नदी : मोठ्या भूप्रदेशावरून वाहत जाणारा निसर्गोत्पन्न जलप्रवाह. रचनेच्या दृष्टीने संबद्ध भूप्रदेशाचे जलनिःसारण करणाऱ्या सर्व जलप्रवाहांमिळून नदीप्रणाली होते व त्या प्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात. नद्यांच्या किंवा उपनद्यांच्या एकमेकांना लागून असलेल्या खोऱ्यांदरम्यानच्या उंच भागाला जलविभाजक म्हणतात. एका मोठ्या खोऱ्यात अनेक लहानलहान खोरी व दुय्यम जलविभाजक असू शकतात. नदीप्रणालीत मुख्य नदी, तिला मिळणाऱ्या उपनद्या व त्यांचे उगमप्रवाह यांचा समावेश होतो. या सर्व प्रवाहांची सुरुवात त्या खोऱ्यात पडणाऱ्या वृष्टीमुळे होते. खडक, माती किंवा वनस्पती यांनी आच्छादिलेल्या भूभागावर पडलेले पावसाचे पाणी किंवा हिमवृष्टीनंतर बर्फ वितळून झालेले पाणी भूपृष्ठावरून वाहू लागते किंवा जमिनीत मुरून जमिनीखालून वाहू लागते. काही पाणी वनस्पती व प्राणी यांच्या जीवनासाठी वापरले जाते आणि बऱ्याचशा पाण्याचे बाष्पीभवन होते. एकूण वृष्टीच्या सु. ३० टक्के पाणी नदीरूपाने वाहते. नदीचे उगमप्रवाह झऱ्यातून, दलदलीतून, सरोवरातून किंवा खोऱ्याच्या सर्वोच्च भागातील छोट्याछोट्या ओढ्या-ओहोळांतून सुरू होतात. प्रारंभी उंच प्रदेशातील जमिनीवर पसरून पडलेले पावसाचे पाणी तसेच पसरट स्वरूपात खाली घसरत येऊ लागते. जमिनीच्या उंचसखल स्वरूपामुळे आणि तिचे काही ठिसूळ कण पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे या पसरट पाण्याचे लहान लहान ओहोळ बनतात. त्यांना धार येते व ते खोलगट मार्ग तयार करून त्यातून वाहू लागतात. हे मार्ग अधिकाधिक खोल होत जाऊन ओहोळांस निश्चित स्वरूप येऊ लागते. अनेक ओहोळ एकत्र येऊन निर्झर व ओढे निर्माण होतात. नंतर त्यांची नदी बनते.

नर्मदेच्या प्रवाहाने खोदलेली घळई, जबलपूर

नदी शेवटी समुद्राला, भूवेष्टित समुद्राला, सरोवराला किंवा अंतर्गत जलनिःसारण प्रदेशातील खोलगट भागाला जाऊन मिळते. ते तिचे मुख होय. काही नद्या फक्त पावसाळ्यातच वाहतात, तर काही पावसाळ्यानंतरही भूमिगत पाण्याच्या आधाराने वाहतात. काही वाळवंटातच मुरतात किंवा वाळून जातात, तर पुष्कळशा नद्या बारमहा वाहत असतात. भूप्रदेशाचे स्वरूप ओबडधोबड असल्यास नद्यांची खोरी लहान असतात. प्रदेश वलीकरणाने झालेला व सौम्य उताराचा असेल तर नद्यांची खोरी विशाल असतात. उगमाजवळ नदीखोरे लहान असते परंतु पुढे पुढे ते विस्तारत जाते. नदीच्या दोन्ही काठांकडील उंच प्रदेश व त्यांमधील तिचे पात्र यांमिळून तिची दरी होते.पूरतट अ-पूरतट प-प्रवाह.

