भूतान : दक्षिण आशियातील एक सार्वभौम राजेशाही राष्ट्र साधारणतः आयताकृती असलेल्या भूतानचा अक्षवृत्तीय विस्तार २६° ४५” उ. ते २८° उ. व रेखावृत्तीय विस्तार ८९° ते ९२° पू. असा आहे. पूर्व-पश्चिम लांबी ३०६ किमी. व दक्षिणोत्तर रूंदी १४५ किमी. क्षेत्रफळ सु. ४६, ६२० चौ. किमी. लोकसंख्या १२,९८,००० (१९८० अंदाज). पूर्व हिमालयातील हे एक भूवेष्टीत राज्य असून याच्या उत्तरेस तिबेट, पूर्वेस भारताचा अरूणाचल प्रदेश, दक्षिणेस आसाम व प. बंगाल आणि पश्चिमेस सिक्कीम तसेच तिबेटमधील चुंबी खोरे आहे. भारत व चीन यांच्या सीमेवर हा प्रदेश असल्याने भूराजनैतिक दृष्ट्या त्यास विशेष महत्त्व आहे थिंफू ( लोक. १०,०००–१९८० अंदाज ) ही उन्हाळी, तर पारो ही हिवाळी राजधानी आहे. १७ डिसेंबर हा भूतानचा राष्ट्रीय दिवस आहे.

‘ड्रॅगन भूमी’, ‘दक्षिणेचे ‘नंदनवन’ (पॅरडाइझ ऑफ द साउथ) इ. नावांनीही हा देश ओळखला जातो. ‘भूत लोकांची’ भूमी किंवा ‘भू-उत्तान’ (उच्च भूमी) यांवरून भूतान हे नाव पडले असावे. भूतान या नावाच्या उत्पत्तीविषयी इतरही काही आख्यायिका रूढ आहेत. भारतीय पुराणांतून या देशाला ‘मद्र’ असेही संबोधण्यात आले आहे. कश्यप ऋषीची पत्नी ‘भूति’ हिच्या वंशजांची भूमी असेही या देशाचे वर्णन केलेले आढळते. स्थानिक लोकांच्या मते ही वज्रदानवांची विहारभूमी असून येथील पर्वतशिखरांवर वज्रदानवांचा संचार असतो. ‘ड्रुक्पा’ किंवा वज्रमानव हे येथील मूळ रहिवाशांचे आद्य नाव असल्याचे मानले जाते. आधुनिक भारतीय इतिहासकार व मानववंशशास्त्रज्ञ यांच्या मते भूतान हा संस्कृत शब्द असून तो ‘भटांत’ शब्दाचा अपभ्रंश असावा.

भूवर्णन : भूतानचा बहुतेक भाग पर्वतमय व घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे. तिबेटकडे जाणाऱ्या पाच खिंडी या भागात असून त्यांपैकी नथू ला ही अत्यंत महत्त्वाची आहे. प्राकृतिक दृष्ट्या भूतानचे ( १) उत्तर भूतान, (२) मध्य भूतान व (३) दक्षिणेकडील दुआरचा मैदानी प्रदेश, असे तीन विभाग पडतात. उत्तर भूतान ग्रेट हिमालयाच्या रांगांत मोडतो. या विभागात अवसादी खडकांचे आच्छादन आढळते. ‘पारो चू’ च्या वरच्या खोऱ्यात टूर्मलीन ग्रॅनाइट प्रकारची मृदा आढळते. उत्तरेकडील या बर्फाळ पट्ट्यात ७,३०० मी. पेक्षा अधिक उंचीची बरीच शिखरे आहेत. सर्वसाधारणपणे ३,६५० मी. ते ५,४७५ मी. उंची असलेल्या या डोंगराळ भागात बरीच कुरणे असून उन्हाळ्यात याक चारण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. या भागात हिमनद्याही आहेत.

मध्य भूतान म्हणजे ग्रेट हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडे आलेल्या सोंडेचा प्रदेश होय. येथील पर्वतरांगा दक्षिणोत्तर पसरलेल्या असून त्या देशातील प्रमुख नद्यांच्या जलोत्सारक आहेत. यांपैकी ब्लॅक पर्वतरांग ही संकोश व मनास या नद्यांची जलोत्सारक आहे. मध्य भूतानमध्ये १,८०० ते २,७५० मी. उंचीच्या प्रदेशात सुपीक खोरी आहेत. पारो, पुनाखा, हा व थिंफू ही त्यांपैकी प्रमुख खोरी असून तेथील सपाट भूमी, पुरेसा पाऊस व निरोगी हवामान यांमुळे तेथे दाट लोकवस्ती आढळते.

भूतानच्या दक्षिण सरहद्दीदरम्यानचा सु.५०किमी. रुंदीचा पट्टा म्हणजे दुआरचा मैदानी प्रदेश होय. हा भाग बराच सखल आहे. या प्रदेशात गोंडवन संघातील स्फटिकयुक्त वालुकाश्माचे थर आढळतात. पूर्व भागात कोळशाचे पातळ थर आहेत. भरपूर पाऊस तसेच तापमान आणि आर्द्रताही जास्त असल्याने हा भाग रोगट व निरुत्साही हवामानाचा आहे.

नद्या : बहुतेक नद्या भूतानच्या उत्तरेकडील पर्वत भागात उगम पावून दक्षिणेकडे वाहतात. वाँग चू, संकोश, तोंगसा चू, बूमथांग, मनास या भूतानमधील प्रमुख नद्या होत. दक्षिणोत्तर पसरलेल्या पर्वतरांगांमुळे या नद्यांची खोरी एकमेकींपासून अलग झाली आहेत. बहुतेक खोरी अरुंद व पर्वतीय भागात असल्याने जलवाहतुकीसाठी त्यांचा उपयोग होत नाही. दक्षिण भूतानमध्ये मात्र या नद्यांच्या पुराचा धोका संभवतो.

हवामान : भूतानच्या उंचसखलपणाचा परिणाम येथील हवामानावर झालेला आढळतो. पर्वतरांगा व जंगले यांमुळे तपमान उन्हाळ्यातही आल्हाददायक असते. हिवाळ्यात हिमरेषेच्या वर बर्फवृष्टी होते. दुआरच्या मैदानी प्रदेशात उन्हाळे उबदार असतात, तसेच तेथील पर्जन्याचे प्रमाणही जास्त असते. मध्य भूतानमध्ये १,१०० ते २,३०० मी. उंचीच्या प्रदेशात हिवाळे थंड व उन्हाळे उबदार असतात, तर उत्तर भूतानमध्ये टंड्रा प्रकारचे हवामान आढळते. येथील अधिक उंचीचा भाग बर्फाच्छादित असून तेथे हिवाळे अतितीव्र, असमान व उन्हाळे सौम्य असतात. उंचीनुसार पर्जन्याच्या वितरणात १०० सेंमी. पासून ५०८ सेंमी. पर्यंत तफावत आढळते.

वनस्पती व प्राणी : भूरचनेतील विविधता, अतिपर्जन्य व पर्जन्यछायेचा प्रदेश इत्यादींमुळे भूतानमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. भरपूर पावसाच्या प्रदेशात सदाहरित निबिड अरण्ये आहेत. डोंगरमाथ्यावर पाइन, स्प्रूस, फर, लार्च, ओक, बीच, मॅपल, सायप्रस, जूनिपर या जातींचे वृक्ष आढळतात. उत्तर भूतानमध्ये आल्पीय प्रकारच्या वनस्पती असून तेथील ४,२७५ ते ४,५७५ मी. उंचीच्या भागात गवताळ प्रदेश आहेत. भूतानमधील अरण्ये आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची ठरतात.

