खोपोली : कुलाबा जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या १८,१५२ (१९७१). हे मुंबई – पुणे हमरस्त्यावर मुंबईच्या १०६ किमी. पूर्वेस, बोरघाटाच्या पायथ्याशी, समुद्रसपाटीपासून ७० मी. उंचीवर वसले आहे. बोरघाटाच्या चढणीनंतर माथा सु. ५५० मी. उंच असल्याने टाटा कंपनीने या उताराचा फायदा घेऊन खोपोली येथे ७०,००० किवॉ. क्षमतेची जलविद्युत् जनित्रे बसविली आहेत. पुणे – मुंबई औद्योगिक परिसराला या विजेचा मोठा फायदा मिळाला आहे. खोपोलीहून कर्जतला १६ किमी. जाणारा मीटरमापी लोहमार्ग असून पावसाळ्यात तो बंद असतो. कागद, रसायने, यांत्रिक उपकरणे इत्यादींचे उद्योगधंदे येथे असून आणखी उद्योगधंदे निघावेत अशा योजना आहेत. नाना फडणीस यांनी बांधलेल्या येथील भव्य महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

शाह, र. रू.