नदी ही व्यापक अर्थांची संज्ञा आहे. ओहोळ, निर्झर, ओढा, उपनदी, नदी, नद ही जलप्रवाहांच्या वाढत्या आकारमानानुसार त्यांना दिलेली नावे आहेत. काही उपनद्या मुख्य नदीएवढ्या किंवा तिच्याहून मोठ्याही असतात. सिंधू, ब्रह्मपुत्रा, शोण या मोठ्या नद्यांना नद म्हणतात. तथापि या सर्व जलप्रवाहांचा अभ्यास नदीच्या अभ्यासातच अंतर्भूत असतो. ठराविक तट नसलेल्या किंवा अनेक मार्गांनी वाहणाऱ्या नद्यांचाही त्यातच समावेश होतो. भूप्रदेशाच्या सामान्य उताराच्या दिशेने वाहणारी नदी ‘समवाहिनी’, तर मार्गातील उंचवट्याच्या प्रदेशाच्या उताराविरुद्ध दिशेने वाहणारी नदी ‘अपवाहिनी’ व कमकुवत खडकाच्या झिजेमुळे बनलेल्या प्रदेशाच्या स्वरूपाशी जुळते घेऊन वाहणारी नदी ती ‘उपवाहिनी’ नदी होय. नदी तिच्या दोन्ही तटांमधील तिच्या पात्रातून सखल भागाकडे वाहत जाते आणि तिच्या मार्गातील भूप्रदेशाची घडामोड करून विभिन्न भूरूपे निर्माण करते. [→ झीज आणि भर]. नद्यांचा तुलनात्मक अभ्यास त्यांची लांबी, वेग, खोऱ्याचा विस्तार, त्यातून वाहणाऱ्या पाण्याचे परिमाण इत्यादींवरून करतात. पुढील पानावरील कोष्टकात जगातील बारा महत्त्वाच्या प्रसिद्ध नद्यांचा तपशील दिला आहे.

नदीच्या खोऱ्यातील खडक, माती वगैरेंचे स्वरूप व रचना आणि नदीप्रवाहाचे त्यावरील कार्य यांमुळे नदीप्रणालीला विशिष्ट रूप प्राप्त होते. त्याला ‘निःसारण प्ररूप’ म्हणतात.

जलनिःसारण प्ररूपे : (१) जाळी प्ररूप, (२) आयताकृती प्ररूप, (३) अरीय प्ररूप, (४) वृक्षसदृश प्ररूप, (५) वलयाकृती प्ररूप, (६) अभिमध्य प्ररूप.

(१) जाळी प्ररूप : विभिन्न प्रतिरोधाच्या वलीकृत गाळखडकाच्या थरांच्या प्रदेशात, समांतर वाहणाऱ्या प्रवाहांना काटकोनात मिळणाऱ्या उपवाही प्रवाहांमुळे नदीप्रणालीला जाळी प्ररूप प्राप्त होते. त्यांना मिळणारे उपप्रवाह रोधक थरांच्या कटकांवरून कमकुवत खडकांच्या पट्ट्यांकडे जाणारे अपवाही प्रवाह किंवा खालच्या पातळीवरील उपवाही प्रवाह असतात.

(२) आयताकृती प्ररूप : विभंग व संधी असलेल्या प्रदेशात प्रवाहांस त्या विभंगांच्या व संधींच्या अनुरोधाने काटकोनी वळणे मिळतात. संधियुक्त अग्निजन्य किंवा सपाट संधियुक्त गाळखडकांच्या प्रदेशात हे प्ररूप आढळते. उदा., ॲपालॅचिअन किंवा रॉकी पर्वत प्रदेश. नदी अपहरणातही अपहृत प्रवाहाला काटकोनी वळण मिळते.

(३) अरीय प्ररूप : उंच प्रदेशावरून सर्व दिशांना जलप्रवाह जात असतील, तर नदीप्रणालीचे ते अरीय प्ररूप होते. भिन्न दिशांनी जाणारे प्रवाह चाकाच्या आऱ्यांप्रमाणे दिसतात. शंक्वाकृती पर्वत, ज्वालामुखी बेटे अशा ठिकाणी हे प्ररूप आढळते.