भूतानमध्ये तृणभक्षक तसेच हिंस्त्र प्राणी बरेच आढळतात. कमी उंचीच्या प्रदेशातील जंगलात वाघ, चित्ता व गेंडा हे प्राणी दिसतात. अतिदक्षिणेकडे हत्ती, सांबर, अस्वल, वेगवेगळ्या प्रकारची हरिणे, कस्तुरी मृग, काळवीट, खेचर इ. प्राणी दिसून येतात.

चौधरी, वसंत


इतिहास व राज्यव्यवस्था : भूतानला प्रदीर्घ इतिहास असला, तरी तो सुसंगत लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. याची कारणे अनेक आहेत त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : भूतानमधील राजकीय अस्थिरता व अनेकवेळा झालेली सत्तांतरे, परिणामत : होत राहिलेला विध्वंस, १८२८ व १८३२ मध्ये लागलेल्या प्रचंड आगी, १८९७ साली झालेला भूकंप तसेच वारंवार येणारे महापूर यांमुळे जुन्या पुनाखा राजधानीचे तसेच देशातील इतरही भागांचे अतोनात नुकसान झाले व ऐतिहासिक पुरावे नष्ट झाले. त्यामुळे देशाचा प्राचीन इतिहास भारतीय, चिनी व ब्रिटिश प्रवाशांनी लिहिलेल्या भूतानच्या वर्णनावर तसेच तोंगसा पेनलोप येथे सापडलेल्या काही हस्तलिखितांवर आधारित आहे.

इसवी सनापूर्वी भूतानवर भारतीय राज्यकर्त्यांचे आधिपत्य होते, असे म्हटले जाते. प्राचीन भोटांग, भोटांत प्रदेशावरूनच ‘भूतान’ हे नाव पडले आहे. भारतीय पुराणांतील काही उल्लेखांवरून व लासेनच्या मते तिबेट म्हणजेच भूतान. भोटांत प्रदेश काश्मीरपासून कामरूप देशापर्यंत (आसाम) पसरला होता, असे म्हटले जाते. भूतानी आख्यायिकांच्या आधारे इ. स. सातव्या शतकापासूनची भूतानविषयीची माहिती जुळविता येते. भूतानच्या प्रदेशात सातव्या शतकात भारतीय संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. राजकीय व सामाजिक क्षेत्रांवर भारतीय प्रभाव विशेषत्वे होता. त्यावेळी भूतानवर कुचबिहारच्या संगलदीप नावाच्या राजाचा अंमल होता. पुढे कामरूप देशाच्या आधिपत्याखाली हा प्रदेश आला. ६५० च्या सुमारास राजा भास्करवर्मन याच्या मृत्यूनंतर हा प्रदेश कामरूप देशापासून अलग झाला व या प्रदेशात लहानमोठी राज्ये निर्माण झाली. आठव्या शतकाच्या मध्यास नालंदा विद्यापीठातील आचार्य पद्मसंभव यांनी भूतानमधील लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. यावेळी या प्रदेशात उत्तरेस केखि-खा-रा थोंग राजा व दक्षिणेस ‘सिंधू प्रदेश’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागात नागुछी ( सिंधू राजा) हे दोन राजे राज्य करीत होते. भूतानचा प्रदेश त्यावेळी ‘मॉन’ या नावाने ओळखला जाई. नागुछीच्या मुलांनी पुढे उत्तरेस तिबेटमधील दोरजी-टोंगपर्यत व पश्चिमेस सिक्कीमपर्यंत राज्यविस्तार केला दक्षिणेस भारतीय सीमा प्रदेशातही राज्यविस्ताराचा अयशस्वी प्रयत्न केला, त्यावेळी भारताच्या तराई प्रदेशावर राज्य करणाऱ्या नबुदारा नावाच्या राजाशी झालेल्या युद्धात नागुछीचा ज्येष्ठ मुलगा तालामेंबर ( चवताळलेला वाघ) ठार झाला. परिणामतः नागुछीने नबुदाराच्या अनुयायांचे हत्याकांड सुरू केले. अशा परिस्थितीतच तो आजारी पडला आणि यातून तो वाचण्याचे लक्षण दिसेना, म्हणून त्याच्या सहकाऱ्यांनी नबुदाराचा (नवाचो) धर्मगुरू व लामा गुरू पद्मसंभवास बोलविण्याविषयी सल्ला दिला. नागुछीने अखेर हे मान्य केले व पद्मसंभवाला भूतानमध्ये बोलविण्यात आले त्याच्या उपचाराने नागुछी बरा झाला. पद्मसंभवाने त्यास बौद्ध धर्माची दीक्षा देऊन नबुदारा व नागुछी यांचा समेट घडवून आणला आणि भारत-भूतान यांच्या दरम्यानची सरहद्द खेन प्रांतातील नाथंग गावाजवळ पक्की करण्यात आली. येथे एक स्तंभ उभारून दोन्ही राजांनी व त्यांच्या अनुयायांनी एकमेकांवर आक्रमण न करण्याच्या शपथा घेतल्या व तेव्हापासून पुढे सु. एक शतकभर या प्रदेशात शांतता नांदली. नवव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भूतानच्या प्रदेशावर तिबेटी लोकांच्या स्वाऱ्या होऊ लागल्या. तिबेटचा बॉन धर्मीय राजा दर्म (लांग-दारमा) बौद्ध धर्माचा द्वेष्टा होता. त्याने भूतानवर हल्ले करून हा प्रदेश लुटला. परंतु लांग-दारमाच्या मृत्यूनंतर अनेक तिबेटी लामांनी धर्मप्रसाराचे काम पुन्हा सुरू केले. ८६१-९०० या काळात हळूहळू भूतानवर तिबेटी लोकांचा अंमल प्रस्थापित झाला. तथापि बॉन व बौद्ध धर्मीयांचा संघर्ष तिबेटमध्ये चालूच राहिला. भूतानवर तिबेटींची सत्ता पुढे दोन शतके कायम टिकली. बाराव्या शतकात अनेक तिबेटी लामा भूतानमध्ये आले. तेराव्या शतकात या प्रदेशावर तिबेटमधील ड्रुकपा (तिबेटमधील बौद्ध धर्मीय निंगमा-पा संप्रदायाची शाखा) संप्रदायाची सत्ता स्थापन झाली. त्यामुळे तिबेट व भूतान यांदरम्यान विविध बौद्ध संप्रदायांच्या लामांची ये-जा वाढली. लामांनी भूतानच्या प्रदेशात बौध्द मंदिरे व विहार उभारले. लामांपैकी शाक्य-पा (शाक्य मुनी) याने पंधराव्या शतकाच्या मध्यास भूतानमध्ये अनेक बौद्ध मठ स्थापन केले. याच शतकात पेमालिंगपा हा बौद्ध आचार्य होऊन गेला. तो गुरू पद्मसंभवाचा अवतार मानण्यात येतो त्याचा संप्रदायही वाढत गेला. भूतानच्या विद्यामान राजघराण्याचे पूर्वज आचार्य पेमालिंगपा यांच्या कुळातील आहेत, असे मानले जाते.

भूतानचा प्रदेश लहान-लहान राज्यांत विभागला गेलेला होता आणि लामांचा प्रभाव वाढत होता. तिबेटमध्ये विविध बौद्ध पंथांत सत्तास्पर्धा चालू होती. त्यामुळे तेथील काही लामांनी दक्षिणेस भूतान, नेपाळ व सिक्कीम या प्रदेशांत आपली सत्ता वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले व अखेर सतराव्या शतकात भूतानमध्ये ड्रुक्पा सांप्रदायिकांना सत्ता प्रस्थापित करण्यात यश आले.

