कॅनडा : उत्तर अमेरिका खंडाचा सु. ४३% प्रदेश व्यापणारे राष्ट्र. क्षेत्रफळ ९९,७६,१८५ चौ. किमी. लोकसंख्या २,१५,६८,३११ (१९७१). उत्तर अमेरिकेतील अलास्काचा व वेस्ट इंडीजचा प्रदेश सोडला, तर त्या खंडाच्या उत्तरेकडच्या अर्ध्याअधिक भागाचा व जवळच्या लहान मोठ्या बेटांचा समावेश कॅनडात होतो. या देशाच्या उत्तरेस व पूर्वेस अनुक्रमे आर्क्टिक व उत्तर अटलांटिक महासागर आहेत. या देशाची दक्षिण सरहद्द पॅसिफिक महासागर व वुड्स सरोवर यांच्या दरम्यान ४९० उ. अक्षवृत्तावरून जाते. पुढे ती अनेक लहान सरोवरांतून पिजन नदीच्या मुखापर्यंत जाते. तेथून ती पंच महासरोवरांतून व पुढे ४५० उ.  अक्षवृत्तावरून पूर्वेस संयुक्त संस्थानांच्या मेन राज्यापर्यंत जाते व शेवटी उत्तरेकडे व पुन्हा दक्षिणेकडे  जलविभाजक क्षेत्रांतून वेडीवाकडी वळणे घेत फंडीच्या उपसागरास जाऊन मिळते. कॅनडाची  पश्चिम सरहद्द दक्षिणेस पॅसिफिक किनाऱ्यावरून जाते. मात्र उत्तरेला ती आतल्या बाजूस वळून  पर्वतमाथ्यावरून पश्चिम किनाऱ्याला जवळजवळ समांतर होत वायव्येस मौंट सेंट एलिआस (१४१०  प.) पर्यंत जाते व तेथून सरळ उत्तरेकडे १४१ प. रेखावृत्तावरून बोफर्ट समुद्रास मिळते. देशाची  जास्तीत जास्त दक्षिणोत्तर लांबी सु. ४,८०० किमी. व पूर्वपश्चिम रुंदी ५,६०० किमी. असून ओटावा हे  राजधानीचे शहर आहे.

भूवर्णन : या देशाचा आकार मोठ्या आयताकार द्रोणीसारखा असून त्याच्या पूर्व भागात विस्तीर्ण  पण कमी खोलीचा हडसनचा उपसागर पसरलेला आहे. या उपसागराच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण  भागी नालाच्या आकाराचा अतिप्राचीन व कठीण प्रस्तरांचा प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाला  ‘कॅनडाची ढाल’ असे म्हणतात. हा प्रदेश उत्तरेस बराच रुंद (३,२०० किमी.) असून दक्षिणेकडे  निमुळता होत गेलेला आहे. आर्कीयन काळात या ठिकाणी पर्वतश्रेणी तयार झाल्या, पण मागील  लक्षावधी वर्षांच्या काळात त्यांची झीज होऊन आज तेथील स्थलीप्राय प्रदेशात कमी कमी उंचीच्या  टेकड्या व त्या भोवती लहानमोठी सरोवरे व नद्यांची खोरी तयार झालेली आहेत.

कॅनडाच्या ढालीच्या पूर्वेस, उत्तरेस व पश्चिमेस आणखीही पर्वतश्रेणी आहेत. पूर्वेकडील  पर्वतश्रेणींचा आकार इंग्रजी ‘व्ही’ अक्षरासारखा असून त्यांचा शिरोबिंदू पूर्वेकडील न्यू फाउंडलंड  बेटात आहे. या शिरोबिंदूपासून एक पर्वतश्रेणी नैऋत्येकडे क्वीबेक आणि मेन या राज्यांच्या  सरहद्दीवरून जाते. हीच श्रेणी दक्षिणेकडे ॲपालॅचिअन पर्वत या नावाने ओळखली जाते. मात्र संयुक्त  संस्थानांत ॲपालॅचिअन पर्वताच्या पूर्वेस जसे रुंद समुद्रतटीय मैदान आढळते, तसे ते कॅनडात  आढळत नाही कारण ते समुद्रात खचले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजेच न्यू फाउंडलंड आणि  नोव्हास्कोशाच्या पूर्वेस रुंद व उथळ समुद्रबूड जमीन तयार झाली असून, ती मासेमारीचे एक उत्कृष्ट क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. 

न्यू फाउंडलंड बेटातून दुसरी पर्वतश्रेणी वायव्येकडे जाते. ती लॅब्रॅडॉरच्या पूर्व भागापर्यंत गेलेली  आहे. या पर्वतश्रेणीची उंची उत्तर भागात २,७०० मी. असून तिच्या अनेक शाखा भोवतीच्या आर्क्टिक  बेटांत पसरलेल्या आहेत. कॅनडाच्या पूर्वेकडील व उत्तरेकडील वर उल्लेखिलेल्या पर्वतश्रेणी  मेसोझोइक महाकल्पातील सिल्युरियन आणि क्रिटेशस कल्पात तयार झालेल्या आहेत.

कॅनडाच्या पश्चिम भागी, पॅसिफिक किनाऱ्याला समांतर दक्षिणोत्तर पर्वतश्रेणी पसरलेल्या  असून, त्यांपैकी पूर्वेकडील श्रेणी रॉकी पर्वत म्हणून प्रसिद्ध आहे. रॉकी पर्वतश्रेणी उत्तरेस यूकॉन  प्रांतातून वायव्येकडे वळते. अलास्कात तिच्या शाखा चारही बाजूंस पसरलेल्या आहेत. या सर्व  पर्वतश्रेणी केनोझोइक महाकल्पाच्या सुरुवातीच्या काळात तयार झाल्याने त्या अलीकडच्या व म्हणून  अधिक उंचीच्या (३,५०० मी. पेक्षाही जास्त) आढळतात. सर्वांत उंच पर्वत शिखर मौंट लॉगन (६,०५०  मी.) यूकॉन टेरिटरीत अगदी नैऋत्येस आहे. 

वर वर्णन केलेल्या पर्वत प्रदेशांकडून कॅनडाचा भूप्रदेश अंतर्गत भागातील हडसनच्या  उपसागराकडे उतरता होत गेलेला आहे. या उपसागराची पूर्व पश्चिम लांबी ९३० किमी. व दक्षिणोत्तर रुंदी ७८४ किमी. आहे. हा उपसागर उत्तर अटलांटिक महासागराचीच एक शाखा आहे.

प्लाइस्टोसीन हिमकालात कॅनडाचा बराचसा भाग बऱ्याच काळपर्यंत हिमाच्छादित होता. पुढे कालांतराने येथील हिमप्रवहण नाहीसे झाले, तरी तेथील पूर्वीच्या  हिमानी क्रियेमुळे नवीन भूविशेष अस्तित्वात आले. ठिकठिकाणी पसरलेले दगडमातीचे हिमोढ, सरोवरे, नद्यांच्या मूळ प्रवाहांत झालेले बदल व नद्यांच्या मार्गांतील धबधबे हे सर्व हिमकाळात  झालेल्या हिमानी कार्याचेच परिणाम होत.

भूरचनेनुसार कॅनडाचे पुढील सहा प्राकृतिक विभाग पडतात :

(१) कॅनडाची ढाल : या प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ ४१⋅६ लक्ष चौ. किमी. असून यात लॅब्रॅडॉर, क्वीबेकचा बहुतांश प्रदेश, आँटॅरिओचा उत्तरे भाग यांचा समावेश होतो. या ढालीची पश्चिम सरहद्द वुड्स सरोवरापासून उत्तरेस आर्क्टिक किनाऱ्यावर डार्न्ली आखातापर्यंत गेलेली आहे. या प्रदेशाचा  पृष्ठभाग खडकाळ व प्राचीन कठीण प्रस्तरांनी बनलेला आहे. ज्या ठिकाणी जमीन थोडी मऊ  खडकांची आहे तेथे नद्यांची खोरी व लहानमोठी सरोवरे तयार झाली आहेत. ज्या ठिकाणी खडक  उभे आहेत तेथे गोलाकार लहान लहान टेकड्या झालेल्या आहेत. खरे पाहता नदी व हिम प्रवाह यांमुळे अपघर्षण झालेला हा एक पठारी प्रदेश आहे. या पठारी प्रदेशाच्या बाह्य सरहद्दीवर तुटलेले कडे तयार झाले असून तेथे धबधबे व जलप्रपात निर्माण झालेले आहेत. याच प्रदेशात फार मोठ्या  प्रमाणात जलविद्युत्‌ निर्माण करण्यात येते.

(२) अटलांटिक किनाऱ्यालगतचा प्रदेश : या प्रदेशालाच अटलांटिक प्रांत असेही म्हणतात.  कॅनडाच्या पूर्व भागातील नोव्हास्कोशा, न्यू ब्रन्सविक व प्रिन्स एडवर्ड बेट, क्वीबेकचा आग्‍नेय भाग व  न्यू फाउंडलंड यांचा या प्रदेशात समावेश होतो. हा एक पर्वतप्रदेश असून त्यातील श्रेणी ईशान्य नैऋत्य दिशांस पसरलेल्या आहेत. न्यू ब्रन्सविक प्रांतात मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश असून, त्याच्या  वायव्येस पठारी प्रदेश आहे. इतरत्र सखल प्रदेश आहे.

(३) सेंट लॉरेन्स नदीचे खोरे : यात क्वीबेक व आँटॅरिओ प्रांतांचा सखल दक्षिण भाग मोडतो. हा  प्रदेश अत्यंत सुपीक व समृद्ध असून त्याचे एकूण क्षेत्रफळ १⋅८२ लक्ष चौ. किमी. आहे. क्वीबेक शहर व  ह्यूरन सरोवर यांच्या दरम्यान अदमासे १,००० किमी. लांबीचे विस्तृत, सपाट मैदान पसरलले असून  या खोऱ्यातील आरंभीचा विकास याच भागात झाला. 


(४) मध्यवर्ती खंडांतर्गत मैदानी प्रदेश : रॉकी पर्वत व कॅनडाची ढाल यांच्या दरम्यान हा मैदानी  प्रदेश पसरलेला असून, त्यात सस्कॅचेवन व ॲल्बर्टा प्रांतांचा बराचसा प्रदेश व मॅनिटोबा प्रांताच्या  दक्षिण भागाचा समावेश होतो. दक्षिणेस हा प्रदेश बराच रुंद (४९ उ. अक्षवृत्तावर मैदानाची रुंदी  १,३०० किमी.) असून उत्तरेकडे व वायव्येकडे तो निमुळता होत गेलेला आहे (५६ उ. अक्षवृत्तावर  रुंदी ६५० किमी.). हा प्रदेश शेल व वालुकाश्म खडकांनी तयार झालेला असून सपाट आहे. मात्र हा सपाट प्रदेश पायरी-पायरीने पश्चिमेकडून पूर्वेस उतरता होत गेलेला आहे. ॲल्बर्टात याची उंची  ९०० मी. असून सस्कॅचेवन व दक्षिण मॅनिटोबात ती अनुक्रमे ६०० व ३०० मी. आहे.

(५) पश्चिमेकडील पर्वतप्रदेश : या पर्वतप्रदेशाची रुंदी ८०० किमी. असून त्यातील पर्वतश्रेणींची उंची ३,५०० ते ६,००० मी. पर्यंत आढळते. हा प्रदेश अनेक पर्वतश्रेणींनी तयार झाला असून त्या एकमेकांना समांतर दक्षिणोत्तर पसरलेल्या आहेत. अगदी पश्चिमेकडील श्रेणीस कोस्ट रेंज असे म्हणतात, तर अतिपूर्वेकडील श्रेणी रॉकी पर्वत म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिण भागात हिमरेषा २,२५० मी. ते २,७०० मी. उंचीवर आढळते. उत्तरेकडे व वायव्येकडे हिमरेषेची उंची कमी होत गेलेली आहे. रॉकी, सेलकीर्क व किनारी पर्वतश्रेणींवर हिमक्षेत्रे व हिमनद्या आहेत. या पर्वतश्रेणींच्या पश्चिम उतारावर बराच पाऊस पडत असल्याने त्या ठिकाणी दाट अरण्ये आढळतात. काही ठिकाणी पर्वतश्रेणी समुद्रकाठापर्यंत आल्यामुळे, तेथे फिओर्ड तयार झाले आहेत.

(६) आर्क्टिक बेटे : कॅनडाच्या मुख्य भूमीपासून उत्तर ध्रुवाच्या अलीकडे १६५ किमी. अंतरापर्यंत  अनेक लहानमोठी बेटे पसरलेली आहेत. त्यांपैकी बॅफीन बेट मॅनिटोबा इतके मोठे आहे. भूरचनेच्या  दृष्टीने या बेटांचा पृष्ठभाग सारखा नाही. तरीपण हिमप्रवाहांचा परिणाम त्यांवर झाला असून ती  खडकाळ आहेत.

नद्या व सरोवरे : कॅनडात हिमकालात हिमानी क्रियेमुळे ज्या ठिकाणी खळगे तयार झाले, त्यांत  पुढे वितळलेल्या बर्फाचे पाणी साचून अनेक लहानमोठी सरोवरे तयार झाली. कॅनडाच्या ढालीच्या  प्रदेशात व त्या सभोवती आज अशी अनेक सरोवरे आढळतात. यां पैकी सुपीरिअर, मिशीगन, ह्यूरन, ईअरी व आँटॅरिओ ही सरोवरे ‘पंचमहासरोवरे’ म्हणून प्रसिद्ध आहेत. यांपैकी मिशीगन सरोवर पूर्णपणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या हद्दीत असून बाकीच्या प्रत्येकामधून अमेरिकेची संयुक्त  संस्थाने व कॅनडा यांची सरहद्द गेलेली आहे.

सव्वीस हजार चौ. किमी. पेक्षाही जास्त क्षेत्रफळ असलेली सुपीरिअर, ह्यूरन, ग्रेट बेअर आणि ग्रेट स्लेव्ह ही चार मोठाली सरोवरे होत. यांशिवाय १,३०० चौ. किमी. पेक्षा जास्त क्षेत्रफळांची व  निरनिराळ्या आकारांची सु. ४० सरोवरे आहेत. अगदी लहान सरोवरे व तळी सेंद्रीय पदार्थांमुळे  हळूहळू बुजण्याच्या मार्गावर असून, तेथे हल्ली दलदल व पीट दलदल तयार झालेली आहे. पण  कॅनडातील बहुसंख्य सरोवरांतून पाणी नद्यांमार्गे उपसून जात असल्याने ती नेहमी शुद्ध, स्वच्छ व  गोड्या पाण्याची राहिली आहेत. फक्त सस्कॅचेवन प्रांतात काही सरोवरांच्या बाबतीत अशी  परिस्थिती नसल्याने ती खाऱ्या पाण्याची आहेत. कॅनडाच्या काही भागात जास्त उंचीवरील  सरोवराचे पाणी जवळच्या कमी उंचीवरच्या सरोवरात ओसंडून जाते. अशा सरोवरांतून व त्यांना  जोडणाऱ्या नद्यांच्या प्रवाहांतून शेकडो किमी. अंतरापर्यंत ‘कानू’तून ये-जा करता येते.  पंचमहासरोवरे व सेंट लॉरेन्स नदी ही जलमार्ग म्हणून जगप्रसिद्ध आहेत. 

