दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक : (रिपब्लिक ऑफ साउथ आफ्रिका किंवा रिपब्लिक व्हान सुईद आफ्रिका). आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाकडील सार्वभौम प्रजासत्ताक देश. विस्तार २२° द. ते ३४° ५२ द. व १६° २९ पू. ते ३२° ५६ पू. यांदरम्यान असून एकूण क्षेत्रफळ १२,२१,०४२ चौ. किमी. आहे. लोकसंख्या २ कोटी ४० लाख (१९७४). याच्या पूर्वेस हिंदी महासागर पश्चिमेस अटलांटिक महासागर असून दक्षिणेस हे दोन्ही महासागर एकमेकांत मिसळून गेले आहेत. वायव्येस नामिबिया (नैर्ऋत्य आफ्रिका), उत्तरेस बोट्‌स्वाना व ऱ्‍होडेशिया तर ईशान्येस मोझँबीक व  स्वाझीलँड हे देश आहेत. क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या अडीचपट असून लोकसंख्या महाराष्ट्राच्या निम्यापेक्षाही कमी आहे. कारभाराच्या सोईसाठी केप प्रांत (क्षेत्रफळ ७,२१,००४ चौ. किमी.), नाताळ (८६,९६७ चौ. किमी.), ट्रान्सव्हाल (२,८३,९१८ चौ. किमी.) व ऑरेंज फ्री स्टेट (१,२९,१५३ चौ. किमी.) या प्रांतात देश विभागला असून केपटाउनच्या आग्नेयीस १,९२० किमी. अंतरावरील प्रिन्स एडवर्ड व मॅरीअन बेटावर १९४७ पासून या देशाची सत्ता आहे. शिवाय १८८४ पासून जर्मनांच्या ताब्यात असलेला वायव्येचा नामिबिया (नैर्ऋत्य आफ्रिका) हा प्रदेश १९१७ साली राष्ट्रसंघाने विश्वस्त प्रदेश म्हणून द. आफ्रिकेकडे सुपूर्द केला. त्याचे क्षेत्रफळ ८,२३,१४५ चौ. किमी. असून लोकसंख्या ७,४६,३२८ (१९७०) आहे. तसेच वाल्व्हिस बे या १,१२४ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या भागाचाही यात अंतर्भाव होतो. देशाच्या तीन राजधान्या पुढीलप्रमाणे आहेत : केपटाउन–संसदीय, प्रिटोरिया–प्रशासकीय व ब्लूमफाँटेन–न्यायिक.

भूवर्णन : हा संपूर्ण देश पठारी असून देशाची सरासरी उंची स. स. १,२०० ते १,५०० मी. आहे. सर्वांत जास्त उंची पूर्व किनाऱ्यास समांतर पसरलेल्या ड्रेकन्सबर्ग (क्वाथलंबा) पर्वतामध्ये आहे. हा पर्वत ३,३५३ मी. पेक्षा जास्त उंच असून तबाना एंतलेनयाना हे सर्वोच्च शिखर ३,४८२ मी. उंच आहे. माँटोसूर्स हे शिखर त्या खालोखाल ३,२९९ मी. उंच आहे. हा पर्वत सह्याद्रीप्रमाणे प्रचंड लाव्हाच्या थरांमुळे बनला आहे. येथून पश्चिमेस व वायव्येस उंची कमी होत जाते, पण पठाराची कड द. आफ्रिकेच्या किनाऱ्यास सर्वत्र समांतर आहे. पश्चिमेस पठाराची उंची १,८०० मी. पर्यंत कमी होते. उत्तर-मध्य बाजूस असलेला कालाहारीच्या वाळवंटी खोऱ्याचा काही सखल भाग या देशात येतो. अंतर्भागीय जलप्रणाली असून मध्यभागी खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. वाहून आणलेल्या वाळूचे येथे फार मोठे संचयन आहे. दक्षिणेस पठाराची कड व समुद्रकिनाऱ्यामध्ये पायऱ्यांचे मंच आढळतात. विशेषतः दोन पायऱ्या स्पष्ट दिसतात. यांनाच ग्रेट कारू व लिटल कारू म्हणतात. या भागात ५,००० मी. पेक्षाही जास्त जाडीचे सागरजन्य गाळाचे खडक आहेत. कंपासबर्ग व विंटरबेर्ख या लहान डोंगररांगा या भागात आहेत. किनाऱ्याचे मैदान हे बरेच अरुंद व उंचसखल आहे. पूर्व किनाऱ्यावर नाताळ प्रांताचे मैदान आहे तर पश्चिम किनाऱ्यावर ५० ते १२० किमी. रुंदीचे नामिब वाळवंट आहे. भारताप्रमाणेच या देशाच्या किनारपट्‌ट्या सलग असल्याने नैसर्गिक बंदरेही फार थोडी आहेत. अगदी दक्षिण टोकास किनाऱ्यावरील डोंगररांगांनी केप अगुल्हास व केप ऑफ गुड होप ही भूशिरे निर्माण झाली आहेत. देशाची जलप्रणाली पठारकड्याने व ड्रेकन्सबर्ग पर्वताने प्रभावित झाली आहे. अंतर्भागातील जलप्रवाहात ड्रेकन्सबर्ग पर्वतात उगम पावणारी व पश्चिमवाहिनी ऑरेंज नदी सर्वांत मोठी आहे. (लांबी २,१७६ किमी.). व्हाल व कॅलेडॉन या तिच्या उपनद्या असून अपिंग्टनच्या पुढे ही नदी नामिबियाच्या सरहद्दीवरून वाहते. निमओसाड प्रदेशातून वाहणाऱ्या या नदीने खोल घळ्या निर्माण केल्या असून उन्हाळ्यात पाणी बरेच कमी असते. या नदीवर ३० वर्षीय बहुद्देशी योजना सुरू करण्यात आली आहे. लिंपोपो ही १,७७० किमी. लांबीची दुसरी मोठी नदी असून ती ड्रेकन्सबर्गच्या वायव्य उतारावर उगम पावून ईशान्येस बोट्‌स्वाना, ऱ्होडेशिया आणि द. आफ्रिका यांच्या सीमेवरून वाहून पुढे मोझँबीकमधून हिंदी महासागरास मिळते. पूर्व किनाऱ्यावर ड्रेकन्सबर्गमध्ये उगम पावणाऱ्या व इतर भागांत पठारकड्यावर उगम पावणाऱ्या नद्या कोकणातील नद्यांप्रमाणे आखूड व वेगवान असून त्यांत तूगेला, उमर्झिव्हूबू, ग्रेट फिश इ. मुख्य आहेत. एकूण जलसंपत्ती मर्यादित आहे.

हवामान : देशाच्या उत्तर भागातून मकरवृत्त गेल्यामुळे फक्त तेवढ्या भागात उष्ण हवामान असते. बाकी सर्व प्रदेश समशीतोष्ण कटिबंधात येतो. उन्हाळ्यातील तपमान २१° ते २४° से. पर्यंत असते. हिवाळा उबदार असून तपमान अंतर्गत पठारी प्रदेशात १०° से. तर काही ठिकाणी ४° से. असते. उन्हाळ्यात पश्चिम भाग कोरडाच असतो, पण तप्त अंतर्भागामुळे पूर्ववारे समुद्रावरून इकडे खेचले जातात व पूर्व किनाऱ्यावरील डोंगरांच्या अडथळ्यामुळे पूर्वेस नाताळ प्रांतात १५० सेंमी. पेक्षा जास्त पाऊस पडतो, पण पश्चिमेस ड्रेकन्सबर्ग पर्वतामुळे पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण झाला आहे.