सतराव्या शतकात नावांग नामग्याल याची सत्ता भूतानमध्ये स्थापन झाली. हा ड्रुक्पा संप्रदायाचा असून मूळ तिबेटमधील होता. ल्हासा येथील धार्मिक सत्तास्पर्धेत अपयश आल्याने तो १६१६ साली भूतानमध्ये आला. त्याने स्वतःला ‘धर्मराजा’ (ड्रुक्पा संप्रदायाचा गुरू रालुंगचा पेमा कार्पो याचा अवतार) म्हणून घोषित केले. ल्हासा येथील त्याचा प्रतिस्पर्धी देव त्सांगपो याने भूतानवर स्वारी केली. तथापि पारो येथे धर्मराजाने त्याचा पराभव केला. नामग्यालने धर्मप्रमुख व प्रशासन प्रमुख म्हणून अनुक्रमे ‘धर्मराजा’ व ‘देवराजा’ अशी दोन पदे निर्माण करून भूतानमध्ये आपली सत्ता हळूहळू दृढमूल केली. प्रत्यक्षात ही दोन्ही पदे बहुधा लामांकडेच सोपविण्यात येत असत. धर्मराजाने भूतानमध्ये किल्लेवजा मोठ्या वास्तू उभारल्या. पुनाखा ही त्याची हिवाळी व थिंफू ही उन्हाळी राजधानी होती. गुस्त्रीखान या मंगोल आक्रमकाचाही त्याने पराभव करून भूतानमधील आपली सत्ता निर्वैर केली. भूतानमधील कायदा व प्रशासनव्यवस्था यांचा पाया नावांग नामग्याल यानेच घातला. देशाची विविध झाँगमध्ये (जिल्ह्यांत) विभागणी करून प्रत्येकावर एकेक राज्यपाल (पेनलोप) नेमला. तिबेटच्या साँगत्सेन गाम्पो या राज्याच्या १६ व धार्मिक १० अशा २६ आज्ञांवर देशाचा कायदा आधारलेला होता. नामग्यालच्या मृत्यूनंतर पुन्हा राजकीय सत्ता संघर्षाने पुढील २५० वर्षे देशात सतत अस्थिरता राहिली. अंतर्गत संघर्षाच्या या प्रदीर्घ काळात मात्र भूतानची एकात्मता टिकून राहिली आणि परकीय आक्रमकांचे सर्व प्रयत्न मोडून काढण्यात आले. उदा., १६९७ साली मध्य तिबेटचा मंगोल राज्यकर्ता लाबझांगखान याने तीन बाजूंनी भूतानवर केलेला हल्ला परतविण्यात आला. धर्मराजा या धार्मिक पदाचे अधिष्ठान तिबेटच्या मान्यतेवर अवलंबून असल्याने भूतानच्या राजकीय कारभारात हस्तक्षेप करण्याची संधी तिबेटला लाभत असे. १७३० मध्ये असा प्रकार घडून तिबेटने निवडलेला राजा भूतानचा सत्ताधीश झाला, भूतानला तिबेटचे मांडलिकत्व पतकरावे लागले. त्या वेळी ल्हासाला खंडणी व नजराणे पाठविले जात. ही पद्धत १९५१ पर्यंत चालू राहिली.

कुचबिहार आणि भूतान यांचे संबंध दीर्घकाळपर्यंत संघर्षाचेच राहिले. १७७२ साली कुचबिहारच्या राजाचा खून झाला, त्यावेळी भूतानचा देवराजा शीडर याने कुचबिहारावर स्वारी केली व तेथे आपल्या मर्जीतील राजा नेमला. या संघर्षात विरोधकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याच्याकडे मदतीची याचना केली व भूतानमध्ये ब्रिटिशांचा शिरकाव झाला. ब्रिटिशांच्या मदतीने खगेंद्रनारायण हा भूतानच्या गादीवर आला. तिसऱ्या पंचेन लामाच्या मदतीने २५ एप्रिल १७७४ रोजी कंपनी सरकारशी भूतानने शांततेचा तह केला. या तहान्वये हिंदूस्थानातील ब्रिटिश प्रदेशात आक्रमण न करण्याचे भूतानने मान्य केले. या घटनेमुळे ब्रिटिशांना तिबेटशी व्यापार वाढविण्याला संधी लाभली. या संदर्भात काही जादा सवलतीही ब्रिटिशांनी भूतानकडून मिळविल्या. १७८५ मध्ये आपल्या सदिच्छेचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी फलाकाटा जिल्हा भूतानला दिला.


अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नेपाळ व तिबेटमध्ये लष्करी संघर्ष होऊ लागला. त्यात ब्रिटिशांचा हात असल्याचा तिबेटी राज्यकर्त्यांना संशय होता. परिणामतः ब्रिटिश-तिबेटी व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला. त्याचवेळी भूतानमधील देवराजाची सत्ता दुबळी झाल्याने भूतानमध्ये स्थानिक सत्ताधारी प्रबळ झाले व त्यांनी आसाममधील ‘दुआर’ या सखल भागावर हल्ले सुरू करून तो प्रदेश ताब्यात घेतला. १८२६ मध्ये कंपनीने आसाम घेतला, परिणामतः हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारशी भूतानचा उघड संघर्ष सुरू झाला. १८३८ मध्ये कंपनी सरकारने भूतानशी व्यापारी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही. तोंगसाचा राज्यपाल ब्रिटिशांचा कडवा विरोधक होता. भूतानने काही ब्रिटिश नागरिक अटकेत टाकले, ही सबब पुढे करून १८४१ मध्ये ब्रिटिशांनी ‘दुआर’ चा प्रदेश ताब्यात घेतला व त्याबद्दली भूतानला दरवर्षी दहा हजार रूपये देण्याचे मान्य केले. हिंदुस्थानातील १८५७ चा उठाव आणि एकूणच अस्थिर राजकीय परिस्थिती यांमुळे भूतानमध्ये ब्रिटिशांना अधिक हस्तक्षेप करण्यास सवड झाली नाही. भूतानची नियंत्रणाबाहेर गेलेली अंतर्गत परिस्थिती पाहून १८६३ मध्ये ब्रिटिश सरकारने बंगाल इलाख्याचा सचिव अँशले ईडन यास भूतानमध्ये पाठविले. तथापि तोंगसाच्या राज्यपालाच्या दडपणाखाली भूतानच्या मालकीचा प्रदेश परत करण्याबाबत उलट देवराजानेच ईडनकडून बळजबरीने करार करून घेतला. ईडन हिंदुस्थानात परतल्यावर सरकारने हा करार रद्द करून भूतानशी युद्ध पुकारले. या युद्धात भूतानचा पराभव झाला. नोव्हेंबर १८६५ मध्ये सिंचुला येथे तह करण्यात आला. या तहान्वये भूतानमध्ये मुक्त व्यापार करण्याचा अधिकार ब्रिटिशांना लाभला, तसेच भूतान आणि शेजारील राज्ये यांच्यातील वादांचा निर्णय करण्याचा अधिकार ब्रिटिशांनी घेतला. हिंदुस्थानच्या प्रदेशात भूतानने हल्ले करू नयेत म्हणून ब्रिटिशांनी भूतानला ५०,००० रू. वार्षिक मदत देण्याचे कबूल केले. भूतानमध्ये अंतर्गत संघर्ष वाढतच राहिला. विशेषतःतोंगसा व पारो येथील राज्यपालांतील कलह वाढत गेला व या कलहाचा शेवट होऊन जिग्मे नामग्याल हा १८७० मध्ये भूतानचा सत्ताधीश बनला. विद्यमान राजघराण्याचा हाच संस्थापक होय. जिग्मे नामग्याल ‘देव नाक्पो’ (कृष्णदेव) म्हणून ओळखला जातो. नामग्यालच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ ‘देवराजा’ बनला व त्याने पारोचा राज्यपाल व पुनाखाचा किल्लेदार यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला.

