मोनाको : पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेले फ्रान्सचे एक मांडलिक राज्य. मोनाको हे जगातील ⇨ व्हॅटिकन सिटीखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत लहान राज्य असून त्याचे क्षेत्रफळ १·९ चौ. किमी. आहे. लोकसंख्या २७,०६३ (१९८२). भूमध्य सागरकिनाऱ्यावर वसलेल्या या राज्याच्या पश्चिमेस, उत्तरेस व पूर्वेस फ्रान्सचा आल्प्स-मॅरिटाइम हा विभाग असून दक्षिणेस भूमध्य समुद्र आहे. मोनाकोव्हिल (लोक. १,२३४–१९८२) हे राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : मौंट ॲगेल (उंची १,१०० मी.) पर्वताच्या पायथ्याशी भूमध्य सागरकिनारी मोनाको वसले आहे.

मोनाकोचे मोनाकोव्हिल, ला काँडमाइन, माँटी कार्लो व फोंव्ह्ये असे चार विभाग पडतात. त्यांपैकी मोनाकोव्हिल हे राजधानीचे ठिकाण समुद्रात शिरलेल्या उंच व खडकाळ अशा टोकदार भूशिरावर वसलेले आहे. खडकाळ भागावरील स्थानामुळे याला ‘रॉक’ असेही संबोधले जाते. सस. पासून या भागाची उंची ६१ मी. आहे. मोनाकोव्हिल हे एक सुरक्षित बंदर असून त्याच्या प्रवेशद्वाराजवळची पाण्याची खोली २७ मी. आणि गोदीतील खोली ७ मी. आहे. मोनाकोव्हिल येथे भव्य राजवाडा, कॅथीड्रल, शासकीय इमारती, महासागरविज्ञान वस्तुसंग्रहालय आहे. मोनाको बंदराच्या पश्चिमेस ला काँडमाइन हा, विशेषतः व्यापारासाठी प्रसिद्ध असलेला विभाग आहे. बंदराच्या उत्तरेस ⇨ माँटी कार्लो विभाग आहे. हा जास्त उंचीवरील हवेशीर भाग असून तो हॉटेले, जुगारगृहे यांसाठी जगप्रसिद्ध आहे. नैर्ऋत्य भागात फोंव्ह्ये या समुद्र हटवून नव्याने विकसित केलेल्या भागात पर्यटन व्यवसायाची निगडीत असे छोटे उद्योगधंदे विकसित झालेले आहेत.

मोनाकोचे हवामान भूमध्य सागरी प्रकारचे आहे. हिवाळे सौम्य व आर्द्र असून गोठणबिंदूखाली तापमान क्कविचत जाते. उन्हाळे उबदार व कोरडे असतात. वार्षिक सरासरी तापमान १६° से. असते. जानेवारीमधील तापमानाची सरासरी १०° से. व जुलै-ऑगस्टमधील तापमानाची सरासरी २४° से. असते. समुद्रसान्निध्यामुळे उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता खाऱ्या किंवा सागरी वाऱ्याने कमी केली जाते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७५ सेंमी. असून वर्षातील सु. ६० दिवसच पाऊस पडतो.