सरोवरांप्रमाणेच कॅनडातील नद्यांची संख्याही बरीच मोठी आहे. हडसन उपसागरास येऊन  मिळणाऱ्या मोठ्या व महत्त्वाच्या नद्यांत ईस्टमन, रूपर्ट, ऑल्बानी, सेव्हर्न, नेल्सन आणि चर्चिल या  नद्यांची गणना होते. नेल्सन नदी या सर्वांत मोठी असून तिला विनिपेग, विनिपेगोसिस, मॅनिटोबा इ.  सरोवरांतून पाण्याचा पुरवठा होतो.

ॲल्बर्टा, सस्कॅचेवन आणि ब्रिटिश कोलंबिया या प्रांतांच्या उत्तर भागातील पीस, ॲथाबास्का व मॅकेंझी या नद्या महत्त्वाच्या आहेत. यांपैकी मॅकेंझी नदीची एकूण लांबी ४,२१६ किमी. असून त्यापैकी  १,७६० किमी. अंतरापर्यंत डिझेलवर चालणाऱ्या लहान आगबोटीने किंवा पडावाने वाहतूक करता  येते. दक्षिणेकडे सस्कॅचेवन महत्त्वाची आहे. वायव्येकडील दुसरी महत्त्वाची नदी यूकॉन ही होय.  पॅसिफिक किनाऱ्यापासून ३२ किमी. अंतरावर उगम पावून ती उत्तरेस आणि वायव्येस अलास्कामधून  वाहत जाऊन शेवटी बेरिंग समुद्रास मिळते.

पश्चिम किनारपट्टीतील सर्व नद्या पॅसिफिक महासागरास जाऊन मिळतात. त्यांत कोलंबिया, फ्रेझर, स्कीना व स्टिकीन या नद्या महत्त्वाच्या आहेत. या नद्यांच्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या  खोऱ्यातून कॅनेडियन पॅसिफिक व कॅनेडियन नॅशनल लोहमार्ग गेलेले आहेत. कॅनडातील अनेक  नद्यांचा उपयोग जलविद्युत्‌ शक्ती निर्माण करण्याकडे होतो.

कॅनडाची पश्चिम किनारपट्टी व लगतची समुद्रबूड जमीन फारच अरुंद आहे. जवळून वाहणाऱ्या  ब्रिटिश कोलंबिया प्रवाह किंवा अलास्का प्रवाह या उष्ण प्रवाहामुळे येथील हिवाळा सौम्य असतो.  याउलट कॅनडाच्या पूर्वेकडील समुद्रबूड जमीन रुंद आहे पण तेथे सेंट लॉरेन्सच्या मुखाशी व  हडसनच्या उपसागरात बऱ्याच काळपर्यत बर्फ जमत असल्याने तसेच लॅब्रॅडॉर प्रवाह या थंड प्रवाहाच्या परिणामामुळे वाहतुकीसाठी तो प्रदेश फक्त  ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंतच खुला असतो.

खनिज संपत्ती : हा देश खनिज संपत्तीने समृद्ध आहे. जागतिक उत्पादनाच्या ७५% निकेल  कॅनडातून येते. शिवाय ॲस्बेस्टसच्या उत्पादनात हा देश अग्रेसर आहे. याशिवाय लोखंड, तांबे, शिसे, जस्त, सोने, जिप्सम व काही दुर्मिळ खनिजांच्या बाबतीत हा देश समृद्ध आहे. लोखंडाच्या  खाणी आँटॅरिओ, क्वीबेक व लॅब्रॅडॉरमधील सरहद्दीवरचा प्रदेश यांत आहेत. अशुद्ध लोखंडाचे हे साठे  उत्तरेस अंगावाच्या आखातापर्यंत पसरलेले आहेत. न्यू फाउंडलंड व क्वीबेक या प्रांतांच्या  सरहद्दीवरही मोठाले साठे आहेत. तांबे आणि निकेल आँटॅरिओ प्रांताच्या सडबरी विभागात व  अटलांटिक प्रांतात आढळतात. कॅनडातील ९०% जिप्सम नोव्हास्कोशाच्या खाणींतून मिळते. शिसे, जस्त व चांदी यांचे साठे अटलांटिक प्रांतात, रॉकी पर्वत भागात व पॅसिफिक किनाऱ्याजवळच्या  प्रदेशांत आहेत. प्रेअरीच्या उत्तरेला तांबे, जस्त व चांदी ही लिन सरोवराजवळ आणि मॅनिटोबाच्या  उत्तरेस फ्‍लिन फ्‍लॉन येथे काढली जातात. संयुक्त संस्थानांच्या सरहद्दीजवळील गोल्ड रेंज ही श्रेणी  तांबे आणि सोन्याने समृद्ध असून रॉसलँड, ट्रेल व फर्नी येथे सोन्याच्या खाणी आहेत. शिवाय आँटॅरिओ प्रांतात सोने आढळते. रॉकी पर्वताच्या पायथ्याजवळच्या प्रदेशात एडमंटन व कॅलगारी येथे  कोळशाचे साठे आहेत. १९४७ साली लेडूक येथे खनिज तेल आढळले. त्यानंतर रेडवॉटर, गोल्डन स्पाईक, पेंबिना इ. भागांत सस्कॅचेवनच्या पश्चिम व आग्‍नेय भागांत व ॲबर्ल्टा प्रांतात, तसेच  ॲथाबास्का नदीच्या खोऱ्यात कोळशाचे व नैसर्गिक खनिजवायूचे मोठाले साठे सापडले आहेत. या खनिजां शिवाय कॅडमियम व पॅलेडियम (रॉकी प्रदेशात), युरेनियम (ॲथाबास्का सरोवराच्या उत्तर काठावर आणि आँटॅरिओ प्रांतात) ही दुर्मिळ खनिजे कॅनडात मिळतात.


हवामान : कॅनडाचा सर्वच भाग शीत समशीतोष्ण व शीत कटिबंधात असल्याने काही अपवाद वगळल्यास येथील हवामान सौम्य व थंड आहे. कॅनडाच्या हवामानावर तीन प्रकारच्या वायुराशींचा परिणाम झाला आहे. उत्तरेकडील ध्रुवीय थंड हवा (ध्रुवीय वायुराशी) हिवाळ्यात आर्क्टिक महासागरावरून दक्षिणेकडे थेट पंचमहासरोवरांपर्यंत पसरते व त्यामुळे मॅकेंझी नदीच्या खोऱ्यापासूनते हडसन उपसागरापर्यंत तपमान गोठणबिंदूपेक्षाही खाली उतरते. उन्हाळ्यात ह्या वायुराशीचा मार्ग थोडा पूर्वेकडून-हडसन सामुद्रधुनीतून जातो. दुसरा वायुराशी मेक्सिकोच्या आखातात सुरू होतो. या आखातातून उबदार, दमट हवा उन्हाळ्यात उत्तरेकडे पसरू लागते व कॅनडाचा बराचसा आग्‍नेय भाग व्यापून तेथील हवामान दमट व उबदार करते. हिवाळ्यात आँटॅरिओच्या दक्षिण भागात बर्फ वितळण्याची आकस्मिक क्रिया याच हवेमुळे घडून येते. तिसरा वायुराशी उत्तर पॅसिफिक महासागरावरून पूर्वेकडे सरकतो. या वायुराशीतील हवा सौम्य व दमट असल्याने तिच्यामुळे ब्रिटिश कोलंबियातील हवामान हिवाळ्यात सौम्य व दमट असते. याच हवेमुळे उन्हाळ्यात तेथे पाऊस पडतो. हिवाळ्यात कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावर लॅब्रॅडॉर शीत प्रवाहाचा व ध्रुवीय हवेचा परिणाम होतो. याउलट पश्चिम किनाऱ्यावर उबदार प्रवाहाचा परिणाम होत असल्याने पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर तपमान २० से. पेक्षा जास्त असते. जानेवारी महिन्यातील ० से. ची समताप रेषा दक्षिणेस सेंट लुइस (सं. संस्थाने) वरून जाते. याचा अर्थ असा की हिवाळ्यात कॅनडात सर्वत्र हिवाळा फार कडक असून तपमान गोठणबिंदूखाली असते. अर्थात अक्षांशानुसार त्यात फरक जाणवतो. जानेवारीत माँट्रिऑलचे सरासरी तपमान -४ से. असते. खंडांतर्गत भागात विनिपेग येथेते -१८ से. असते, तर उत्तरेस आर्क्टिक बेटांत ते सरासरी -३७ से. इतके असते. पॅसिफिक किनाऱ्यावर ते फक्त गोठणबिंदूवर (व्हिक्टोरिया ४ से.) असते आणि तेथे हिवाळा सौम्य असतो.

हिवाळ्यात हिमवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. हिमवृष्टीचे प्रमाण खालीलप्रमाणे आढळते : माँट्रिऑल : दोन-सात मी., क्वीबेक : तीन मी., प्रेअरी प्रदेश : एक मी. ज्या ठिकाणी बर्फाचा पातळ  थर जमतो, त्या ठिकाणी जमीन खोलवर गोठलेली असते. प्रेअरी प्रदेशाच्या काही भागात जमीन एक  मी. खोलीपर्यंत गोठलेली असते. अतिउत्तरेकडे हिमवृष्टी इतकी मोठी होते की तेथील बर्फ  उन्हाळ्याअखेर वितळते.

सर्वसाधारणपणे एप्रिलअखेरपर्यंत जमीन हिमाच्छादित राहते. मे महिन्यात बर्फ वितळून तपमान  वाढू लागते व जुलै महिन्यात ते कमाल मर्यादा गाठते. उन्हाळ्यातील तपमान बरेचसे अक्षांश व  समुद्रापासून अंतर या दोन गोष्टींवर अवलंबून असते. जुलै महिन्याचे सरासरी तपमान माँट्रिऑल  २१ से., विनिपेग २० से., व्हिक्टोरिया १६ से. व अतिउत्तरेस २ से. असे आढळते. उन्हाळ्यानंतर  येणाऱ्या शरद ऋतूत तपमान सौम्य असते व आकाश निरभ्र असते.

कॅनडात पाऊस मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात (मे ते ऑगस्ट) पडतो. पश्चिमेकडील पर्वतप्रदेशात  काही ठिकाणी २५० सेंमी. पेक्षाही अधिक पाऊस पडतो. मात्र पुढे पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होते.  कॅनडाच्या उत्तरेकडील बऱ्याच भागांत व मध्यवर्ती भागात वार्षिक पर्जन्यमान ५० सेंमी. असते व  प्रेअरी प्रदेशात ते प्रमाण ३० सेंमी. पेक्षाही कमी असते. हा पाऊस तेथे येणाऱ्या आवर्तांमुळे पडतो. सेंट लॉरेन्सच्या खोऱ्यात १०० ते १३० सेंमी. पाऊस पडतो.

कॅनडात हवामानाचे पुढील प्रकार आढळतात : पश्चिम किनारी प्रदेशात पश्चिम यूरोपीय  हवामान : सेंट लॉरेन्स नदीच्या खोऱ्यात सेंट लॉरेन्स प्रकारचे हवामान पश्चिमेकडील खंडांतर्गत  भागात प्रेअरी प्रकारचे हवामान त्याच्या उत्तरेस व पूर्वेस तैगा प्रकारचे हवामान व अतिउत्तरेला टंड्रा  प्रकारचे हवामान.

वनस्पती : कॅनडात अक्षांशानुसार व हवामानानुसार नैसर्गिक वनस्पतींच्या प्रकारातही बदल  झालेला आढळतो. कॅनडाच्या काही भागात दाट अरण्ये, काही भागात गवत तर काही भागात फक्त  शेवाळेच वाढताना दिसते. कॅनडाचा ४०% भाग अरण्याने व्यापलेला असून, या अरण्याची उत्तर मर्यादा तरु-रेषेच्या रूपाने लॅब्रॅडॉरच्या उत्तर भागातून व हडसन उपसागराच्या दक्षिण किनाऱ्यावरून  वायव्येला मॅकेंझी नदीच्या मुखापर्यंत चापासारखी गेलेली आहे. या रेषेच्या दक्षिणेस पश्चिमेकडील  प्रेअरी प्रदेश सोडल्यास संयुक्त संस्थानांच्या सरहद्दीपर्यंत अरण्ये पसरलेली आहेत. या प्रदेशात काही  ठिकाणी मिश्र जातीची अरण्ये आढळत असली, तरी त्याशिवाय अरण्यांचे तीन प्रमुख प्रकार दिसून  येतात : (१) सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये : यात मऊ लाकडाची स्र्पूस, पाईन, सीडार ही झाडे मुख्यतः  आढळतात (२) रुंदपर्णी पानझडी वृक्षांची अरण्ये : यात बर्च, मॅपल, ॲश, एल्म, ओक, हिकरी आणि  बीच हे झाडांचे प्रकार दिसतात (३) पश्चिम किनाऱ्यालगतच्या दमट प्रदेशातील अरण्ये : यात  डग्लस फर, सित्का स्र्पूस, तांबडे सीडार व एल्डर, हेमलॉक इ. ७५ ते ९० मी. उंचीचे वृक्ष आहेत. 

अरण्यप्रदेशाच्या पश्चिमेकडील पर्जन्यछायेत, ३० सेंमी पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात गवत  वाढते. तरु-रेषेच्या उत्तरेस खुरटी झाडे, गवत व शेवाळे वाढते.

कॅनडातील हवामान व वनस्पती यांचा परिणाम तेथील मृदांवरही झालेला आहे. कॅनडातील पूर्व  भागात पडझोल जातीची मृदा आढळते. पण तेथेही भूरचना व वनस्पतीप्रकार यांच्या भिन्नतेमुळे  ढाल प्रदेशातील पिंगट पडझोल व सेंट लॉरेन्स खोऱ्याच्या सखल भागातील पिंगट-राखी रंगाची  पडझोल असे उपप्रकार आढळतात. नैऋत्य सस्कॅचेवन व आग्‍नेय ॲल्बर्टा या पश्चिमेकडील  खंडातर्गत भागात पावसाचे प्रमाण फारच कमी असल्याने तेथे फक्त आखूड गवत उगवते. या भागात कमी सेंद्रीय द्रव्ये असलेली पिंगट मृदा आढळते. या प्रदेशाच्या उत्तरेस व पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत असल्याने तेथे करड्या-पिंगट रंगाचा पट्टा चंद्रकोरीप्रमाणे पिंगट मृदेच्या पट्ट्याभोवती पसरलेला आहे. ज्या ठिकाणी पावसाचे  प्रमाण बरेच असते, तेथे सेंद्रिय द्रव्यांनी समृद्ध अशी काळी प्रेअरी मृदा तयार झाली आहे. तिच्या कमी  वृष्टीच्या सीमेवर सुप्रसिद्ध चर्नोझम मृदा आढळते. ब्रिटिश कोलंबियाच्या पठाराच्या मध्यभागी व  गवताळ प्रदेशाच्या उत्तर भागात करड्या रंगाची मृदा आढळते. पश्चिमेकडील पर्वतप्रदेशात हवामान, उताराचे स्वरूप व वनस्पती यांच्या भिन्नतेनुसार मृदांचे अनेक प्रकार दिसून येतात.