युजेन वांगचुक (नामग्यालचा मुलगा) हा अत्यंत कर्तबगार होता. १८८४ पासून भूतानमध्ये त्याचा प्रभाव वाढत गेला. त्याने ब्रिटिशांबरोबर घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले. तिबेटमधील ब्रिटिशांचे व्यापारी हितसंबंध अबाधित राखण्यात भूतानचा फार मोठा वाटा होता. १९०३ साली ब्रिटिश शिष्टमंडळाबरोबर वांगचुक मध्यस्थ म्हणून ल्हासाला गेला. १७ डिसेंबर १९०७ रोजी भूतानच्या देवराजाचे निधन झाले व युजेन हा सर्वांनुमते भूतानच्या गादीवर आला. तेव्हापासून तेथे वंशपरंपरागत राजसत्ता सुरू झाली. ८ जानेवारी १९१० रोजी भूतानशी ब्रिटिशांनी नवा तह केला. या तहान्वये आपले परदेशी संबंध ब्रिटिशांच्या सल्ल्याने ठरविण्याचे भूतानने मान्य केले. भूतानला द्यावयाची वार्षिक मदत वाढवून ती एक लाख रुपये करण्यात आली. या कराराच्या संदर्भात भूतानचे स्वतंत्र देश म्हणून असलेले स्थान अबाधित असल्याचा खुलासा ब्रिटिश सरकारने केला. युजेन वांगचुक १९२६ मध्ये मरण पावला.तत्पूर्वी त्याने सर्व अंतर्गत संघर्ष मिटविले होते. त्यानंतर जिग्मे वांगचुक हा गादीवर आला. १९५२ मध्ये त्याचे निधन झाले. आपल्या कारकीर्दीत त्याने शाळा, दवाखाने तसेच जुन्या धार्मिक वास्तूंचे जीर्णोद्धार इ. कामे पार पाडली.

एप्रिल १९४८ मध्ये भूतानने आपले एक शिष्टमंडळ भारतात पाठविले. परिणामतः८ ऑगस्ट १९४९ रोजी भारत व भूतान यांच्यामध्ये तह करण्यात आला. भूतानच्या आग्नेयीकडील देवणगिरी प्रदेश सदिच्छेचे प्रतीक म्हणून भारताने भूतानला परत केला व वार्षिक मदतीची रक्कम १० लाख रु. पर्यंत वाढविली. परदेशसंबंधांत भारत सरकारचा सल्ला घेण्याचे भूतानने मान्य केले. मुक्त व्यापार व उद्योग विकसित करण्याच्याही तरतुदी या तहात होत्या. १९५२ साली जिग्मे दोरजी वांगचुक हा भूतानच्या गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत १९५३ साली राष्ट्रीय विधानसभा, १९६५ साली शाही सल्लागार परिषद (रॉयल अँडव्हायझरी कौन्सिल), मे १९६८ मध्ये देशाचे पहिले मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. त्यामुळे जिग्मे दोरजी वांगचुक हा आधुनिक भूतानचा शिल्पकार मानला जातो. लोकशाहीवर त्याची निष्ठा होती. २१ जुलै १९७२ मध्ये जिग्मे दोरजी वांगचुकचे निधन झाले. त्यानंतर जिग्मे सिंगई वांगचुक हा केवळ १७ वर्षाचा असतानाच गादीवर आला.

चीनने १९५९ साली तिबेट घेतल्यावर सु. ४,००० तिबेटी निर्वासित भूतानमध्ये आश्रयासाठी आले. हेरगिरी व इतर विघातक कृत्ये हे लोक करतात, म्हणून भूतान सरकारने त्यांची लहानलहान गटांत विभागणी केली. १९७८ साली तिबेटच्या दलाई लामाबरोबर या निर्वासितांच्या प्रश्नासंबंधी जवळजवळ चार वर्षे चाललेली चर्चा अयशस्वी झाली. १९७९ मध्ये भूतानच्या राष्ट्रीय विधानसभेने एक आदेश काढून तिबेटी निर्वासितांनी त्या वर्षाअखेर एकतर भूतानी नागरिकत्व स्वीकारावे किंवा तिबेटला परत जावे असे घोषित केले. त्या वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये भारत सरकारने भूतानमधील तिबेटी निर्वासितांना भारतात प्रवेश देण्याचे अमान्य केले. जुलै १९८० अखेर बऱ्याचशा तिबेटींनी भूतानचे नागरिकत्व पतकरले.

जिग्मे सिंगई वांगचुक यांनी २५ फेब्रुवारी १९८० रोजी भारतास भेट दिली. १९४९ चा तह हा उभय देशांना हितकारक असल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.

भूतानमध्ये निरंकुश राजेशाही असून ती वंशपरंपरागत चालत आलेली आहे. शासन व प्रशासन व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे. राजाला मदत करणारी शाही सल्लागार परिषद, मंत्रिमंडळ, राष्ट्रीय विधानसभा व देशातील सु. ६,००० लाभांचा प्रमुख अशा सर्वांचा शासनात व प्रशासनात सहभाग असतो. राष्ट्रीय विधानसभेची मुदत ३ वर्षाची असते. तीत १५० सदस्य असतात. त्यांपैकी १०१ हे लोकनिर्वाचित सदस्य असून १० जागा धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी राखीव असतात. उर्वरित सदस्यांत शासकीय अधिकारी, मंत्री व शाही सल्लागार परिषदेचे सदस्य यांचा अंतर्भाव होतो. कायदे करणे, राजकीय व संविधानात्मक बाबींवर सल्ला देणे इ. कामे विधानसभा करते. मंत्रिमंडळ आणि शाही सल्लागार परिषद विधानसभेला जबाबदार असतात. वर्षातून विधानसभेची दोन अधिवेशने भरतात. सल्लागार परिषदेत ९ सदस्य असून त्यांपैकी एक राजप्रतिनिधी, दोन धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी व ६ प्रादेशिक लोकप्रतिनिधी असतात. नोव्हेंबर १९८१ मध्ये मंत्रिमंडळात ४ मंत्री, २ राजप्रतिनिधी असे ६ सदस्य होते. भूतानमध्ये १८ जिल्हे असून त्यांवर एक प्रशासनप्रमुख असतो. जिल्ह्याची न्यायव्यवस्था स्वतंत्र असते. देशाच्या संकल्पित पाचव्या पंचवार्षिक योजनेत ( १९८२-८६) विकेंद्रीकरणाची तरतूद केली असून पुनाखा व थिंफू या दोन जिल्ह्यांचे विलीनीकरण करण्याची तरतूद आहे. देशात कोणतेही राजकीय पक्ष नाहीत.


न्यायव्यवस्था : भूतानमध्ये फौजदारी व दिवाणी अशा स्वतंत्र विधिसंहिता आहेत. जिल्हापातळीवरील न्यायालये, त्यांवरील अपील न्यायालये व उच्च न्यायालये अशी न्यायालयीन व्यवस्था आहे. उच्च न्यायालयाची स्थापना १९६८ मध्ये करण्यात आली असून त्यावर सहा न्यायाधीश असतात.

संरक्षण : भूतानच्या शाही लष्कराचे स्वरूप व संख्या यांबद्दल गुप्तता पाळण्यात येते. सैन्यदलाचा प्रमुख राजाच असतो. सैनिकी दलांखेरीज देशात मोठ्या प्रमाणावर लोकसेनाही ठेवली आहे. देशातील सैनिकी प्रशिक्षण भारतीय सैनिकी पथकाकडून दिले जाते.

                                                                                                                                                 जाधव, रा, ग. चौंडे. मा. ल.

