हिमेजी : जपानच्या होन्शू बेटावरील ह्योगो प्रांतातील औद्योगिक शहर. लोकसंख्या ५,३५,९४५ (२०११). हे कोबे शहराच्या पश्चिमेस ५२ किमी.वर, ईशिकावा नदीकाठी, अंतर्देशीय समुद्राच्या उत्तर किनाऱ्याजवळ वसले आहे. कान्साई-क्यूशू हे औद्योगिक क्षेत्र जोडणाऱ्या महामार्गावरील हिमेजी हे मोक्याचे स्थान आहे. हिमेजी शहर हे विशेषतः कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे अन्नप्रक्रिया, पोलाद व तेलशुद्धीकरण इत्यादींचे कारखाने आहेत. १९ एप्रिल १८८९ मध्ये हिमेजी शहराची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये ३ जुलै १९४५ रोजी अमेरिकेने ७६७ टनाचे आगलावे स्फोटक बाँब टाकल्यामुळे हिमेजी शहराचा ६३% भागउद्ध्वस्त झाला. त्याचा परिणाम शहराच्या लोकसंख्येवर झाला. काही कालावधीनंतर हे शहर हारिमा औद्योगिक क्षेत्राशी जोडले गेले. हारिमा मैदानी प्रदेशातील व त्सुयामा खोऱ्यातील सुपीक जमिनीत उत्पन्न होणाऱ्या शेतमालाच्या निर्यातीमुळे हिमेजी शहराची भरभराट झाली. युद्धोत्तर काळात हे एका औद्योगिक व शेतमालाचे व्यापार केंद्र म्हणून भरभराटीस आले. हिमेजी शहरात २००६ मध्ये यासूतोमी, कोदेरा, लेशीमा, दुमेसाकी ही शहरे समाविष्ट केली आहेत. येथे लोहपोलाद, रसायने, कापड, अवजड उद्योग, कातडी वस्तूनिर्मिती, विद्युतसाहित्य इ. निर्मिती उद्योग विकसित झाले आहेत. 

 

येथील प्राचीन हिमेजी किल्ला हा जपानमधील ऐतिहासिक बांध-कामाच्या विशेष नमुन्यापैकी एक किल्ला आहे. यास शिरागासी किंवा ईग्रेट् किल्ला असेही म्हणतात. १३४६ मध्ये आकामात्सू घराण्याने हा किल्ला प्रथम बांधला. हा किल्ला ४०० वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा असल्यामुळे, दुसऱ्या महायुद्धाच्या बाँब हल्ल्यातून व १९९५ च्या भूकंपातून आणि प्रचंड वादळातून जशाचा तसा शाबूत राहिला. अलिकडे युनेस्कोने यास जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या शिवाय येथील ऐंकोजी मंदिर, मौंट सेप्पीको, हिमेजी सेंट्रल पार्क (सफारी पार्क), हिमेजी सिटी टेगारायामा बोटॅनिकल गार्डन इ. येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत. 

कुंभारगावकर, य. रा.