प्राणी : कॅनडात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. अधिक संख्येने आढळणारे प्राणी म्हणजे  कस्तुरी-वृषभ व वापिती नावाचे सांबर हे होत. वापितींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  उत्तरेकडच्या ओसाड भागात ‘कॅरिबू’ सांबर आढळते. शिवाय श्वेत, ग्रिझली व काळी अस्वले आणि  श्वेत कोल्हे दिसून येतात. तैगा अरण्यात ‘मूस’ नावाचे सांबर, टोकदार शिंगांचा काळवीट व  व्हर्जिनिया जातीचा हरिण हे मोठ्या प्राण्यांचे प्रकार आढळतात. अरण्यात लांडगे आणि मैदानात  कॉयोट आहेत. पश्चिमेकडे प्यूमाही आढळतो. त्याच्या शिवाय या अरण्यात लिंक्स, बीव्हर, ऑटर मार्टिन, मिंक, स्कंक इ. फरधारी प्राणीही आढळतात. मात्र त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत  असल्याचे आढळून आले आहे. मैदानी प्रदेशात व्हर्जिनिया हरिण व ॲल्बर्टाच्या उत्तरे भागात गव्यांचे  कळप दिसून येतात. ब्रिटिश कोलंबियाच्या प्रदेशात रानमेंढ्या व रानबोकड पुष्कळ दिसतात. येथे  गरुड, ससाणा व घुबड यांच्या अनेक जाती, द्रोणकावळा, साधा कावळा, चिमण्या, अनेक प्रकारचे  गाणारे पक्षी तसेच गल, करढोक, टर्न, गॅनेट इ. अनेक पाणपक्षी विपुल आहेत. शिवाय  ऋतुमानानुसार दक्षिणोत्तर स्थानांतर करणारे निरनिराळे पक्षीही आढळतात.

वाघ, दि. मु.


इतिहास : प्राचीन काळी कॅनडात गहूवर्णी इंडियनांची वस्ती होती. नवव्या व दहाव्या शतकांतली फ एरिकसनच्या नेतृत्वाखाली व्हायकिंग टोळ्या कॅनडात आल्या असाव्यात. कित्येक व्हायकिंगह्या प्रांतात स्थायिकही झाले असावेत. परंतु व्हायकिंगांच्या अमेरिकेवरील स्वाऱ्यांचा आणि वसाहतींचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. त्यामुळे कॅनडाच्या इतिहासाला खरी सुरुवात अर्वाचीन काळाचत झाली, असे म्हणावयास हरकत नाही. इंग्‍लंडच्या सातव्या हेन्रीच्या आश्रयाने १४९७ मध्ये जॉन कॅबट हा इटालियन समन्वेषक पूर्वेच्या शोधार्थ निघाला. तो बहुधा न्यू फाउंडलंड मध्ये किंवा केपब्रेटन बेटावर उतरला असावा आणि त्या भागावर त्याने सातव्या हेन्रीचा हक्क प्रस्थापित केला. तसेच १५३४ ते १५४१ च्या दरम्यान झाक कार्त्ये या समन्वेषकाने फ्रान्सच्याच आश्रयाने केलेल्या तीन सफारींत सेंट लॉरेन्सचे आखात, सेंट लॉरेन्स नदीचा परिसर इ. भागात संचार केला पण या प्रांतात फ्रान्सची वसाहत स्थापण्याचे त्याचे उद्दिष्ट सफल झाले नाही. कार्त्येनंतर अनेक फ्रेंच नावाड्यांनी व व्यापाऱ्यांनी कॅनडात संचार केला व मासळी आणि लोकर यांचा व्यापार सुरू केला. १६०८ साली साम्युएल द शांप्लँ याने क्वीबेक ह्या कॅनडातील पहिल्या फ्रेंच वसाहतीची स्थापना केली. व्यापाराबरोबर धर्मप्रचारकही कॅनडात संचार करू लागले. या कालखंडात कॅनडाच्या निरनिराळ्या भागांत सु. दहा हजार फ्रेंच नागरिक स्थायिक झाले. तेव्हा १६६३ मध्ये चौदाव्या लुइने क्वीबेकला फ्रेंच साम्राज्यातील प्रांताचा दर्जा बहाल केला व फ्रेंच वसाहतींना न्यू फ्रान्स हे नाव मिळाले. न्यू फ्रान्समध्ये गव्हर्नर हा राजप्रतिनिधी होता. तो वसाहतीच्या संरक्षणव्यवस्थेकडे पाही तर इन्टेन्ड हा मुलकी अधिकारी व त्याचे कौन्सिल मुलकी प्रशानसाचे व न्यायदानाचे काम पाही. क्वीबेकच्या बिशप लाइन्टेन्डच्या कौन्सिलात स्थान असून तो वसाहतीचा धर्मप्रमुख असे. फ्रान्सप्रमाणे इंग्‍लंडच्याही वसाहती न्यू फाउंडलंड, हडसन उपसागराच्या परिसरात व उत्तर अमेरिकेच्या इतर प्रदेशात होत्या. त्यांपैकी काही इंग्‍लंडने हॉलंडकडून मिळविल्या होत्या व  बाकीच्या इंग्रज रहिवाशांनी स्थापन केल्या होत्या. इंग्रज व फ्रेंच वसाहतवाल्यांत लोकरीच्या  व्यापारावरून व इतर कारणांमुळे अनेक तंटे उद्‌भवत. परंतु १६७५ पर्यंत यांच्यातील संघर्षाला तीव्र स्वरूप आले नव्हते. १६७० मध्ये स्थापन झालेल्या हडसन कंपनीच्या परिश्रमाने व उत्रेक्तच्या तहाने (१७१३) हडसन उपसागराच्या परिसरात ब्रिटिशांना वसाहती मिळाल्या. नोव्हास्कोशातही  ब्रिटिशांनी वसाहत स्थापिली. फ्रेंचांनी लुइझिॲना ही वसाहत स्थापिली (१६९९). आपल्या  वसाहतींचे रक्षण सुलभतेने व्हावे व किनाऱ्यापासून आतल्या मुलखात ब्रिटिशांचा शिरकाव होऊ नये, म्हणून फ्रेंचांनी लुइझिॲना व उत्तरेकडील न्यू फ्रान्स वसाहतींना जोडणारी किल्ल्यांची एक रांगच  उभारावयाची योजना अंमलात आणली.

१७४० मध्ये यूरोपात ऑस्ट्रियन वारसायुद्ध सुरू झाल्यानंतर इंग्‍लंड-फ्रान्सच्या अमेरिकेतील  वसाहतींत युद्ध पेटले. या युद्धात ब्रिटिश सैन्याने फ्रेंचांचा लुइसबर्ग किल्ला काबीज केला, पण १७४८ च्या एक्स-ला-शापेलच्या तहाने तो फ्रान्सला परत मिळाला. यानंतर सहाच वर्षांनी इंग्‍लंड-फ्रान्सच्या  अमेरिकेतील वसाहतींत युद्धाला पुन्हा सुरुवात झाली व १७५६ मध्ये सुरू झालेल्या सप्तवार्षिक युद्धाचे ते तात्कालिक कारण ठरले. अब्राहम टेकडीवरील भीषण संग्राम आणि तदानुषंगिक क्वीबेकचे पतन (१७५८) ही या युद्धातील एक महत्त्वाची घटना होय. या एका संग्रामाने फ्रेंचांचे अमेरिकेतील साम्राज्य  संपुष्टात आले. १७६३ च्या पॅरिसच्या तहाने सबंध कॅनडा इंग्‍लंडला मिळाला आणि कॅनडाच्या  इतिहासातील अर्वाचीन युगास सुरुवात झाली. 

कॅनडाचा प्रचंड विस्तार व तेथील ६५,००० वर रोमन कॅथलिक फ्रेंच भाषिकांची वस्ती, यांमुळे  इंग्‍लंडच्या शासनापुढे अनेक बिकट समस्या उभ्या राहिल्या. कॅनडातील फ्रेंच रहिवाशांत नव्या  राजवटी विषयी आत्मीयता निर्माण करण्यासाठी प्रशासनात फ्रेंचांना मानाचे स्थान देणे जरूरीचे होते. परंतु तत्कालीन ब्रिटीश कायद्यानुसार रोमन कॅथलिकांना मताधिकार तर नव्हताच पण सरकारी  नोकरीतही त्यांना प्रवेश नव्हता. तेव्हा इंग्‍लंडच्या कॅथलिकां विषयीच्या धोरणाला कॅनडापुरती मुरड  घालण्याचे ठरवून १७७४ मध्ये इंग्‍लंडने ‘क्वीबेक ॲक्ट’ संमत केला. या कायद्याने कॅनडातील रोमन चर्चला मान्यता मिळाली. रोमन कॅथलिकांना सरकारी नोकऱ्या मिळणे शक्य झाले. ब्रिटिश  कायद्याबरोबरच फ्रेंच दिवाणी कायद्यालाही मान्यता देण्यात आली.

क्वीबेक ॲक्टमुळे तेथील फ्रेंच लोक संतुष्ट झाले. त्यामुळे अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धप्रसंगी  तेथील फ्रेंचांनी इंग्‍लंडविरुद्ध उठाव केला नाही. कॅनडावर प्रत्यक्ष स्वारी करून ब्रिटिशांना शह  देण्याचाही अमेरिकनांचा प्रयत्न फसला. उलट स्वातंत्र्ययुद्धकाळात व त्यानंतर अल्पावधीत सु.  ६०,००० राजनिष्ठ ब्रिटिश नागरिकांनी कॅनडात स्थलांतर केले. त्यामुळे सरोवरी मुलखात  ब्रिटिशांची संख्या वाढली. क्वीबेक मध्ये पूर्वीप्रमाणे फ्रेंच बहुसंख्य राहिले, म्हणून १७९१ साली अपर व  लोअर असे कॅनडाचे दोन भाग पाडण्यात आले प्रत्येकाला स्वंतत्र गव्हर्नर व सरकार नियुक्त  कायदेमंडळ देण्याची व्यवस्था झाली. परंतु एवढ्याने दोघांचेही समाधान झाले नाही. दोन्ही  कॅनडातील पुढारी लोकनियुक्त कायदेमंडळ मिळावे व गव्हर्नरचे कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला  जबाबदार असावे, अशी मागणी करू लागले. या मागण्यांकडे दीर्घकाल दुर्लक्ष झाल्याने असंतोष  वाढत गेला व परिणामी दोन्ही कॅनडांत बंडे झाली (१८३६–३८). तेव्हा यावर तोडगा सुचविण्यासाठी  ब्रिटिश सरकारने लॉर्ड डरॅमची नेमणूक केली.

डरॅमच्या कॅनडाविषयक अहवालाने कॅनडाच्याच नव्हे, तर परिस्थितीने एकंदर ब्रिटिश  वसाहतींच्या व ब्रिटिशांच्या वसाहती विषयक धोरणात क्रांतिकारक बदल घडवून आणला. अंतर्गत  शासनाच्या बाबतीत स्वायत्तता देण्याने कॅनडातील असंतोष नाहीसा होईल, इंग्रज व फ्रेंच भाषिकांत  एकोपा निर्माण होईल व साम्राज्यातून फुटून निघण्याची चळवळ कॅनडात मूळ धरणार नाही, असे मत  डरॅम अहवालात मांडले गेले. डरॅमच्या शिफारशी न स्वीकारता ब्रिटिश तत्कालीन सरकारने इंग्रज व  फ्रेंच भाषिकांतील तेढ कमी करण्यासाठी १८४० मध्ये अपर व लोअर कॅनडाचे एकीकरण केले. परंतु  या एकीकरणाने काहीच साध्य न झाल्याने ब्रिटिश शासनाने पूर्व व पश्चिम कॅनडा असे नवे विभाग पाडून तेथील स्थानिक कौन्सिलांना बरेच अधिकार दिले. या धोरणाने कॅनडातील असंतोष कमी  झालेला दिसताच, कॅनडाला अंतर्गत शासनाबाबतीत स्वायत्तता देण्याचे ठरवून या धोरणाची  अंमलबजावणी करण्यासाठी लॉर्ड एल्जीनला कॅनडाचा गव्हर्नर जनरल म्हणून पाठविले. त्याने  इंग्‍लंडच्या पद्धतीप्रमाणे कॅनडाचा कारभार चालविला, तरी कॅनडातील इंग्रज व फ्रेंच यांच्यातील तेढ  कमी झाली नाही. जॉन मॅक्डॉनल्ड व जॉर्ज ब्राऊन यांच्या प्रयत्नांनी कॅनडातील विविध प्रांतांच्या  परिषदेत संघराज्याची कल्पना मान्य झाली व तदनुसार ब्रिटिश पार्लमेंटने १८६७ मध्ये ‘डोमिनियन ऑफ कॅनडा’ हे संघराज्य स्थापन केले. त्यात क्वीबेक, आँटॅरिओ, नोव्हास्कोशा, न्यू ब्रन्सविक हे  घटक प्रांत होते. मात्र न्यू फाउंडलंडला संघात सामील होण्यास १९४९ साल उजाडले. 

संघस्थापनेनंतर कॅनडाला दळणवळणातील अडचणी, श्रमिकांचा तुटवडा, इंग्रज व फ्रेंच  यांच्यातील तेढ, मेटीस लोकांची (फ्रेंच आणि इंडियन यांची संकर प्रजा) दोन बंडे (१८६९–१८७३ व  १८८५) अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.


पहिल्या महायुद्धात कॅनडाने इंग्‍लंडला सैन्य, दारूगोळा, अन्न व कर्जपुरवठा करून फार  मोलाची कामगिरी बजावली. युद्धोत्तर काळात तह परिषदेत स्वतंत्र प्रतिनिधित्व व राष्ट्रसंघाचे (लीग  ऑफ नेशन्स) सभासदत्व मिळाल्याने कॅनडाचे राजकीय महत्त्व वाढले. तसेच हवाई वाहतुकीची  सुरुवात, लोहमार्गांचे राष्ट्रीयीकरण, नव्या खाणींचा शोध, शेतीची आणि उद्योगधंद्यांची वाढ यांमुळे  कॅनडात समृद्धीचे नवे युग अवतरले. मात्र अन्य देशांप्रमाणेच १९२९ च्या आर्थिक मंदीचा तडाखा  कॅनडाला बसून आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.

कॅनडा व ब्रिटिश साम्राज्यातील अन्य देश यांनी केलेल्या मौलिक साहाय्याने पहिल्या महायुद्धात  दोस्त राष्ट्रांना विजय मिळविणे सुलभ झाले होते. म्हणून १९३१ च्या ‘स्टॅट्यूट ऑफ वेस्ट मिन्स्टर’ने  सर्व वसाहती समान दर्जाच्या आहेत, ह्या तत्त्वास कायद्याने मान्यता दिली.

दुसऱ्या महायुद्धातही कॅनडा, इंग्‍लंड-अमेरिकेच्या बाजूने लढला. अल्पावधीत फार मोठे सैन्य  कॅनडाने उभारले. युद्धोत्तर काळातही कॅनडाने यूरोपीय देशांना अन्न आणि इतर वस्तूंचा उदारपणे  पुरवठा केला. तसेच युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या देशांतील शेकडो नागरिकांना कॅनडात आश्रय  मिळाला. युद्धानंतर १०–१२ वर्षे कॅनडाची सूत्रे लिबरल पक्षाकडे होती. नंतर काँझर्व्हेटिव्ह पक्षाकडे व  फिरून १९६३ मध्ये लिबरल पक्षाचा पुढारी लेस्टर पीअर्सनकडे आली.