आर्थिक स्थिती : भूतानची अर्थव्यवस्था शेतीप्रधान असून ९३.४% लोक शेती व पशुपालन व्यवसायांत गुंतलेले होते (१९८०). कसण्यास योग्य जमीन फारच थोडी आहे. १९७८ मध्ये शेतीखालील एकूण क्षेत्र सु. ५,५३४ चौ. किमी. होते. तीव्र उतार, नापीक जमीन आणि प्रतिकूल हवामान यांमुळे बहुतेक सर्व ठिकाणी जंगले, उंच प्रदेशातील कुरणे व गवताळ प्रदेश आढळतात. अंतर्गत हिमालयात असलेल्या सुपीक खोऱ्यात मात्र लागवडीखाली जास्तीत जास्त जमीन आणलेली आढळते. मध्य भूतानमध्ये असलेली सुपीक खोरी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. मात्र ती खोरी सलग नसून हिमालयाच्या दक्षिणोत्तर पर्वतरांगांमुळे एकमेकींपासून अलग झालेली आहेत. प्रदेशभिन्नतेनुसार सोपान शेती, डोंगरशेती व सखोल शेती यांचा अवलंब केलेला आढळतो. शेताला दगडाचे बांध घातलेले असतात व सूचिपर्णी वृक्षांचे कुंपण असते. दगडांनी तयार केलेल्या कालव्यांतून दूरवरून पाणी आणले जाते. तांदूळ, गहू, सातू, मका, तृणधान्ये, बटाटे, संत्री, सफरचंद ही प्रमुख कृषिउत्पादने होत. १,२२० मी. उंचीपर्यत तांदूळ व बकव्हीट होतो. २,४३८ मी. पर्यत तांदूळ व सातू यांचे वर्षाआड फेरपालट करून पीक घेतले जाते. २,७४३ मी. पर्यत काही ठिकाणी गहू पिकविला जातो. शतकानुशतके खते न घालता तांदूळ पिकविल्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. उत्पादनाच्या व निर्यातीच्या दृष्टींनी सफरचंद हे येथील प्रमुख फळ आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनातही बरीच वाढ झालेली आढळते. भूतानमधील कृषिउत्पादन पुढीलप्रमाणे होते (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : तांदूळ ३००, गहू ६५, मका ६०, सातू १०, बकव्हीट ५ (१९७८), तृणधान्ये ५, बटाटे ४३, इतर कंदमुळे ५, कडधान्ये २, तंबाखू १, ताग ६ (१९८०).

देशात जमीनसुधारणांना प्राधान्य देऊन कृषिविकास घडवून आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. एकाच व्यक्तीकडे १२.१४ हेक्टरांपेक्षा जास्त जमीन ठेवता येत नाही. खुद्द राजालाही १२.१४ हेक्टरच जमीन ठेवण्याची परवानगी आहे. जलसिंचन योजनांमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न चालू असून १९६६-७८ या काळात १३,७५९.३२ हे. क्षेत्र ओलिताखाली आणले गेले. पशुपालन व कुरणांशी निगडित व्यवसाय देशात सर्वत्र चालतात. धनगर लोक उन्हाळ्यात डोंगराळ भागात जातात, तर हिवाळ्यात सखल प्रदेशात स्थलांतर करतात. याक, मेंढ्या व गुरे यांचे कळपच्या कळप बाळगले जातात. देशातील पशुधन पुढीलप्रमाणे होते (आकडे हजारांमध्ये): गुरे २१० , डुकरे ६०, मेंढ्या ४२, शेळ्या २२, म्हशी ५, घोडे २०, गाढवे १७, खेचरे ८, कोंबड्या १०९ (१९८०).

भारत सरकारच्या सक्रिय सहकार्याने व आर्थिक मदतीने भूतानने अशा चार पंचवार्षिक योजना (१९६१-६५, १९६६-७०, १९७१-७६ व १९७६-८१) पार पाडल्या. पहिल्या दोन योजनांचा खर्च पूर्णतः भारताने केला. तसेच पहिल्या योजनेचा आराखडा भारतीय नियोजन आयोगाने केला होता. या योजनेत रस्तेबांधणी व शिक्षण यांवर अधिक भर दिला होता. भारताशी निकटचा संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. दुसऱ्या व तिसऱ्या योजनांत कृषी आणि पशुपालन यांचा आधुनिक शास्त्रीय पद्धतीने विकास, प्रादेशिक विशेषीकरण आणि नवीन पीकपद्धतीचे संशोधन व विकास यांवर भर देण्यात आला. चौथ्या योजनेत जलसिंचन व शेतीविकास तसेच पशुसंवर्धन यांना अग्रक्रम देण्यात आला. योजनांतर्गत काळात शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. देशात आगकाड्या, साबण, मेणबत्त्या, गालिचे, वस्त्रनिर्मिती तसेच लाकूड, अन्न परिरक्षण व मद्यनिर्मिती इ. उद्योगधंदे चालतात. अलीकडे लाकूडकाम, बांबूकाम, विणकाम इ. उद्योगांचा विकास केला जात आहे. पुगली येथे सिमेंट कारखाना असून फुंतशॉलींग, गेलेगफुग व सेमडुप जोंखार येथे उपभोग्य व औद्योगिक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन करणाऱ्या छोट्या औद्योगिक वसाहती स्थापन झालेल्या आहेत. त्यासाठी भारतातून मजूर आणि काही शक्तिसाधने पुरविली जातात. लघुउद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना सरकारतर्फे उत्तेजन देण्यात येते. देशात सु. ४० लघुउद्योग होते (१९८०).

दळणवळण साधनांच्या पुरेशा सोयी नसल्याने भूतानमधील वनसंपत्तीचा पुरेपुर वापर करता येत नाही. कमी डोंगराळ भागातील देवदाराची वने मात्र महत्त्वाची आहेत. तांबे, जिप्सम ह्या दोन प्रमुख खनिजांशिवाय वैदूर्य, टूफा, डोलोमाइट, ग्रॅफाइट, शिसे, जस्त, चुनखडी, संगमरवर, अभ्रक, पाटीचा दगड, पायराइट, संगजिरे यांचेही साठे देशात सापडले आहेत. आग्नेखय भूतानमध्ये सापडणारा कोळसा आसाममधील चहाच्या भट्ट्यांना पुरविला जातो. खनिजांवर आधारित छोटे -छोटे उद्योग निघत आहेत. उदा., पारो येथील ग्रॅफाइट अभिशोधन प्रकल्प. भारत सरकारच्या मदतीने भूस्तररचनेचे सर्वेक्षण करण्यात येत असून जलविद्युत्निर्मितीच्या योजना सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. देशात ४,००० किवॉ. जलविद्युत्शक्ती उपलब्ध असून तीपैकी बरीचशी भारताकडून पुरविली जाते. भारत सरकारच्या मदतीने उभारला जात असलेला वांगचू खोऱ्यातील ( ३३६ मेवॉ. क्षमतेचा) चुखा जलविद्युत्प्रकल्प विशेष महत्त्वाचा असून तो १९८४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. भारत सरकारच्या मदतीने भूतानने जलढाका नदीवरील प्रकल्पाचे काम हाती घेतले असून त्यापासून १८,००० किवॉ. जलविद्युत्‌शक्ती उपलब्ध होईल. तीपैकी २५० किवॉ. वीज भूतानला मोफत दिली जाणार आहे. या प्रकल्पाचा फायदा भारतातील प. बंगाल राज्याला व नैर्ऋत्य भूतानला अधिक मिळेल. स्वीडिश सरकारच्या साहाय्याने पाइन वृक्षराजीने नटलेल्या दक्षिण भूतानमध्ये कागदाचा मोठा कारखाना काढला जात आहे.


देशात १९६० पासून तिबेटबरोबरच्या व्यापारास बंदी घालण्यात आली आहे. देशातून लाकूड, फळे, मद्य, लाख, मेण, कस्तुरी, हस्तिदंत, याक, हातमागाचे व कलाकुसरीचे कापड, खनिज पदार्थ यांची मुख्यतः निर्यात होते. बहुतांशी व्यापार भारताशी असला, तरी लाकूड, वेलदोडे व मद्य यांची निर्यात मध्यपूर्व आशिया, सिंगापूर व प. यूरोप यांना केली जाते. भारतातून आवश्यक यंत्रसामग्री व संरक्षणसामग्री आयात केली जाते. भूतानने १९८० मध्ये ग्रेट ब्रिटनकडून ९३,००० स्टर्लिंग पौंड किंमतीच्या वस्तूंची आयात केली.

