शायेन येथील राजभवनशायेन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी वायोमिंग राज्याची राजधानी. लोकसंख्या ५०,००८ (१९९०). हे शहर राज्याच्या वायव्य भागात क्रो खाडीवर, लॅरमी शहराच्या पूर्वेस सुमारे ७९ किमी. अंतरावर, समुद्रसपाटी पासून १,८५० मी. उंचीवर वसले आहेत. स्थानिक शायएन इंडियन जमातीवरून त्याचे नाव पडल्याचे दिसते. युरोपीय वसाहतकारांनी १८६७ च्या सुमारास या प्रदेशात लोहमार्ग सुरू करून शहराची रीतसर स्थापना केली. शहराजवळच ‘फोर्ट डी. ए. रसेल’ (किल्ला) बांधण्यात आला. १९३० मध्ये किल्ल्याला वायोमिंग राज्याचा पहिला गव्हर्नर फ्रॅन्सिस ई. वॉरन याचे नाव देण्यात आले. ईशान्येकडील ब्लॅक हिल्समधील सोन्याच्या खाणींकरिता लागणाऱ्या साहित्यसामग्रीचे केंद्र, तसेच टेक्सस राज्यातून येणाऱ्या गाईगुरांच्या वाहतुकीचे केंद्र म्हणून हे प्रसिद्धीस आले. शहराच्या आसमंतात समृद्ध चराऊ कुरणे आहेत. बंदूकधारी सरदार, जुगारी लोक तसेच अल्पकालिक वस्ती करणारे लोक यांचा अड्डा बनलेले हे शहर, गाईगुरांचे मालक व मेंढपाळ यांच्यामधील संघर्षामुळे बदनाम झाले. १९४७ मध्ये अमेरिकन हवाईदलाचा तळ, तर १९६० मध्ये ‘ॲटलस’ आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्र तळ येथे उभारण्यात आला. शायेन हे गोकुळ (काउ टाउन) व रेल्वेचे विभागीय केंद्र म्हणून ओळखले जाई.

शायेन हे मध्य रॉकी पर्वत प्रदेशाचे व्यापार व वितरण केंद्र आहे. गाईगुरांच्या व्यापाराचे हे मोठे केंद्र आहे. येथे खनिज तेल उत्पादन, इमारती लाकूड, पशुखाद्य, रसायने, प्लॅस्टिके इ. निर्मितीचे उद्योगधंदे चालतात. शहरातील राज्य-विधिमंडळ-इमारतीच्या ४४ मी. उंचीच्या घुमटावर कंदिलाच्या आकाराचा कळस असून अंतर्भागात पश्चिमी शैलीची भित्तिचित्रे आहेत. येथील सर्वोच्च न्यायालयवास्तूतच राज्याचे संग्रहालय आहे. शायेनमध्ये ‘फ्राँटिअर डेज’ नावाचा, अमेरिकेतील सर्वांत जुना व सर्वांत मोठा असा सहा दिवसांचा अश्वक्रीडोत्सव (रोदेओ) १८९७ पासून प्रतिवर्षी जुलैमध्ये साजरा होतो. ‘वाइल्डवेस्ट’ व कॅटेल किंग्‌डम यांच्या जुन्या आठवणी जागविणारा हा उत्सव असतो. ‘शायेन फ्राँटिअर डेज’ या उत्सवामध्ये ‘ब्राँको – बस्टिंग’ (नाठाळ घोड्यांना ताळ्यावर आणणे), ‘चकवॅगन’ शर्यती, बैल व वासरू या दोघांना दोराने अडकविणे (बांधणे), बुलडॉगिंग (गोऱ्याची शिंगे पकडून त्याची मान मुरगाळणे व त्याला लांबवर भिरकावून देणे.) इ. कार्यक्रमांचा अंतर्भाव होतो.

अमेरिकन इंडियन लोकनृत्ये, चौरस नृत्ये (चार जोडप्यांनी चौकोनात उभे राहून नृत्य करणे.), कार्निव्हल (लेंट सणापूर्वीचा) उत्सव इ. गोष्टी पर्यटकांना आकृष्ट करतात.    

चौधरी, वसंत