(४) वृक्षसदृश प्ररूप : क्षितिजसमांतर स्तरित खडकांच्या किंवा संपुंजित अग्निजन्य अथवा रूपांतरित खडकांच्या प्रदेशात खडकांचे विशिष्ट सारंचनिक नियंत्रण नसल्यामुळे अनेक दिशांनी येणाऱ्या उपप्रवाहांनी बनलेल्या नदीप्रणालीचे प्ररूप ‘वृक्षसदृश प्ररूप’ किंवा ‘शाखाकृती प्ररूप’ असते. पुष्कळ फांद्या असलेल्या पर्णहीन वृक्षाप्रमाणे या नदीप्रणालीचे प्ररूप दिसते. सामान्यतः पुष्कळशा नदीप्रणाली या प्ररूपाच्या दिसतात.

(५) वलयाकृती प्ररूप : घुमटाकृती भूप्रदेशाभोवती गाळखडकाचे वलयाकार दृश्यांश उत्थानाने निर्माण झाले, म्हणजे त्यांमधून वर्तुळाकार मार्गाने अनुवर्ती प्रवाह वाहू लागतात. त्यामुळे हे प्ररूप आढळून येते.

(६) अभिमध्य प्ररूप : मध्यवर्ती खोलगट प्रदेशाकडे सर्व बाजूंनी वाहत येणाऱ्या जलप्रवाहांमुळे नदीप्रणालीला हे प्ररूप प्राप्त होते.

पूर्वप्रस्थापित निःसारण : नदीखोऱ्याचा विकास झाल्यानंतर खोऱ्याचा भूप्रदेश उंचावला गेला आणि नदीचे पात्र खोल करण्याचे कार्य चालूच राहिले म्हणजे होणारे निःसारण हे पूर्वप्रस्थापित निःसारण होय. सिंधू, सतलज, अरुण, ब्रह्मपुत्रा, कोलंबिया या नद्याचे पर्वतभागातील निःसारण या प्रकारचे आहे.

पूर्वरोपित निःसारण : भिन्न काळात भिन्न घटनेते थर एकावर एक येऊन निर्माण झालेल्या प्रदेशात नदी जेव्हा वरचा थर खणून खालच्याही थरात आपले कार्य चालू ठेवते आणि आपला प्रवाहमार्ग प्रस्थापित करते, तेव्हा तिचे निःसारण या प्रकारचे असते. कोलोरॅडो नदी व इंग्लंडमधील सरःप्रदेश (लेक डिस्ट्रिक्ट) याची उदाहरणे होत.

 

नदी जलवाहन क्षेत्र

(हजार चौ.किमी.)

लांबी

(किमी.)

जगाच्या एकूण भूपृष्ठाचा व्यापलेला भाग (शेकडा) दर सेकंदास वाहणारे पाणी (हजार घ.मी.)
ॲमेझॉन ७,०५० ६,४३७ ४·८ १८०
काँगो ३,४५७ ४,७०० २·३ ४१
नाईल ३,३४९ ६,६५० २·३
मिसिसिपी–मिसूरी ३,२२१ ६,०२० २·२ १८
यांगत्सी १,९५९ ५,४९४ १·३ ३४
नायजर १,८९० ४,१८० १·३
गंगा–ब्रह्मपुत्रा १,६२१ २,८९७ १·१ ३८
सेंट लॉरेन्स– महासरोवर १,४६३ ४,०२३ १·० १०
व्होल्गा १,३६० ३,६९० ०·९
सिंधू १,१६६ २,८८० ०·८
मरी–डार्लिंग १,०५७ ३,७८० ०·७ ०·४
डॅन्यूब ८१६ २,८५० ०·६