रुपया हे भारतीय चलन सर्वत्र रूढ आहे. एनगुलट्रम (नू) हे भूतानी चलन असून ते एप्रिल १९७४ पासून सुरू करण्यात आले. १, ५, १० व १०० नूंच्या नोटा आणि ५, १०, २५, ५० चेट्रुम व १ नू यांची नाणी आहेत. १०० चेट्रुमांचा १ नू होतो. जून १९८२ मध्ये विनिमयदर पुढीलप्रमाणे होता (१ रूपया=१ नू ) १ स्टर्लिंग पौंड = १६.५५ नू १ अमेरिकी डॉलर=९.५५५ नू. येथील चांदीच्या चलनाला टिकचुंग म्हणतात. भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे भूतानचे परदेशी हुंडणावळीचे सर्व व्यवहार पाहिले जातात. १९७९-८० मध्ये देशाचा महसूल १,०६० लक्ष नू व खर्च २,५०० लक्ष नू होता. जमीनधारा, कुरणातील कर व निवडणुकांवरील कर या उत्पन्नाच्या, तर रस्तेविकास, शिक्षण, न्याय व सरकारी कामकाज या खर्चाच्या प्रमुख बाबी आहेत. १९६८ मध्ये फुंतशॉलींग येथे ‘बँक ऑफ भूतान’ ही देशातील पहिलीच बँक सुरू करण्यात आली. तिचे २५% भागभांडवल भारतीय स्टेट बँकेने घेतले आहे. भारत हा भूतानला अर्थसाहाय्य करणारा प्रमुख देश आहे १९६१-७५ या काळात ६,२०० लक्ष रूपयांची, १९७८-७९ मध्ये ४,१०० लक्ष नू, तर १९७९-८० मध्ये १,७०० लक्ष नूंची भारताने मदत केली. पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजनांचा संपूर्ण खर्च, तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा ९०% खर्च भारताने केला. यांशिवाय संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम, बालक निधी, जागतिक अन्न कार्यक्रम आणि लोकसंख्याविषयक कार्यनिधी इत्यादीं मार्फतही भूतानला आर्थिक मदत मिळते.

भूतानचा आर्थिक विकास प्रामुख्याने वाहतूक व दळणवळणाच्या साधनांवर अवलंबून आहे. राज्यशासन, अर्थकारण आणि आधुनिक विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारी संपर्कसाधने देशात अतिशय मर्यादित आहेत. वाहतुकीची चांगली सोय झाल्याशिवाय देशातील वेगवेगळ्या टोळ्यांचे व जमातींचे एकीकरण होणार नाही. नागमोडी वळणांच्या खिंडी, डोंगरकडे, घनदाट अरण्ये इत्यादींमुळे भूतानमध्ये अतिशय मंदगतीने रस्ते बांधले जात आहेत. उत्तरेकडून, पूर्वेकडून व पश्चिमेकडून भूतानमध्ये प्रवेश करणे अशक्यप्राय आहे. दक्षिणेकडून भारताशी मात्र बरीच वाहतूक चालते. पर्वतीय प्रदेशात अजूनही याक, तट्टू, खेचर यांद्वारेच वाहतूक केली जाते. देशात १९७९ मध्ये सु. १,७७५ किमी. लांबीचे रस्ते १,४३२ खाजगी मोटारी व ७४७ जड वाहने ५३ सामान्य डाकगृहे, २८ शाखीय डाकगृहे, १,०८६ किमी. लांबीच्या दूरध्वनी तारा व १५ स्वयंचलित विनिमय केंद्रे होती. पारो येथे प्रमुख विमानतळ असून यांगफुला येथील विमानतळावरून फक्त पूर्वेकडील प्रदेशांशी विमान वाहतूक केली जाते. देशात हेलिकॉप्टरतळ (हेलिपॅड) मात्र बरेच आहेत. ‘भारतीय हवाईमार्ग निगमा’च्या सहकार्याने ‘ड्रुक एअरवेज’ तर्फे पारो-कलकत्ता अशी विमानसेवा १९८२ पर्यंत सुरू करण्याची योजना आहे. १९७८ मध्ये देशात १,३५५ दूरध्वनिसंच होते. येथील क्केनसेल हे साप्ताहिक (खप ५,००० प्रती) व ड्रुक लोसेल हे त्रैमासिक (खप ३,००० प्रती) इंग्रजी, द्झाँगखा व नेपाळी या तीन भाषांतून प्रसिद्ध केली जातात.

लोक व समाजजीवन : भूतान ही शांतताप्रिय ड्रॅगनची भूमी मानली जाते. शांतताप्रिय भूतानी समाजामुळे हे अधिकच सार्थ ठरते. तिबेट, ब्रह्मदेश, नेपाळ व भारत या लगतच्या प्रदेशांतील लोकसमूहांचा प्रभाव भूतानी समाजावर दिसून येतो. उत्तर भूतानमधील मूलतः मंगोल वंशाचा असलेला समूह, मध्य भूतानमधील भारतीय व उत्तर भूतानी यांच्या वांशिक मिश्रणाने तयार झालेला समाज, अरुणाचल प्रदेशातील लोकांशी साम्य असलेला पूर्व भूतानमधील वर्ग व दक्षिण भूतानमधील नेपाळी वंशाचे लोक, अशा प्रकारच्या विविधतेतून भूतानी समाजाची घडण झालेली आहे. सामान्यपणे तिबेटी व भूतानी समाजांचा पूर्वकालीन वारसा अधिक प्रमाणात समान असला, तरी या दोन्ही समाजांत परस्परांविषयी काही प्रतिकूल पूर्वग्रह आढळतात.

भूतानमध्ये वेगवेगळ्या वंशांचे लोक असले, तरी भूतिया लोकच बहुसंख्य असून ते ड्रुक्पा संप्रदायाचे अनुयायी आहेत. महायान बौद्ध हा देशाचा अधिकृत धर्म असून सु. ६,००० लामांचे वास्तव्य देशात आहे. ताशी चोद्‌ झांग येथे मुख्य धर्मपीठ आहे. देशाच्या महसुलापैकी बराचसा महसूल लामा व त्यांचे मठ यांवर खर्च होतो. देशात ७५% बौद्ध व २५% हिंदू धर्मीय आहेत.

सामान्यपणे भूतानी लोक मध्यम बांध्याचे व सुदृढ असतात. शेती व पशुपालन हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय होय. शेतीची कामे स्त्री-पुरुष दोघेही करतात. या कामी गावातील लोक परस्परांचे सहकार्य घेतात. भात लावणीचा प्रसंग हा मंगल मानला जातो. त्यावेळी स्त्रिया नवी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करतात. ‘छांग’ हा बीर प्रकार व ‘आरा’ हा मद्यप्रकार भूतानमध्ये विशेष लोकप्रिय आहे. चहा हे भूतानी लोकांचे अगदी आवडते पेय. पण त्यांचा चहा लोणी व मीठ घातलेला, पेजेसारखा घट्ट केलेला असतो. डोंगराळ भागातील लोक भटके असून ते पशुपालन करतात. याक हा प्रमुख प्राणी म्हणजे त्यांची ‘कामधेनू’ आहे. मध्य व पश्चिम भूतानच्या खोऱ्यांतील लोक मुख्यतःशेतकरी आहेत. आग्नेपय भागातील लोक फिरती शेती करतात. द. भूतानमधील लोक नेपाळी असून तेही शेती करतात. ‘खो’ किंवा ‘बोकू’ म्हणून ओळखला जाणारा झगा हे भूतानी पोषाखाचे वैशिष्ट्य. बहुतेक पुरुषांच्या कमरेला धारदार कट्यार असते. लाकूडतोडीसाठी व इतर तत्सम कामांसाठी त्याचप्रमाणे प्रसंगविशेषी शस्त्र म्हणूनही तिचा उपयोग करतात. हे शस्त्र चालविण्यात भूतानी लोक तरबेज आहेत. कातडी तळव्याचे आणि भरतकाम केलेल्या कापडाचे गुडघ्याइतके उंच बूट भूतानी लोक वापरतात. वरिष्ठांपुढे किंवा ज्येष्ठांपुढे अनवाणी जाण्याची पद्धत आहे. स्त्रिया खांद्यापासून पायापर्यंत लोंबणारा झगा (किरा) वापरतात. त्यावरून जाकीट घालण्याचीही प्रथा आहे. सुती, रेशमी व लोकरी अशा विविध प्रकारचे कपडे वापरले जातात. भूतानी वस्त्रप्रावरणे रंगीबेरंगी असतात. स्त्रियांना पोवळ्यांच्या व मोत्यांच्या दागिन्यांची विशेष आवड असते. पारंपारिक समाजात झग्याची गुणवत्ता, संख्या इत्यादींवरून व्यक्तीचा दर्जा ठरत असे. भात, सुके मांस हे भूतानी लोकांचे मुख्य अन्न आहे. दगड,माती व लाकूड यांची तीन मजल्यांपर्यंत घरे भूतानमध्ये आढळतात. लोखंडाचा उपयोग घरबांधणीसाठी करीत नाही. अर्थात भूतानच्या विविध प्रदेशांतील भौगोलिक परिस्थित्यनुसार घरबांधणीत फरक दिसून येतो. आधुनिक शहरी वातावरण कमी असून थिंफू, पारो यांसारख्या मोठ्या शहरांतूनच ते आढळते.