संयुक्त राष्ट्रे या संघटनेत व ब्रिटिश राष्ट्रकुलातही आज कॅनडाला महत्त्वाचे स्थान आहे.  इंग्‍लंड-अमेरिकेशी सहकार्य, संयुक्त राष्ट्रे या संघटनेत कम्युनिस्ट गटाला विरोध, असे धोरण जरी  कॅनडाने स्वीकारले असले, तरी १९६० नंतरच्या मंदीकालात कम्युनिस्ट देशांशीही व्यापारी करार  करण्यास वा इंग्‍लंडच्या यूरोपीय कॉमन मार्केट प्रवेशाला विरोध करण्यास मागेपुढे पाहिलेले नाही.  तसेच १९६२ मधील क्यूबा प्रकरणी अमेरिकेला कॅनडाचे अमेरिकेचे हवाईतळ वापरता आले नाहीत.  संयुक्त राष्ट्रांत चीनला प्रवेश मिळावा, म्हणून कॅनडाने पाठिंबा दिला तर दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषाच्या धोरणास त्याचा विरोध होता. तसेच अमेरिकेच्या व्हिएटनाम धोरणासही कॅनडाचा नेहमीच विरोध होता. अविकसित देशांना साहाय्य देण्यात कॅनडाचा पुढाकार असून शांततेसाठी कोणत्याही कृत्याला कॅनडाचा नेहमीच पाठिंबा आहे. शांततेच्या कार्यासाठीच १९५७ साली कॅनडाचे परराष्ट्रमंत्री लेस्टर पीअर्सन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. एकंदरीत डोमिनियन असा शब्द कॅनडाच्या नावात असला, तरी कॅनडा स्वत:ला पूर्णपणे स्वतंत्र समजतो. अंतर्गत बाबतीत औद्योगिक प्रगती व आर्थिक स्थैर्य कॅनडाने साध्य केले आहे. पण क्वीबेकमधील फ्रेंचांनी विभक्त होण्याची चळवळ आरंभली असून त्यावरून बहुभाषिक कॅनडाचे एकसंघ राष्ट्र करण्याचे उद्दिष्ट अद्यापि साध्य व्हावयाचे आहे.

ओक, द. ह.

राजकीय स्थिती : ब्रिटिश वसाहतवादातून स्वतंत्र स्वयंशासनाकडे संविधानात्मक वाटचाल करताना कॅनडामध्ये प्रादेशिक व राजकीय एकत्रीकरणाची क्रिया चालू होती. ब्रिटिश पार्लमेंटच्या अनेक कायद्यांनी कॅनडाची घटना घडत गेली असली, तरी कॅनडामध्ये संविधनात्मक पद्धतीचा पाया १८६७ च्या ‘ब्रिटीश नॉर्थ अमेरिका ॲक्ट’ने घातला गेला यातच वेळोवेळी दुरुस्त्या होऊन तो ॲक्ट आजच्या कॅनडाचे संविधान बनला आहे. लिखित संघराज्यात्मक संसदीय शासनपद्धती, मंत्रिमंडळात्मक कार्यकारिणी, सीनेट व हाउस ऑफ कॉमन्स असे द्विसदनी कायदेमंडळ, उच्चतम न्यायालय ही कॅनडाच्या संविधानाची काही वैशिष्ट्ये म्हणून निर्देशिता येतील. ब्रिटिश नॉर्थ अमेरिका ॲक्ट व्यतिरिक्त रूढी, परंपरा आणि न्यायालयीन निर्णय यांनीही कॅनडामध्ये अलिखित संविधान निर्माण केले आहे. केंद्र व प्रांत यांच्यामधील अधिकारांची विभागणी स्पष्ट असून शेषाधिकार केंद्राकडे दिले आहेत तसेच घटक राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक, सीनेट सदस्यांची नियुक्ती, प्रांतिक विधिमंडळाच्या कायद्यांबाबत गव्हर्नर जनरलचा विशेष अधिकार इत्यादींमुळे कॅनडामध्ये केंद्रसत्ता बलिष्ठ झाली आहे. ब्रिटिश नॉर्थ अमेरिका ॲक्टमध्ये दुरुस्तीचा अधिकार पूर्वी ब्रिटिश संसदेला होता, तो १९४९च्या कायद्याने कॅनडाच्या संसदेला प्राप्त झाला आहे. घटक राज्यांच्या अधिकारांसंबधीच्या दुरूस्त्यांना मात्र घटक राज्यांची अनुमती आवश्यक असल्याची तरतूद त्यात आहे. 

ब्रिटनची राणी ही कॅनडाची राज्यप्रमुख आहे. कॅनडामधील मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ती आपला प्रतिनिधी म्हणून पाच वर्षांकरिता गव्हर्नर जनरलची नेमणूक करते. १९५२ पासून या पदावर कॅनेडियन माणसाची नियुक्ती झाली आहे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नर जनरल आपली कार्ये पार पाडतो. सीनेट या वरिष्ठ सभागृहाचे १०२ सभासद आहेत. त्यांची नेमणूक गव्हर्नर जनरलने केलेली असून त्यांची प्रांतनिहाय सभासदसंख्या ४ ते २४ पर्यंत आहे. सीनेटला संविधानाने अर्थविषयक बिलाखेरीज इतर बाबतींत कनिष्ठ सभागृहाबरोबरचे अधिकार दिले असले, तरी सीनेटचे महत्त्व कायदा निर्मितीत गौण स्वरूपाचे आहे. हाऊस ऑफ कॉमन्सची निवडणूक दर पाच वर्षांनी होते. २१ वर्षांवरील ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या प्रौढांनी, सार्वत्रिक रीत्या गुप्त मतदानाने निवडलेल्या लोकांची ही लोकसभा असून, त्यामध्ये १९६८च्या निवडणुकीनुसार २६४ सदस्य होते. या सभागृहामध्ये बहुसंख्य सदस्य असलेल्या पक्षाच्या अथवा बहुसंख्यांकांचा पाठिंबा मिळविणाऱ्या पुढाऱ्याला गव्हर्नर जनरल पंतप्रधान नेमतो. घटक राज्ये, भाषावर प्रतिनिधी व तत्सम बाबींचा विचार करून पंतप्रधान आपल्या सहकाऱ्यांचे कार्यकारी मंडळ बनवितो, कॅनडाच्या राज्य शासनामध्ये पंतप्रधान हा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या कार्यकारी मंडळाला  (कॅबिनेट) प्रिव्ही कौन्सिल म्हणतात. हे प्रिव्ही कौन्सिल शासनव्यवस्थेचे एकूण धोरण ठरविते व केंद्राच्या अखत्यारीतील खात्यांची सनदी नोकर यंत्रणेद्वारा व्यवस्था पाहते. कॅनडातील घटक राज्यांतील लेफ्टनंट गव्हर्नर अशाच स्वरूपाच्या कार्यकारिणींद्वारा राज्याचे शासन पाहतात.

कॅनडामधील राजकीय पक्षपद्धती बव्हंशी ब्रिटनसारखी आहे. संघराज्याच्या स्थापनेपासूनच लिबरल व काँझर्व्हेटिव्ह हे येथील प्रमुख दोन पक्ष अस्तित्वात आले. धोरणविषयक मतभेद असले तरी त्या दोहोंमध्ये मूलभूत तात्त्विक विरोध नाही. जगातील समाजवादी विचारसरणीचा प्रभाव पडून येथेही तसे पक्ष निर्माण झाले असले तरी ते कमकुवत आहेत. कॅनडातील अंतर्गत राजकारणात प्रथमपासूनच ब्रिटिश विरुद्ध फ्रेंच असा संघर्ष चालत आला आहे. संघराज्याचा १९६७ मध्ये शतक महोत्सव साजरा झाला, तरी हा संघर्ष थोड्याफार प्रमाणात चालूच होता. क्वीबेक प्रांतात फ्रेंचांची जास्त वस्ती असल्याने तेथे थोडीफार बंडाळी होते. तथापि कॅनडाच्या राष्ट्रीय संसदेत या फुटिरतेस साद मिळत नाही. १९६९ मध्ये हाउस ऑफ कॉमन्समध्ये पुढील पक्षबल होते : लिबरल १५४, प्रोग्रेसिव्ह काँझेर्व्हेटिव्ह ७२, सोशल क्रेडिट रॅली १४, न्यू डेमोक्रॅटिक पार्टी २२, अपक्ष ३ व १३ रिकाम्या. सीनेटमध्ये पुढील पक्षबल होते : लिबरल ६१, प्रोग्रेसिव्ह काँझव्हेटिव्ह २५, अपक्ष १३ व ९ रिकाम्या. पिएरे एलिएट ट्रूडो हा १९६९ पासून पंतप्रधान असून रोलंड मिचेनेर हा १९६७ पासून गव्हर्नर जनरल आहे.

शासनाच्या सोयीसाठी कॅनडाची विभागणी पुढील प्रांतांत केली आहे : न्यू फाउंडलंड, प्रिन्स एडवर्ड बेट, नोव्हास्कोशा, न्यू ब्रन्सविक, क्विबेक, आँटॅरिओ, मॅनिटोबा, सस्कॅचेवन, ॲल्बर्टा व ब्रिटिश कोलंबिया यूकॉन आणि नॉर्थवेस्ट टेरिटरी हे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत. कॅनडातील स्थानिक शासन हा घटक राज्यांच्या अखत्यारीतील विषय असून महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या संस्था निरनिराळ्या पातळीवर काम करतात.

कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना १८७५ सालीच झाली असून ते ओटावा येथे आहे. या न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश व इतर आठ न्यायाधीश असून ते दिवाणी, फौजदारी व अपिलाची कामे पाहतात. प्रत्येक प्रांतात एक उच्च न्यायालय व त्याखाली पोलीस दंडाधिकारी व जस्टिस ऑफ पीस असतात. सर्व वरिष्ठ न्यायाधिशांची नेमणूक गव्हर्नर जनरल करतात. पूर्वी इंग्‍लंडमधील प्रिव्ही कौन्सिलकडे सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध जाता येत असे ती पद्धत १९४९ च्या कायद्याने बंद झाली. सर्वोच्च न्यायालया शिवाय देशात एक्श्वेकर कोर्ट असून ते मुलकी व लष्करी न्यायदानाचे कामकाज पाहते.


कॅनडाची संरक्षणव्यवस्था राष्ट्राचे संरक्षण मंत्रालय पाहते. संरक्षणमंत्री, संरक्षण उपमंत्री, सैन्यदल प्रमुख व उपप्रमुख आणि संरक्षण संशोधन मंडळाचे अध्यक्ष यांचे मंडळ संरक्षणाबाबत सर्व धोरण ठरविते. १९७० पासून कॅनडातील तिन्ही दलांचे एकीकरण करण्यात आले असून भूदलात ४३,९०० नौदलात १८,५०० आणि हवाईदलात ४५,१०० असे संख्याबल होते. अत्याधुनिक शस्त्रसामग्रीने सज्ज अशी विविध पथके कॅनडात असून संयुक्त राष्ट्रे अथवा कोणत्याही शांतता कार्यासाठी उपयुक्त ठरावे असे एक वेगळे पथक हे कॅनडाचे वैशिष्ट्य आहे. संघराज्याचे रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीसदल असून ते सॉलिसिटर जनरलच्या अधिकारात आहे. विमाने व इतर आधुनिक साधनांद्वारा हे दल देशातील शांतता व सुव्यवस्था यांचे काम पाहते. प्रांत, महानगरपालिका, रेल्वे व राष्ट्रीय बंदर मंडळ यांची वेगवेगळी पोलीसदले असून ते संघराज्याच्या पोलीसदलाचीही मदत घेतात.

देशपांडे, म. द.

आर्थिक स्थिती : कॅनडा हा प्रामुख्याने प्रगत कृषिप्रधान देश आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर येथे इतर उद्योगधंद्यांची मोठी वाढ झाली असली, तरी मनुष्यबळानुसार कृषिउद्योग हा सर्व प्राथमिक उद्योगधंद्यांत अग्रक्रमाचाच राहिला आहे. देशातील रोजगारीत गुंतलेल्या एकूण लोकसंख्येपैकी ७⋅५ % लोक कृषिउद्योगात आहेत. १९६६ च्या आकडेवारीनुसार, कृषिक्षेत्राचा विस्तार ७,०४,५८,२७० हे. होता व त्यापैकी ४,३७,८८,५४० हे. क्षेत्र लागवडीत आणण्यात आले होते. याच सुमारास शेतांची संख्या ४⋅३ लक्षांवर होती. १९७१ मध्ये शेतांची संख्या ३,६६,१२८ झाली. कृषिउद्योगात गुंतलेले मनुष्यबळ शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे व शेतांच्या विस्तारामुळे हळूहळू कमी होत गेल्याचे आढळते. अमेरिकेप्रमाणेच कॅनडातही दर हेक्टरी उत्पादन मोठे आहे ह्याची कारणे सुधारित बी बियाणी, उत्कृष्ट नांगरणी, रासायनिक खतांचा मोठा वापर, जंतुनाशकांचा उपयोग, वनस्पतिरोग व विनाशी कीड ह्यांचे नियंत्रण आणि प्रतिबंध, ही होत. एकूण कृषिजन्य उत्पादकता व कृषिउत्पादन यांचे प्रमाण वर्षाकाठी १९३५ पासून दोन टक्क्यांनी वाढलेले आढळते.

कॅनडातील शेतीचे पुढीलप्रमाणे चार विभाग पडतात : (अ) अटलांटिक प्रदेश : यात नोव्हास्कोशा, न्यू ब्रन्सविक, प्रिन्स एडवर्ड बेट व न्यू फाउंडलंड हे प्रांत येतात. या प्रदेशात १०% लोकसंख्या व १⋅८% सुधारित जमीन आढळते. हा प्रदेश बटाटे व सफरचंदे यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रिन्स एडवर्ड बेट व न्यू ब्रन्सविक ह्या दोन प्रांतांत मिळून देशातील एकूण बटाट्यांपैकी ४०% उत्पादन होते. नोव्हास्कोशा प्रांतात कॅनडातील एकूण सफरचंदांच्या उत्पादनापैकी १५% ते १८% उत्पादन होते. या विभागात ब्‍लूबेरीचेही उत्पादन होते. मच्छीमारी, पशुपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय हे या प्रदेशातील महत्त्वाचे उद्योग आहेत.

 (आ) मध्य कॅनडाचा प्रदेश : यात क्वीबेक व आँटॅरिओ हे प्रांत येतात. देशातील एकूण लोकसंख्येच्या ६५% लोक या प्रदेशात राहतात. त्यामुळे या प्रदेशातील कृषिउद्योग हा या प्रदेशाच्या तसेच देशाच्या समग्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा मानतात. देशातील एकूण कृषिउद्योगापासून मिळणाऱ्या नगदी उत्पन्नापैकी ४०% उत्पन्न या प्रदेशातून मिळते. येथे देशातील एकूण सुधारित जमिनीपैकी २१% जमीन आढळते. या प्रदेशातील कृषिउत्पादन हे पशुपालन व कुक्कुटपालन यांवर अवलंबून आहे. देशातील एकूण दुग्धशाळा–जनावरांपैकी २/३ आँटॅरिओ व क्वीबेक प्रांतांत आहेत. गोमांस उत्पादन हा आँटॅरिओतील मोठा उद्योग आहे. देशातील एकूण डुकरांपैकी ३५% ते४०% उत्पादन आँटॅरिओत, तर २०% क्वीबेक मध्ये होते. गाईगुरांच्या उत्पादनावर व संवर्धनावर अधिक भर असल्याने ह्या प्रांतांत सु. ७०% जमीन चारा, गवत व वैरण ह्यांकरिता उपयोगात आणली जाते. या प्रदेशात ओट, मिश्रधान्ये, मका ही पिके मोठ्या प्रमाणात होतात तंबाखू बीट, सोयाबीन, तसेच डबाबंद उद्योगास आवश्यक अशी वाटाणा, टोमॅटो, काकड्या ह्यांचे उत्पादन करतात. कॅनडातील एकूण तंबाखूपैकी ९०% ते९५% उत्पादन आँटॅरिओत होते २०% ते २५ % बीट उत्पादन आँटेरिओत, तर १०% क्वीबेकमध्ये होते. सफरचंदे, नासपती, पीच, चेरी, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी इ. विविध फळांचे उत्पादन त्याचप्रमाणे भाजीपालाही या प्रदेशात वाढत्या प्रमाणात होऊ लागला आहे.

