वाडी : बॉडी. वाळवंटी, खडकाळ प्रदेशांतील प्रवाहांच्या कोरड्या पडलेल्या आणि काठावर उंच दरडी असलेल्या खोल व अरुंद पात्रांस वाडी म्हणतात. ही संज्ञा अरबी भाषेतील असून तिचा अर्थ खोल दरी, नदी किंवा नदीपात्र असा होतो. काही अरबी भाषिक देशांत कधी कधी अशा पात्रांतून वाहणाऱ्या पाण्यालाच (प्रवाहाला) वाडी म्हणतात. मोरोक्कोमध्ये वाडी म्हणजे नदी होय, तिचे कोरडे पात्र नव्हे. 

सुरुवातीच्या काळात हा शब्द तुर्की, पर्शियन व या भाषांच्या जवळच्या पूर्वेकडील काही भाषांत वापरात होता. परंतु सांप्रत तो पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका इ. भागांतही वापरला जातो. स्पॅनिश भाषेत अशा भूभागालाच ‘ग्वादी’ म्हणतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील वायव्य भागात व लॅटिन अमेरिकेत अशा अत्यल्पकाली प्रवाहाला ‘अरोयो’, तर भारतात सर्वसाधारणपणे ‘नाला’ म्हणतात. प्राचीन काळापासून वाळवंटी भागात अशा वाड्यांच्या अनुरोधाने वसाहती झाल्याचे दिसून येते. वाळवंटी, ओसाड प्रदेशात पाऊस क्वचितच परंतु अत्यंत जोराने येतो. त्यामुळे जमिनीला खोल घळ्या पडतात हे प्रवाह पुढे वाळवंटातच जलदगतीने नष्ट होतात व वाड्यांची निर्मिती होते. वरच्या भागात पडलेला पाऊस किंवा उंच डोंगरावरील वितळलेले बर्फ यांमुळे वाड्यांना अचानक अत्यल्पकाली पूर येतात व त्यामुळे जवळपासच्या वस्त्यांमध्ये कधीकधी प्राणहानीही होते. 

काही शास्त्रज्ञांच्या मते सहारा व अरबी वाळवंटांच्या उत्तरेकडील भागांत हिमप्रवाह वाहिले असावेत व त्या काळात वाळवंटातील हवामान अधिक आर्द्र होते. त्यामुळे त्यावेळी या प्रदेशांतही नद्या असाव्यात व नंतर त्यांची पात्रे कोरडी पडली असावीत. असे येथील वाड्यांत आढळलेल्या पुराव्यावरून दिसून येते. 

कुमठेकर, ज. ब. चौंडे, मा. ल.