नॉर्वे : उत्तर यूरोपातील स्कँडिनेव्हियाच्या द्वीपकल्पावरील पश्चिमेकडील देश. क्षेत्रफळ ३,२३,९०० चौ. किमी. (बेटांसह), लोकसंख्या ४०,१७,१०१ (१९७६). या देशाला दक्षिणेस स्कॅगरॅकचा समुद्र, पश्चिमेस नॉर्वेचा समुद्र व अटलांटिक महासागर आणि उत्तरेस आर्क्टिक महासागर यांच्याशी एकूण २,६५० किमी. लांबीची दंतुर सागरीसरहद्द लाभली आहे. पूर्वेस स्वीडनशी १,६३३ किमी., फिनलंडशी ७३६ किमी. व रशियाशी १८६ किमी. ची भू-सरहद आहे. देशाचा आकार गदेसारखा दक्षिणेकडे खूप रुंद आहे. उत्तर-दक्षिण लांबी १,८०० किमी. असून जास्तीत जास्त रुंद भाग ४२५ किमी. आहे. विस्तार ५८° उ. ते ७१° उ. व ४° ३० पू. ते ३१° १० पू. यांदरम्यान. नॉर्वेची १५,९०० चौ. किमी. क्षेत्रफळाची सु. दीड लक्ष लहानमोठी बेटे असून त्यांत स्वालबार द्वीपसमूह, बूव्हे, यान मायेन, पीटर–१ व लोफोतेन ही मोठी बेटे आहेत. गेल्या शतकात अंटार्क्टिका खंडामधील क्कीन मॉड लँड (२०° प. ते ४५° पू.) या भागावर नॉर्वेचा हक्क प्रस्थापित झाला व १९२० मध्ये स्वालबार द्वीपसमूह नॉर्वेला मिळाला. ऑस्लो ही राजधानी आहे.

भूवर्णन :नॉर्वेची भूपृष्ठरचना हिमयुगातील हिमक्षयनाने अतिशय तीव्र चढउतारांची बनलेली असून, सपाट भाग अगदी थोडा आहे. पर्वतवेष्टित अरुंद आखाते (फ्योर्ड) हे किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. हिमयुगानंतर हिमक्षयित दऱ्यांमध्ये समुद्राचे पाणी शिरून ही आखाते तयार झाली असावीत. यामुळे देशाला खूप सुरक्षित बंदरे लाभली आहेत. साँग्‌ना, हारडांगर, नॉर्ड व ऑस्लो हे प्रमुख फ्योर्ड आहेत. ऑस्लो व त्रॉनहेमजवळ काही विस्तृत सखल प्रदेश आहे. बाकीची किनारपट्टी अतिशय अरुंद असून किनाऱ्यासमोर असंख्य खडकाळ व ओसाड बेटे आहेत.

दक्षिण नॉर्वेचा बहुतांश पश्चिम भाग डोव्हरफेल व लांगफ्येल या पठारांनी व्यापलेला असून मध्यभागी योतुनहेम पर्वतावर नॉर्वेतील गालहप्‌पिगन व ग्लिटरटिन ही २,५०० मी.हून अधिक उंचीची शिखरे आहेत. याच भागात यॉस्टडाल्‌स्ब्रे हा ८०० चौ. किमी. व्याप्तीचा यूरोपातील सर्वांत मोठा हिमव्याप्त प्रदेश आहे. मध्य पठारी व पर्वतीय प्रदेश हा दक्षिण नॉर्वेचा जलविभाजक होय. मध्य नॉर्वेत त्रॉनहेमजवळ चिंचोळा खोल भाग आहे. त्याच्या उत्तरेकडे पठारांची उंची कमी होत गेली असून ती स्वीडनकडून पश्चिमेच्या बाजूस समुद्राकडे उतरती आहे. नॉर्वेची सरासरी उंची ५०० मी. आहे. नॉर्वेत लहान जलप्रवाह व हिमनद्या दोनशेहून अधिक असून त्यांवर शेकडो उंच जलप्रपात आहेत. मध्य पर्वतीय प्रदेशातून आग्नेयीकडे वाहणारी ग्लॉमा ही ५६० किमी. लांबीची सर्वांत मोठी नदी ऑस्लो फ्योर्डच्या पूर्वेस समुद्राला मिळते. म्यसा हे ३५० चौ. किमी. क्षेत्राचे सरोवर लॅगन या ग्लॉमाच्या उपनदीवर आहे. देशात एकूण सु. १३,००० चौ. किमी. क्षेत्राची सरोवरे आहेत.

