सक्कर : सक्खर. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र व याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,९०,५५१ (१९८१). हे सिंधू नदीच्या उजव्या (पश्र्चिम) काठावर, देशातील उष्ण व वाळवंटी भागात, कराचीच्या ईशान्येस सु. ३९० किमी.वर वसले आहे. देशातील वायव्य लोहमार्गावरील हे प्रमुख मध्यवर्ती स्थानक असून कराची, मुलतान, क्वेट्टा व अन्य महत्त्वाच्या शहरांशी ते लोहमार्ग व महामार्गांनी जोडलेले आहे. सिंधू नदीवरील लॅन्सडाउन या येथील पुलामुळे देशाच्या पूर्व व पश्र्चिम भागांतील वाहतूक सुलभ झाली आहे. अफगाणिस्तानशी होणाऱ्या व्यापार मार्गावरील हे महत्त्वाचे स्थानक मानले जाते.

रोहरी व सक्कर यांदरम्यानच्या नदीपात्रातील मोक्याच्या बेटावर बक्खर या प्राचीन दगडी किल्ल्याचे अवशेष आहेत. लॅन्सडाउन पुलाच्या बांध-कामासाठी या बेटावरील दगडांचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात आला होता. सक्करच्या पूर्वेस जवळच सिंधच्या हिंदू राजांच्या ॲरोर या राजधानीचे अवशेष आढळतात. इ. स. ७१२ मध्ये मुसलमानांनी हे ठिकाण आपल्या ताब्यात घेतले होते. सक्करच्या जुन्या भागात काही ऐतिहासिक कबरी व मशिदी असून त्यांपैकी ‘ मीर मसुम शाह मिनरेट ’ (इ. स. १६०७) प्रसिद्ध आहे. नवीन शहर नदीकाठावरील चुनखडकयुक्त कमी उंचीच्या कटकांवर विस्तारलेले असून ते ब्रिटिश काळात वसविण्यात आले आहे. ब्रिटिशांनी येथे सैन्यासाठी वसाहत केली होती. १८६२ साली येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. स्थानिक उदयोगांना चालना मिळावी म्हणून १९५० मध्ये ‘ सक्कर इंडस्ट्रिअल ट्रेडिंग इस्टेट ’ ची स्थापना करण्यात आली. येथे सिमेंट, सिगारेटी, रबर, कापड, तयार कपडे, धातू , रसायने यांच्या निर्मितीचे कारखाने असून लोकर, कातडी कमाविणे, अभियांत्रिकी, रेशीमकाम इ. उदयोग चालतात. शहरात सिंध विदयापीठाशी सलग्न असलेली अनेक शासकीय महाविदयालये आहेत.

अत्यंत कमी पर्जन्यामुळे (वार्षिक सरासरी १२.५ सेंमी.) या भागात वेळोवेळी पडणाऱ्या दुष्काळांवर उपाय म्हणून ब्रिटिश काळात, सक्कर येथे सिंधू नदीवरील लॉईड बंधाऱ्याची (सक्कर बंधारा) योजना आखण्यात आली. ही जगातील मोठया जलसिंचन योजनांपैकी एक आहे. तीनुसार सक्कर निदरीजवळच १९२३-३२ या कालावधीत १.६ किमी. लांबीचा, १८ मी. रूंदीच्या ६६ कमानी व ५० टनी दरवाजांचा बंधारा बांधण्यात आला. उपकालव्यांसह एकूण सु. ९,८६६ किमी. लांबीचे कालवे काढून २०,००० चौ. किमी. क्षेत्र जलसिंचनाखाली आणण्यात आले असून काही वर्षांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहकार्याने या बंधाऱ्याच्या नियंत्रकांची दुरूस्ती करण्यात आली आहे. या योजनेमुळे वाळवंटी-ओसाड भागही सिंचनाखाली आला आहे.

कुंभारगावकर, य. रा. चौंडे, मा. ल.