सार्डिनिया : इटलीचे भूमध्य समुद्रातील सिसिलीनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट व प्रांत. या प्रांतात सार्डिनिया बेटाबरोबरच लगतच्या लहानलहान बेटांचाही समावेश होतो. इटलीच्या मुख्य भूमीपासून पश्चिमेस सु. २०० किमी. तसेच आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यापासून उत्तरेस सु. २०० किमी. वर व कॉर्सिका (फ्रान्स) बेटापासून दक्षिणेस १२ किमी. वर सार्डिनिया हे बेट आहे. टिरीनियन समुद्रामुळे इटलीच्या मुख्य भूमीपासून हे बेट अलग झाले असून कॉर्सिका व सार्डिनिया बेटांदरम्यान ११ किमी. रुंदीची बेनिफाचोची सामुद्रधुनी आहे. बेटाची उत्तर-दक्षिण लांबी २६५ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी १४५ किमी. आहे. बेटाचे क्षेत्रफळ २४,०९० चौ. किमी. असून किनाऱ्याची एकूण लांबी १,३०० किमी. आहे. लोकसंख्या १६,७५,४११ (२०११). काल्यारी (लोकसंख्या १,५६,५६०–२०१०) हे या प्रांताच्या राजधानीचे ठिकाण व महत्त्वाचे बंदर आहे.

काल्यारीचा वार्षिकोत्सव : धार्मिक फलक घेतलेल्या पारंपरिक वेषभूषेतील स्त्रिया.सार्डिनियाची सु. ९० टक्के भूमी पर्वतीय किंवा डोंगराळ आहे. खडक मुख्यतः ग्रॅनाइट व सुभाजा प्रकारचे आहेत. जेन्नारजेंतू गिरिपिंडातील मौंट लामारमोरा (उंची १,८३४ मी.) हे बेटावरील सर्वोच्च शिखर आहे. वायव्य भागातील सास्सारी आणि दक्षिण भागातील काम्पीदानॉ हे प्रमुख मैदानी प्रदेश आहेत. नद्या कमी लांबीच्या व द्रुतगती असून तीर्सो, फ्लूमेंदॉझा व काँघीनस या प्रमुख नद्या आहेत. सन १९०७ पासून सु. २०० जलाशयांची निर्मिती करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व जलविद्युत्‌शक्ती निर्मिती प्रकल्पही उभारले आहेत. बेटावर सु. २६,००० पेक्षा अधिक झरे असून त्यांपैकी बरेच झरे चुनखडीयुक्त गुहामय प्रदेशात किंवा ज्वालामुखी प्रदेशात वैशिष्ट्यपूर्ण रीत्या निर्माण झालेले गरम पाण्याचे आहेत.

बारूमीनी येथील ‘नूरागी’, सार्डिनिया.

सार्डिनियाचे हवामान भूमध्य सागरी प्रकारचे आहे. भरपूर सूर्यप्रकाश व कोरडी हवा हे हवामानाचे वैशिष्ट्य आहे. हिवाळे सौम्य आणि उबदार तर उन्हाळे उष्ण व कोरडे असतात. हिवाळ्यात पाऊस पडतो. पर्जन्यमान व पर्वतीय प्रदेशात सु. १०० सेंमी. तर मैदानी प्रदेशात ६० सेंमी. आहे. बेटावर बुचाचे ओक (कॉर्क ओक), जूनिपर, लॉरेल, मर्टल इ. भूमध्यसागरी प्रकारच्या वनस्पती आढळतात. अरण्ये कमी झाल्याने काही ठिकाणी डोंगराळ प्रदेश उघडे पडले आहेत. शिकारीमुळे वन्यपशूंची संख्या कमी झाली आहे. सांबर प्राणी तुरळक आढळतो. रानडुकरांची संख्या बरीच आहे.

सार्डिनिया बेटावर प्रागैतिहासकालीन असंख्य वैशिष्ट्यपूर्ण नूरागी (दगडातील शुंडाकार शंकू रचना ) आढळतात. त्यांच्या सखोल अभ्यासाबाबत पुरातत्त्वविद्यातज्ञ अद्यापही अनभिज्ञ आहेत. त्यांचा वापर किल्ल्यांचे रक्षण, निवास व ब्राँझ धातूच्या ओतशाला म्हणून केला गेला आहे. फिनिशियन हे येथील पहिले वसाहतकरी असावेत (इ. स. पू. सु. ८००). त्यानंतर ग्रीक, कार्थेजियन यांनी या बेटावर हल्ले केले. इ. स. पू. २३८ मध्ये त्यावर रोमनांची सत्ता आली. ती पुढे सु. ७०० वर्षे टिकली. त्यानंतर व्हँडॉल, पुन्हा रोमन, बायझंटिन व सारासेन यांच्या सत्ता होऊन गेल्या. इ. स. आठव्या ते बाराव्या शतकापर्यंत सार्डिनिया स्वतंत्र प्रदेश होता. त्यानंतर त्यावर ताबा मिळविण्याचा जेनोआने प्रयत्न केला. ॲरगॉन सभागृहाने १३२६ मध्ये ताबा मिळविला. १७०८ पर्यंत बेटावर स्पॅनिश सत्ता राहिली. त्यानंतर ते ऑस्ट्रियाकडे गेले. इ. स. १७२० मध्ये सार्डिनियाच्या राजाने याचा ताबा घेतला. सव्हॉय गृहाकडे सुपूर्त केल्यानंतर ते इटलीच्या वायव्य भागातील पीडमाँट प्रदेशाला जोडले. अठराव्या शतकाच्या अखेरीस पीडमाँट फ्रान्सला जोडले. इ. स. १८६१ मध्ये सार्डिनिया बेट इटलीचा एक भाग बनले. दुसऱ्या महायुद्घकाळात (१९३९–४५) सार्डिनियावर इटलीचा प्रमुख हवाई व नाविक तळ होता. १९४८ मध्ये या बेटाला मर्यादित प्रमाणात स्वायत्त शासनाची मान्यता देण्यात आली.