देशाच्या बऱ्याच भागात उन्हाळ्यात पाऊस पडतो परंतु पश्चिम किनारपट्टी हिवाळी पावसाचा प्रदेश आहे, तर द. किनारपट्टीत दोन्ही ऋतूंत पाऊस पडतो. पावसाचे सरासरी प्रमाण ४४ सेंमी असले तरी प्रत्यक्ष वितरणात ठिकठिकाणी फार तफावत आढळते. नाताळ किनारपट्टी आणि ड्रेकन्सबर्ग पर्वतीय प्रदेश हा देशातला सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश असून येथे पावसाची सरासरी १५० सेंमी.हून जास्त आहे. उलट नैर्ऋत्येकडील कारू भागात १५ सेंमी.हूनही कमी पाऊस पडतो. अंतर्गत पठारी भागात साधारणतः २० ते ७५ सेंमी. पर्जन्यमान असते. एकंदरीत देशाच्या ३० टक्के भागात पावसाचे सरासरी प्रमाण २५ सेंमी.हून कमीच असते. त्याचप्रमाणे बऱ्याच मोठ्या भागात पाऊस अनिश्चित असतो. परिणामतः अशा भागात प्रदीर्घकालीन अवर्षणावस्था आढळते. उदा., १९६० ते १९६६ ही सहा वर्षे या भागात सतत दुष्काळी परिस्थिती होती.


वनस्पती : पर्यावरणीय भेदांमुळे या देशात वन व पशुसंपदेत बरीच विविधता व विपुलता आहे. जगातील २०० प्रमुख वनस्पतिसमूहांपैकी १४० वनस्पतींच्या जाती या देशात असून त्यात १,६०० चे वर उपजाती आढळतात. गवताचे ५०० वर प्रकार येथे असून पूर्वेकडील उंच पठारी भाग देशातला सर्वोत्तम गवताळ प्रदेश मानला जातो. उंचीनुसार यात ‘हाय व्हेल्ड’ व ‘लो व्हेल्ड’ हे भाग आहेत. पश्चिमेकडील कारू भागात कारी जातीची अर्धा ते एक मी. उंचीची मरूस्थली झाडे व झुडुपे आढळतात. नैर्ऋत्य भागात भूमध्य सामुद्रिक हवामानात आढळणारी माकी नामक वनस्पती आहे. याखेरीज शासकीय वनसंवर्धन धोरणानुसार सु. ४२ लाख एकरांत यूरोप व ऑस्ट्रेलियातून आणलेल्या वॅटलसारख्या झाडांचीही लागवड केली आहे.

देशाची १२·५ लाख हेक्टर जमीन जंगलाखाली आहे पैकी १० लाख हेक्टरमध्ये पाइन, डिंक किंवा वॅटलसारखी झाडे मुद्दाम लावण्यात आली आहेत. दर वर्षी ८·५ कोटी घ.मी. लाकडाचे उत्पादन होते व ते मुख्यतः स्थानिक गरजांसाठीच वापरले जाते. या उद्योगात एक लाख लोक गुंतले आहेत.

प्राणी : पशुसंपदेत मुख्यतः मुंगीभक्षक अस्वलासारखा प्राणी, चित्ता, वाघ, कोल्हा, सिंह, गेंडा, हत्ती, हिप्पोपोटॅमस, अनेक प्रकारचे काळवीट व रानरेडे आदींचा समावेश होतो. देशात अनेक विस्तीर्ण अभयारण्यांतून हत्ती व चित्ते यांचे कळप त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणात ठेवले आहेत. अद्दो राष्ट्रीय उद्यान हत्तींसाठी तर बॉटेबाक राष्ट्रीय उद्यान चित्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. याखेरीज ९०० हून अधिक प्रकारचे पक्षी, २०० प्रकारचे सर्प, ४०,००० प्रकारचे किटाणू व १,८०० प्रकारचे मासे ही या देशाची अन्य पशुसंपदा होय.

इतिहास : बुशमेन, हॉटेंटॉट हे जरी या देशातले मूळ रहिवासी असले तरी देशाचा अधिकृत असा इतिहास पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून उपलब्ध होऊ लागला. या सुमारास पहिले रहिवासी म्हणजे पोर्तुगीज व्यापारी. बार्थोलोम्यू डीअश नामक पोर्तुगीज खलाशाने द. आफ्रिकेच्या टोकाकडील केप ऑफ गुड होप भूशिराचा सर्वप्रथम शोध लावला. भारताबरोबर व्यापार करण्याच्या मार्गावरील एक ठाणे म्हणून १६४१ साली डचांनी केप येथे एक किल्ला बांधला. डच ईस्ट इंडिया कंपनीने या प्रदेशात १६५२ मध्ये वसाहत करण्यास सुरुवात केली. व्हान रीबेक हा डच सरकारतर्फे द. आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील टेबल बे येथे वसाहतीसाठी आला. याप्रमाणे १७९५ पर्यंत फक्त १५,००० डच लोक द. आफ्रिकेत स्थायिक झाले. यांपैकी अधिकांश कंपनीच्या चाकरीतून निवृत्त झालेले अधिकारी होते. पुढे फ्रेंच ह्युजेनॉट्‌स, जर्मन आणि मलाया, मोझँबीक व पूर्व आणि पश्चिम आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांची भर पडली. केप प्रदेशाची हवा चांगली व भूमीही सुपीक आणि विस्तीर्ण म्हणून डच व जर्मन शेतकऱ्यांनी येथे वसाहत करून यूरोपप्रमाणे येथे गहू, लिंबू जातीची फळे, द्राक्षे इ. पिके घेण्यास आरंभ केला. हॉटेंटॉट लोकांकडून गुरे मिळविली, स्पेनमधून मरीनो जातीच्या मेंढ्या मागविल्या व मेंढपाळीत लक्ष घातले. अशा प्रकारे गुजराण करीत यांच्या वसाहतींचा विस्तार पूर्वेकडे व उत्तरेकडे वाढला. या डच व जर्मन वसाहतवाल्यांचे वंशज म्हणजे आफ्रिकानेर लोक. पुढे अठराव्या शतकात पूर्वेकडील सागरस्वामित्वाच्या स्पर्धेत ब्रिटिश लोकही उतरले व त्यांनी भारताच्या मार्गावरील मोक्याचे ठाणे म्हणून १८०६ साली केपटाउन काबीज केले. पाठोपाठ इंग्रज वसाहतवाले व प्रशासक आले. इंग्रज मळेवाल्यांनी पूर्व किनाऱ्यावर नाताळ भागात उसाची शेती सुरू केली. यासाठी मजूर म्हणून यांनी शेकडो भारतीयांना जवळजवळ सक्तीने तिकडे नेले. ब्रिटिशांच्या या हालचालींमुळे डच वसाहतवाले (बोअर लोक) हवालदिल झाले. ब्रिटिशांचे आणखी वर्चस्व टाळण्यासाठी या बोअर लोकांनी १८३६ साली त्यांच्या मूळ स्थानापासून पूर्वेकडे पठारी भागात स्थानांतर केले. ही घटना द. आफ्रिकेच्या इतिहासात ‘महाप्रस्थान’ या नावाने ओळखली जाते. आफ्रिकानेर (बोअर) व इंग्रज यांच्यातील झगड्यांमुळे या सुमारास द. आफ्रिकेत व्हाल नदीच्या उत्तरेस व दक्षिणेस ट्रान्सव्हाल व ऑरेंज फ्री स्टेट अशी दोन डच (बोअर) प्रजासत्ताक राज्ये अस्तित्वात आली. ब्रिटिशांनी १८४३ मध्ये नाताळ या ईशान्येकडील राज्यात आपला अंमल जाहीर केला. १८६४ पर्यंत बोअर लोकांचे स्वातंत्र्य व अलिप्तता कशीबशी टिकाव धरू शकली. तथापि नंतरच्या काळात मौल्यवान खनिजांच्या शोधांमुळे या भागात पुनः संघर्ष निर्माण झाले. १८६७ मध्ये किंबर्लीनजीक हिऱ्यांचा शोध व १८८६ मध्ये दक्षिण ट्रान्सव्हालनजीक लागलेला सोन्याचा शोध यांमुळे या देशाच्या इतिहासास वेगळे वळण लागले. वेगवेगळ्या भागांतून अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या आशेने हजारो लोकांनी या प्रदेशाकडे धाव घेतली. यातून संघर्ष वाढू लागले. सोने काढण्यासाठी लागणारे भांडवल व कुशल कामगार यांची बोअर लोकांकडून वाण असल्याने ब्रिटिश भांडवल व कामगार आपल्या प्रदेशात येऊ देणे भाग पडले. यासाठी ब्रिटिशांना भरमसाठ कर भरावा लागे. तसेच त्यांना या प्रदेशाचे नागरिकत्वही नाकारण्यात आले. ही व्यवस्था फार काळ टिकू शकली नाही. अखेर तिचे पर्यवसान ऐतिहासिक बोअर युद्धात झाले. युद्धाची समाप्ती हेरीनिनिंग तहान्वये झाली व १९१० साली ब्रिटिश साम्राज्यान्तर्गत द. आफ्रिका संघराज्य निर्माण झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर राजकीय परिस्थिती पालटू लागली. आफ्रिकेतील अनेक देश स्वतंत्र होऊ लागले व द. आफ्रिकेच्या वर्णद्वेषी धोरणावर टीका होऊ लागली. इंग्लंड व द. आफ्रिका यांचे मतभेद होऊ लागले व त्यामुळे द. आफ्रिका सार्वभौम प्रजासत्ताक बनवून ‘ब्रिटिश कॉमन वेल्थ’ मधून बाहेर पडावे असा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार ५ ऑक्टोबर १९६० रोजी देशात सार्वमत (फक्त गोऱ्यांचे) घेण्यात आले. १६,३४,२४० मतदान झाले. त्यापैकी ८,५०,४५८ लोकांनी प्रजासत्ताकाच्या बाजूने तर ७,७५,८७८ लोकांनी विरोधी मतदान केले. अशा प्रकारे अल्पशा बहुमताने हा देश ३१ मे १९६१ रोजी प्रजासत्ताक बनला आणि ‘ब्रिटिश कॉमन वेल्थ’ मधून बाहेर पडला. त्यानंतर वर्णद्वेषी धोरण अधिकच प्रखर झाले.


