्यात आले आहेत. या विभागांचे काही खेडी मिळून गट पाडण्यात आले आहेत. प्रत्येक विभागावर एका मुख्य अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते. त्याच्या हाताखाली गटाधिकारी असतात. तसेच खेड्यातील वृद्धांच्या सल्ल्याने विभागाधिकारी खेडेप्रमुखाची नेमणूक करतो. हे अधिकारी न्यायदानाचीही व्यवस्था बघतात. गिनीमध्ये न्यायव्यवस्था स्वतंत्र नाही. देशात दोन वर्षे लष्करी सेवा सक्तीची असून सुसज्ज असे छोटे सेनादल अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली आहे. गिनी हे राष्ट्र संयुक्त राष्ट्रांचे सभासद आहे. आफ्रिकन ऐक्य संघटनेचे (ओ. ए. यू.) हे राष्ट्र सभासद असून या संघटनेद्वारा गिनी देशाला संरक्षण, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शास्त्रीय व तांत्रिक बाबतींत मदत मिळते.

आर्थिक स्थिती : गिनी मुख्यतः कृषिप्रधान देश आहे देशातील ९५% लोक शेतीवर अवलंबून आहेत. पण भविष्यकाळात औद्योगिक विकासात हा देश पुढे येण्याची शक्यता आहे. फूटा जालन पठाराच्या उतारावर कॉफी प्रमुख असून दक्षिणेकडील सखल प्रदेशात केळी, ताडफळे, अननस, भात यांची लागवड केली जाते. यांशिवाय भुईमूग, वाटाणा, तीळ, मका, ज्वारी, मॅनिऑक, रताळी ही पिकेही देशात होतात. अरण्यांमुळे लाकूडकाम हा येथील लोकांचा व्यवसाय झालेला आहे. कोनाक्रीजवळ कामायेन्नी, किंदिया व डालाबा येथे फळसंशोधन केंद्रे स्थापण्यात आली आहेत. कांकान व कोबा येथे भातसंशोधन केंद्रे आहेत. सेरेडू येथे कोयनेलची प्रायोगिक शाळा आहे. शेतीबरोबरच पशुपालनाचाही व्यवसाय फूटा जालन पठाराच्या उत्तरेकडील सॅव्हाना गवताळ भागात केला जातो. प्रामुख्याने या भागातील फुलानी लोक पशुपालनाचा व्यवसाय करतात. देशात १९७०-७१ साली सु. ४,८०,००० मेंढ्या, ५,००,००० शेळ्या, १८,३०,००० गाई-बैल, २५,००० डुकरे, ३,००० गाढवे व ४२,००,००० कोंबड्या होत्या. शेती, पशुपालन, लाकूडतोड, ताडाचे तेल तयार करणे व खाणकाम हेच येथील लोकांचे प्रमुख व्यवसाय होत. औद्योगिक विकास अजून फारसा न झाल्यामुळे कामगार संघटनाही निर्माण झालेल्या नाहीत. हिरे, अशुद्ध लोखंड, बॉक्साइट व सोने हे येथे मिळणारे प्रमुख खनिजपदार्थ होत. ईशान्य गिनीमधील नायजरकाठच्या सीगीरी शहराच्या आसमंतात पूर्वीपासून सोने मिळविण्याचा परंपरागत धंदा होता. तथापि आता सोन्याचे उत्पादन घटू लागले आहे. कालोऊम द्वीपकल्पात लोखंडाचा २० कोटी टनांवर साठा असून तेथे अनेक खाणी आहेत. देशातील अनेक ठिकाणी लोखंडासाठी संशोधन चालू आहे. मासेंटा जिल्ह्यात हिऱ्याच्या खाणी आहेत. येथील खाणींचा विकास यूरोपीय राष्ट्रांनी आपले भांडवल गुंतवून केला होता. पण १९६१ मध्ये सोने व हिऱ्यांच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्यानंतर हिऱ्यांचे उत्पादन घटल्याने पुन्हा राष्ट्रीयीकरण १९६३ पासून रद्द करण्यात आले. बॉक्साइटमध्ये गिनी समृद्ध असून बोके शहराच्या आसमंतात गिनीतील सर्वांत मोठा बॉक्साइटचा साठा आहे. याशिवाय देशातील अनेक भागांत बॉक्साइटचे उत्पादन होते. कॅनडा, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी व इटली ह्यांच्या ५१% भागात गिनीने काढलेल्या कंपनीद्वारा १९७८ पर्यंत ८० लक्ष टन उत्पादन काढण्याची योजना आहे. जागतिक बँकेनेही यासाठी मदत केली आहे. कोनाक्रीच्या ईशान्येकडील फ्रिया येथे बॉक्साइटचा मोठा साठा आसमंतात असल्याने बॉक्साइट शुद्ध करून ॲल्युमिनियम तयार करण्याचा मोठा कारखाना उभारला आहे. संपूर्ण आफ्रिकेत किंवा यूरोपमध्ये ॲल्युमिनियमचे उत्पादन करणारा हा सर्वांत मोठा कारखाना आहे. या कारखान्यामधून १९६० साली १७,००० टन, तर १९६८ साली ५,३५,३१० टनांचे उत्पादन झाले. हा ॲल्युमिनियमचा कारखाना म्हणजे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने गिनीने टाकलेले सर्वांत मोठे पाऊल होय. हा जगातील सर्वांत मोठा ॲल्युमिनीयमचा कारखाना बनविण्याच्या योजना आहेत. १५४ किमी. लोहमार्ग बांधून फ्रिया हे कोनाक्री बंदराशी जोडण्यात आले आहे.

