कंकणद्वीप : बांगडीसारखे, जवळजवळ वर्तुळाकार प्रवाळद्वीप. याच्या आतल्या बाजूस २० ते १०० मी. खोलीचे, सपाट तळाचे खारकच्छ असून त्याभोवती लहान लहान प्रवाळद्वीपांचे वर्तुळ बनलेले असते. त्यातून खारकच्छात शिरण्यास खोल पाण्याचा मार्ग असतो. कंकणद्वीपे समुद्रांच्या उबदार पाण्याच्या भागात, विशेषतः पॅसिफिक व हिंदी महासागरांत आढळतात. ती जवळजवळ समुद्रसपाटीतच असतात काहींची उंची सु. ५ मी. पर्यंत असते.

कंकणद्वीपावर चुनखडकाशिवाय दुसरे खडक नसतात. काही द्वीपांवर मात्र फॉस्फेट खडक आढळतो. दुसरीकडून आलेली माती किंवा खते यांवर काही वनस्पती वाढतात. नारळीचे झाड हे येथील वैशिष्ट्यपूर्ण झाड होय. येथे गोडे पाणी सहसा आढळत नाही. पावसाचे पाणी भांड्यांतून किंवा खळग्यांतून साठवून काळजीपूर्वक वापरावे लागते. पाऊस पुष्कळ पडत असेल तर द्वीपावर थोडेबहुत गोडे पाणी मिळते व खारकच्छाची क्षारताही पुष्कळशी कमी होते. काही द्वीपांवर तारो, ब्रेडफ्रुट इत्यादींचे उत्पादन होते. तेच तेथील लोकांचे मुख्य अन्न होय. त्याच्या जोडीला खारकच्छात मिळणारे विपुल मासे, शेवंडे, मृदुकाय प्राणी असतात. नारळाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. खोबरे, ग्वानो (खत म्हणून उपयोगी पडणारी समुद्रपक्ष्यांची विष्ठा), मोती, समुद्रकाकडी, बटणांसाठी प्राण्यांची कवचे इत्यादींची निर्यात होते. वादळांमुळे किंवा भूकंपामुळे उठणाऱ्या मोठ्या लाटांमुळे कंकणद्वीपांवरील वस्तीचे फार नुकसान होते.

हिंदी महासागरातील लक्षद्वीप व मालदीव, पॅसिफिकमधील कॅरोलाइन, मार्शल, गिल्बर्ट, टूआमोटू या द्वीपसमूहात आणि विषुववृत्ताजवळ व इतरत्र विखुरलेली अनेक प्रसिद्ध कंकणद्वीपे आहेत. गिल्बर्ट द्वीपसमूहातील ख्रिसमस कंकणद्वीपाचा भूभाग तर मार्शल द्वीपसमूहातील क्वाजालिन कंकणद्वीपाचे खारकच्छ सर्वांत  मोठे आहे.

चार्ल्स डार्विनने १८४२ मध्ये अशी कल्पना मांडली की महासागरी बेटे किंवा ज्वालामुखी यांच्याभोवती किनारी प्रवाळभित्ती तयार होत असाव्यात व मग ते बेट किंवा ज्वालामुखी भूपृष्ठांतर्गत हालचालींमुळे खचून नाहीसे होत असावे आणि प्रवाळाचे कंकणद्वीपच तेवढे बाकी उरत असावे. कंकणद्वीपांचा बाहेरचा उतार पुष्कळदा अतिशय उतरता व महासागरात खूप खोलपर्यंत गेलेला असतो, ही गोष्ट या कल्पनेस पोषक आहे. दुसऱ्या एका कल्पनेप्रमाणे हिमयुगात समुद्रांचे पाणी फार गार असल्यामुळे बेटांभोवती प्रवाळांचे संरक्षण तयार होऊ शकले नाही. लाटांमुळे बऱ्याच बेटांचे माथे समुद्रसपाटीपर्यंत झिजून गेले. नंतर बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली तेव्हा प्रवाळांचे संरक्षणवलय तयार होऊन कंकणद्वीपे बनली. सध्याची कंकणद्वीपे पूर्वी उंच सागरी बेटे होती असे डार्विनप्रमाणे मानले, तर बेटांबेटांवरील वनस्पती व प्राणी यांच्या वितरणाचे अधिक चांगले स्पष्टीकरण होते हे मात्र खरे.

कुमठेकर, ज. ब.