डी–१ : वेल्स व इंग्लंडमधील नदी. लांबी सु. ११० किमी. जलवाहन क्षेत्र २,१०५ चौ. किमी. ग्रीक भूगोलज्ञ टॉलेमी दुसऱ्या शतकात या नदीस ‘देओउआ’ असे संबोधतो. ही ग्विनेध परगण्यात दुआलच्या उतारावर उगम पावून बॅला सरोवरास शीघ्रगतीने येऊन मिळते. प्रथम ती ईशान्येस विभंग द्रोणीमार्गे वाहू लागते. नंतर ती कॉर्वेन येथे एकदम पूर्वेकडे वळून लॅनगॉलिनवरून वाहते. ही नदी डेन्बीशर-श्रॉपशर व प्लिंट-चेशर या परगण्यांची हद्द असून काही अंतर वेल्स आणि इंग्लंड यांची सरहद्द आहे. चेशरमध्ये ती समृद्ध कुरणी प्रदेशातून जाते. चेस्टरपासून आयरिश समुद्रावरील मुखापर्यंत १९ किमी. लांबी आणि सु. ८·५ किमी. रुंद सरळ गेलेली कृत्रिम खाडी आहे. मुखाजवळ नदी अतिशय उथळ असल्यामुळे वाळू व दलदल पात्रातील विस्तृत भागावर पसरलेली आहे.

कांबळे, य. रा.