गिनीमधील इतर उद्योगधंदे लहान, स्थानिक कच्च्या मालावर अवलंबून असलेले व प्रक्रियात्मक स्वरूपाचे आहेत. फ्लॅट या ब्रिटिश कारखानदाराने उघडलेला कापडउद्योग देशाची ७५% गरज भागवितो. कांकान व कोनाक्री येथे विटांचे कारखाने, कोनाक्री येथे प्लॅस्टिकचा कारखाना, सिंबाला येथे सुरुंगाच्या दारूचा कारखाना, ब्येला येथे तंबाखूचा कारखाना असून चीनच्या मदतीने बांधलेला फर्निचरचा कारखाना, साखरशुद्धी कारखाना, भाताच्या गिरण्या, अननस डबाबंद कारखाने असे उद्योग देशात आढळतात. काँकूरे नदीवरील जलविद्युत्‌शक्तीचे मोठे निर्मितिकेंद्र रशियाच्या मदतीने बांधण्यात आले आहे. १९६८ मधील विद्युत्‌शक्तीचे एकूण उत्पादन २० कोटी किवॉ. ता. होते. खनिजसंपत्तीने समृद्ध असल्यामुळे तसेच अनेक पुढारलेल्या देशांनी गिनीस मदत दिल्यामुळे या देशाचा औद्योगिक विकास होण्याची बरीच शक्यता निर्माण झाली आहे.

गिनीचा परदेशव्यापार प्रामुख्याने घाना, माली, कॅमेरून, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, पोलंड, फ्रान्स, चीन, जर्मनी, इंग्लंड इ. देशांशी चालतो. कॉफी, लोखंड, बॉक्साइट, ॲल्युमिनियम, सोने, हिरे, केळी, अननस, कातडी इ. पदार्थ व जनावरे हा देश निर्यात करतो. कोळसा, औषधे, यंत्रसामग्री, खनिजतेल, मोटारी, साखर, धान्य, कापड इ. माल आयात करतो. १९६८ साली गिनीने १,६१० कोटी गिनी फ्रँकची निर्यात केली होती, तर १,१२० कोटी गिनी फ्रँकची आयात केली होती. निर्यातीत ५०% वर ॲल्युमिनियमचा वाटा होता आणि त्याखालोखाल हिरे, लोखंड, केळी इत्यादींचा होता. गिनी फ्रँक हे येथील चलन असून १ डॉलर = २४७ गिनी फ्रँक हा त्याचा विनिमय दर आहे. १९६९-७० साली २,४३८ कोटी गिनी फ्रँकचा शिलकी अर्थसंकल्प होता.


दळणवळणाच्या मार्गांची अजूनही फारशी वाढ झालेली नाही. गिनीमध्ये १८,००० किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी ३२५ किमी. पक्के आहेत. कोनाक्रीपासून ईशान्येकडील कांकानपर्यंत ६६२ किमी. लांबीचा लोहमार्ग असून चीनच्या मदतीने तो माली देशातील बामाकोपर्यंत वाढविण्यात येत आहे. याशिवाय फ्रिया ते कोनाक्री हा १५४ किमी. लांबीचा प्रमुख लोहमार्ग आहे. देशातील महत्त्वाची शहरे विमानवाहतुकीने जोडलेली असून विदेशी राष्ट्रांशी विमानवाहतूक चालते. कोनाक्री हे उत्तम बंदर असून कासा, बेंटी व काकांदे ही दुय्यम बंदरे आहेत. देशातील दूरध्वनींची संख्या १९७२ साली ७,४८८ १९६९ साली रेडिओ ९०,००० दैनिके २ व नियतकालिके ३ होती.