नदीचा उतार : नदीचा उतार तिच्या अनुगामी पार्श्विकेवरून स्पष्ट होतो. नदीच्या पाण्याचे जे झीज व भरीचे कार्य चालू असते, त्याचा अंतिम उद्देश नदीच्या उताराचे प्रवणन (ग्रॅडेशन) करण्याचा असतो. नदीच्या पात्राचे प्रवणन होण्यासाठी उताराचा प्रकार, जलप्रमाण, नदीच्या पात्राची वैशिष्ट्ये आणि पाण्यातील गाळ या चार गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. नदीचा प्रारंभ असताना उतार खडबडीत असतो. नदीत पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे नदीची त्या भागाची झीज करण्याची क्षमता कमी असते. नदीच्या मधल्या टप्प्यात नदीतील जलप्रमाण वाढलेले असते. त्यामुळे उताराचे प्रवणन वेगाने होते. नदीच्या पात्राच्या उताराला सफाई प्राप्त होते. नदीचा उतार कमी झाला म्हणजे पाण्याचा वेग मंदावतो. तथापि नदीची कार्यक्षमता कमी होते असे नाही. ॲमेझॉन नदीच्या खालच्या टप्प्यात उतार एक किमी. स ४·७५ सेंमी. आहे. तरी पण तेथे जलप्रमाण वाढलेले असल्याने वेग दर सेकंदाला २·४ मी. होतो. जलप्रमाण वाढल्याने क्षुब्ध प्रवाह निर्माण होतात. नदीच्या तिसऱ्या टप्प्यात अनुगामी पार्श्विका जवळजवळ प्रवणित होते. त्यामुळे नदीच्या झीज व भर कार्यात समतोल निर्माण होतो. ही अवस्था थोड्या काळासाठी निर्माण होते. अशा वेळी नदीच्या पार्श्विकेला संतुलन पार्श्विका (प्रोफाइल ऑफ ईक्विलिब्रिअम) असे म्हणतात. हे नदीचे प्रौढ स्वरूप आहे. नदीने आपल्या खोऱ्याचे आधार प्रतलापर्यंत प्रवणन केले म्हणजे पुष्कळदा त्याचे पुनर्युवीकरण होऊन सर्व क्षरणचक्र पुन्हा सुरू होते.

प्रवाह वैशिष्ट्ये : नदीचा प्रवाह अनेक धारांनी बनलेला असतो. प्रवाह चालू असताना या धारा एकमेकांशी समांतर नसून त्यांच्यामध्ये गुंतागुंत होते. ही प्रवाहांतर्गत गुंतागुंत म्हणजे प्रवाहाची क्षुब्धता होय. संथ पाण्यात धारांची गुंतागुंत कमी असते. या प्रवाहाची झीजेची क्षमता कमी असते. या प्रवाहाला सुवाही प्रवाह म्हणतात. क्षुब्ध प्रवाहात जलधारा एकमेकांना मिळतात आणि ओलांडून जातात. प्रवाहामध्ये पात्राच्या मध्यभागी पृष्ठभागाशी वेग कमाल असतो. वेगाचे प्रमाण पात्राच्या तळाकडे व उभय तीरांकडे कमी होत जाते. याचाच अर्थ प्रवाहाची कमाल क्षुब्धता प्रवाहाच्या मध्यभागी असते. नदीच्या पात्राचा आकार व नदीची वळणे यांवर प्रवाहाचे स्वरूप अवलंबून असते. पात्र सममित असल्यास आणि नदी सरळ वाहत असल्यास नदीच्या बरोबर मध्यभागी कमालवेग व तीरांकडे किमान वेग अशी समसमान विभागणी होते. परंतु नदीला वळण असेल, तर वळणाच्या अंतर्वक्र भागात पात्र खोल व बहिर्वक्र भागात उथळ असते. त्यामुळे क्षुब्ध प्रवाहाचा कल अंतर्वक्र भागाकडे असतो. यामुळे त्या बाजूला जमिनीचे खनन व बर्हिवक्र भागात संचयन अशा प्रक्रिया घडतात. सर्वच नद्यांमध्ये क्षुब्ध हालचालींमुळे प्रवाह एका तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत हिंदकळत असतात. पाण्याच्या या आंदोलनाला पार्श्ववर्ती आंदोलन म्हणतात.