राजकीय स्थिती : द. आफ्रिका पहिल्या जागतिक युद्धात ब्रिटिशांचे बाजूने जर्मनीविरूद्ध लढला म्हणून युद्धांनंतर लीग ऑफ नेशन्सने आफ्रिका खंडातील पूर्वीचे जर्मनीच्या संरक्षणाखाली असलेले नैर्ऋत्य आफ्रिका (नामिबिया) हे राज्य या देशास बहाल केले. १९६६ साली संयुक्त राष्ट्र संघटनेने ही मुखत्यारी द. आफ्रिका संघराज्याकडून काढून टाकण्याच्या बाजूने मतदान केले. परंतु हे कृत्य या देशाने बेकायदेशीर ठरवून संयुक्त राष्ट्र संघटनेचे मतदान धुडकावून लावले असून नैर्ऋत्य आफ्रिकेचा कारभार द. आफ्रिका हा देशच पाहत असतो. 

१९४८ साली डॉ. मालन हा राष्ट्रीय पक्षाचा पंतप्रधान सत्तेवर येताच त्याने श्वेतवर्णीयांच्या श्रेष्ठत्वावर आधारित वर्णविद्वेषाच्या धोरणाचा जोमाने पाठपुरावा आरंभिला. १९५८ साली व्हेरवुर्ड पंतप्रधान झाल्यावर वर्णविद्वेष आणि वर्णानुसार प्रादेशिक पृथकता या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने (जागतिक मताची यत्किंचितही तमा न बाळगता) कायदेकानून करून देशातील चार वांशिक गटांचे आपापसातील सामाजिक संबंध येऊ न देण्याच्या दृष्टीने गौरेतरांवर कडक निर्बंध लादण्यात आले. आफ्रिकनांच्या स्वतंत्र वसाहती ग्रामीण भागात वसविण्यात येत आहेत. तथापि शहरात कारखान्यांतून हलक्या कामांसाठी आफ्रिकन मजूर वापरण्यात येतात. त्यांच्याही उपनगरांत स्वतंत्र वसाहती उभारलेल्या आहेत. घरगडी म्हणून गोऱ्यांच्या वस्तीत ज्या आफ्रिकनांस राहावे लागते त्यांना आपल्या बायकामुलांना तेथे कधीच आणता येत नाही. सत्तारूढ राष्ट्रीय पक्षाची धारणा अशी की, आफ्रिकन लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे विकास साधण्यासाठी देशात विशिष्ट क्षेत्रात आफ्रिकन लोकांच्या वसाहती स्थापल्याने कार्यभाग सफल होईल. परंतु जून १९७६ मध्ये सोवेटो येथे जी तीव्र दंगल झाली त्यावरून सरकारचे हे धोरण किती निरुपयोगी व आत्मघातकी आहे हे स्पष्ट झाले.

देशाचा कारभार संसदीय पद्धतीने चालतो. अध्यक्ष, सीनेट आणि हाउस ऑफ असेंब्ली मिळून संसद बनते. अध्यक्ष हा प्रजासत्ताकाचा प्रमुख असून सीनेट व असेंब्लीसचे सभासद एकत्रितपणे त्याची सात वर्षांच्या काळासाठी निवड करतात. सीनेट आणि असेंब्लीच्या सभा बोलावण्याचे, स्थगित करण्याचे किंवा विसर्जित करण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्षांस असून वर्षातून किमान एक तरी बैठक बोलावलीच पाहिजे असे घटनात्मक बंधन आहे. सीनेट हे वरिष्ठ सभागृह असून त्यात ५४ सभासद असतात. पैकी १० जणांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष करतात, तर ४४ सभासदांची ५ प्रांतांतील लोक करतात. सीनेट हा ३० वर्षे वयाचा, द. आफ्रिकेत किमान ५ वर्षे वास्तव्य असणारा, श्वेतवर्णीयच असावा लागतो. असेंब्ली हे कनिष्ठ सभागृह असते. त्याची सभासद संख्या १६६ असून त्यांची केप ऑफ गुड होप, नाताळ, ट्रान्सव्हाल, ऑरेंज फ्री स्टेट व नैर्ऋत्य आफ्रिका ह्या प्रांतांतील किमान १८ वय असणारे श्वेतवर्णीय नागरिक मतदानाने निवड करतात. उमेदवार श्वेतवर्णी नागरिक ३० वर्षांचे वरील वयाचा असावा लागतो. अत्यंत उघड वर्णद्वेषी धोरण असणारा हा देश आहे. नॅशनॅलिस्ट ह्या कट्टर वर्णद्वेषी पक्षाचे सरकार आहे. डॉ. निकोलस डीडेरिक हे राष्ट्राध्यक्ष आहेत. प्रांतामध्ये राष्ट्राध्यक्ष पाच वर्षांसाठी प्रशासक नेमतात. प्रांताचे एक निवडलेल्या सभासदांचे विधिमंडळ असते व त्यातून चार लोकांचे कार्यकारी मंडळ असते. प्रांतिक विधिमंडळाने पास केलेला ठराव राष्ट्राध्यक्ष फेटाळू शकतात. येथेही फक्त श्वेतवर्णीयच सहभागी होऊ शकतात.

बांटू व अन्य वर्णीयांचे प्रशासन : वर्णविद्वेष हे देशाचे राष्ट्रीय धोरण असल्याने भिन्न वर्णीयांसाठी स्वतंत्र शासन व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. १९५१ सालच्या ‘बांटू ऑथॉरिटिज ॲक्ट’ या कायद्यान्वये बांटूंना काही प्रशासकीय, कार्यकारी व न्यायविषयक अधिकार देण्यात आले. १९५९ मध्ये ‘प्रमोशन ऑफ बांटू सेल्फ–गव्हर्नमेंट’ कायदा झाला व त्या अन्वये प्रमुख वांशिक गटांना काही प्रशासकीय सवलती देण्यात आल्या व त्यानुसार प्रत्येक गटासाठी स्वतंत्र कमिशनर जनरल नेमून वांशिक गटाचे स्वयंशासन सुरू करण्यात आले. सिस्केई, त्सवाना, लेबोवा, मचांगाना, वेंदा, साउथ सोथो व झुलू टेरिटोरियल ऑथॉरिटी या काही वांशिक गटांना अल्प स्वयंशासन देण्यात आले असून त्यांपैकी ट्रान्सकेई हे पहिले स्वयंशासन पूर्ण करणारे राज्य बनले आहे (१९६३). इतर गटांस स्वतंत्र कायदेमंडळे देण्यात आली आहेत. ऑक्टोबर १९७६ मध्ये ट्रान्सकेई हे संपूर्ण स्वतंत्र झाल्याची घोषणा द. आफ्रिकेने केली आहे. हा प्रदेश झोसा लोकांचा असून त्याचे क्षेत्रफळ ४१, ००२ चौ. किमी. आणि लोकसंख्या १७,५१,१४२ (१९७०) आहे. ट्रान्सकेई येथे १९६३ मध्ये व १९७३ मध्ये दोन निवडणुका झाल्या असून ट्रान्सकेई नॅशनल इंडिपेंडन्स पार्टीचे नेते कैसर मातान्झिमा हे आहेत आणि त्यांचा वर्णभेदी धोरणास पाठिंबा आहे.ट्रान्सकेईचे स्वातंत्र्य थोतांड आहे असे अन्य आफ्रिकी देशांचे मत आहे. मिश्रवर्णीय आणि भारतीय लोकांसाठी स्वतंत्र प्रतिनिधी मंडळे आहेत.