(इ) प्रेअरी प्रदेश : या प्रदेशात मॅनिटोबा, सस्कॅचेवन, व ॲल्बर्टा हे प्रांत येतात. कॅनडाच्या एकूण सुधारित जमिनीपैकी ७५ टक्क्यांहून अधिक जमीन ह्या प्रदेशात मोडते. याशिवाय बरीच जमीन कुरणे व गवताची मैदाने ह्यांसाठी वापरतात. एकूण कृषिउत्पादनमूल्याच्या ५०% मूल्य व ३/५ कृषिउत्पादन ह्या प्रदेशात होते. या प्रदेशात गहू हे मुख्य पीक आहे. कॅनडाच्या गहू-उत्पादनयोग्य जमिनीपैकी ९५ टक्क्यांहून अधिक जमीन या प्रदेशात आहे. गहूनिर्यातीत जगात कॅनडाचा अमेरिके खालोखाल क्रमांक आहे. याशिवाय बार्ली, सनताग, रॅपसीड, सूर्यफूल व राय ह्या पिकांचे ९० टक्क्यांहून अधिक उत्पादन या प्रदेशात होते. बीट, बटाटे, टोमॅटो, गोड मका, गाजरे ह्यांचेही उत्पादन होते. विविध धान्योत्पादनाकरिता हा प्रदेश अधिक प्रसिद्ध असला, तरी येथे पशुपालन उद्योगही महत्त्वाचा आहे कॅनडातील एकूण गाईगुरांपैकी सु. ४५ टक्के गोमांसाच्या व कालवड गाईंपैकी ७० टक्क्यांवर ३५ टक्के ते ४० टक्के डुकरे आणि ५० टक्क्यांहून अधिक मेंढ्या ह्या प्रदेशात आहेत.

(ई) पश्चिम किनारी प्रदेश : दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, भाजीपाला व गोमांस निर्मितीच्या गाईंचे उत्पादन हेच उद्योग या डोंगराळ प्रदेशात प्रामुख्याने चालतात. कॅनडाच्या एकूण अंड्यांच्या आणि कोंबड्यांच्या मांस उत्पादनापैकी अनुक्रमे १०% आणि ७% ते ८% उत्पादन या प्रदेशात होते. सफरचंद, चेरी, नासपती, पीच, जर्दाळू, आलुबुखार वगैरे फळे प्रामुख्याने होतात.

जंगलसंपत्ती : कॅनडाच्या जंगलांनी देशाच्या भूपृष्ठाच्या ५७% क्षेत्र व्यापले आहे. मात्र उत्पादक जंगलक्षेत्र २४% आहे. देशाच्या आकारमानाने, सबंध जगात येथील जंगलांचा तिसरा क्रम लागतो. ९१% जंगले सरकारच्या मालकीची आहेत. राष्ट्रीय उद्याने आणि केंद्रशासित प्रदेश यांतीलच जंगले व नैसर्गिक साधनसंपत्ती यांवर केंद्र सरकारची  मालकी असून प्रत्येक प्रांतातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर त्या त्या प्रांताचे नियंत्रण असते. उत्पादक जंगलांपैकी ६३% क्षेत्रात सूचिपर्णी मऊ लाकडाचे वृक्ष (तेरडा, डग्लस फर, हेमलॉक व स्प्रूस) व १२% जंगलक्षेत्रात कठीण लाकूड असलेले पानझडी वृक्षप्रकार (बर्च, मॅपल व पॉप्‌लर) आढळतात. क्वीबेक प्रांतात मऊ लाकडाच्या वृक्षांचे सर्वाधिक प्रमाण असल्याने व या प्रांतातून वाहणाऱ्या नद्याही सर्वांत लांब असल्याने, १९५० पासून देशाच्या एकूण कागद व कागद-लगदा उत्पादनाच्या सु. निम्मे उत्पादन एकट्या क्वीबेक प्रांतात होऊ लागले आहे. या उद्योगाच्या विकासाच्या दृष्टीने सेंट लॉरेन्स, सॅगने, सेंट मॉरिस, लीव्हर, गॅटनो, ओटावा आणि मूस या नद्या फार महत्त्वाच्या ठरल्या आहेत. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील डग्लस फर वृक्षांसारख्या मोठ्या व उंच वृक्षांपासूनच मुख्यत: कॅनडात लाकूड उत्पादन होते. देशातील एकूण लाकूड उत्पादनाच्या निम्मे उत्पादन या प्रांतातून १९६० पासून होऊ लागले. बहुतेक मोठाल्या गिरण्या फ्रेझर नदी मुखापाशी आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात देशातील लाकूडउत्पादन ८,००० हून अधिक लाकूड-गिरण्यांतून होऊ लागले कागद–लगदा व कागद उत्पादन करणाऱ्या गिरण्यांची संख्या १५० च्या वर होती. कॅनडाच्या जंगल उद्योगांचा व्यापार शेषावर मोठा प्रभाव आहे. जंगल-उद्योगांवर अवलंबून असलेल्यांची संख्या ३,७२०० च्या वर असून, वर्षाकाठी सरासरी ९.९१ कोटी घमी. लाकूड कापण्यात येते आणि एकूण कापलेल्या लाकडाचे उत्पादन २⋅४४ कोटी ते ३⋅०४ कोटी बोर्ड मीटर होते. पूर्व कॅनडामध्ये  जंगल उद्योगांचे प्रमुख उत्पादन म्हणजे कागद-लगदा व कागद हे होय. यापैकी ७५% उत्पादन एकट्या अमेरिकेस निर्यात केले जाते, पश्र्चिम कॅनडात कापलेले लाकूड हेच प्रमुख उत्पादन असून ते ५०% निर्यात करतात.


खनिजसंपत्ती: खाणउद्योगाचा विकास विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून होऊ लागला. आँटॅरिओ प्रांतातील दळणवळणाच्या साधनांमुळे खाणउद्योगाने तेथे प्रथम मूळ धरले १९४६ च्या सुमारास पेट्रोलियमला फारसे महत्व नव्हते, परंतु १९५७ मध्ये कॅनडा पेट्रोलियम उत्पादनाच्या बाबतीत जगामधील अग्रेसर देशांपैकी एक म्हणून गणला जाऊ लागला. १९७१ मधील अशोधित पेट्रोलियम-उत्पादन ४९⋅२७ कोटी बॅरल व मूल्य १३५⋅६९ कोटी कॅनडियन डॉलर होते. ॲल्बर्टा प्रांतात मोठाल्या तेलक्षेत्रांचा शोध लागल्यामुळे, पेट्रोलियम उत्पादन हा कॅनडामधील मोठा उद्योग बनला आहे. ‘द इंटरप्रॉव्हिन्शिअल पाइपलाइन’ हा देशातील सर्वांत मोठा तेलनळ (लांबी ३,२५९ किमी.) असून १९६९च्या अखेरीस, देशातील एकूण तेलनळांची लांबी २९,१०५ किमी. होती. १८७० मध्ये कॅनडाच्या निर्यात व्यापारात खनिजपदार्थांचा वाटा ५% होता. तो १९६५ च्या सुमारास ३३% झाला, ही गोष्ट लक्षणीय आहे. जागतिक उत्पादनाच्या दृष्टीने कॅनडाचा निकेल, ॲस्बेस्टस, जांदी व जस्त ह्यांच्या उत्पादनात पहिला क्रम लागतो युरेनियम, मॉलिब्डिनम, जिप्सम, सेलेनियम, गंधके, टिटॅनियम, ॲल्युमिनियम, कोबाल्ट, प्‍लॅटिनम धातू व टेल्यूरियम ह्यांच्या उत्पादनात दुसरा सोने व लोहधातुक ह्यांच्या उत्पादनात तिसरा शिसे व मॅग्‍नेशियम ह्यांच्या उत्पादनात चौथा व तांबे आणि बेराईट ह्यांच्या उत्पादनात पाचवा क्रम लागतो. कॅनडाच्या एकूण निर्यातीमध्ये धातू व खनिज उत्पादनाचे प्रमाण ३०% असते. १९६६ मध्ये कॅनडाच्या एकूण खनिज उत्पादनात पेट्रोलियम २०%, निकेल १०%, लोहधातुक ११% , तांबे १२%, जस्त ७%, नैसर्गिक वायू ५%,, ॲस्बेस्टस ४%, सोने ३%, शिसे, पोटॅश व दगडी कोळसा प्रत्येकी २% आणि चांदी,प्‍लॅटिनम समूह, युरेनियम आणि गंधक प्रत्येकी १% असे प्रमाण होते. १९६७ मधील एकूण खनिज उत्पादनाबाबत आँटॅरिओ (२६%), ॲल्बर्टा (२२%), क्वीबेक(२९%), सस्कॅचेवन (८%), आणि ब्रिटिश कोलंबिया हे प्रांत अग्रेसर असून कॅनडाच्या उर्वरीत भागात जवळजवळ २५% उत्पादन होते. आँटेरिओच्या टिमिन्स व कर्कलॅंड लेक आणि क्वीबेनमधील नॉरॅंडा व व्हॅल डी ऑर येथील खाणींतून मोठ्या प्रमाणात सुवर्णउत्पादन झाले. आँटेरिओच्या सडबरी द्रोणी-प्रदेशात जगातील एकूण निकेल उत्पादनापैकी ७५% उत्पादन होते. त्याच प्रदेशात प्‍लॅटिनम, तांबे, सेलेनियम, टेल्यूरियम, र्‍होडियम, सोने, चांदी, कोबाल्ट आणि उपउत्पादन म्हणून लोहधातुक यांचे उत्पादन होत असते. ॲल्‌बर्टा व सस्कॅचेवन प्रांतांत कॅनडाच्या एकूण कोळशाच्या साठ्यांपैकी (१०,००० कोटी टन) सु. ७५% साठे आढळले आहेत १९७१ साली कोळशाचे उत्पादन १⋅८४ कोटी टन झाले असून त्याचे मूल्य १२⋅१७ कोटी कॅनडियन डॉलर होते. त्याचप्रमाणे पेट्रोलियमचाही मोठा साठा याच भागात आहे. उत्तरेकडील राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा खनिज उद्योग हा कणाच धरला जातो. बांधकाम उद्योगाला खनिज उद्योगाच्या वाढीमुळे फार मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे.

मत्सोद्योग : कॅनडाला अंतर्गत सरोवरांचे वरदान लाभलेले असूनही व्यापारी दृष्ट्या मासेमारी अटलांटिक व पॅसिफिक किनाऱ्यांवर चालते. मासेमारी उद्योगात सु. ८०.००० लोक गुंतलेले आहेत. प्रतिवर्षी सु. १२⋅५ लक्ष मेट्रिक टन मासे उत्पादन होते. मासे आणि त्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ यांचे निर्यातमूल्य वर्षाला २० कोटी डॉलरच्या वर होते. म्हणजेच, मासे व माशांपासून तयार केलेले विविध पदार्थ यांच्या एकूण जागतिक व्यापाराच्या १०% व्यापार कॅनडातून चालतो. कॉड, लॉब्स्टर, हॅडॉक, हेरिंग, सॅमन, पिकेरेल, पर्च, सिस्को वगैरे माशांचे प्रकार सापडतात.

फर उद्योग : कॅनडाचा हा पारंपारिक उद्योग असून आजदेखील त्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्व आहे. या उद्योगात सु. ४०,००० लोक आहेत. बीव्हरपासून वर्षास सु. चार लक्ष कातडी (५३ लक्ष डॉलर किंमतीची) मिळतात. मिंक प्राणी फर उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जातात. मिंक पासून ८०% फरचे उत्पादन होते. १९७० मध्ये फर शेतांची संख्या ८८१ होती.

विद्युतशक्ती : कॅनडाची सु. ९०% वीज पाण्यापासून तयार होते. जलविद्युत निर्मितीच्या बाबतीत कॅनडाचा अमेरिकेच्या खालोखाल म्हणजे दुसरा क्रम लागतो. कॅनडातील दरडोई वीज वापर एक अश्वशक्तीहून थोडा अधिक आहे या बाबतीत कॅनडाचा नॉर्वेच्या खालोखाल क्रम लागतो. १९७१ मध्ये २११⋅४७ अब्ज किवॉ. तास वीज निर्मिती झाली. १९६१ मध्ये कॅनडा व अमेरिका या दोन देशांत कोलंबिया नदीखोऱ्याचा संयुक्तपणे विकास करण्याबाबत ६० वर्षे मुदतीचा करार झाला.