लोक व समाजजीवन : गिनीच्या उत्तर भागात हॅमिटिक व सेमिटिक वंशाच्या उत्तरेकडून आलेल्या इस्लाम धर्माच्या फुलानी अथवा पेऊल टोळ्यांनी वसाहती केल्या, तर दक्षिण भागात निग्रो लोकांनी वसाहती केल्या. पसरट चेहरा, रुंद हनुवटी, आखूड नाक, जाड ओठ, उंच कपाळ, काळा वर्ण व अंगाने मजबूत ही येथील निग्रो लोकांची वैशिष्ट्ये होत. उत्तरेकडील लोकांच्या धर्मांचा आणि भाषांचा दक्षिणेकडील बऱ्याच निग्रो लोकांवर विशेष परिणाम घडून आला. दक्षिणेकडील बऱ्याच निग्रो लोकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आहे. येथील लोकांमधील प्रमुख घटक म्हणजे फुलानी (सु. २६ टक्के), मालिंके अथवा मांडिगो (सु. १६ टक्के), सुसू (सु. ९ टक्के) व किसी (सु. ४ टक्के) हे होत. येथील लोकांत धर्माने ६२% मुसलमान, १·५% ख्रिस्ती व ३५% निसर्गपूजक आहेत. लोकसंख्येच्या वार्षिक वाढीचे प्रमाण ३·४% आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या १२% लोक सुशिक्षित आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १५·३ आहे. खेड्यातील बहुतेक लोक शंकू आकाराचे छप्पर असलेल्या वर्तुळाकार झोपड्यांतून राहतात. यूरोपीय लोकांच्या वसाहतीमुळेच शहरे निर्माण झाली. व्यवसायाने पशुपालक असलेल्या पेऊल लोकांनी अलीकडे शहरांत राहण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी आपल्या मुलींचे विवाह निग्रो शेतकऱ्यांशी करण्यास सुरुवात केली आहे. येथील शासनव्यवहाराची भाषा जरी फ्रेंच असली, तरी बऱ्याच भागांत फुलानी, बंबारा मोसी, हौसी, फोन, अरबी व अनेक आफ्रिकी पोटभाषा बोलल्या जातात. १९६८ पासून आठ राष्ट्रीय भाषा मानलेल्या असून त्यांपैकी एकीचा तरी अभ्यास आवश्यक आहे. भात, ज्वारी, मासे व जनावरांचे मांस हे येथील लोकांचे प्रमुख खाद्यपदार्थ होत. नद्यांतून व समुद्रातून काही लोक मासेमारी करतात व त्यासाठी लहानलहान होड्यांचा उपयोग करतात. शेती, पशुपालन व खाणकाम हेच येथील लोकांचे प्रमुख व्यवसाय होत. स्त्रियादेखील जंगलांतील फळे गोळा करणे, मासेमारी व मळ्यांतून मजुरी करणे यांसारखे व्यवसाय करतात. साहित्याच्या दृष्टीने उल्लेखनीय प्रगती नाही आणि शिक्षणाच्या प्रसारास नुकतीच सुरुवात झाली आहे. १९६७ साली १,८०० प्राथमिक व माध्यमिक शाळांतून २,५०,००० विद्यार्थी शिकत होते. याशिवाय देशात औद्योगिक व व्यावसायिक अनेक शिक्षणसंस्था शासनाद्वारे काढण्यात आल्या आहेत. कोनाक्री येथे उच्च तंत्रसंस्था आहे. खासगी शाळा १९६२ मध्ये संपूर्णतः सरकारने ताब्यात घेतल्या. खासगी शाळा सरकारी मालकीच्या करण्यास फ्रेंच रोमन कॅथलिक धर्मगुरूने विरोध केल्यामुळे त्याला देशातून हद्दपार करण्यात आले. शाळा चालविण्यास या आफ्रिकन धर्मगुरूंनाच आता परवानगी देण्यात येते. देशात ६ मोठे दवाखाने असून ३२ लहान दवाखाने आहेत. १९६७ साली ४२,००० लोकांमागे एक डॉक्टर होता. मलेरिया, निद्राविकार, पीतज्वर, देवी हे देशातील मोठ्या प्रमाणावर होणारे रोग असून त्यांवर अत्याधुनिक उपाययोजना करण्याच्या योजना आहेत.

कोनाक्री हे गिनीच्या राजधानीचे व देशातील सर्वांत मोठे शहर व बंदर होय. देशातील लोखंड व बॉक्साइटच्या खाणींमुळे तसेच जलविद्युत्‌शक्तीमुळे या शहराचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात घडून येण्यास सुरुवात झाली आहे. काही वर्षांपूर्वी कोनाक्री हे एक लहान बंदर होते व शहराच्या रस्त्यावरून कित्येक आफ्रिकन स्त्रिया जवळजवळ नग्नावस्थेत फिरत असत परंतु यूरोपीय लोकांच्या संपर्कामुळे हे चित्र संपूर्णतः बदलून गेले आहे. कांकान (२९,१०० लोकसंख्या), किंदिया (२५,०००), सीगीरी (१२,७००), लाबे (२२,५००) ही गिनीमधील अन्य मोठी शहरे होत. गिनीमधील दाट अरण्यांचा प्रदेश अद्यापही मोठ्या प्रमाणात असमन्वेषित असल्याने तज्ञांना त्याबद्दल आकर्षण आहे. 

पाठक, अ. नी.


गिनीकोनाक्री राजधानीचे विहंगम दृश्यएक गिनी वादकपारंपरिक केशभूषा केलेली फुलानी स्त्रीगिनीतील मचाणावरील वैशिष्ट्यपूर्ण झोपडी