न्याय : रोमन–डच तत्त्वांवर आधारित न्यायतत्त्वे मुख्यतः येथे वापरात आहेत. व्यापार, जहाजवाहतूक इत्यादींबाबत ब्रिटीश कायदा ग्राह्य आहे पण व्यक्तिगत बाबींमध्ये तसेच मालमत्ता व वारसा करार यांत रोमन–डच कायदाच मार्गदर्शक आहे. सुप्रीम कोर्ट हे देशाचे सर्वोच्च न्यायालय असून त्याचे दोन भाग आहेत : (अ) अपेलेट डिव्हिजन हा भाग प्रमुख न्यायाधीश व राष्ट्राध्यक्ष विवक्षित खटल्यासाठी नेमतील तेवढे न्यायाधीश मिळून बनतो. हे देशाचे सर्वोच्च न्यायपीठ होय पण त्याची निर्मिती व कार्यक्षेत्र आवश्यक त्यावेळीच ठरविली जाते. घटनात्मक व सर्व तऱ्हेची अपिले येथे चालतात. (आ) प्रॉव्हिन्शिअल डिव्हिजिन्स हे सुप्रीम कोर्टाचेच भाग असून ते सर्व प्रांतांमध्ये आहेत. केप प्रांतात तीन आहेत. येथे खटले नव्याने चालू शकतात तसेच अपिलेसुद्धा चालतात. ट्रान्सव्हाल व नाताळ प्रांतांतही सुप्रीम कोर्टाच्या स्थानिक शाखा आहेत. न्यायाधीश ७० वर्षे वयापर्यंत अधिकारावर राहू शकतो आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मागणी केल्यानंतर केवळ राष्ट्राध्यक्षच त्याला काढू शकतो. यांशिवाय स्थानिक पातळीवर मॅजिस्टेटची न्यायालये असून त्यांस मर्यादित प्रमाणातच शिक्षा देता येते. कृष्णवर्णीयांसाठी बांटू अपील न्यायालय व तीन बांटू घटस्फोट न्यायालये आहेत. शिवाय बांटू आयुक्तांना न्यायदानाचे काही अधिकार आहेत व काही टोळीप्रमुखांसही टोळीतील कलहामध्ये न्याय देण्याचा अधिकार आहे.

संरक्षण : अंतर्गत संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा असून वर्णभेदी धोरणानुसार गौरवर्णीय, कृष्णवर्णीय, भारतीय व मिश्रवर्णीय लोकांची स्वतंत्र पोलीसदले आहेत.

बाह्य संरक्षणासाठी व आणीबाणीच्या वेळी अंतर्गत संरक्षणासाठी देश नऊ संरक्षण विभागांत विभागलेला आहे. संरक्षणदले पर्मनंट फोर्स, सिटिझन फोर्स व कमांडो यांत विभागलेली आहेत. पर्मनंट फोर्स यात कायम स्वरूपाचे अधिकारी व सैनिक, भूदल, नौदल व विमानदल यांतील लोक असतात व शांततेच्या काळात संपूर्ण संरक्षणदल प्रशिक्षित करण्याची जबाबदारी या विभागाची असते. युद्धाच्या वेळी मात्र हे दल सिटिझन फोर्समध्ये समाविष्ट होते. पर्मनंट फोर्स आणि सिटिझन फोर्समध्ये तिन्ही दले असतात, तर कमांडो दल मुख्यतः भू व वायूदलातील लोक मिळून बनते. १८ ते ६५ वयापर्यंतच्या प्रत्येकास युद्धकाळात लष्करी सेवा सक्तीची आहे. १६ ते २५ वयाच्या लोकांस शांततेच्या काळात लष्करी प्रशिक्षण सक्तीचे आहे. कमांडोत ते अधूनमधून असे १६ वर्षे व सिटिझन फोर्समध्ये प्रथम एक वर्ष आणि नंतर अधूनमधून नऊ वर्षे असते. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ देशात निवास करणाऱ्या परदेशी व्यक्तीसही लष्करी सेवा सक्तीची आहे. भूदलाचे नऊ विभाग आहेत. ७,००० कायम सैनिक व ६०,००० सिटिझन फोर्सचे सैनिक आहेत.

नौदलाची मुख्य कचेरी सायमन्झटाउन येथे असून नौदलात ३ पाणबुड्या, २ विनाशिका, ३ पाणबुडी विरोधी फ्रिगेट्‌स, ४ अन्य फ्रिग्रेट्‌स, १० सुरूंगकाढी व शिवाय अन्य जहाजे होती. नौदलात १९७५ साली ४७५ अधिकारी व ३,७२९ अन्य नौसैनिक होते. विमानदलात हल्ला, वाहतूक, सागरी इ. अनेक भाग असून कॅनबेरा, मिराज, सेबरजेट्‌स, व्हापकाऊंट, व्हँपायर व सी–१३० वाहतूक विमानांनी विमानदल सुसज्ज आहे. हेलीकॉप्टर विभागातही अनेक प्रकारची हेलीकॉप्टर्स असून त्यामध्ये अल्यूएट, ल्यूना, वॅस्प व सुपर फ्रेलॉन ही प्रमुख आहेत. विमानदलात एकूण ५,००० कायम अधिकारी व सैनिक आणि ३,००० सिटिझन फोर्स सैनिक आहेत.

आर्थिक स्थिती : हा देश आफ्रिका खंडात सर्वाधिक संपन्न असून खनिजे विशेषतः सोने, लोकर यांच्या निर्यातीमुळे त्याची अर्थव्यवस्था विकसित झाली आहे. १९६४ साली एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १२·५ टक्के उत्पन्न खाण उत्पादनाचे होते परंतु सध्या राष्ट्रीय उत्पन्नात उद्योगधंद्यांचा मोठा वाटा असून त्याखालोखाल शेती, व्यापार व शेवटी खाणी असा क्रम लागतो.

या देशातल्या श्वेतवर्णीयांचे राहणीमान आफ्रिका खंडात सर्वांत वरच्या दर्जाचे आहे. दुसऱ्या जागतिक युद्धानंतर आर्थिक स्थितीत फार सुधारणा झाली असून उत्पादनबाबतीत या देशाने नवे उच्चांक केले आहेत.


कृषी : पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विशेषतः जमिनीचा उंचसखलपणा व हवामान यांमुळे देशाचे कृषिक्षेत्र फार मर्यादित आहे. एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १५ टक्के जमीन लागवडीखाली आहे. पाण्याचा अपुरा पुरवठा ही प्रमुख समस्या असल्यामुळे देशात पाण्याचा वापर व नियंत्रण १९५६ च्या जलकायद्यानुसार होते. पाणी पुरवठ्याच्या सोयी विशेष नाहीत. १९६६ साली ऑरेंज नदी प्रकल्पास आरंभ झाला असून हा प्रकल्प ३० वर्षांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पानुसार नदीवर ३ मोठी धरणे, ९ किमी. लांबीचा बोगदा, काही कालवे आणि २० जलविद्युत्‌ केंद्रे बांधण्यात येतील. त्यांपैकी एक प्रमुख धरण हेंड्रिक व्हेरवुर्ड बांधून पूर्ण झाले आहे.

