अलेक्झांडर फोन हंबोल्ट

हंबोल्ट, अलेक्झांडर फोन: (१४ सप्टेंबर १७६९-६ मे १८५९). पूर्ण नाव फ्रीड्रिख व्हिल्हेल्म कार्ल हाइन्रिख अलेक्झांडर फोन हंबोल्ट. जर्मन प्रवासी व प्रकृतिवैज्ञानिक. जन्म बर्लिन येथे. प्राथमिक शिक्षण फ्रँकफुर्ट येथे. लहान-पणापासूनच अलेक्झांडरचा सृष्टि-ज्ञानाकडे ओढा होता. त्याचे विद्यापीठीय शिक्षण गटिंगेन व फ्रायबर्गला झाले. त्याने केलेल्या र्‍हाईन खोऱ्यातील भू वि ज्ञा न विषयक संशोधनावरील निबंध १७९० मध्ये प्रसिद्ध झाला. फ्रायबर्गच्या खाणअकादमीत ए. जी. व्हे र्न र च्या हाताखाली उच्च शिक्षण घेतल्यानंतर १७९० मध्ये मानव-वंशशास्त्रज्ञ जॉर्ज फॉर्स्टरबरोबर त्याने बेल्जियम, हॉलंड (नेदर्लंड्स), फ्रान्स व इंग्लंडचा प्रवास केला. १७९२ मध्ये त्याची प्रशियात खाण अधिकारी म्हणून नेमणूक झाली. नोकरीवर असताना त्याने उत्पादनवाढीचा आटोकाट प्रयत्न केला, प्रशिक्षण शाळा काढल्या कामगार कल्याणाकडे अधिक लक्ष पुरविले. ह्याच वेळी स्नायुक्षोभावर केलेल्या प्रयोगांवरील त्याचा निबंध पुढे १७९९ मध्ये प्रसिद्ध झाला. फ्रायबर्गच्या वास्तव्यात त्याने तेथील भूमिगत वनस्पतींबाबत संशोधन करून पुस्तक लिहिले (१७९३). खाण अधिकारी म्हणून त्याला पोलंड आणि ऑस्ट्रियात भरपूर प्रवास करावा लागला. वारंवार व्हायमार येथे जावे लागल्याने गटे, शिलर आदी विद्वानांशी त्याची मैत्री जडली. १७९५ मध्ये वनस्पती व वैज्ञानिक संशोधन यांसाठी त्याने स्वित्झर्लंड व इटलीचा प्रवास केला. १७९६ मध्ये संशोधन व प्रवास यांकरिता त्याने नोकरीचा त्याग केला व पॅरिसचा प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ एमे बोप्लाँबरोबर तो प्रवासास निघाला. नेपोलियनला ईजिप्तमध्ये भेटून तिकडे संशोधन करण्याच्या इराद्याने तो व बोप्लाँ मार्सेयेथे गेले परंतु माद्रिद येथे गेले असता तेथील सरकारच्या आग्रहावरूनते ५ जून १७९९ ला दक्षिण अमेरिकेस रवाना झाले.

