ब्रिक्सियाः विद्यमान नाव ब्रेशा. इटलीच्या लाँबर्डी विभागातील ब्रिक्सिया (ब्रेशा) प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,१२,२६५ (१९७९). आल्प्सच्या पायथ्याशी मिलान शहराच्या पूर्व-आग्नेयीस ८४ किमी., वर गाझी नदीतीरावर हे वसलेले आहे. रोमनपूर्व काळापासून हे प्रसिद्ध असून तेथे अनेक राजवटी होऊन गेल्या. १८६० मध्ये ते इटलीत समाविष्ट झाले. हे प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र असून लोखंड-पोलाद, यंत्र-सामग्री इ. कारखान्यांव्यतिरिक्त मोटारींचे सुटे भाग, कापड, विणमाल, खाद्यपदार्थ, पादत्राणे, बंदुका, काचसामान अशी विविध उत्पादने येथे होतात. शहरात ठोक व किरकोळ अशा दोन्ही प्रकारचा व्यापार चालतो. मिलान-व्हेनिस लोहमार्गावरील हे प्रमुख स्थानक आहे. येथील रोमन वास्तू, मध्ययुगीन चर्चवास्तू आणि राजवाडे, संग्रहालये, चित्रवीथी इ. प्रेक्षणीय आहेत. प्रबोधनकालीन विख्यात चित्रकार जी. बी. मोरोनी व मोरेटो यांच्या वास्तव्यामुळे सोळाव्या शतकात ते विशेष प्रसिद्ध होते.

ओक, द. ह.