लागवडीखालील जमिनीपैकी ७० टक्के क्षेत्रात मका घेण्यात येतो. अन्यत्र गहू, भाजीपाला इ. पिके घेतात. ही जीवनावश्यक शेती मुख्यतः बांटू लोक करतात. श्वेतवर्णीयांचा भर नगदी पिकांवर असून ते तंबाखू, भुईमूग, कापूस इ. पिके काढतात. मका किंवा तंबाखूचे पीक घेण्याऐवजी कापसाचे पीक काढण्यास सध्या शेतकरी उद्युक्त झाले आहेत. कृषी व्यवस्थेत फलोत्पादनास विशेष स्थान असून हा देश जगातील एक प्रमुख फलोत्पादक गणला जातो. संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षे, सफरचंद, केळी, अननस, आंबा, पेरू, पपई इ. विविध प्रकारची फळे देशात होतात व ती मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात करतात. या देशाच्या फलोत्पादनास महत्त्व म्हणजे यूरोपीय देशांत हिवाळ्यात जेव्हा फळांची कमतरता असते त्यावेळी येथे फळे विक्रीसाठी तयार झालेली असतात. १९७४ साली प्रमुख पिकांचे उत्पादन पुढीलप्रमाणे होते : मका १ कोटी १० लाख मे टन, गहू १६ लाख मे. टन, भुईमूग २·८ लाख मे. टन, कापूस ३८,००० टन, ऊस १ कोटी ७२ लाख टन, बटाटे ६ लाख टन, ओट १ लाख ३ हजार टन, फळे १२ लाख ६१ हजार टन.

१९७३–७४ मध्ये १,०६,००,००० गुरे ३,१०,००,००० मेंढ्या ४१,००,००० शेळ्या १०,५०,००० डुकरे २,३०,००० घोडे १,२६,५०,००० कोंबड्या होत्या. मेंढ्या बहुशः लोकरीसाठी पाळतात. ८० टक्के मेंढ्या मरीनो जातीच्या असून त्यांच्यापासून उत्कृष्ट लोकर मिळते. १९७४ साली देशात चीज २ लाख टन, लोणी ३,२५,००० टन व गायीचे दूध ३२ लाख टन, संघनित व बाष्पीकृत दूध ४ लाख ५० हजार टन, लोकर १० लाख ४४ हजार टन इ. उत्पादन झाले.

उद्योग : द. आफ्रिका प्रजासत्ताक उद्योगधंद्यांचे दृष्टीने आफ्रिका खंडात अग्रेसर असून सोने व इतर मौल्यवान खनिजांच्या खाणींमुळे देशाच्या औद्योगिक भरभराटीस चालना मिळाली. उद्योगधंद्यांपासून मिळणारे उत्पादन स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या २२·७ टक्के आहे. सोने व अँटिमनी उत्पादनात जगात या देशाचा पहिला क्रमांक असून क्रोम व मँगॅनीज उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. पोलाद, मोटारी, कोळसा आणि निकेल उत्पादनामध्ये हा देश आफ्रिका खंडात अग्रेसर आहे. आफ्रिका खंडातील सहाराच्या दक्षिणेकडील देशांपेक्षा याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीस १९२६ साली सरकारप्रणीत विद्युत्‌ पुरवठा मंडळाच्या स्थापनेपासून खरी चालना मिळाली. देशातील महत्वाचे औद्योगिक प्रदेश म्हणजे जोहॅनिसबर्गलगतचा विट्‌वॉटर्झरँड भाग, केपटाउनलगतचा नैर्ऋत्येकडील भाग, पोर्ट एलिझाबेथ व ईस्ट लंडन आणि नाताळमधील दरबान व कोळसा खाणीचा भाग औद्योगिक मालात लोखंड, पोलाद, अन्नोपयोगी वस्तू, यंत्रे, रसायने, कापड, सिमेंट, कागद व लाकूड लगदा, ॲल्युमिनियम, पादत्राणे, चहा, जहाजे, विमाने इत्यादींचा समावेश होतो. १९७४ मध्ये बांधकाम उद्योगात ४,१०,४०० वाहतूक व दळणवळण उद्योगात २,९७,१६३ आणि घाऊक व्यापारात १,९५,१०० कामगार काम करीत होते तर किरकोळ उद्योगांत २,९८,९०० खाणीमध्ये ६६,४६,००० वस्तुनिर्मिती उद्योगात १३,१६,६०० कामगार होते.

खनिज उत्पादन : जगातील ७७% सोने या देशात निघत असून १९७४ चे उत्पादन ७५ लाख ९४ हजार टन होते. चांदी ९ लाख ३१ हजार टन, लोह १,१७,३४,००० मे. टन, मँगॅनीज ४८,३५,००० मे. टन, ॲस्बेस्टॉस ३,३६,००० मे. टन, हिरे ७४,१०,००० कॅरट, कोळसा ६,५०,१८,००० मे.टन, चुना व चुनखडक १८५ लाख मे. टन असे प्रमुख खनिजांचे उत्पादन होते.


व्यापार : द. आफ्रिका, बोट्‌स्वान, लेसोथो आणि स्वाझीलँड हे आयात–जकात संघाचे सभासद असून आयात–निर्यात एकत्रित होते. १९७१ साली एकूण आयात २८२ कोटी रँड व निर्यात १५४ कोटी रँड इतक्या किंमतीची होती. एकूण विदेश व्यापार तुटीचा होता.

सोने व लोकर ह्या वस्तू देशाच्या निर्यात मालात अग्रगण्य असून अन्य निर्यात मालात हिरे, लोखंड, फळे व भाजीपाला इत्यादींचा समावेश होतो. एकूण निर्यातीपैकी या देशातून २७% ग्रेट ब्रिटनला, १२% जपानला व ८% अमेरिकेस निर्यात होते.

आयात मालात अन्नपदार्थ, पेये, तंबाखू, रसायने, निर्मितीवस्तू, मोटारींचे सुटे भाग, कापड व खनिज तेले इ. पदार्थांचा समावेश असून एकूण आयातीच्या २३% ग्रेट ब्रिटन, १६% अमेरिका व १४% प. जर्मनी या देशांकडून होते.

शिंदे, सु. द. डिसूझा, आ. रे.