मोनाकोमध्ये ताड, कोरफड, कॅरोब, टॅमॅरिकेसी, लाजाळू ह्या वनस्पती, भूमध्य सागरी प्रकारच्या इतर वनस्पती, फुलझाडे झुडुपे इ. येथे बरीच आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : इ. स. पू. ७०० च्या सुमारास फिनिशियन लोक मोनाकोच्या परिसरात येऊन राहिले असावेत. प्राचीन ग्रीक-रोमन सत्तांच्या काळात एक व्यापारी केंद्र व सागरी बंदर म्हणून मोनाको प्रसिद्ध होते. मध्ययुगीन काळात इटलीतील ग्रीमाल्डी या घराण्याकडे मोनाकोचा ताबा आला (१३०८). तत्पूर्वी म्हणजे ११०० च्या सुमारास उत्तर इटलीतील जेनोआच्या लोकांनी मोनाकोचा ताबा घेतला होता आणि १२१५ मध्ये तेथे एक किल्लाही बांधला होता. पंधराव्या-सोळाव्या शतकांत हे बंदर अधूनमधून फ्रान्स आणि स्पेन यांच्या ताब्यात राहिले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात १७९३ मध्ये ते फ्रेंचांनी घेतले पण व्हिएन्ना काँग्रेसच्या ठरावानुसार ते ग्रीमाल्डी कुटुंबाकडे परत करण्यात आले (१८१५) . मात्र प्रथम सार्डिनिया (१८१५–६०) आणि नंतर फ्रान्स (१८६१ नंतर) यांचे संरक्षित राज्य असा त्याचा दर्जा ठेवण्यात आला. येथील माँटी कार्लो (स्था. १८६६) हे विसाव्या शतकांत श्रीमंत यूरोपीय पर्यटकांचे हिवाळी पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्धीस आले. १९११ साली येथील राजा पहिला ॲल्बर्ट याने नवीन संविधान अंमलात आणले. तत्पूर्वीच्या काळात दरबारी कपटकारस्थाने वाढली होती आणि त्यांत दुसरा झां ल्यूशन आणि पहिला ऑनोरे हे राज्यकर्ते बळी पडले होते. पहिल्या ॲल्बर्टची कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्याने येथील महासागरविज्ञानाचे संशोधनकेंद्र व संग्रहालय स्थापन केले. त्यानंतरच्या १९२२–४९ च्या प्रदीर्घ काळात दुसरा लुई हा येथील राजा होता. दुसऱ्या महायुद्धात अल्पकाळ जर्मनांनी हे व्यापले होते. दुसऱ्या लुईचा नातू तिसरा रेनिअर हा नंतर गादीवर आला (१९४९). १९५६ साली त्याने अमेरिकन चित्रपट अभिनेत्री ग्रेस केली हिच्याशी विवाह केला. रेनिअरने १९६२ साली नवे संविधान अंमलात आणले. त्यानुसार स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात आला, तसेच फाशीची शिक्षा बंद करण्यात आली. १९६३ साली फ्रान्सच्या दडपणाखाली मोनाकोत पहिल्यांदाच व्यापारी नफ्यावर कर बसविण्यात आला. रेनिअरने पर्यटनदृष्ट्या मोनाकोच्या विकासाच्या काही योजना-उदा., भूमिसंपादन-तयार केल्या. येथील पर्यटन व्यवसाय नियंत्रित करणाऱ्या मुख्य कंपनीवर ॲरिस्टॉटल ओनासीस या ग्रीक धनिकाचे प्रभुत्व होते. १९६६ सालच्या अधिनियनानुसार या कंपनीवर मोनाको शासनाचे नियंत्रण वाढविण्यात आले. पुढील वर्षी ओनासीसने कंपनीतील आपले भाग शासनाला विकले.


तिसऱ्या रेनिअरने १९११ सालचे संविधान रद्द करून नॅशनल कौन्सिल आणि कम्यूनल कौन्सिल ही दोन्ही विधिमंडळे बरखास्त केली (१९५९). तथापि १९६२ पासून ही विधिमंडळे पुन्हा स्थापन करण्यात आली. नॅशनल कौन्सिलसध्ये ५ वर्षांच्या मुदतीसाठी १८ सदस्य निवडले जातात, तर कम्यूनल कौन्सिलसध्ये ४ वर्षांसाठी १६ सदस्य निवडले जातात. या द्विसदनी विधिमंडळाच्या निवडणुका १९८३ साली झाल्या होत्या. १९६२ च्या संविधानानुसार येथे वंशपरंपरागत राज्यसत्ता आहे. येथे सर्वोच्च न्यायाधिकरण असून व्यक्तीचे मुलभूत हक्क, नागरी व संघटना स्वातंत्र्य इ. अधिकार जपण्याचे काम ते करते. नॅशनल कौन्सिलच्या संमतीने संविधानदुरुस्ती करता येते. फ्रान्सशी झालेल्या करारानुसार (१९५१) या दोन देशांचे परस्परसंबंध निश्चित करण्यात आले होते. फ्रान्सने हा करार १९६२ साली रद्द केला तथापि पुढील वर्षी दुसरे काही करार करण्यात आले. १९१८ च्या तहानुसार मोनाकोच्या राजघरण्यात पुरुषवारस नसेल, तर हे राज्य फ्रेंच शासनाखाली येईल अशी तरतुद आहे. राजाच्या हाताखाली एक मुख्यमंत्री असून तो फ्रेंच शासनाने नियुक्त केलेला असतो. राज्यात अर्थ, पोलीस व अंतर्गत व्यवस्था आणि सार्वजनिक बांधकाम अशी खाती असून त्यांवर नॅशनल कौन्सिलमधील एकेक सदस्य प्रमुख असतो.

देशातील न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी दोन न्यायालये आहेत. राज्यातील पोलिसदल महत्त्वाचे असून त्यात १९८५ साली ३५० पोलिस व निरीक्षक होते.