गाळाचे वहन : नदीबरोबर येणारा गाळ तीन प्रकारचा असतो. नदीच्या पाण्यात इतर रसायने असल्याने काही पदार्थांचे कण पाण्यात विरघळलेल्या स्वरूपात असतात. काही गाळ पाण्यातून तरंगत वाहत जातो. त्याला निलंबित गाळ म्हणतात. खडकाचे जड तुकडे पाण्याच्या जास्त वेगामुळे तळाबरोबर घरंगळत जातात. या गाळाला कर्षण गाळ असे म्हणतात. नदीचा वेग जर दुप्पट झाला, तर नदीची वहनक्षमता ६४ पट होते. साधारणतः ०·०४ मिमी. व्यासाचे गाळाचे कण प्रवाहात पृष्ठापासून तळापर्यंत सारखेच वाटले गेलेले असतात. ०·१ मिमी. व्यासाच्या कणांचा गाळ पृष्ठभागाकडे कमी व तळाकडे जास्त प्रमाणात असतो. गाळाचा आकार ०·५ मिमी. हून जास्त असल्यास असा गाळ बव्हंशी कर्षण गाळ या गटात मोडतो. गाळाचे विशिष्ट गुरुत्व नेहमीच पाण्याच्या विशिष्ट गुरुत्वाहून (१·०) जास्त असल्याने गाळ प्रवाहात आल्याबरोबर गुरुत्वाकर्षणानुसार उतारावरून वाहू पाहतो. जाडाभरडा गाळ प्रतिसेकंदास ०·१५ मी. सरकतो. सूक्ष्म गाळ त्यामानाने हळू सरकतो. गाळाच्या या प्रवृत्तीमुळे पाण्याचा कित्येक किमी. प्रवास झाला, तरी लक्षणीय संचयन होत नाही. प्रवाहातील क्षुब्धता गाळाला निलंबित ठेवते.

