अबू : राजस्थान राज्याच्या सिरोही जिल्ह्यातील थंड हवेचे निसर्गरम्य गिरिस्थान, जैनांचे तीर्थक्षेत्र व ðदिलवाडा मंदिरांच्या अप्रतिम शिल्पांकरिता जगप्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या (अबूरोडसह) ३५,१७१ (१९७१). अहमदाबाद-दिल्ली या पश्चिम रेल्वेमार्गावरील अहमदाबाद प्रस्थानकापासून १८६ किमी. अंतरावर अबूरोड हे स्थानक आहे. याच्या वायव्येस अबूच्या पहाडावर २७.३५ किमी. अंतरावर अबू असून तेथपर्यंत मोटारीने जाता येते. अबू समुद्रसपाटीपासून १,१५८ मी. उंच आहे. 

‘अर-बुध’ म्हणजे ‘ज्ञानाचा डोंगर’ यावरून अबू हा शब्द आला असावा. प्लिनीने याचा ‘मॉन्स कॅपिटॅलिया’ असा उल्लेख केल्याचे आढळते. अबूचा पहाड ही जरी अरवलीचीच शाखा असली तरी पश्चिमवाहिनी बनास नदीच्या खोऱ्याने ती अलग झालेली आहे. अबूच्या पहाडाचा माथा १९ किमी. लांब व पाच किमी. रुंद पठारी प्रदेश आहे. या पठारावरील गुरुशिखर हे १,७२२ मी. उंच असून ते हिमालय-निलगिरी दरम्यानचे सर्वांत उंच शिखर आहे. याशिवाय येथे छोटीमोठी अनेक शिखरे आहेत. अबूचा पहाड विविध व रंगीबेरंगी वनश्रींनी विनटलेला असून तेथे निरनिराळे पक्षी आढळतात. 

या भागावर आठव्या शतकापर्यंत शैवपंथीयांची व त्यानंतर काही काळ जैनांची सत्ता होती. सिरोही संस्थानाधिपतीपासून ब्रिटिशांनी अबू खंडणीवर घेतले व १८४० पासून ते थंड हवेचे ठिकाण म्हणून जाहीर करण्यात आले. 

संगमरवरातील नयनमनोहर नक्षिकामामुळे भारताचे एक भूषण ठरलेली दिलवाड्याची जैन-मंदिरे हे येथे येणाऱ्या प्रवाशांचे प्रमुख आकर्षण होय. ह्याखेरीज  इतर अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. त्यांपैकी एक म्हणजे नखी-तलाव. देवांनी आपल्या नखांनी खोदला म्हणून त्याचे नाव ‘नखी’ पडले, असे सांगतात. काळे खडक, काळे बगळे, छोटी कमळे, रंगीत मासे व नौकाविहार ह्यांमुळे तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. वारा व इतर कारणांमुळे झिजून मोठा बेडकासारखा दिसणारा ‘टोड रॉक’ हा प्रसिद्ध खडक या तलावाकाठीच आहे. ह्याशिवाय येथे सनसेट पॉइंट, गुरुशिखरावरील दत्तमंदिर, अर्बुदादेवीचे पहाडी गुहेतील मंदिर, गोमुख-स्थान व तेथील वसिष्ठमंदिर, हनुमान, हत्ती व राम यांच्या गुंफा, परशुराम व अग्नी यांची कुंडे, कपिल व कनक ही तीर्थे इ. प्रेक्षणीय आहेत. अबूपासून सु. सहा किमी. वरील अचलगढ येथील महादेवाचे मंदिर (अचलेश्वर), नंदी, मंदाकिनी-कुंड वगैरेंसाठी प्रसिद्ध आहे. अबूला राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, फिरण्यासाठी गाड्या, चित्रपटगृहे, क्रीडांगणे, दुकाने इ. सुखसोयी आहेत. 

दातार, नीला


दिलवाडा मंदिर, अबूअचलगढ, अबू

'टोड रॉक', अबू

निसर्गसुंदर नखी तलाव, अबू.