 

उद्योग : पहिल्या महायुद्धात कॅनडाच्या निर्मिती उद्योगांच्या वाढीला मोठी चालना मिळाली. तेव्हापासून शेतीपेक्षा औद्योगिकरणावर अधिक भर देण्यात आला. दुसरे महायुद्ध हे उद्योगधंद्यांच्या प्रगतीला उत्प्रेरक ठरले. १९४५ च्या सुमारास, देशातील एकूण उत्पादनमूल्यापैकी निम्म्याहून अधिक मूल्य निर्मितीउद्योगांपासून तर कृषिक्षेत्रापासून २०% मूल्य झाले. १९६९ मध्ये कॅनडात सु.३३,००० निर्मितीउद्योग व १२ लक्षांवर कामगार होते. निर्मितीउद्योगांचे दक्षिण आँटेरिओ व क्बीबेक ह्या प्रांतांत केंद्रीकरण झाले असून त्यांत अनुक्रमे ५०% व ३०% उत्पादन होते. कॅनडातील १५ प्रमुख उद्योगांचा क्रम साधारणत: १९४६—१९६० या काळात बदलल्याचे दिसत नाही. कागद-लगदा व कागद उद्योग हा उत्पादनमूल्याच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचा ठरला आहे. या उद्योगाचे ८०% उत्पादन निर्यात केले जाते. जगास लागणाऱ्या एकूण वृत्तपत्री कागदाच्या सु. ५०% कागद कॅनडातून पुरविला जातो कागद-लगदा निर्यातीत कॅनडाचा सबंध जगात पहिला प्रमांक लागतो. कागद-लगदा व कागद ह्या उद्योगात सु. ८०,००० कामगार आहेत. देशात १५० हून अधिक कागद-लगदा व गिरण्या आहेत त्यांपैकी ६० च्या वर क्वीबेकमध्ये, ४० हून अधिक आँटॅरिओत व २५ च्या वर ब्रिटिश कोलंबियात आहेत. ह्या तीन राज्यांत मिळून देशातील एकूण निर्मितीउद्योगांपैकी ८२% उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आढळते. या उद्योगाचे उत्पादन प्रतिवर्षी वृत्तपत्री कागद १६० लक्ष टन, मल्टिपेपर व पेपरबोर्ड ह्यांच्या वस्तू ८४ लक्ष टन आणि कागद-लगदा ४६ लक्ष टन असे आहे. लाकूडतोड उद्योगाच्या ८,००० हून अधिक गिरण्या असून त्यांत सु. ४८,००० लोक गुंतलेले आहेत. या उद्योगापासून तयार होणाऱ्या निरनिराळ्या वस्तूंची व पदार्थांची वर्षाकाठी विक्री सु. ७,२०० लक्ष डॉलर आहे. व्हिनीअर व प्लायवुड उद्योगाच्या सु. ८० गिरण्या व १२,००० हून अधिक कामगार आहेत. या उद्योगापासून तयार होणाऱ्या पदार्थांची सरासरी वार्षिक विक्री २,००० लक्ष डॉलर आहे. खनिजप्रक्रिया उद्योग हाही एक महत्त्वाचा उद्योग मानतात. ॲल्युमिनियम उद्योग हा सबंध जगात अमेरिकेच्या खालोखाल महत्त्वाचा समजला जातो. कॅनडाच्या वाढत्या नागरी लोकसंख्येसाठी व निर्यातीकरिता शेतमालावर प्रक्रिया करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. मांसनिर्मिती व मांससंवेष्टन ह्या उद्योगाचा महत्त्वाच्या उद्योगांत पाचवा क्रम लागतो त्याखालोखाल लोणी व चीज उत्पादन, विविध खाद्यपदार्थ निर्मितीउद्योग आणि पाव व तत्सम पदार्थांची निर्मिती ह्या उद्योगांचे क्रम लागतात. विस्तृत अंतरे असलेल्या कॅनडासारख्या देशात दळणवळणाच्या साधनांची निर्मिती ही अतिशय महत्त्वाची ठरते. १९६० च्या पुढे, सर्व उद्योगांमध्ये मोटारगाड्या निर्मितीउद्योगाचा पाचवा क्रम लागला. त्याचप्रमाणे मोटारीच्या सुट्या भागांच्या निर्मितीउद्योगासही मोठे महत्त्व प्राप्त झाले. रेल्वे डबे व इतर सामग्री ह्यांचा निर्मितीउद्योग उत्पादनमूल्याच्या दृष्टीने खाली घसरल्याचे दिसते. दुसऱ्या महायुद्धापासून विमान उद्योगास अतिशय महत्त्व आले. १९६४ साली अमेरिकेशी केलेल्या मोटारनिर्मिती करारामुळे मोटार उद्योगात भरमसाट प्रगती झाली व तिचा परिणाम मोटारनिर्यातीत दिसून आला. १९६४ मधील ९⋅९३ कोटी डॉलरवरून १९६६ मध्ये ८४⋅५ कोटी डॉलर किंमतीची मोटारींची निर्यात कॅनडातून झाली.१९६७ मध्ये प्रथमच, कॅनडाच्या पारंपारिक निर्यात वस्तूंना – गहू व वृत्तपत्री कागद – मोटारींनी डॉलरमूल्यात मागे सारले, १९६० नंतर विमाने व संरक्षणउद्योगाला आवश्यक अशा निवडक वस्तूंचीही अमेरिकेस निर्यात होऊ लागली. सेंट कॅथरिन्स, हॅमिल्टन, ओकव्हिल, टोराँटो, ओशावा, बेलव्हिल, किंग्स्टन, ब्रॉकव्हिल ही मोठाली औद्योगिक शहरे बनली आहेत. ‘स्टील कंपनी ऑफ कॅनडा’ व डोमिनियन फाउंड्रीज अँड स्टील कंपनी’ ह्यांसारख्या प्रचंड उद्योगांमुळे हॅमिल्टन हे लोखंड व पोलाद निर्मितीचे प्रमुख केंद्र बनले आहे. ‘ट्रॉइस रिव्हिएरेस’ हा सेंट लॉरेन्स नदीवरील, कागद व कागद-लगदा निर्माण करणारा आघाडीचा कारखाना आहे. १९६५ च्या सुमारास कापड उद्योग, रसायन, पेट्रोलियम, वीज उपरकणे आणि लोखंड-पोलाद हे उद्योग झपाट्याने वाढत असल्याचे आढळून आले आहे.


कॅनडामधील एकूण निर्मितिक्षमतेच्या ७०% निर्मितिक्षमता ही अमेरिकन कंपन्यांच्या मालकीची किंवा नियंत्रणाखाली आहे. कॅनडाचा मोटारउद्योग हा जवळजवळ १००% अमेरिकन कंपन्यांच्या मालकीचा आहे, तर तेल आणि वायुउद्योग हा ८०% परदेशी कंपन्यांच्या त्यातही अमेरिकन कंपन्यांचे प्रमाण अधिक मालकीचा आहे. लाकूडउद्योग, विद्युत् उपकरणनिर्मिती उद्योग हे देखील प्रचंड अमेरिकन उद्योगांकडून नियंत्रित केले जातात. परंतु लोखंड-पोलाद व ॲल्युमिनियम उद्योग हे मोठ्या प्रमाणावर कॅनडियन कंपन्यांच्या मालकीचे आहेत. ‘मॅसे फर्ग्युसन लिमिटेड’ सारख्या कृषियंत्रे निर्माण करणाऱ्या व ‘पॉलिमर कॉपोरेशन’सारख्या संश्र्लिष्ट रबर व प्‍लॅस्टिक पावडरी निर्मान करणाऱ्या कॅनडीयन मालकीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्याचेही देशातील इतर उद्योगांवर नियत्रंण आहे.‘पॉलिमर कॉर्पोरेशन’ हा सरकारी मालकीचा उद्योग, साम्यवादी राष्ट्रे वगळून, जगातील इतर देशांना लागणाऱ्या संश्र्लिष्ट रबरापैकी १०% रबर उत्पादन करतो.

कॅनडातील उद्योगधंद्यांना सतत भेडसावणारी समस्या म्हणजे उद्योगधंद्यांच्या मोठ्या आकराची व अंतर्गत लहान बाजारपेठेची सांगड कशी घालावयाची, ही होय. दुसरी समस्या ही, की देशातील दुय्यम कंपन्यांच्या धोरणासंबंधीचे सर्व निर्णय परदेशांतील प्रमुख कंपन्यांकडून घेतले जातात, ही होय. हिच्यावर अद्यापि तरी तोडगा सुचलेला नाही. अशा तर्‍हेने, कॅनडाची निर्मितीउद्योगांच्या बाबतीत द्विधा मनस्थिती झालेली आहे. अमेरिकेशी दृढ आर्थिक संबंध राखल्याने कॅनडाला ऐश्वर्य आणि भरभराट लाभते आहे, पण त्याबरोबच, उद्योगांच्या आर्थिक निर्णयांबाबत किंवा आर्थिक व्यवहारांबाबत कमी स्वातंत्र्य मिळत आहे.

कॅनडात १९७२ च्या अखेरीस, एकूण कामगार संख्या सु. ८३⋅६३ लक्ष होती. २/३ कामगार क्वीबेक व आटॅंरिओ राज्यांत राहतात. १९७२ मधील कामगारांचे उद्योगानुसार गुंतलेले आकडे (लक्षांमध्ये) पुढीलप्रमाणे होते : शेती ४⋅३० निर्मितीउद्योग : १८⋅६५ सेवाउद्योग : २१⋅७४ व्यापार : १४⋅९१ अर्थप्रबंध, विमा, स्थावर मालमत्ता : ३⋅९१ इतर प्राथमिक उद्योग २⋅०९ सरकारी प्रशासन : ५⋅४६ बांधकाम : ५⋅२४ लक्ष होती. मे १९७० मध्ये कामगार संख्या ७९,०७,००० होती. एकूण लोकसंख्येशी पुरुष कामगाराचे प्रमाण १९५० मध्ये ८४% होते, ते १९६८ मध्ये ६५% पर्यंत खाली आले याउलट स्त्री कामगारांचे २३ टक्क्यांवरून ३४% पर्यंत वाढले. स्त्री कामगारांचे वाढते प्रमाण, ही देशाच्या कामगार क्षेत्रातील महत्त्वाची घटना मानली जाते. १९७१ च्या सुमारास, कामगार संघटनांची एकूण सभासद संख्या सु. २२⋅१० लक्ष होती म्हणजेच, एकूण कामगार संख्येच्या २५% कामगार व कृषिक्षेत्र वगळून राहिलेल्या पगारी कामगारांपैकी ३३% कामगार कामगार संघटनांचे सभासद होते. देशातील दोन मध्यवर्ती कामगार संघटनांपैकी ‘कॅनडियन लेबर काँग्रेस’ या दोहोंपैकी मोठ्या कामगार महासंघाशी संबद्ध असलेल्या कामगार संघटनाचे ७५% कामगार सभासद होते व ‘कॉन्फेडरेशन ऑफ नॅशनल टेड्र युनियन्स’ ह्या दुसऱ्या कामगार महासंघाशी संलग्न कामगार संघटनांचे सु. १०% कामगार सभासद होते. कॅनडातील कामगार चळवळीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणचे तिचे आंतरराष्ट्रीय स्वरूप, सु. ७०% कॅनडयिन कामगार संघटना सभासद हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांशी संबद्ध आहेत.

या संघटनांची मुख्य कार्यालये अमेरिकेतच आहेत. अमेरिकेतील दोन कामगार महासंघ १९५५ मध्ये एकत्रित झाले, त्याचप्रमाणे १९५६ मध्ये कॅनडातील दोन कामगार संघटना व दोन रेल्वे कामगार संघटना एकत्र येऊन सध्याची ‘कॅनडियन लेबर काँग्रेस’ अस्तित्वात आली. कामगार संघटनांचे प्रमाण कॅनडातील राज्य आणि उद्योग या दोहोंनुसार बदलते आहे. रेल्वे, मोटारगाड्या, कागद-लगदा व कागद, लोखंड-पोलाद, मांस-संवेष्टन, रबरवस्तु-उद्योग व वीजउपकरण उद्योग ह्यांमध्ये कामगार संघटनेचे प्रमाण ७५% ते ९५%, तर वस्त्रोद्योग, मुद्रण व प्रकाशन, बेकरी, लाकुड वस्तु-उद्योग व वीजउपकरण उद्योग ह्यांमध्ये कामगार संघटनेचे प्रमाण ७५% ते ९५%, तर वस्त्रोद्योग, मुद्रण व प्रकाशन, बेकरी, लाकूड वस्तु-उद्योग आणि रासायनिक पदार्थ उद्योग यांमध्ये हे प्रमाण ५०% आहे. बहुतेक उद्योगधंद्यांतील कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे प्रमाण अद्यापिही अत्यल्पच आढळते. कॅनडियन कामगाराचे जीवनमान हे अमेरिकन कामगाराच्या खालोखाल आहे. आठवड्यास सरासरी १०० डॉलर ही कामगाराची प्राप्ती असते. एकूण कामगारांपैकी ७५ टक्के कामगार आठवड्यास ४० किंवा त्यापेक्षा कमी तास काम करतात एकूण ८५% कामगारांचा कामाचा आठवडा पाच दिवसांचाच असतो. ७५% कामगारांना कायद्यानुसार आठ किंवा अधिक पगारी सुट्ट्या व वर्षातून तीन ते चार आठवड्यांची रजा मिळते. सामुदायिक वाटाघाट, बेकारी विमा, किमान वेतन, कमाल कामाचे तास (कमाल ४८, प्रमाणित ४०), कामगार हानिपूर्ती वगैरे महत्त्वाच्या कामगारविषयक बाबींबद्दल कायदे करण्यात आले आहेत.

व्यापार : विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कॅनडाला आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्व येऊ लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यापराच्या संदर्भात कॅनडाचा अमेरिका व ग्रेट ब्रिटन ह्यांच्या पाठोपाठ तिसरा क्रम लागला १९५४ नंतर मात्र पश्चिम जर्मनीने कॅनडास चवथ्या क्रमांकास टाकले. दरडोई व्यापाराच्या बाबतीत १९६० च्या नंतर कॅनडा इतर प्रगत देशांच्या कितीतरी पुढे होता.

कॅनडाच्या एकूण निर्यात व्यापारमूल्यामध्ये १/३ भाग जंगलवस्तूंपासून येतो. कित्येक वर्षे वृत्तपत्री कागदाला निर्यात वस्तुसूची मध्ये अग्रक्रम मिळालेला होता लाकडाच्या फळ्या व लाकूड भुसा ह्यांचाही निर्यातीच्या अग्रेसर वस्तूंमध्ये अंतर्भाव होतो. १९५० पासून खनिजसाधनांचाही निर्यात व्यापारात १/३ वाटा दिसू लागला. निकेल, ॲल्युमिनियम, लोहधातुक, तांबे, पेट्रोलियम, युरेनियम, ॲस्बेस्टस व जस्त ही महत्त्वाची निर्यातीची खनिजे होत. १९२० च्या पुढे काही काळपर्यंत शेतमालाचा निर्यात व्यापारात सु. अर्धा हिस्सा असे परंतु १९५० पासून त्यांचा हिस्सा ३० टक्केच राहिल्याचे दिसते. गव्हाचा क्रम दुसरा (वृत्तपत्री कागदाच्यानंतर) व कधीकधी पहिलाही आढळतो.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस शेतमाल व मत्स्योत्पादन ह्यांच्या निर्यातीचे प्रमाण एकूण निर्यात व्यापारात ६३% होते तेच १९६५ च्या सुमारास २२% झाले इतर प्राथमिक वस्तूंच्या निर्यातीचे मानही २८% वरून २५% वर आले. उच्च प्रक्रियेत व निर्मित वस्तूंचे प्रमाण (उदा., लाकूड लगदा, रसायने, यंत्रावजारे, वाहतूक सामग्री व साधने, वृत्तपत्री कागद इ.) ९% वरून (१९००) ५३% वर (१९६५ च्या सुमारास) गेले. कॅनडाच्या आयात व्यापारात यंत्रावजारे व इतर उत्पादित वस्तू असतात. १९६० च्या सुमारास आयात व्यापारात पुढील वस्तु होत्या : वीज उपकरणे, मोटरी, ट्रॅक्टर, विमाने, एंजिने व ह्यांचे सुटे भाग. कॅनडियन कंपन्या अमेरिकन कंपन्यांशी सहकार्य करून वरील अनेक वस्तूंचे उत्पादन करीत असल्या, तरी झपाट्याने वाढत जाणाऱ्या कॅनडियन अर्थव्यवस्थेला अनेक वस्तूंची आयात करावीच लागते. खनिज पदार्थांच्या आयातीमध्ये अशुद्ध पेट्रोलियम, इंधन तेल व कोळसा ह्यांचा समावेश होतो. तसेच लिंबू जातीची फळे, कॉफी, कापूस व साखर हे पदार्थ आयात करावे लागतात. विसाव्या शतकाच्या प्रारंभी कॅनडा, ग्रेट ब्रिटन व अमेरिका यांच्याशी आयात व्यापाराच्या बाबतीत गुंतलेला होता परंतु हळूहळू कॅनडाचे आर्थिक संबंध अमेरिकेशी अधिक निकटचे होत गेले. १९०० च्या सुमारास कॅनडाच्या सु. ५०% आयात वस्तू अमेरिकेतून येत असत १९६८ च्या सुमारास हेच प्रमाण ७०% झाले. याच काळात ग्रेट ब्रिटन व यूरोपीय देश यांच्याकडील आयात वस्तूंचे प्रमाण प्रत्येकी १४% होते. १९६८ च्या सुमारास कॅनडाच्या निर्यात व्यापाराचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते : अमेरिका ६७% ग्रेट ब्रिटन ९% जपान ४%.