हिमयुगाची माघार सुरू झाली म्हणजे वितळलेल्या पाण्याबरोबर शाडू, गाळ, रेती वाहत येऊन खोल भागांत थरांच्या रूपाने साचतात व गाळाची चांगली सपाट जमीन तयार होते. ऑस्लो आणि त्रॉनहेमच्या जवळ असे विस्तीर्ण मैदानी भाग आहेत. इतरत्र प्राचीन किनारपट्टीच्या भागांत गाळाची तुटक क्षेत्रे आढळतात. अरण्यव्याप्त भागांतील जमीन निरिंद्रिय क्षार कमी झाल्याने हलक्या प्रतीची आहे.

देशात लोहखनिजे व लोहगंधकयुक्त खनिजे महत्त्वाची आहेत. तांबे, चांदी, जस्त व शिसे अल्प प्रमाणात मिळतात. स्वालबार बेटावर मात्र ५ लक्ष टन दगडी कोळसा दरसाल काढला जातो. स्कॅगरॅकच्या समुद्रात खनिज तेलाचा शोध लागला असून अटलांटिकमध्येही तेल सापडण्याची शक्यता आहे. देशातील शक्तिसाधनांची उणीव जलशक्तीने भरून काढली आहे.

हवामान : देशाचा सु. १/३ भाग शीत कटिबंधात असूनही अटलांटिकवरून येणाऱ्या विस्तीर्ण व उष्ण गल्फ प्रवाहामुळे देशाचे हवामान समशीतोष्ण राहिले आहे. यामुळे अगदी उत्तरेकडील किनारादेखील वर्षभर खुला राहतो. पश्चिम किनाऱ्यावरील सरासरी तपमान १५° से. च्या आसपास असते. त्रॉनहेमच्या उत्तरेस उन्हाळ्यात ३ महिने सूर्य मावळतच नाही, म्हणून नॉर्वेला ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा देश’ म्हणतात. हिवाळ्यात ३ महिने त्या भागात सूर्य उगवत नाही. उत्तर अटलांटिकवरून येणाऱ्या चक्री आवर्तांच्या मार्गात नॉर्वे येत असल्यामुळे वर्षभर हवा सतत बदलती राहते. पश्चिम नॉर्वेत सौम्य हिवाळे, शीतल उन्हाळे, २०० सेंमी, पाऊस असे सागरी हवामान आहे. पूर्व नॉर्वेत हिवाळे थंड, उन्हाळे गरम, पाऊस १०० सेंमी. आहे. नॉर्वेत पाण्याची टंचाई कोठेही नाही. हिवाळ्यात पर्वतांवर हिम पडते आणि अनेक नद्या व सरोवरे गोठतात.

वनस्पती व प्राणी : नॉर्वेत उंच पर्वतीय थंड प्रदेशात खुरटी वनस्पती आहे, पण दऱ्याखोऱ्यांतून ७०० ते ८५० मी. उंचीपर्यंत स्प्रूस व पाडून या सूचिपर्णी वृक्षांची दाट झाडी आहे. अधूनमधून बर्च, ॲश, ॲस्पेन हे पानझडी वृक्ष आढळतात. पश्चिम भागात पानझडी वृक्ष अधिक आहेत, तर दऱ्याखोऱ्यांतून पाइन वृक्ष अधिक वाढतात. पठारावर खुरटे गवत वाढते. त्याचा उपयोग तृणभक्षक प्राण्यांना होतो. बेरीसारखी रानटी फळे देणारी झुडपेही बरीच आढळतात. नॉर्वेला वृक्षसंपत्तीचे वरदान आहे.