अर्थकारण : देशाचे चलन ‘रँड’ हे असून ते फेब्रुवारी १९६१ पासून द. आफ्रिकी पौंडाऐवजी अर्थव्यवहारात आले. देशात दशमान पद्धती १९५९ पासून कार्यवाहीत आली. १०० सेंट = १ रँड असून अर्थव्यवहारात /, १, २ सेंटची काशाची नाणी ५, १०, २० व ५० सेंटची रौप्यनाणी १, २, ५, १० व २० रँडच्या नोटा तसेच १ व २ रँडची सुवर्णनाणी प्रचलित आहेत. डिसेंबर १९७५ मधील विनिमय दर १ स्टर्लिंग पौंड = १·७५ रँड व १ अमेरिकी डॉलर = ८७ सेंट असा होता. द. आफ्रिका प्रजासत्ताकाची वित्तव्यवस्था सुविकसित आहे. ‘साउथ आफ्रिकन रिझर्व्ह बँक’ ही देशाची मध्यवर्ती बँक असून नोट प्रचालनाधिकार व चलनविषयक नीतीच्या कार्यवाहीचे अधिकार तिच्याकडे आहेत. यांशिवाय देशात ९ व्यापारी बँका, १८ सर्वसाधारण बँका, ७ बचत बँका, ५ वित्तप्रबंधक संस्था (कृषी, उद्योग, व्यापार या क्षेत्रांना अर्थसाहाय्य करणाऱ्या संस्था), १० मर्चंट बँका, ३ हुंडीघरे व २ विकास संघटना आहेत. जोहॅनिसबर्ग येथे देशातील एकमेव शेअरबाजार (स्था. १८८७) असून तेथे १,१०० च्या वर कंपन्यांच्या शेअरांची उलाढाल होते. देशात ३६ विमाकंपन्या आहेत. १९७० मध्ये सर्वसाधारणतः केंद्र शासनाचे कर–महसूल प्रमाण हे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या २२ टक्के होते. हे प्रमाण अनेक औद्योगिक देशांच्या मानाने बरेच कमी आहे. प्रत्यक्ष करांमध्ये व्यक्तींवरील प्राप्तिकर, तसेच लाभांश आणि व्याज यांवरील करांचा समावेश होतो. भांडवली नफाकर आकारला जात नाही. व्यवसायांवरील प्रमुख कर म्हणजे प्राप्तिकर आणि अवितरित नफाकर हे होत. एकंदरीत देशातील करभारप्रमाण कमी आहे. १९७३–७४ च्या अर्थसंकल्पातील एकूण महसुली उत्पन्न व एकूण खर्च अनुक्रमे ३४१·२६ कोटी रँड व ४४३·४४ कोटी रँड होते. महसुली उत्पन्न प्रामुख्याने प्राप्तिकर, भांडवली कर, सीमाशुल्क, उत्पादनशुल्क, विक्रीकर, इतर अप्रत्यक्ष कर आणि संकीर्ण यांपासून मिळाले. खर्चाच्या बाबींमध्ये सार्वजनिक कर्जावरील व्याज, उपदाने, सामाजिक सुरक्षा, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, संरक्षण, राज्यानुदाने, इतर चालू खर्च, रेल्वे व बंदरे यांचे बांधकाम, डाक व तारसेवा प्रशासन आणि संकीर्ण यांचा अंतर्भाव होतो. १९७५–७६ च्या अर्थसंकल्पातील महसुली उत्पन्न व खर्च यांचे आकडे अनुक्रमे ५९०·९० कोटी रँड व ५३१·१० कोटी रँड होते. देशातील चलनवाढीचा वेग मोठा व सतत असूनही, १९७५–७६ च्या शासकीय खर्चात सु. १९ टक्क्यांनी वाढ झाली व संरक्षण अणि अधःसंरचना या बाबींवर शासनाला अग्रलक्ष द्यावे लागले. १९७५ च्या अखेरीस निग्रही उपाय अंमलात आणले गेले. त्यांमध्ये उत्पन्ननीती आणि शासनाचे खर्चकपातीचे आश्वासन यांचा अंतर्भाव होता.

गद्रे, वि. रा.


वाहतूक व संदेशवहन : देशात पहिली रेल्वे १८६० साली दरबानपॉइंट या मार्गावर सुरू झाली. १९७१ साली ३०,८४० किमी. रेल्वेमार्ग होते. त्यांपैकी ८,९१२ किमी. रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झाले होते. सर्व रेल्वेमार्ग अरुंदमापीच आहेत. केपटाउन व जोहॅनिसबर्ग यांच्या उपनगरी रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून अन्य मुख्यमार्गी रेल्वेचेही झपाट्याने विद्युतीकरण होत आहे. १९७५ मध्ये सु. ६१ कोटी उतारू व १२ कोटी मे. टन मालाची वाहतूक झाली.

देशात १९७३ साली सु. २,००० किमी. लांबीचे राष्ट्रीय हमरस्ते, ३,२०,००० किमी. प्रांतिक आणि ३,२०,००० किमी. ग्रामीण रस्त्यांपैकी सु. ३८,००० किमी. रस्ते डांबरी होते.

१९७४ मध्ये नवीन व वापरात असलेली वाहने पुढीलप्रमाणे होती : मोटारी– १९,५०,३४७ बसगाड्या– ६४,३२८ व्यापारी वाहने–७,१९,१४८ मोटार सायकली– १,१२,११८.

देशात नौसुलभ नद्या नाहीत. सागरी वाहतूक मर्यादित असून ती ५० विदेशी कंपन्यांमार्फत होत असते. देशात केपटाउन व पोर्ट एलिझाबेथ, दरबान व ईस्ट लंडन ही चार प्रमुख बंदरे आहेत, तर मॉसल बे, पोर्ट नॉलथ, वॉल्व्हिस बे व ल्यूडरिट्‌स ही छोटी बंदरे आहेत. १९७१ मध्ये या सर्व बंदरांस २१,२४१ जहाजांनी भेटी दिल्या व ४·९ कोटी टन मालाची उलाढाल झाली.

साउथ आफ्रिकन एअरवेज ही सरकारी हवाई वाहतूक कंपनी देशात १९३४ पासून सुरू झाली असून ती देशातल्या सर्व प्रमुख शहरांना जोडते. देशात १० प्रमुख व १३ छोटे विमानतळ आहेत. जान स्मट्स–जोहॅनिसबर्ग, डी. एफ्. मालन–केपटाउन व लुई बोथा, दरबान हे प्रमुख विमानतळ आहेत. १९७१–७२ मध्ये साउथ आफ्रिकन एअरवेजने सु. ३९,५२,३७३ उतारूंची व ५६,३०,८०० टन मालाची वाहतूक केली. साउथ आफ्रिकन एअरवेज कंपनी यूरोप, द. अमेरिका, उ. अमेरिका या देशांशीही प्रवासी व मालवाहतूक करते, शिवाय २३ अन्य आंतरराष्ट्रीय विमानकंपन्या द. आफ्रिकेत हवाई वाहतूक करतात.

१९७१ मध्ये ३,८६३ डाक व तार कचेऱ्या होत्या. देशात साउथ आफ्रिकन ब्रॉडकास्टिंग ही निमसरकारी आकाशवाणी यंत्रणा असून त्यात १२ केंद्रांचा अंतर्भाव होतो व यांच्याद्वारे ४ राष्ट्रीय कार्यक्रम इंग्रजी व आफ्रिकान्स भाषांमधून सादर केले जातात. १९७३ साली देशात सु. २३,५०,००० रेडिओ परवानाधारक होते. द. आफ्रिकेत प्रथमच दूरचित्रवाणीची सोय जानेवारी १९७६ मध्ये झाली असून २,५०,००० दूरचित्रवाणी संच होते आणि सु. १० लाख लोक पाहणारे होते. १९७३ साली देशात १७,४५,५४० दूरध्वनी यंत्रे होती. १९७३ मध्ये देशास ६,१०,१७० पर्यटकांनी भेट दिली. त्यांपैकी ५०% पर्यटक आफ्रिका खंडातील, ३३% यूरोप खंडातील, ८% अमेरिकेतील व उर्वरित ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडांतील होते.

देशात एकूण ६०० छापखाने व प्रकाशसंस्था आहेत व जवळजवळ त्या सर्व जोहॅनिसबर्ग, केपटाउन व दरबानच्या आसपास आहेत.

श्वेतवर्णीयांची २२ दैनिके असून त्यांपैकी १४ इंग्रजी भाषिक, ६ आफ्रिकान्स भाषिक आणि २ बांटूंच्या भाषेतील आहेत. दैनिकांखेरीज ४५० हून अधिक इंग्रजी व आफ्रिकान्स भाषेत निघणारी अन्य वृत्तपत्रेही देशात आहेत.


लोक व समाजजीवन : द. आफ्रिका प्रजासत्ताकाची १९७४ मध्ये लोकसंख्या २ कोटी ४० लाख म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मी व वाढीचा दर २·५ टक्के होता. भिन्न वंशीय लोक १९७० च्या जनगणनेप्रमाणे गौरवर्णीय ३७,५१, ३२८ बांटू १,५०,५७,९५२ आशियायी ६,२०,४३६ मिश्रवर्णीय २०,१८,४५३. बांटू लोकांमध्ये झुलू ४० लाख, झोसा ३९ लाख, त्स्वाना १७ लाख, सेपेदी १६ लाख, सेशोइशू १४ लाख अशी विभागणी होती. जोहॅनिसबर्ग हे सर्वांत मोठे शहर व देशातील व्यापार व उद्योगधंद्यांचे प्रमुख केंद्र असून त्याची लोकसंख्या सु. १४,३२,६४३ (१९७०) होती. केपटाउनची वस्ती १० लाख ९० हजार असून ५ लाखांहून अधिक लोकसंख्या असणारी देशातील दुसरी शहरे प्रिटोरिया व पोर्ट एलिझाबेथ ही होत. एक लाखांहून अधिक वस्ती असलेल्या अन्य मोठ्या शहरांत दरबान, जर्मिस्टन, ब्लूमफाँटेन, बनोनी, स्प्रिंग्ज व ईस्ट लंडन यांचा समावेश होतो. देशात निम्म्याहून अधिक नागरी लोकसंख्या असून ती विट्‌वॉटर्झरँड, केपटाउन, दरबान व पोर्ट एलिझाबेथ या शहरातून एकवटलेली आहे. देशाच्या आकारमानाने नागरी लोकसंख्येचे प्रमाण मोठे आहे. सर्वांत दाट लोकवस्ती पूर्व भागांत असून त्यांत बांटू, झुलू, या लोकांचे प्रमाण अधिक आहे. मध्य व पश्चिम भागात सापेक्षतः लोकवस्ती विरळ आहे. पूर्वी येथे बुशमेन हॉटेंटॉट राहत असत.