अर्थकारण : कॅनडियन डॉलर हे अधिकृत चलन असून विदेशी विनिमय दर १०० कॅनडियन डॉलर = ३९ पौंड स्टर्लिंग = ९३ अमेरिकन डॉलर असा आहे. बॅंक ऑफ कॅनडा (१९३५) ही मध्यवर्ती बॅंक आहे. १८१७ पासून कार्य करणाऱ्या सनदी बॅंका ह्या व्यापारी बॅंका, आयुर्विमा कंपन्या, विश्वस्त कंपन्या, सहकारी पतसंस्था, निवृत्तिवेतन कंपन्या इ. खाजगी वित्तप्रबंधक कंपन्याही देशात कार्य करतात. १९६० पासून एकंदर अर्थप्रबंधापैकी ८०% पैसा या खाजगी वित्तप्रबंधक कंपन्यांकडून पुरविला जात होता. नऊ सनदी बॅंका व त्यांच्या ६,४२२ शाखा देशात व २७० शाखा परदेशांत आहेत. ‘टोरँटो शेअरबाजार’ (१८७८) हा कॅनडाचा सर्वांत मोठा शेअरबाजार असून त्यानंतर ‘मॉंट्रिऑल शेअरबाजारा’चा (१८७४) क्रम लागतो. व्हॅंकूव्हर व विनिपेग येथे लहान शेअरबाजार आहेत. देशात एकूण सहा शेअरबाजार आहेत. केंद्रीय, प्रांतीय व नगरपालिकीय अशा तिन्ही शासकीय स्तरांवरील वस्तू व सेवांचा खर्च १९६०च्या नंतर एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या सु. १९% होत असल्याचे दिसते. वित्तीय दायित्व व करउत्पन्न यांबाबत केंद्र व राज्य सरकारे ह्यांच्यात विभागणी कशी केली जावी, हा एक अतिशय बिकट प्रश्न आहे. १९६६ मध्ये जमा झालेल्या सु. १० अब्ज डॉलर राजस्वापैकी, केंद्र सरकारने प्रत्यक्ष करांवाटे व्यक्तींवरील करांपासून ३०% तर निगम करांपासून १७% उत्पन्न मिळविले राज्यशासनांना व नगरपालिकांना मिळून प्रत्यक्ष करांवाटे ४७% उत्पन्न मिळाले. राज्यशासन व नगरपालिका ह्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येणारा खर्च व उभारले जाणारे कर्ज याचे कारण रस्ते, शाळा, विद्यापीठे, आरोग्य व समाजकल्याण ह्यांवर ती मोठ्या प्रमाणात खर्च करीत असतात, हेच होय. केंद्रशासनाच्या खर्चाच्या बाबी संरक्षण, सरकारी कर्जावरील व्याज, कौटुंबिक भत्ते, रुग्णालयीन शुश्रूषा, निवृत्त सैनिकांना देण्यात येणारे लाभ व राज्यांना द्यावयाच्या रकमा ह्या होत.

वाहतूक व संदेशवहन : १९०० पासून पुढील काळात पश्चिम कॅनडातील रहदारी व वाहतूक यांत झालेल्या वाढीस तोंड देण्याकरिता तसेच गव्हाच्या निर्यातीत सुकरता आणण्याकरिता रेल्वेमार्ग झपाट्याने बांधण्यात येऊ लागले. खनिज उद्योग, कागदलगदा व कागद उद्योग ह्यांच्या विकासामुळेही नवीन लोहमार्ग बांधले गेले. १९७० च्या अखेरीस ९५% पेक्षा जास्त लांबीचा लोहमार्ग (सु.९१,७६० किमी. लांब) ‘कॅनडियन नॅशनल’ व ‘कॅनडियन पॅसिफिक’ ह्या दोन खंडगामी रेल्वे कंपन्यांच्या नियंत्रणाखाली होता. ‘कॅनडियन नॅशनल रेल्वे कंपनी’ सरकारच्या मालकीची आहे. या दोन्ही रेल्वे कंपन्यांचे अमेरिकेतील रस्ते वाहतूक व्यवस्थेशी संबंध आहेत. लोहमार्गांची एकूण लांबी १९७० च्या अखेरीस एक लक्ष किमी. वर होती. वाहतूक आयुक्त मंडळाच्या (१९०३) अखत्यारात रेल्वे दर, त्याचप्रमाणे दूरध्वनी, तारायंत्र व इतर संदेशवहनाच्या साधनांचे दर येतात. हे मंडळ लोहमार्ग बांधणी, त्यांची स्थाननिश्चिती, रेल्वे वाहतूक इ. सर्व बाबी हाताळते. रस्तेबांधणीचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर वाहतूक सुविधांमध्ये पुष्कळच वाढ होत गेली.१९७० मध्ये ८,२६,८५१ किमी. लांबीचे रस्ते होते (यातच २,६११ किमी. लांबीचे जलद रस्ते समाविष्ट).१९७१ मध्ये कॅनडात ६७⋅५१ लक्ष मोटार गाड्या, १८⋅५० लक्ष व्यापारी गाड्या (ट्रक, बसगाड्या वगैरे) व १,९८,८६८ मोटारसायकली होत्या. कॅनडाची बंदरे हवामानाच्या दृष्टीने अतिशय निरुपयोगी ठरतात. हिवाळ्यात मॉंट्रिऑल हे बंदर बंद ठेवावे लागते हॅलिफॅक्स व सेंट जॉन ही बंदरे हिवाळ्यात चालू असूनही कॅनडाच्या अंतर्भागापासून फार दूरवर असल्याने ती अमेरिकेच्या अटलांटिक बंदरांशी स्पर्धा करू शकत नाहीत. व्हॅंकूव्हर हे निर्यात व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे बंदर आहे. पोर्ट आर्थर, फोर्ट विल्यम, पोर्ट कॉलबोर्न (आँटॅरिओ) ह्या बंदरावर माल चढविण्या-उतरविण्याच्या अत्याधुनिक सोयी आहेत. सेंट लॉरेन्स सी व हा सागरगामी मार्ग १९५९ मध्ये पूर्ण करण्यात आल्यामुळे (कॅनडाला सु. ३४ कोटी डॉलर खर्च) अटलांटिकपासून पंचमहासरोवरांच्या मुखापर्यंतचा ३,५३८ किमी. लांबीचा जलमार्ग बोटींना वापरता येऊ लागला. कॅनडाला या मार्गाचा आयातनिर्यातीसाठी मोठा उपयोग होतो. कॅनडा-ग्रेट ब्रिटन व युरोप ह्यांच्यामध्ये अटलांटिक महासागरातून आणि कॅनडा- आशिया व ऑस्ट्रेलिया ह्यांच्यामध्ये पॅसिफिक महासागरातून अनेक जहाज कंपन्यांची नियमित वाहतूक चालते. कॅनडियन रेल्वे कंपन्यांच्या दुय्यम जहाज कंपन्या आहेत. कॅनडामध्ये अंतर्गत जलवाहतूकही महत्त्वाची आहे. १९३७ मध्ये स्थापन झालेली ‘एअर कॅनडा’ ही हवाई वाहतूक कंपनी सरकारी मालकीची असून ती खंडांतर्गत व अटलांटिकच्या पूर्वेस व दक्षिणेस हवाई वाहतक करते. ‘कॅनडियन पॅसिफिक एअरलाइन्स’ ही दुसरी विमान कंपनी युरोप, पूर्वेकडील देश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका ह्या खंडांत वाहतूक करते. हवाई वाहतूक मंडळ नागरी हवाई वाहतूकविषयक सर्व समस्या हाताळते. १९३८ मध्ये झालेल्या सु. ५३,००० टन मैलांच्या शहरांतर्गत माल वाहतुकीपैकी ५१% रेल्वेने, ४६% जलमार्गाने, ३% रस्त्यांनी व फारच थोडी हवाई मार्गाने वाहतूक झाली. पण वाहतुकीचे हेच प्रमाण १९६० च्या पुढे, सु. दोन लक्ष टन मैलांच्या वार्षिक मालवाहतुकीपैकी ४२% रेल्वेने, २७% जलमार्गाने, ९% हवाई मार्गाने व २२% नळमार्गाने वाहतूक झाल्याचे दिसते. १९६९ च्या सुमारास २९,१०५ किमी. लांबीचे तेलनळांचे जाळे सबंध देशभर पसरले होते. नैसर्गिक वायूचे एकत्रीकरण, प्रेषण आणि वितरण ह्यांकरिता ६९,७६६ किमी. लांबीचे नळ होते.

वाहतूक सुविधांप्रमाणेच संदेशवहनाच्या साधनांतही मोठी प्रगती झालेली आहे. १९७० साली तारायंत्रांच्या तारांची लांबी सु. ८⋅८५ लक्ष किमी. होती देशात १७ देशांच्या सागरी तारा टाकण्यात आल्या. बिनतारी संदेशवहनाचीही उत्कृष्ट व्यवस्था आहे. १९७२ साली ९,०२३ डाकघरे होती. व्यापारी रेडिओ केंद्रे व दूरचित्रवाणी केंद्रे ही शासकीय ‘कॅनडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ द्वारा चालविली जातात तथापि, त्याशिवाय १९७१ साली देशात ३३१ खाजगी व सरकारी नभोवाणी केंद्रे व ४५३ दूरचित्रवाणी केंद्रे होती. घरटी दूरचित्रवाणी संच आहे. १९७० च्या अखेरीस देशात रेडिओ, दूरचित्रवाणी व दूरध्वनी यांची संख्या अनुक्रमे ४५,९८,००० ६१,००,००० व ८८,२१,००० होती.

कॅनडाला १९६७ च्या पूर्वीच्या दशकात बाहेरील पर्यटकांपासून दरवर्षी ५० कोटी डॉलर मिळत होते. १९६७ मध्ये–कॅनडा हे स्वतंत्र राष्ट्र झाल्यापासून शंभराव्या वर्षी–कॅनडाला परदेशी प्रवाशांपासून शंभर कोटी डॉलर मिळाले. परदेशी चलन मिळविणारा पहिल्या क्रमांकाचा उद्योग म्हणून लवकरच पर्यटन उद्योग गणला जाईल असे दिसते. कॅनडा व अमेरिका ह्या दोन्ही देशांत रस्ते, रेल्वे, जल व हवाई वाहतुकीच्या अत्युत्कृष्ट सुविधा असल्याने अमेरिकन पर्यटक अधिककरून कॅनडाला उन्हाळ्यात भेट देतात. कॅनडात इतर देशाच्या प्रवाशांचीही संख्या वाढत आहे. १९६९ मध्ये सु. ३⋅५८ कोटी अमेरिकन पर्यटकांनी कॅनडाला भेट दिली (खर्च : ९३⋅१३ कोटी कॅ.डॉ.) इतर देशांतून आलेल्या पर्यटकांची संख्या सु. ५ लक्ष व खर्च ११⋅३० कोटी कॅनडियन डॉलर झाला. कॅनडातील दरडोई खर्चाचे प्रमाण प्रतिवर्षी सु. ५० डॉलर असल्याने, जगातील इतर कोणत्याही माणसापेक्षा कॅनडियन लोक परदेश प्रवासावर अधिक खर्च करतात. शासनाने पर्यटकांकरिता अनेक सुविधा केल्या आहेत हजारो रेस्टॉरंट व हॉटेलांमधून सु. तीन लक्ष खोल्या उपलब्ध आहेत. पर्यटन उद्योगामुळे एक लक्षांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला असून शासनाला कररूपाने कित्येक लक्ष डॉलर महसूल मिळतो.

गद्रे, वि.रा.