शेती व खाणकाम हे सार्डिनियातील प्रमुख व्यवसाय आहेत. येथे कृषियोग्य जमिनीचे प्रमाण कमी आहे. शेतीतून गहू, बार्ली, बटाटा, द्राक्षे, ऑलिव्ह, लिंबू जातीची फळे, बदाम, भाजीपाला, तंबाखू इ. उत्पादने घेतली जातात. सार्डिनियाचे निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र चराऊ कुरणांखाली आहे. त्यावर शेळ्या, मेंढ्या पाळल्या जातात. मासेमारी हा व्यवसायही महत्त्वाचा असून ट्यूना, सार्डिन, लॉबस्टर, अँकोव्ही हे मासे पकडले जातात. सभोवतालच्या सागरी भागात विविध प्रकारचे डॉल्फिन आढळतात. सार्डिनियावर खनिज संपत्ती विपुल आहे शिसे व जस्त यांचे इटलीच्या एकूण उत्पादनापैकी चार पंचमांश उत्पादन येथे होते. याशिवाय लिग्नाइट कोळसा, मँगॅनीज, अभ्रक, बॉक्साइट, फ्लुओराइट, तांबे, लोहखनिज, सुरम्याची धातू, ॲल्युमिनियम व अल्युमिना यांचेही उत्पादन होते. खनिज तेलशुद्घीकरण, खनिज तेल रसायन उद्योग, वस्त्रोद्योग, मीठ निर्मिती, अन्नप्रक्रिया, कागदनिर्मिती, लाकूडकाम, चर्मोद्योग, विद्युत् अभियांत्रिकी इ. उद्योगधंदे येथे आहेत. येथील बुचाचे उत्पादन मोठे आहे. पर्यटन व्यवसाय मुख्यतः किनारी भागात केंद्रित झालेला आहे. बेटावर रस्ते व लोहमार्गांचे जाळे असून हे बेट इटलीशी हवाई व सागरी मार्गाने जोडलेले आहे. काल्यारी, तेरानोव्हा पॉसानिया, ऑलबिआ व पोर्तो तोरेस ही प्रमुख व्यापारी बंदरे आहेत.

सार्डिनियावरील बहुसंख्य लोक दाटीवाटीने वसलेल्या खेड्यांत किंवा लहान नगरांत राहतात. किनारी भागातील चाचेगिरी व मलेरियाच्या भीतीमुळे प्रामुख्याने बेटाच्या अंतर्गत भागात वस्ती केंद्रित झाली आहे. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला ८० व्यक्ती अशी होती (२०११). इटालियन ही राष्ट्रभाषा आहे. सार्डिनियन, जेनोईज, अरबी, तस्कन, कॅटॅलॅन या भाषा अनेक भागांत बोलल्या जातात. येथील लोकसाहित्य व कारागिरी समृद्घ आहे. प्रत्येक शहरात व गावात वार्षिक उत्सव साजरे केले जातात. त्यांमध्ये अश्वारोहणासारखे साहसी पराक्रमी खेळ खेळले जातात. पाहुण्यांविषयी आतिथ्यशीलता व निष्ठा ही सार्डिनियन लोकांच्या सामाजिक नीतिमत्तेचे विशेष लक्षण आहे. पर्यटन व्यवसाय मुख्यतः किनारी भागात केंद्रित झालेला आहे. मुख्य भूमीपासून वेगळे असल्यामुळे बेटाने आपली गायन, नृत्य व इतर अनेक पारंपरिक प्रथांची जपणूक केलेली आहे. लोक सुंदर कशिदाकाम केलेल्या वस्त्रांचा पेहेराव करतात. काल्यारी, सास्सारी, न्वॉरो व ईग्लेझ्यास ही येथील प्रमुख शहरे आहेत. राजधानी काल्यारी हे बेटाच्या दक्षिण भागात, काल्यारी आखाताच्या शिरोभागी वसले असून प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र आहे.

कुंभारगावकर, य. रा. चौधरी, वसंत