कुंडलकासार सरोवराची निर्मिती : क - कुंडलकासार सरोवर

नदीच्या पात्राचे स्वरूप : नदीच्या पात्राचे स्वरूप तीन घटकांवर अवलंबून असते. जलप्रवाह, वाहणाऱ्या गाळाचे प्रमाण व स्वरूप आणि पात्राची खडकरचना. नदीचे पात्र सरळ, नागामोडी, गुंफित, बहुशाखी, अनियमित अशा पाच प्रकारांचे असू शकते. सरळ प्रवाहाचा तळ उंचसखल होणारा व मध्येच डोह असणारा असतो. उभट उतारावर व एखाद्या विभंगरेषेच्या अनुषंगाने हा प्रवाह वाहतो. पात्राचा आकार सममित असतो. सरळ पात्राची बदलण्याची प्रवृत्ती असते. जलप्रवाहात बदल होताच किंवा पात्राचे खनन होऊन खडकरचना वेगळी मिळल्यास नदीच्या पात्राला वळण मिळते. प्रवाहाला वळण मिळत गेले की नागमोडी प्रवाह तयार होतात. भूरूपाचा अडथळा येऊन बनणारी नागमोडी वळणे हा साधा प्रकार आहे. पाण्याचे प्रमाण वाढल्याने नदी आपल्या पात्राला वळण देते, हा नागमोडीचा प्रकार महत्त्वाचा आहे. पार्श्ववर्ती अपघर्षणामुळे नागमोडी पात्ररचना बनते. पात्राची छेद पार्श्वरेखा असमांग बनते. एका बाजूला म्हणजे वळणाच्या अंतर्वक्र बाजूला खोली जास्त असते. या रचनेमुळे नदीचे खननकार्य इतके एकांगी होते की, कधीतरी पुराचे वेळी नागमोडीची मान तुटते व आ. २ मधील य१ आणि य२ हा भाग जोडला जाऊन आ. ३ प्रमाणे प्रवाह सरळ होतो. तुटलेल्या मानेत पाणी राहते व सरोवर बनते. त्यास कुंडलकासार (नालाकृती) सरोवर म्हणतात. नागमोडीची लांबी सामान्यपणे तिच्या रुंदीच्या ७ ते १० पट असते. गुंफित प्रवाह हे नदीच्या पात्राचे तिसरे रूप आहे. याला वेणीरचना म्हणतात. नदीची पूरपातळी वाढल्यावर नागमोडी रचना होते व गाळ पात्रातच जास्त साचतो. पूरपातळी खाली आली की, साचलेल्या गाळाच्या ढिगांना वळसे घालून अनेक प्रवाहांनी नदी वाहू लागते. या पात्र-स्वरूपाला गुंफित प्रवाह म्हणतात. रुंद पात्र, गाळाचे त्वरेने इतरत्र सरकणे आणि नदीपात्राचे स्थान सातत्याने बदलत राहणे ही गुंफित प्रवाहाची वैशिष्ट्ये आहेत. नदी अखेरच्या टप्प्यात असताना बहुशाखी प्रवाह तयार होतात. समुद्राजवळ नदी आल्यावर सागराच्या पाण्याचा विरोध होतो. नदीकडून गाळाचे खूप संचयन होते. नदीचा क्षीण प्रवाह अनेक फाट्यांनी सागरास मिळतो. हा प्रदेश त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.

संशोधन : भूपृष्ठावर झीज व भर करणारी जी कारके आहेत, त्यांत नदी प्रमुख आहे. वारा, बर्फ व नदी यांची तुलना केल्यास नदीकडून ९० टक्के कार्य होत असते. त्यामुळे गेल्या शंभर वर्षांत झीज व भरीचा प्रमुख कारक म्हणून नदीसंबंधात संशोधन झाले आहे. इसवी सनापूर्वी इतिहासाचा जनक हीरॉडोटस याने नाईल नदीचे सामर्थ्य व तिच्या पूरतट मैदानांचा ऊहापोह केला. तेव्हापासून नदीच्या वैशिष्ट्यांचा विचार शास्त्रीय पायावर केला जाऊ लागला. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत भूरूपशास्त्र या स्वतंत्र शास्त्राचा उदय झाल्यावर जेम्स हटन, प्लेफेअर, पॉवेल, डटन या शास्त्रज्ञांनी नदीच्या कार्यातील सुसंगती स्पष्ट केली. दरी, मैदान, त्रिभुज प्रदेश अशी भूरूपे एकापाठोपाठ एक तयार होतात व त्यांचा क्रम ठरलेला असतो हे हटनपासून प्रकर्षाने मांडले गेले. पॉवेल आणि डटन यांनी नदीच्या प्रकारांचे जननिक वर्गीकरण केले. भूरचना व नदीप्रवाहांची उत्क्रांती यांचा संबंध स्पष्ट केला. नदी जास्तीत जास्त समुद्रसपाटीपर्यंत झीज करू शकते म्हणून सागरपातळी ही झीजेची निम्नतम पातळी आहे, हे प्रतिपादन केले. या आधारसामग्रीवर विल्यम मॉरिस डेव्हिसने १८८४ साली क्षरणचक्र ही महत्त्वाची संकल्पना मांडली. उगमापासून मुखापर्यंत नदी विविध भूरूपे तयार करते. नदीच्या वयानुसार तिची क्षमता वाढते. वाढलेल्या क्षमतेनुसार ती प्रदेशाची झीज करते. सर्त्र प्रदेश सागरपातळीपर्यंत सपाट करणे हा तिचा अंतिम उद्देश असतो. प्रदेशाला जी अंतिम सपाटी प्राप्त होते, तिला स्थलीप्राय किंवा प्रायः समतल हे नाव डेव्हिसने दिले. नवनिर्मित प्रदेशाला युवावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था आणि पुनर्युवीकरण किंवा कायाकल्प या अवस्थांतून जावे लागते. झीजेच्या या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर प्रदेशाचे पुनरुत्थान होते व डेव्हिसने प्रतिपादलेले क्षरणचक्र पुन्हा सुरू होते. डेव्हिस यांच्या या मूलभूत विचारावर आल्ब्रेख्‌त पेंक, कॉटन, लोबेक, वुलरीज, मॉर्गन, क्रिकमे, लिओपोल्ट, शोर्ले इत्यादींनी विचार व्यक्त करून सुधारणा केली. १९३५ पासून नदीच्या अभ्यासात परिणामात्मक अभ्यासाचे पर्व सुरू झाले आहे. हॉर्टन, स्ट्रॅलर, क्रिकमे, लिओपोल्ट, डूर्नकँप यांनी नदीच्या प्रवाहाचा वेग, तिच्या प्रवाहाची गुणवत्तेनुसार प्रतवारी, पात्राचा आकार, जलप्रमाण व नदीच्या या वैशिष्ट्यांचा परिणाम यासंबंधात आकडेवारी जमा केली. त्यानुसार आता नदीच्या अभ्यासाला अधिक काटेकोर स्वरूप प्राप्त झाले आहे. १९६० पासून पर्यावरणी भूरूपशास्त्र या अभ्यासशाखेत नदीच्या कार्याचा आणि व्यावहारिक परिणामांचा उपयोजनी अभ्यास होत आहे. हा अभ्यास विशेष जीवनाभिमुख ठरावा.