दक्षिण अमेरिकेच्या प्रवासात शास्त्रीय दृष्टीने निरीक्षणे करणे, नोंदीघेणे, वनस्पतींचे नमुने जमविणे हे त्यांचे मुख्य काम होते. वाटेत कानेरी बेटसमूहांपैकी तेनेरीफवर मुक्काम करून तेथील ज्वालामुखीच्या शिखरावरते चढले. १८०० मध्ये ओरिनोको नदीच्या उगमापासून निघून जंगलव निर्मनुष्य प्रदेशातून त्यांनी चार महिन्यांत २,७६० किमी. प्रवास केलाव ओरिनोको व ॲमेझॉन यांच्यातील जलविभाजकाची जागा निश्चित केली. १८०२ मध्ये कोलंबियातील मॅग्डालीना नदीतून ते तिच्या उगमाकडे निघाले. शेवटी वाटेतील कॉर्डिलेरा पर्वतश्रेणी ओलांडून ते कीटो येथे पोहोचले. एक्वादोरमधील चिंबोराझो हे सर्वांत उंच शिखर ते चढले. नंतर ॲमेझॉनच्या उगमाच्या शोधात ते पेरू देशाची राजधानी लीमा येथेपोहोचले. तेथून समुद्रमार्गे पेरूच्या शीतप्रवाहाचा अभ्यास करीत ते १८०३ मध्ये मेक्सिकोला पोहोचले. १८०४ मध्ये हंबोल्ट गाय-ल्यूसाकबरोबर चुंबकीय दिग्पाताचे रहस्य शोधण्याकरिता इटलीला गेला व नंतर द. अमेरिकेच्या पाच वर्षांतील समन्वेषणाची माहिती लिहिण्यासाठी १८०८ मध्ये तो पॅरिसला स्थायिक झाला. वीस वर्षांच्या कालावधीत, नामांकित मदतनिसांच्या साहाय्याने त्याने तीस खंडांत ही माहिती प्रसिद्ध केली. त्यात प्रामुख्याने दक्षिण व मध्य अमेरिकेचा भूगोल तेथील राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे वर्णन, तसेच वनस्पतींच्या ४,५०० नमुन्यांची माहिती यांचा समावेश होतो. १८२७ मध्ये तो बर्लिनला कायमचा स्थायिक झाला. तेथे त्याने काही व्याख्याने दिली, त्यांचे संकलन त्याच्या सुप्रसिद्ध कॉसमॉस या पुस्तकात केले आहे. रशियाच्या झारच्या विनंतीवरून १८२९ मध्ये सी. जी. एरेनबुर्क व गुस्ताफ रोझ यांच्याबरोबर त्याने उरल व रशियन आशियाचे नऊ महिन्यांत सु. ३,७१० किमी.चे समन्वेषण केले. यात त्याने सोने, प्लॅटिनम, हिरे यांच्या जागा शोधल्या चुंबकीय वादळांचे निरीक्षण केले व वेधशाळा काढण्याच्या सूचना दिल्या. आशिया सेंट्रल (१८४३) या पुस्तकाच्या तीन खंडांत या समन्वेषणाची माहिती त्याने प्रसिद्ध केली. १८३५ नंतरचे त्याचे बहुतेक आयुष्य बर्लिनला संशोधनात व कॉसमॉस या ग्रंथाच्या लेखनात व्यतीत झाले. भौतिक विज्ञानावरील हा अजरामरग्रंथ १८४५-६१ या कालावधीत सहा खंडांत प्रसिद्ध झाला.

प्रकृतिविज्ञानाच्या विविध शाखांमध्ये हंबोल्टने केलेले कार्य व त्याचा प्रभाव मौलिक स्वरूपाचा आहे. त्याला आधुनिक भूगोलाचा जनक मानतात. मध्य व दक्षिण अमेरिकेची चांगली ओळख हे त्याचे महत्त्वाचे कार्य. हवामानाच्या नोंदींचा अभ्यास करून त्याने बरेच निष्कर्ष काढले. समुद्रसपाटीपासूनची उंची व उष्णतामान यांचे विषम प्रमाण असते हा त्यांपैकीच एक निष्कर्ष होय. समोष्णतादर्शक रेषांच्या साहाय्याने नकाशे काढून निरनिराळ्या देशांतील हवामानातील भेद दाखविण्याची प्रथा त्याने पाडली. चुंबकीय वादळांचे नियम व स्वरूप सांगितले. पृथ्वीच्या चुंबकीय आकर्षणाचे प्रमाण ध्रुवांकडून विषुववृत्ताकडे कमी कमी होत जाते, हेहीत्याने सिद्ध केले. ठिकठिकाणी वेधशाळा स्थापण्यास लावून त्यांना आंतरराष्ट्रीय संघटनेचे स्वरूप आणण्याचे कार्य केले. अग्निजन्य खडकांची उत्पत्ती जलसंचयातून नसून ज्वालामुखीपासून होते, हे भूगर्भशास्त्रीय सत्य सांगून त्याने त्यासंबंधीच्या जुन्या समजुती दूर केल्या. पंचमहाभूतांवर वनस्पतींची विभागणी अवलंबून असते ही कल्पना त्याने मांडली. निरी-क्षणावर व संशोधनावर आधारलेल्या अभ्यासपद्धतीचा त्याने पुरस्कार केला. तो मानवतावादी होता. त्याचा मित्रपरिवार मोठा होता. असे म्हणतात की, त्यावेळेस तो यूरोपात नेपोलियनच्या खालोखाल सुप्रसिद्ध होता.

बर्लिन येथे त्याचे निधन झाले.

शाह, र. रू.