आर्थिक स्थिती : पर्यटन उद्योग हाच या राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य घटक आहे. साधारणपणे प्रतिवर्षी जगातील ६ लक्ष पर्यटक येथे येतात. येथील जुगारगृहे, हॉटेले, क्लब, पुळणी आणि इतर मनोरंजन केंद्रे एका मोठ्या कंपनीच्या ताब्यात आहेत. रंगीबेरंगी आणि सुंदर डाकतिकीटे हेदेखील उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन आहे. अनेक परदेशी कंपन्यांची मुख्यालये देशात आहेत कारण येथे करांचे प्रमाण व दर अत्यंत कमी आहेत. मोनाकोव्हिल शहराच्या पश्चिमेस असलेल्या फोंव्ह्ये या औद्योगिक परिसरात बीर, कँडी आणि रसायने यांचे कारखाने आढळतात. येथील चलन म्हणजे फ्रेंच फ्रँक हेच आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार फ्रान्सशीच मुख्यत्वे चालतो. देशात सर्वत्र मेट्रिक परिमाणे वापरात आहेत.

देशातील कामगारवर्ग सु. २१,५८८ (१९८४) त्यांपैकी २,५०० कामगार कामगारसंघटनांचे सदस्य आहेत.

देशात ४७·०८ किमी. लांबीच्या सडका असून १·६ किमी.लांबीचा फ्रेच नॅशनल रेल्वेच्या एक फाटा आहे. देशाला फ्रान्समधील नीस येथील विमानतळ जवळचा आहे. १९८४ साली देशात १७,७०० दूरध्वनी संच होते. देशात नभोवाणी केंद्र व दूरचित्रवाणी केंद्र आहे. येथे तीन चित्रपटगृहे असून त्यांपैकी एक खुले आहे.

लोक व समाजजीवन : देशातील निम्म्याहून अधिक लोक फ्रेंच असून, उरलेल्यांपैकी अधिक लोक अमेरिकन, बेल्जियन, ब्रिटीश आणि इटालियन आहेत. शासनाची व व्यवहाराची भाषा फ्रेंच आहे. खुद्द स्थानिक लोक कमी असून, ते मात्र फ्रेंच व इटालियन भाषांचे मिश्रण असलेली बोलीभाषा बोलतात. येथे आयकर नसल्यामुळे अनेक श्रीमंत लोक कायमच्या वास्तव्यासाठी येतात. तथापि, १९६३ पासून येथील फ्रेंच रहिवाशांना फ्रेंच शासनाच्या दरानुसार आयकर भरावा लागतो.

देशाचा अधिकृत धर्म रोमन कॅथलिक असला, तरी सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य आहे. चर्चमार्फत येथे प्राथमिक शाळा चालविल्या जातात. येथे एक उच्च माध्यमिक विद्यालय आणि एक संगीत अकादमी आहे.

शासनातर्फे फ्रेंच भाषेतील चांगल्या साहित्यकृतीसाठी प्रतिवर्षी पुरस्कार देण्यात येतो.


प्रेक्षणीय स्थळे : येथील माँटी कार्लो हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ, जुगारगृहांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. बालसाहित्यासाठी येथील प्रिन्सेस कॅरोलिन ग्रंथालयाचा विशेष लौकिक आहे. महासागरविज्ञानाचे संग्रहालय, प्रागैतिहासिक वस्तूंचे संग्रहालय, प्राणिसंग्रहालय, वनस्पतीशास्त्रीय संग्रहालय इ. उल्लेखनीय आहेत. येथील महासागर संशोधन प्रयोगशाळा तसेच मत्स्यालय जगप्रसिद्ध आहे. माँटी कार्लो येथील ग्रँड थिएटरसध्ये जगप्रसिद्ध गायक, नर्तक, वादक इत्यादींचे कार्यक्रम होतात. 

संदर्भ : 1. Hondley-Taylor, Geoffrey, Ed. Bibliography of Monaco, London, 1968.

             2. La Gorce, P. M. de, Monaco, Lausanne. 1969.

             3. Pickard, Fredrick W. Monaco and the French Riviera, New York, 1937.

चौधरी, वसंत जाधव. रा. ग.

मोनाकोमोनाकोतील जुगारगृह : एक दृश्य.१. मोनाकोव्हिल येथील प्रसिद्ध 'ग्रीमाल्डी राजप्रासाद' २. मोनाकोचे बंदर : एक विहंगम दृश्य.