नदीचे आर्थिक महत्त्व : इतिहासकाळात नद्यांनी व्यापारी, जेते, संशोधक व वसाहतकरी इत्यादींना सारख्याच प्रमाणात आकर्षित केले होते. मानवी संस्कृतीचा प्रारंभ टायग्रिस, युफ्रेटीस, सिंधू, हवांग हो, नाईल या नद्यांच्या काठी साडेचार ते दहा हजार वर्षांपूर्वी झाला, असे मानले जाते. तेथे प्राचीन काळी सिंचनव्यवस्थाही होती असे आढळून आले आहे. तथापि मेक्सिको, पेरू, भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील देश येथील संस्कृती नदीखोऱ्यांवर अवलंबून नव्हत्या. इतिहासकाळात पश्चिम यूरोपात नद्यांच्या काठी तेरा राजधान्या होत्या. उत्तर अमेरिकेत यूरोपातून लोक गेले, तेव्हा त्यांनी नद्यांच्या अनुषंगानेच अंतर्भागात स्थानांतर केले. सिकंदराने सिंधू ओलांडून भारतात येण्याचे ठरविले. गंगा-सिंधूच्या समृद्ध खोऱ्यांचे आकर्षण सिकंदरापासून मोगलांपर्यंत सर्वांनाच होते. आर्थिक समृद्धी विशेषतः नद्यांच्या खोऱ्यांत प्रथम अवतरली, कारण नद्या पर्वतप्रदेशातून सुपीक माती आणून ती मैदानी प्रदेशात पसरतात व त्यामुळे हे प्रदेश शेतीच्या दृष्टीने विशेष उत्पादक ठरतात. उद्योगधंद्यांस व घरगुती उपयोगांसही नद्या पाणी पुरवितात.

नदी – प्रवाहाचा खालचा टप्पा : हुगळी नदी, कलकत्ता.