लोक व समाजजीवन : क्षेत्रफळदृष्ट्या रशियाच्या खालोखाल कॅनडाचा क्रमांक असला, तरी त्याची लोकसंख्या १९७१ मध्ये २,१५,६८,३११ म्हणजे जवळजवळ केरळ राज्याएवढीच होती. देशातील लोकवस्तीची घनता दर चौ. किमी.स सरासरी फक्त नऊ असून कॅनडाच्या उत्तरेकडील मोठ्या प्रदेशात लोकवस्ती अतिशय तुरळक आहे. संयुक्त संस्थानांच्या सरहद्दीपासून १६० किमी. पर्यंतच्या पट्ट्यात सु. ६६% लोक राहतात. १९७१ च्या शिरगणतीप्रमाणे कॅनडाची ३५⋅२% लोकसंख्या आँटॅरिओ प्रांतात, २८% क्वीबेक, १०⋅१% ब्रिटीश कोलंबिया व ७⋅५% अल्बर्टा प्रांतात होती. १९६१ च्या एकूण लोकसंख्येपैकी ३०⋅४% फ्रेंच, २३% इंग्‍लिश, १०⋅४% स्कॉटिश, ९⋅६% आयरिश, ५⋅८% जर्मन, २⋅५% इटालियन, २⋅४% डच, १⋅८% पोलिश, २⋅६% युक्रेनियन, ७⋅५ % इतर युरोपीय ०⋅३% चिनी, ०⋅२% जपानी, ०⋅२% इतर आशियाई ०⋅२% निग्रो आणि १⋅२% आदिवासी इंडियन व एस्किमो आणि १⋅२% अवर्गीयकृत होते. एस्किमो प्रामुख्याने कॅनडाच्या उत्तर भागात राहतात. येथील बरेच एस्किमो आता सुधारले असले, तरी काही एस्किमो परंपरागत मच्छीमारी व शिकार करून राहतात. कॅनडातील मूळचे इरोक्वाय, ह्यूरन, अल्गॉंक्वियन, ॲथापास्कन इ. आदिवासी इंडियन हल्लीहल्लीपर्यंत वेगळ्या वसाहतीत राहत असले, तरी त्यांनी आता पूर्ण कॅनडियन संस्कृती उचलली आहे. कॅनडामध्ये फ्रेंच व इंग्‍लिश या दोन भाषा प्रामुख्याने बोलल्या जात असल्या, तरी फक्त फ्रेंच जाणणाऱ्यांचे प्रमाण १९६१ मध्ये क्वीबेक प्रांतात ६१.९% व न्यू ब्रन्सविकमध्ये १८⋅७% होते इतरत्र ते नव्वद टक्क्यांवर आढळते. साहजिकच प्रामुख्याने क्वीबेक प्रांतात फ्रेंच घरे, राहणी, संस्कृती इत्यादींचे प्राबल्य आढळते. १९०१ साली कॅनडातील ६२% लोकवस्ती ग्रामीण भागात राहत असे, तर१९७१ साली ७६% लोकवस्ती शहरभागात राहत असल्याचे आढळले. कॅनडातील ५५% लोकवस्ती २८ महानगरपालिकांच्या सरहद्दीत राहते. १९६६ मध्ये आँटॅरिओ प्रांतातील ७७⋅३%, क्विबेक ७४⋅३% व ब्रिटिश कोलंबियातील ७२⋅६% लोकवस्ती शहरात राहत होती. १९६१ मध्ये कॅनडाच्या लोकसंख्येपैकी १/३ लोकसंख्या १५ वर्षांखालील मुलांची बनलेली असून १/२ लोकसंख्या २०-६४ वयांमधील होती. कॅनडातील बहुसंख्य लोक ख्रिश्चन धर्मानुयायी असून १९६१ साली ४६⋅५% प्रॉटेस्टंट व ४५⋅७% रोमन कॅथलिक होते. या दोहोंचे अनेक उपग्रंथ येथे असून याशिवाय येथे मॉर्मन, मेनोनाइट्स, ह्यूटे, राइट्स इ. अनेक गट आढळतात. यहुदी १⋅४% होते. बुद्ध, इस्लाम व हिंदू अनुयायांची संख्याही कॅनडात बरीच असून सु. दहा बुद्धमंदिरे आणि काही मशिदी आहेत. काही विद्यापीठांतून इस्लाम अभ्यासाच्या विशेष सोयी आहेत. ब्रिटिश नॉर्थ अमेरिका कायद्यान्वये शिक्षण ही घटक राज्यांच्या अधिकारातील बाब असून केंद्रशासित प्रदेश, आदिवासी व परदेशातील कॅनडियन यांच्या शिक्षणाची जबाबदारी केंद्राकडे आहे. त्यामुळे निरनिराळ्या राज्यांत शिक्षणाची निरनिराळी पद्धत आढळते. तथापि एकूण शिक्षणाचा सर्वसाधारण आराखडा बहुधा सारखाच आहे. माध्यमिक स्तरापर्यंत कॅनडात शिक्षण विनाशुल्क मिळते विद्यार्थ्यांना अनेक अत्याधुनिक सोयी उपलब्ध असून वस्तुनिष्ठ, व्यक्तिविकासवादी, निर्मितीक्षम विचारसरणीच्या शिक्षणपद्धतीचा कॅनडात मोठ्या प्रमाणावर वापर आढळतो. १९७०–७१ साली कॅनडात एकूण १६,५५२ शाळांतून २,६५,०५६ शिक्षक व ५८,२५,२९८ विद्यार्थी होते. १९६९–७० मध्ये पदवी प्राप्त करून देणाऱ्या ६० संस्थांतून ३,१६,९५३ विद्यार्थी शिकत होते यांपैकी ४४ विद्यापीठे होती. फ्रेंच व इंग्‍लिश या दोन्हीही राजमान्य भाषा असून शासकीय सर्व व्यवहार बहुधा दोन्ही भाषांत चालतो. १९७१ मध्ये कॅनडात १२० दैनिके प्रसिद्ध होत त्यांपैकी १०२ इंग्रजी भाषेत, १२ फ्रेंच व ६ इतर भाषांमध्ये निघत ८२६ नियतकालिकांपैकी जवळजवळ १/५ प्रकाशने फ्रेंच होती. वृत्तपत्रांना देशात संपूर्ण स्वातंत्र्य असेल, तरी त्यांना अमेरिकेतील वृत्तपत्रांशी स्पर्धा करणे कठीण जाते. बऱ्याच वृत्तपत्रांची मालकीही परकीय आहे. देशात हजारो ग्रंथालये असून ४०० वर विविध संग्रहालये व कलावीथी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर व शहरी लोकसंख्या वाढू लागल्यानंतर कॅनडात घरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. १९६६ साली देशात ५१ लाख निवासस्थाने होती त्यांमध्ये दरवर्षी दीड लाख निवासस्थानांची भर घालण्याची शासकीय  योजना होती. जगातील आरोग्यसंपन्न देशांपैकी कॅनडा हा एक देश असून तेथे मृत्यूंचे प्रमाण हजारी ७.३ (१९७०) आहे. प्रसूतिमृत्यूंचे प्रमाण हजारी २२ आहे. हे प्रमाण जगातील सर्वांत कमी प्रमाणांपैकी आहे. ह्दय व रक्तवाहिन्या यांच्या विकारांनी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण एकूण मृत्यूंपैकी ५० टक्कयांहून अधिक आहे. कर्करोगाने होणाऱ्यामृत्यूंचे प्रमाण १६ टक्क्यांहून अधिक आहे. कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १६ टक्क्यांहून अधिक आहे. आरोग्य ही घटक राज्यांच्या अखत्यारीतील बाब असून १९६० मध्ये दर १,००० लोकांमागे ११ खाटा उपलब्ध होत्या. वृद्धांना निवृत्तिवेतन, आंधळे, माता, व गरजूंना साहाय्य, बेकारीभत्ता, कुटुंबभत्ता इ. योजना कॅनडात चालू असून संघराज्याच्या अर्थसंकल्पातील पंचवीस टक्क्यांवर रक्कम सार्वजनिक आरोग्यावर खर्च होते.

आर्थिक समृद्धीबरोबर कॅनडात एकोणिसाव्या शतकापासून साहित्या आणि संस्कृती यांचाही विकास होऊ लागला. टॉमस चांडलर हॅलीबर्टन (१७९६—१८६५) याने कॉनडाचे नाव आंतरराष्ट्रीय साहित्यक्षेत्रात नेले. रॉबर्ट्स (१८६०—१९४३) व ब्‍लिस कारमन (१८६१—१९२९) हे श्रेष्ठ कवी व लघुकथाकार होते. लॅंपमन (१८६१—१८९९) हा निसर्गप्रेमी तर स्टीफन लीकॉक (१८६९—१९४४) हा अर्थशास्त्रज्ञ व निबंधकार विनोदी लेखनासाठी प्रसिद्ध आहे. लुई फ्रेशेत (१८३९—१९०८) याच्या काव्याचा फ्रेंच अकादमीने गौरव केला आहे. मेझो द ला रॉश (१८८५—१९०८) याच्या काव्याचा फ्रेंच अकादमीने गौरव केला आहे. मेझो द ला रॉश (१८८५—१९६१) या कादंबरीलेखिकेच्या जालना (१९२७) कादंबरीस १०,००० डॉलरचे बक्षीस मिळाले होते. याशिवाय एथेल विल्सन (१८९०—  ), मार्गारेट लॉरेन्स (१९२६—   ), ग्रेबिएल रॉय इ. अनेक लेखक कॅनडातील साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. याशिवाय इतिहास, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. विषयांतील काही लेखकांनाही आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली आहे. साहित्याच्या विविध प्रकारांची कॅनडात आज मोठी प्रगती झाली असून उत्तम वाड्मयनिर्मितीस पोषक वातावरण निर्माण करण्यास शासनाने पुढाकार घेतला आहे.

कला क्रीडा इत्यादी : कॅनडातील कलांचा विकास गेल्या शंभर वर्षातच झाला असून, १९५७ साली संघराज्याने एकूण सर्व सांस्कृतिक कार्याच्या विकासासाठी एक मंडळ स्थापले आहे. कॅनडातील चित्रकलेच्या तुलनेने तेथील वास्तुकला, मूर्तिकला वा इतर कलाकुसरीची कामे कमी महत्त्वाची आहेत. कॅनडातील एस्किमो व आदिवासी इंडियनांच्या कला सोडल्या, तर कॅनडात आलेल्या लोकांनी यूरोपातीलच कला चालू ठेवल्या. कॅनडातील अनेक वास्तूंवर गॉथिक, फ्रेंच, व्हिक्टोरियन इ. वास्तुशैलींचा ठसा आढळतो. अगदी अलीकडलील एक्स्पो ६७ मधील कॅनडियन ‘हॅबिटाट’ व व्हॅंकूव्हरमध्ये १९६० साली बांधलेले सायमन फ्रेझर विद्यापीठ यांचाच उल्लेख खास कॅनडियन वास्तुशैलीसाठी करावा लागेल. मूर्तिकला आणि इतर कलाकुसरींचा विकासही प्रामुख्याने या तीस-चाळीस वर्षांतीलच आहे. चित्रकलेमध्ये मात्र पॉल केन (१८१०—१८७१)व कॉर्नेलिअस क्रीगहॉफ (१८१२—१८७२) यांनी आपला प्रभाव कॅनडा बाहेरही पाडला. यांच्या आधी अथवा त्या काळी कॅनडात अनेक चित्रकार होऊन गेले परंतु कॅनडातील चित्रकलेचा इतिहास केन-क्रीगहॉफपासून सुरू झाल्याचे मानतात. विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून कॅनडातील चित्रकलेतिहासात खास कॅनेडियन वैशिष्ट्यनिर्मितीची चळवळ सुरू झाली फ्रॅंक कारमायकेल, लॉरेन हॅरिस, जॅक्सन, फ्रांट्स जॉन्स्टन, आर्थर लिस्मर, मक्डॉल्ड आणि फ्रेडरिक व्हार्ली या सप्तर्षींनी (ग्रुप ऑफ सेव्हन) कॅनडातील चित्रकलेला नवीन वळण दिले. याचे पडसाद इतर कलादालनात तसेच लोकांच्या जीवनातही पडू लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर ‘मॉंट्रिऑल स्कूल’ सारखे संप्रदाय निर्माण होत आहेत.

  कॅनडियन संगीत आणि रंगभूमी यांवर अमेरिकेचा मोठा प्रभाव आहे. क्वीबेक आणि अटलांटिक भागांत काही जुनी वैशिष्ट्ये अजून टिकून आहेत. बहुतेक मोठी शहरे संगीत व नृत्य यांची मोठी केंद्रे आहेत. आँटॅरिओमधील स्ट्रॅटफर्ड येथे दरवर्षी शेक्सपिअरच्या नाटकांचा महोत्सव साजरा होतो.


विविध देशांतून आलेले लोक, त्यांची राहणी, हवामान या सर्वांच्या प्रभावामुळे कॅनडात विविध खेळ दिसतात. बर्फाशी बराच काळ संपर्क राहत असल्याने कॅनडात बर्फावरील खेळांचे प्राबल्य दिसते आणि ऑलिंपिकच्या हिवाळी-खेळ विभागात कॅनडा नेहमी भाग घेत असतो. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अनेक कॅनडियन चमकले आहेत. बर्फावरील हॉकी हा येथील महत्त्वाचा खेळ असून कर्लिंग, स्कीइंग, टोबोगॅनिंग व स्केटिंगचे विविध प्रकार येथे लोकप्रिय आहेत. उन्हाळी खेळात लॅक्रॉस, बेसबॉल, गोल्फ तसचे विविध शर्यतींचे व मैदानी खेळ कॅनडात लोकप्रिय आहेत. लॅक्रॉस हा मूळचा आदिवासींचा खेळ. हॉकी स्वरूपाचाच हा खेळ कॅनडात १८६० च्या सुमारास फार लोकप्रिय होता. तो राष्ट्रीय खेळ मानला जाई. तथापि त्याची लोकप्रियता कमी झाली म्हणून ‘बॉक्सलॅक्रॉस’ ही त्याची सुधारलेली आवृत्ती सध्या कॅनडात प्रचलित आहे. मच्छीमारी हा कॅनडामधील मनोरंजनाचा विषय असून तो सर्वत्र लोकप्रिय आहे. याशिवाय येथे मोटरशर्यती, नौकाशर्यती, शिकार, गिर्यारोहण इत्यादींनाही महत्त्व आहे. टोराँटो येथील घोड्याच्या शर्यती, आँटॅरिओमधील बोमनव्हिलजवळील मोटरशर्यती, कॅलगारीमधील रेडिओ स्पर्धा, विनिपेग येतील कर्लिंग स्पर्धा, सेंट कॅथरिन्झ (आँटेरिओ) येथील रिगेटा (वल्ही) स्पर्धा जगभर प्रसिद्ध आहेत.

महत्त्वाची स्थळे : कॅनडा हा खंडप्राय देश आहे. उत्तरेकडे ध्रुव प्रदेशातही कॅनडाचा भाग पोहोचलेला असूल्यामुळे कॅनडामध्ये परदेशी प्रवाशांना मोठेचे आकर्षण आहे. कॅनडामध्ये ५०० वर राष्ट्रीय उद्याने असून प्रवाशांकरीता अनेक सुखसोयी उपलब्ध आहेत. निसर्गाचे अनेक नमुने कॅनडात पहावयास मिळतात. रॉकीसारख्या पर्वतश्रेणी, पॅसिफिक व अटलांटिक किनारपट्ट्यांमधील पुलिने, घनदाट अरण्ये, प्रेअरीचा गवताळ प्रदेश, अनेक सुंदर सरोवरे, उत्तरेकडील अनेक बेटे व आर्क्टिकचा बर्फमय प्रदेश, कॅरिबू व फरधारी प्राणी, एस्किमो व त्यांची राहणी, आदिवासी इंडियन आणि कॅनडामधील विविध लोकांची संस्कृती ही कॅनडाची मोठी आकर्षणे होत. कॅनडातील पूर्व भागांतील शहरांत जुन्या संस्कृतीचे दर्शन होते क्वीबेनमध्ये फ्रेंच संस्कृतीचा ठसा दिसतो, तर पश्चिम भागातील शहरे उशिरा उदयास आल्याने तेथे नाविन्य आढळते. अटलांटिक किनाऱ्यावरील मच्छीमारी खेडी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. क्वीबेनचा ‘बॅप्टिस्ट डे’, ओटावामधील  रोजचा ‘चेंजिंग द गार्ड’ समारंभ, स्ट्रॅफर्डचा ‘शेक्सपिअर समारोह, टोराँटोचे राष्ट्रीय प्रदर्शन, सस्कॅचेवनमधील ‘पिओन-एरा’, व्हँकूव्हरमधील प्रदर्शन, नाताळ व एक जुलैचा ‘डोमिनियन डे’, यांना कॅनडियन जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. ओटावा ही कॅनडाची राजधानी असली, तरी माँट्रीऑल हे देशातील सर्वांत मोठे शहर आहे. टोरॉंटो, व्हॅंकूव्हर, एडमंटन, कॅलगारी, हॅमिल्टन, विनिपेग, लंडन, विंझर,क्वीबेक, रिजायना, सॅस्काटून ही कॅनडामधील एक लाखावर लोकसंख्या असलेली शहरे आहेत. अमेरिकेसारखा बलाढ्य देश शेजारी असूनही कॅनडाने आपले वैशिष्ट्य टिकविले असून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कॅनडाला महत्त्वाचे स्थान आहे. 

शाह, र. रू.

संदर्भ : १. Careless, J. M. S. Brown, R. C. Ed. The Canadians, Toronto, 1967.

2. Caves, R.E. Holton, R. H. The Canadian Economy : Prospect and Retrospect, Cambridge, 1959.

3. Klinck, C.F. &amp other, Ed. Literary History of Cacada, Toronto, 1965.

4. Mclnnis, E. Canada : A Political and Social History, Toronto, 1959.

5. Putnam, D.F. Canadian Regions : A Geography of Canada, Toronto,1956.

6. Robinson, J. L. Robinson, J. Geography of Canada Toronto, 1951.

 7. Stovel, J. A. Canada in the World Economy, Cambridge, 1959.

8. Tanghe, R. Bibliography of Canadian Bibliographies, Toronto, 1962.

9. Young, J.C. Ed. Enoyclopaedia Canadiana, Ottawa, 1962.


सस्कॅचेवनमधील पोटॅश-खाण हिमाच्छादित प्रदेशातील एक हमरस्ता
प्रेअरीतील शेती ,सस्कॅचेवन इंडियन जमीतीचा एक माजी नेता.
कॅनडातील कागद कारखान्याचे एक दृश्य कॅनडातील यांत्रिक लाकूडतोड
कॅनडातील प्राणिविशेष