या देशाचे वांशिक स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे असून विविध वांशिक गटांचे वितरणही असमान आहे. एकूण लोकसंख्येत १९७५ साली चार वांशिक गटांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. बांटू (आफ्रिकन) ७०·२ गोरे १७·५ मिश्रवर्णीय ९·४ व आशियाई २·५. स्थूलमानाने कृष्णवर्णीय लोक जरी बहुसंख्य असले, तरी गोऱ्यांच्या हातीच सर्व संपत्ती उद्योगधंद्यांची मालकी व राजकीय सत्ता केंद्रित झालेली असून त्यांचेच राहणीमान सर्वसाधारणतः चांगले आहे. ऑरेंज फ्री स्टेट या घटक राज्यात गोऱ्यांचे संख्याधिक्य स्पष्ट असून आफ्रिकन किंवा अन्यवर्णीय येथे मुळीच नाहीत. याखालोखाल ट्रान्सव्हाल राज्यातही गोऱ्यांची संख्या अन्यवर्णीयांपेक्षा अधिक आहे. ऑरेंज फ्री स्टेट वगळता अन्य राज्यांत बांटू लोक हा एकूण लोकसंख्येपैकी मोठा गट आहे. गौरवर्णीय लोकही एकजिनसी नाहीत. त्यांमध्ये ब्रिटिश व आफ्रिकानेर (बोअर) असे दोन भाग आहेत. ब्रिटिश गौरवर्णीयांची संख्या ११ लाख १९ हजार आणि आफ्रिकन गौरवर्णीयांची संख्या १७ लाख ९७ हजार होती. शिवाय अल्प प्रमाणात जर्मनी, फ्रान्स इ. देशांतील गोरे लोक आहेत. आफ्रिकन गौरवर्णीय डच लोकांचे वंशज असून मुख्यतः शेती करतात व अधिक कट्टर वर्णद्वेषी आहेत.

देशातील कृष्णवर्णीय (आफ्रिकन) गटात सांस्कृतिक व वांशिक दृष्ट्या फार विविधता असून ते देशाच्या निरनिराळ्या भागांत विखुरलेले आढळतात. ट्रान्सव्हाल भागात त्यांचे प्रमाण मोठे आहे. उत्तर व पूर्व भागात जवळजवळ सर्वच लोक बांटू आहेत. बांटूंमध्ये खोसा (काफीर), झुलू, सोथो, त्स्वाना, त्सोंगा, स्वाझी, व्हेंडिया, बेचूआना, मॅतबीली इ. विविध जाती व जमातींचा समावेश होतो. बांटूंखेरीज स्थानिक आफ्रिकनांत हॉटेंटॉट व बुशमन हेही अंतर्भूत आहेत. जुन्या पारंपरिक जीवनपद्धतीचा त्याग करून हे कृष्णवर्णीय लोक शहरांकडे धाव घेत असून त्यांपैकी अनेक गोऱ्यांच्या शेतावर काम करतात किंवा उद्योगधंद्यात कोणत्याही प्रकारचे काम अत्यल्प वेतनात करण्यास तयार असतात.

अन्य (मिश्र) वर्णीयांमध्ये मलाया आणि आफ्रिकन गुलाम तसेच हॉटेंटॉट व गोरे यांचे वंशज यांचा समावेश असून ते बहुभाषिक आहेत. या लोकांची सर्वांत मोठी वस्ती केपप्रांतात केपटाउन व पोर्ट एलिझाबेथ शहरांत आहे. शेतमजूर वा शहरातून घरगड्यांचे काम व औद्योगिक कामगार म्हणूनही हे लोक काम करतात. यांपैकी तीनचतुर्थांश लोक नागरी असून आफ्रिकान्स ही त्यांची प्रमुख भाषा आहे.

आशियाई हा देशातला सर्वात छोटा वांशिक गट असून तो प्रमुख्याने नाताळ (विशेषतः दरबान) मध्ये आढळतो. या गटातील अनेक लोक सध्या व्यापारी, मळ्याची शेती करणारे, औद्योगिक कामगार व उद्योगपती म्हणून वावरत आहेत. या लोकांना आंतरप्रांतीय स्थानांतर करण्यास मज्जाव असून ऑरेंज फ्री स्टेटमध्ये राहण्यास बंदी आहे. यांपैकी ८७ टक्के लोक हिंदू असून हिंदी, गुजराती व तमिळ भाषिक आहेत.

धर्म : १९७० साली गौरवर्णीयांत १४ लाख नेडरडुईट्‌स कर्कपंथीय त्याखालोखाल अँग्लिकन, मेथडिस्ट, रोमन कॅथलिकपंथीय, अल्प प्रमाणात ज्यू व प्रेसबिटेरियन होते. अन्यवर्णीयांत २७ लाख ६१ हजार बांटू चर्चचे अनुयायी, १७ लाख ९४ हजार मेथडिस्ट, १५ लाख रोमन कॅथलिक व १५ लाख आफ्रिकन चर्चचे अनुयायी होते. ४,२३,१८० हिंदू व २,५४,७८० मुस्लिम होते. उरलेले लोक अनेक ख्रिस्ती पंथांत विभागले होते व ४६ लाख लोकांचा कुठलाच धर्म नोंदविलेला नव्हता.


समाजकल्याण व आरोग्य : देशात विविध आरोग्यसेवा असून अल्प उत्पन्न गटाच्या लोकांना व गौरेतरांना रूग्णालयीन शुश्रूषा निःशुल्क आहेत, पण वैद्यकीय उपचार खाजगी रीत्या केले जातात. १९७३ साली देशात १०,५६७ डॉक्टर, २,९५८ विशेषज्ञ, ६,२०२ अंतर्वासित, ७१ दंततज्ञ व १,५३७ दंतवैद्य होते. १९७०–७१ साली १,०९,८९२ खाटा असलेली ७५० रूग्णालये आणि ३०,००० परिचारिका होत्या. हा देश समाजकल्याणकारी जरी नसला, तरी देशात समाजोपयोगी कायदेपद्धती असल्याने समाजोपयोगी योजना देशात चालू आहेत. बेकारी विमा, अपघात विमा, वृद्ध आणि अंधांना निवृत्तीवेतन, अल्प उत्पन्नगटांतील कुटुंबियांना भत्ते इ. योजना देशात उपलब्ध आहेत. देशात एकूण २,००० नोंदविलेल्या कल्याणकारी संघटना आहेत.

भाषा : देशात इंग्रजी व आफ्रिकान्स या दोन अधिकृत शासकीय भाषा आहेत. आफ्रिकान्स ही सतराव्या शतकातील डच भाषेपासून तयार झालेली असून ६० टक्के गोऱ्यांची व ९० टक्के मिश्रवर्णीयांची ती मातृभाषा होती. अन्य गोरे व मिश्रवर्णीय हे मुख्यतः इंग्रजी भाषिक होत. या दोन भाषांखेरीज आफ्रिकनांच्या अन्य भाषांमध्ये खोसा, झुलू, पेडी, सोथो, त्स्वाना, त्सोंगा, स्वाझी, व्हेंडिया इत्यादींचा समावेश आहे. तसेच शहरात राहणारे आशियाई लोक इंग्रजी भाषिक असून ते तमिळ, हिंदी, गुजराती इ. भाषाही बोलतात.