गेल्या दोन-तीन शतकांत नद्यांचे आर्थिक महत्त्व फार वाढले आहे. सागरातून देशांतर्गत भागात येण्यासाठी नद्यांचे मार्ग उपयुक्त ठरतात. गंगा नदीतून मोठ्या सागरी बोटी आत येतात. ॲमेझॉनचा प्रवाह ३,७०० किमी. पर्यंत नौसुलभ आहे. यांगत्सी १,००० किमी. तर सेंट लॉरेन्स नदी २,००० किमी. पर्यंत नौसुलभ आहे. कॅनडात व इतर देशांत नद्यांचा उपयोग ओंडके दूर वाहून नेण्यासाठी करतात. नद्यांतून मिळणारे मत्स्यान्न व त्यासाठी केले जाणारे मत्स्यसंवर्धन हा नद्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा उपयोग आहे. चीन, थायलंड यांसारख्या देशांत कित्येक लोकांचे सारे जीवनच नदीच्या पृष्ठावर व्यतीत होत असते. नद्यांकाठी व मुखांशी मोठमोठी शहरे व बंदरे उदयास येतात. जलसिंचनासाठीही नद्यांचा उपयोग होतो. सध्या जलसिंचन व वीजनिर्मिती यांसाठी नद्यांचा उपयोग काही प्रमाणात होत असला, तरी कोळसा, तेल ही शक्तिसाधने कमी पडू लागल्याने भविष्यकाळात त्यांचा उपयोग वाढणार आहे. नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण ऋतुपरत्वे, वृष्टिपरत्वे, भूरूपपरत्वे कमीजास्त होते. त्याचा परिणाम त्या पाण्याच्या वापरावर साहजिकच होतो. तथापि महापूर, प्रदेशावर वाळू पसरणे, मार्ग बदलून प्रदेशाचे नुकसान होणे, जलसिंचनाच्या काही योजनांत समुद्राच्या पाण्याचे आक्रमण व जमिनीचे क्षारीकरण इ. प्रकारे नद्या नुकसानही करतात.

अवखळ नद्यांना बांध, धरणे बांधून किंवा त्यांचे प्रवाह दुसरीकडे वळवून त्यांचा अधिक चांगला उपयोग करण्याच्या योजना सर्वत्र होत आहेत. नदीच्या पाण्याच्या वापराबाबत देशादेशांत, राज्याराज्यांत वाद निर्माण होऊ लागले आहेत. तथापि नर्मदा, गोदावरी, कृष्णा यांच्या पाण्याच्या वाटपाबद्दल समझोते झाले आहेत. त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाणीवापराबाबत सहकार्य केले जात आहे. डॅन्यूब नदीच्या वापराबाबत ती ज्या ज्या देशांतून वाहते, त्यांच्यात एक करार झालेला आहे. झँबीझीवरील करिबा धरण, नाईलवरील आस्वान धरण, कोलंबिया नदी, सेंट लॉरेन्स सी-वे इत्यादींच्या उपयोगांबाबत आंतरराष्ट्रीय करारांना महत्त्व आले आहे. भारतातून पाकिस्तानात आणि बांगला देशात जाणाऱ्या पाण्याच्या वापराबाबत सहकार्याची चर्चा चालू आहे. नद्या जेथे सीमा असतात, तेथे त्यांनी पात्र बदलल्यास हद्दींबाबत तंटे उत्पन्न होतात. नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी तिचा उपयोग कसा करावा याबद्दलही कायदे करावे लागतात. नद्यांविषयी बहुतेक सर्व देशांत आदराची भावना दिसून येते. त्यांना लोकमाता, पिता, देवता इ. नावे दिली जातात. भारतात तर गावाच्या नदीलाच काय, परंतु ओढ्यालाही कित्येक लोक गंगाच म्हणतात. नद्यांना, विशेषतः गंगेला, हिंदूंच्या धार्मिक जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहित्यात व संगीतातही नद्यांचा गौरव वर्णिलेला आहे.

तावडे, मो. द. कुमठेकर, ज. ब.