फ्राय व्हेंतोस : द. अमेरिकेतील यूरग्वाय देशाच्या रीओ नेग्रो या पश्‍चिमेकडील विभागाची राजधानी. लोकसंख्या १४,००० (१९७० अंदाज). यूरग्वायची राजधानी माँटेव्हिडिओ हिच्या वायव्येस २७३·५८ किमी. वर यूरग्वाय नदीकाठी हे शहर वसले असून ते उत्कृष्ट बंदरही आहे. लोहमार्ग, हवाईमार्ग व सडकांनी मॉंटेव्हिडिओशी हे जोडलेले आहे.

‘इन्डिपेन्डेन्सिया’ या नावाने हे शहर १८५९ मध्ये स्थापन झाले. त्याचे विद्यमान नाव अठराव्या शतकातील एका धार्मिक मठावरून ठेवण्यात आले आहे.

येथे मांस डबाबंद करण्याचा देशातील पहिला कारखाना १८६१ मध्ये काढण्यात आला. नंतर शहरात प्रशीतन व शीतगृहांच्या सोयी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत गेल्याने देशातील मांस डबाबंद करण्याच्या उद्योगात हे शहर अग्रभागी राहिले. शहराच्या आसमंतात गहू, बार्ली, मका, इ. पिके होतात. फ्राय व्हेंतोसच्या पृष्ठप्रदेशातून मिळणाऱ्‍या गुरे, मांस, कातडी, लोकर, इ. चे निर्यातकेंद्र आहे.

गाडे, ना. स.