स्त्रियांचा दर्जा पुरुषांपेक्षा कमी असला, तरी त्यांना खूपच स्वातंत्र्य आहे. शासकीय सेवेतही भूतानी स्त्रिया प्रवेश करत आहेत. सहशिक्षणाची पद्धत आहे. दिवेलागणीनंतर मात्र स्त्रियांना भिक्षूंचे वास्तव्य असलेल्या झाँगमध्ये राहण्यास बंदी आहे. सरकारने विवाहाची नोंदणी करण्याचा आदेश काढलेला आहे. विवाह विधी साधा असतो. मंत्र-तंत्रावर पारंपरिक समाजाचा विश्वास आहे. पुष्कळदा रोगनिदान व उपचार मांत्रिकांकडून केले जातात. भूतानी वैद्यकावर भारतीय आयुर्वेदाचा, तसेच तिबेटी व चिनी वैद्यकाचा प्रभाव आहे. औषधी वनस्पतींवर विशेष भर दिला जातो. भूतानी लोकांत प्रेताचे दहन करण्याची प्रथा आहे. प्रत्येक घरात बुद्धमूर्ती असलेले देवघर किंवा देवळी असते. कुत्रा हा आवडता पाळीव प्राणी आहे. धनुर्विद्या हा भूतानचा राष्ट्रीय खेळच म्हटला पाहिजे. सण-उत्सव प्रसंगी या खेळाच्या स्पर्धा भरविण्यात येतात. त्या बहुधा सांघिक स्वरूपाच्या असतात. देगॉर हा भिक्षुवर्गाला आवडणारा एक खेळ होय. ८ मी. अंतरावर ठेवलेल्या लक्ष्याकडे हाताच्या तळव्यावर ठेवलेला १ किग्रॅ. वजनाचा दगड टाकणे असा हा खेळ आहे. १९७० नंतर भूतानमध्ये फुटबॉलही खेळला जाऊ लागला. तथापि तो शहरे व शाळा यांपुरताच मऱ्यादित आहे. थिंफू येथे फुटबॉलस्पर्धा भरविल्या जातात. मुखवट्यांचे समूहनृत्य भूतानींना अत्यंत आवडते. त्यांत स्त्री-पुरुष जोडीने भाग घेतात. द. भूतानमधील नेपाळी लोकांतही ही नृत्ये रूढ आहेत. तिबेटी निर्वासितांच्या आगमनामुळे याकची कातडी धारण करून केलेले नृत्य भूतानमध्ये लोकप्रिय ठरत आहे. रूढी आणि श्रद्धा यांनी भूतानी लोकजीवन अंतर्बाह्य व्यापलेले आहे. तथापि त्यात आधुनिक विचारसरणीने हळूहळू बदल होत चाललेला दिसतो.

देशात साक्षरता अत्यल्प आहे. पारो खोऱ्यात साक्षरतेचा थोडा प्रसार झालेला दिसतो. भूतानमध्ये पदवी अभ्यासक्रमापर्यंतचे सर्व शिक्षण मोफत दिले जाते. देशात १०८ सरकारी शाळा, १९ माध्यमिक शाळा, ६ केंद्रीय शाळा, २ शिक्षक प्रशिक्षण संस्था, २ बौद्ध धर्मशिक्षणाच्या शाळा, १ महाविद्यालय व २ तांत्रिक विद्यालये असून विद्यार्थिसंख्या २८,५४८ व शिक्षकांची संख्या १,२१० होती (१९७९). देशात मुख्यत्वे द्‌झाँगखा, इंग्रजी, नेपाळी या भाषा प्रचलित असून बहुसंख्य लोक द्झाँगखा भाषा बोलतात. यांशिवाय देशात अनेक बोलीभाषा रूढ आहेत. दक्षिण भूतानमधील नेपाळी लोक अल्पसंख्याक आहेत. त्यांना दुय्यम नागरिकत्वाचा दर्जा देण्यात आलेला असून मध्य भूतानमध्ये त्यांना वस्ती करण्यास परवानगी नाही.

भूतानमध्ये स्थापत्यविशारद, तंत्रज्ञ, डॉक्टर, शिक्षक, कुशल कामगार, मजूर इत्यादींची फार मोठी वाण आहे. भारतातून अर्थशास्त्रज्ञ, मजूर, वनाधिकारी व कृषिअधिकारी मागविले जातात. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला २३ असून सरासरी आयुमान ४६.१ वर्षे आहे (१९७७). १९७०-७५ या काळात वार्षिक सरासरी जननप्रमाण ४३.७% व मृत्युप्रमाण २३.३% होते. पर्वतीय प्रदेशात व दुआरनजिकच्या टेकड्यांच्या प्रदेशात रोगट हवामानामुळे लोकसंख्येची घनता कमी आढळते. मध्य भूतानमध्ये मात्र घनता जास्त आहे. खेडी व वस्त्या लहानलहान असून त्या दूरवर विखुरलेल्या आढळतात. यामुळे राजकीय व भावनात्मक ऐक्याची भावना जोपासणे कठीण झाले आहे. बहुतेक लोक खेड्यांतच रहातात. थिंफू, पारो यांची फारतर मोठ्या नगरांत गणना करता येईल. यांशिवाय वांगडू, तोंगसा, ताशिगांग, फुंतशॉलींग, सारभंग ही प्रमुख नगरे आहेत. १९७७ मध्ये देशात १४ रुग्णालये, ५२६ खाटा, ७१ दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५२ डॉक्टर होते.

सरंजामी पद्धत, विशेषतः अमर्याद जमीनमालकी, १९६४ नंतरच्या काळात बेकायदा ठरविण्यात आली. बहुपत्नीत्व व बहुपतित्व यांना आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात आले. पुरुषाला प्रथम पत्नीच्या संमतीने फक्त तीनच विवाह करता येतात. मुलाचे व मुलीचे विवाहयोग्य वय अनुक्रमे २१ व १६ ठरविण्यात आले आहे. धनुर्विद्येत भूतानी लोक प्रवीण असून भूतानचा राजा ड्रुक ग्यालपो दोरजी वांगचुक हा स्वतः या कलेत विशेष कुशल होता.