शिक्षण : सात ते सोळा वयोगटाच्या गोऱ्यांना शिक्षण निःशुल्क व सक्तीचे आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी प्रांतिक सरकारची तर विद्यापीठीय, तांत्रिक व धंदेशिक्षण केंद्र सरकारकडे आहे. १९७४ साली देशात १६ विद्यापीठे होती. त्यांपैकी ११ गोऱ्यांची विद्यापीठे असून त्यांमध्ये ८६,२३२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. ३ बांटूंच्या विद्यापीठांतून २,८८४ विद्यार्थी, एका मिश्रवर्णीय विद्यापीठात १,२४१ विद्यार्थी व भारतीयांसाठी असणाऱ्या विद्यापीठात २,००३ विद्यार्थी होते. १९७२ मध्ये देशात १५ तंत्रमहाविद्यालयांतून ५३,९८१ विद्यार्थी होते. यांमध्ये गोऱ्यांची १३ तंत्रमहाविद्यालये व ४५,५६४ गोरे विद्यार्थी होते. यांखेरीज गौरेतरांसाठी १४ अध्यापक महाविद्यालये आहेत. तसेच बांटूंच्या धंदेशिक्षणाची सोय ६ तंत्रशाळा व २१ औद्योगिक शाळांमधून केली आहे. ५०% बांटू साक्षर आहेत व शालेय वयाच्या मुलांपैकी ८०% बांटू मुले शाळेत जातात.

कला व क्रिडा : इंग्रजांच्या प्रभावामुळे क्रिकेट व टेनिस हे दोन खेळ खूप लोकप्रिय झाले आहेत. तसेच फेल्ट प्रदेश गोल्फ खेळासाठीही प्रसिद्ध आहेत. पण सरकारने वर्णभेदी धोरण खेळातही चालवल्याने जगभरचे लोकमत आज प्रक्षुब्ध झाले असून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेमधून हा देश बाहेर पडला आहे. तसेच कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांनीही या देशावर बहिष्कार टाकला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये द. आफ्रिकी खेळाडूंशी आज बऱ्याच देशांचे खेळाडू खेळण्याचे नाकारतात. कम्युनिस्ट, आशियाई व आफ्रिकी देशांचा विरोध तीव्र आहे. १९७६ सालचे माँट्रिऑल येथील ऑलिंपिक सामने आफ्रिकी राष्ट्रांच्या सामन्यांवरील बहिष्काराने गाजले.

शिंदे, सु. द. डिसूझा, आ. रे.


महत्वाची स्थळे : द. आफ्रिका प्रजासत्ताकामध्ये जास्त घनता असलेली नागरी वस्ती पूर्व व दक्षिण भागांत आहे. एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सतरा शहरे याच भागात वसलेली आहेत. दहा लाखांच्यावर लोकसंख्या असणारी केपटाउन व जोहॅनिसबर्ग ही दोनच शहरे आहेत. केपटाउन (लोकसंख्या १०,९६,५९७ – १९७०) ही देशाची संसदीय राजधानी असून आधुनिक सुखसोयी व मोठ्या गोद्या असलेले उत्तम बंदर आहे. याचे निसर्गसुंदर स्थान व उत्साहवर्धक भूमध्यसागरी हवामान यांमुळे हे एक आकर्षक प्रवासी केंद्र बनले असून केप–कैरो लोहमार्गाचे व हवाईमार्गाचे ते अंतिम स्थानक आहे. संसदगृहे, वस्तुसंग्रहालये, वनस्पतिउद्याने, कलावीथी, जुन्या डच वास्तुशिल्पाचे व चित्रकलेचे नमुने, जुनी वेधशाळा, केपटाउन विद्यापीठ या येथील मुख्य प्रेक्षणीय गोष्टी होत. जोहॅनिसबर्ग हे सर्वांत मोठे शहर (लोकसंख्या १४,३२,६४३ – १९७०) असून सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. येथे मोठमोठे कारखाने, खाण व व्यापारी कंपन्या असून तीन विमानतळ, विट्‌वॉटर्झरँड विद्यापीठ, आफ्रिकन विद्यापीठ, वेधशाळा व कृत्रिम तारामंडळ आहे. जर्मिस्टन येथे सोने शुद्ध करण्याचा जगातील सर्वांत मोठा कारखाना असून ते लोहमार्ग, उद्योगधंदे व शक्तिसाधने यांचे मुख्य केंद्र आहे. दरबान हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर (८,४३,३२७ – १९७०) व हिंदी महासागरावरील महत्त्वाचे बंदर आहे. याच्या आसमंतात पुष्कळ सुंदर बागा व मळे असल्यामुळे यांस बागांचे शहर असे म्हणतात. हे महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी केंद्र असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ व नाताळ विद्यापीठ आहे. प्रिटोरिया (५,६१,७०३ – १९७०) हे देशाच्या प्रशासकीय राजधानीचे ठिकाण असून द. आफ्रिका विद्यापीठ, प्रिटोरिया विद्यापीठ, राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय, नवे व जुने ट्रान्सव्हाल वस्तुसंग्रहालय, वेधशाळा व विमानतळ येथे आहेत. लोह, पोलाद, रसायने, सिमेंट, अभियांत्रिकी इ. उद्योगधंद्यांचे व लोहमार्गाचे हे केंद्र असून येथे शासकीय कार्यालये व परराष्ट्रीय वकिलाती आहेत. द. आफ्रिकेच्या प्रमुख बंदरांपैकी पोर्ट एलिझाबेथ (४,६८,५७७ – १९७०) हे एक असून उत्तम आरोग्यधामही आहे. येथील सर्प–उद्यान प्रसिद्ध असून त्यात सु.२,००० सरीसृप आहेत. पोर्ट एलिझाबेथ विद्यापीठ, फ्रेडरिक किल्ला, वस्तुसंग्रहालय, कलावीथी आणि पुष्कळ उद्याने येथे आहेत. ब्लूमफाँटेन (१,८०,१७९ – १९७०) हे देशाच्या न्यायिक राजधानीचे ठिकाण असून ऑरेंज फ्री स्टेट व लेसोथो यांचे व्यापारकेंद्रे आहे. ऑरेंट फ्री स्टेट विद्यापीठ, दोन वेधशाळा, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, युद्ध वस्तुसंग्रहालय या येथील प्रेक्षणीय गोष्टी आहेत. द. आफ्रिकेचे ईस्ट लंडन (१,२३,२९४ – १९७०) हे महत्त्वाचे मासेमारी बंदर व आरोग्यधामही आहे. ईस्ट लंडन वस्तुसंग्रहालय, मत्स्यालय, कायमचे लोकर प्रदर्शन, ३२ हे. क्षेत्राची राणीची बाग व ग्लमरगन किल्ला या येथील उल्लेखनीय बाबी होत. पीटरमॅरित्सबर्ग, विट्‌वॉटर्झरँड, ग्रेॲम्सटाउन, सायमन्झटाउन, वेलकम, व्हर्जिनिया, स्टेलनबॉस, सासॉलबर्ग आणि किंबर्ली ही इतर महत्त्वाची शहरे आहेत

कांबळे, य. रा.

संदर्भ : 1. Beaver, S. H.  Stamp, L. D. A Regional Geography, Part II, Africa, London, 1968.

           2. Best, A. C. G. ‘‘The Republic of South Africa: White Supremacy ’’, Focus, Vol.35-No. 6, New York, 1975.

           3. Church, R. J. H.  Africa and The Islands,  London 1967.

           4. Jarrett, H. R. An Outline Geography of Africa, London, 1966. 

  सोन्याच्या खाणीचा परिसर, जोहॅनिसबर्गलोखंड व पोलादाचे उत्पादन केंद्र, प्रिटोरियाकिंबर्ली येथील हिऱ्यांच्या खाणीचे विवरदृश्ययुनियन बिल्डिंग, प्रिटोरियादरबानमधील झूलू रिक्षावालाद. आफ्रिकेतील गजराज

केप ऑफ गुड होप : एक विहंगम दृश्यबुशमन गुहाचित्रे, 'सँडस्टोन' गुहा, नाताळझूलूंचा पारंपरिक नृत्यप्रकार