कला : भूतानमधील कलानिर्मितीला दीर्घ परंपरा असून तीवर भारत, नेपाळ, चीन, तिबेट या लगतच्या प्रदेशांतील कलापरंपरांचा ठसा उमटलेला आहे. सतराव्या शतकापासून थिंफू व पुनाखा शहरांच्या परिसरात नेपाळमधील नेवारी कारागीर येऊ लागले. त्यांच्या प्रभावाने भूतानमधील लाकडी तसेच सोन्या-चांदीचे कलाकाम, धार्मिक चित्रकला, धातुकाम इ. कनिष्ठ कलांना चालना मिळाली. दोरजी वांगचुक राजाच्या कारकीर्दीत कलावंतांच्या प्रशिक्षणासाठी खास योजना तयार करण्यात आल्या. विशेषतःदेशाचा कलात्मक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले.

भूतानी कला ही मुख्यतः धार्मिक हेतूने निर्माण झाली. ‘मंडल चित्रण’ सतत पुनरावृत्त होणारा रूपबंध असून मंदिर-मठांच्या भिंती, छते इत्यादींवर त्याचा विविध प्रकारचा आविष्कार केल्याचे दिसून येते. कागद, रेशमी कापड इत्यादींवर केलेले धार्मिक स्वरूपाचे प्रसिद्ध चित्रण ‘थंगका’ म्हणून भूतानमध्ये ओळखले जाते. ‘तिबेटी टंका’ च्या पद्धतीची ही कला आहे. वेधक रंगांनी सजविलेल्या बुद्धाच्या व बौद्ध देवतांच्या मूर्ती हे भूतानी मूर्तिकलेचे ठळक वैशिष्ट्य. त्यांच्या आकार-प्रकारांत विविधता आढळून येते. धार्मिक चित्रणाने वेधक बनविलेल्या लाकडी चौकटींनी अंतर्गत वास्तुशोभन करण्याची प्रथा भूतानमध्ये आढळते.

भूतानी फर्निचर वस्तूंत लाकडी नक्षीकामाला विशेष महत्त्व दिलेले दिसून येते. स्लेटचे शिलाशिल्पन ही मूळची चिनी कला तिचे भूतानमध्ये पुनरूज्जीवन करण्यात येत आहे. स्लेटच्या फलकावर बौद्ध देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आढळतात. मंदिर-मठादी धार्मिक वास्तूंच्या बाह्य सुभोभनासाठी त्यांचा उपयोग करण्यात येतो. पुष्कळदा धार्मिक मंत्रही अशा फलकांवर कोरलेले आढळतात. हस्तिदंती कलाकाम तसेच शृंगशिल्पन याही बाबतींत भूतानी कला समृद्ध आहे. नित्य पूजाविधीतील छोट्या देवतामूर्ती विशेषतःबौद्ध भिक्षू तयार करतात. लाकडाचे, कागदी लगद्याचे आणि मातीचे मुखवटे करण्याची प्रथाही भूतानमध्ये आढळते. मुखवटे अनेक आकार-प्रकारांचे रंगीत किंवा साधे असतात. धार्मिक विधी तसेच समारंभ इ. प्रसंगी सामूहिक नृत्ये सादर करण्यात येतात. त्यावेळी मुखवटे वापरण्याची प्रथा आहे. सोन्या-चांदीचे तसेच जडजवाहिऱ्यांचे कलाकाम हा नेवारी कलावंतांचा वारसा होय. धार्मिक पोथ्यांतून व संहितांतून सुरेख, कलात्मक लेखनकला आढळते. या हस्तलिखितांतून लघुचित्रणाची कलाही विशेष विकसित झाली. हस्तकला किंवा हस्तव्यवसायांतही भूतानी परंपरा समृद्ध आहे. लाकडी भांडी, बश्या विशेष वेधक असतात त्यांवर पुष्कळदा लाखेचे कलाकाम केलेले आढळते. त्यांचे आकार, प्रकार व रंग सांकेतिक असून त्यांवरून अन्नपात्र, पेयपात्र, भिक्षुपात्र यांच्यातील वेगळेपणा चटकन ओळखता येतो. चहापात्रे व पेयपात्रे पुष्कळदा चांदीच्या जडावकामाने सुशोभित केलेली असतात. मोठ्या प्रमाणावर लाकडी भांडी तयार करण्याची योजना भूतानी सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे. उपयुक्त तथा कलात्मक स्वरूपाचे बुरूडकामही परंपरेने चालत आले आहे. 


भूतानमधील गढीवजा वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हा एक संमिश्र वास्तुप्रकार असून त्यात किल्ला व मठ दोहोंच्या अभिकल्पांचे मिश्रण आढळते. कालांतरांने ‘झाँग’ हा वास्तुप्रकार एक बहुद्देशी वास्तुप्रकार विकसित झाला त्यात सैनिकी, प्रशासकीय व धार्मिक अशा सर्व कामांसाठी योग्य रचना करण्यात येऊ लागली. ल्हासा (तिबेट) येथील पोताला राजवाडा हा भूतानमधील झाँगच्या धर्तीवर बांधल्याचे म्हटले जाते. ‘ल्हाखांग’ म्हणजे पवित्र मंदिरे ही भूतानी वास्तुकलेचे दुसरे ठळक वैशिष्ट्य आहे. विशेषतः ड्रुक्पा संप्रदायाच्या प्रभावकाळात या वास्तू मोठ्या प्रमाणात उभारण्यात आल्या. ‘चोरटेन’ किंवा स्तूप हे भूतानी वास्तुकलेचे तिसरे वैशिष्ट्य होय. हे स्तूप आठ प्रकारचे आहेत. बुद्धाचे अवशेष आठ वेगवेगळ्या गटांच्या अनुयायांनी आठ प्रकारच्या स्तूपरचनेत जतन केले, असे म्हणतात. ते आठही स्तूपप्रकार भूतानमध्ये आढळतात. पारो येथील पंधराव्या शतकात बांधलेला स्तूप उल्लेखनीय आहे.

भूतानी कलादृष्टी रंगप्रचुर आहे. वस्त्रप्रावरणे, घरे, भित्तिचित्रणे व भित्तिलेपचित्रणे, धार्मिक हस्तलिखिते, हस्तकला इ. सर्वांतून भूतानी लोकांचे रंगांचे वेड प्रकर्षाने जाणवते. धार्मिक श्रद्धा हे तर भूतानी कलेचे अढळ अधिष्ठान आहे. सगळ्याच कलाविष्करांतून भूतानी धर्मश्रद्धेचा प्रत्यय येतो. भूतानी कलेचे वेगळेपणही त्यामुळेच काहीसे टिकून आहे.

पर्यटन : निसर्गरम्य परिसर म्हणून भूतानची ख्याती आहे. पारो, पुनाखा, वांग डु फ्रोदांग तोंगसा, हा झाँग इ. प्राचीन किल्ले प्रसिद्ध आहेत. पर्यटकांपासून भरपूर परकीय चलन प्राप्त होते. १९७९-८० मध्ये १५,००० पर्यटकांनी भूतानला भेट दिली व त्यांपासून सु. १० लक्ष अमेरिकी डॉलर एवढे उत्पन्नमिळाले.

संदर्भ :

1. Das, N. The Dragon Country, New Delhi, 1973.

2. Dey, Nundo Lal, The Geographical Dictionary of Ancient and Mediaeval India, New Delhi,1971.

3. Labh, K. India and Bhutan,   New Delhi, 1974.

4. Mehra, G. N. Bhutan: Land of the Peaceful Dragon, New Delhi, 1981.

5.Rustomji N. K. Bhutan: The Dragon Kingdom in the Crisis, Oxford, 1978.

6. Singh, Nagendra, Bhutan : A Kingdom in the Himalayas, New Delhi, 1972.

7. Sircar, D. C. Studies in the Geography of Ancient and Mediaeval India, Delhi, 1960.

चौधरी, वसंत

भूतान 


भूतान

भूतानमधील एक प्रसिद्ध बुद्धमूर्ती राजधानी थिंफू
पारो येथील धनुर्विद्याभ्यास करणारे भूतानी धार्मिक प्रसंगी शिंग वाजवणारे थिंफू येथील लामा