काळविटासारखा कळप करून राहणारा रेनडियर व हरिण, मूस, लांडगा, बॅजर, मार्टन, पाणमांजर, बीव्हर, खोकड, लिंक्स, ग्लटन व अस्वल हे प्राणी येथे कमीजास्त प्रमाणात आढळतात. लॅप लोकांनी डोंगराळ भागात रेनडियरचे कळप पाळलेले आहेत. नद्यांतून सॅमन व ओढ्यांतून ट्राउट मासे विपुल आहेत. समुद्रात मुख्यत: कॉड मासे मिळतात. हेरिंग, हॅलिबट व व्हेल हे इतर मासे आहेत. वुल्व्हरीन व लेमिंग या उंदरांसारख्या प्राण्यांची संख्या बरीच आहे. हे सर्व तृणभक्षक प्राणी आहेत. लेमिंगांची संख्या वेगाने वाढते व मग ते सामुदायिक स्थलांतर करतात आणि मार्गात लांडगे, कोल्हे, गरुड यांचे भक्ष्य बनतात, उरलेल्यांपैकी पुष्कळसे पाण्यात बुडून मरतात, तर काही पलीकडे जमिनीवर पोहोचतात. ते सामुदायिक आत्महत्या करतात, ही समजूत आता चुकीची ठरली आहे. फ्योर्डच्या उंचउंच कपारींमुळे सागरी पक्ष्यांची संख्या फार मोठी आहे. बरेचसे पक्षी हिवाळ्यात आफ्रिकेपर्यंत स्थलांतर करतात.


इतिहास : ख्रिस्तपूर्व काळात नॉर्वेचा बायझंटिन रोमन साम्राज्याशी संपर्क होता. परंतु आठव्या-नवव्या शतकांपर्यंतचा या देशाचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही. त्यानंतर नॉर्वेतील व्हायकिंग या दर्यावर्दी आक्रमक व्यापाऱ्यांमुळे त्याचा यूरोपशी संबंध आला व पुढे व्हायकिंगांच्या चाचेगिरीमुळे यूरोप त्रस्त झाला. मध्ययुगात नॉर्वे-मधील अनेक लहान राज्ये एकत्र करण्याचे कार्य पहिला हाराल, ट्र्यूग्व्हेसॉन (पहिला ओलाफ) व दुसरा ओलाफ (हाराल्सॉन ओलाफ) या तीन राजांनी केले. हारालने ऑस्लोचे साम्राज्य वाढविले, पण त्याच्या पश्चात असंतुष्ट मांडलिकांनी डेन्मार्कशी संधान बांधून यादवीचा पाया घातला. त्यानंतरचा पहिला ओलाफ या राजाने स्वतः ख्रिस्ती धर्म स्वीकारून त्याचा झपाट्याने प्रसार केला. यामुळे नॉर्वेत एकराष्ट्रीयत्वाची भावना रुजली. दुसरा ओलाफ या राजर्षीने एकछत्री अंमल स्थापन केला, पण त्यालाही यादवीचा पूर्ण बीमोड करता आला नाही. १०३० मध्ये स्टिकलस्टाडच्या लढाईत त्याला मृत्यू आला. त्यानंतरच्या काळात स्वीडन व डेन्मार्क या देशांच्या साम्राज्यतृष्णेत नॉर्वे देश भरडून निघाला. या पारतंत्र्याच्या काळात नॉर्वेची आर्थिक स्थिती मात्र सुधारली. नॉर्वेची माशांची निर्यात खूप वाढली व त्या बदल्यात धान्य, कापड, मध, मसाल्याचे पदार्थ इ. मिळू लागले. इंग्लंड, जर्मनी या देशांशी व्यापार वाढला व त्रॉनहेम बंदराचे महत्त्व कमी होऊन बर्गेनचे वाढले. या उत्कर्षाच्या काळात हॅन्सिॲटिक या विदेशी व्यापारी संघाचा प्रभाव वाढून नॉर्वे कर्जबाजारी झाला, हे व्यापारी पैशाच्या जोरावर कायदा आणि शासन मानेनासे झाले. चौदाव्या शतकात नॉर्वेत प्लेगची साथ येऊन तीत देशाची अर्धी लोकसंख्या बळी पडली. या दोन संकटांनी दुर्बल झालेला नॉर्वे १५३६ मध्ये डेन्मार्कच्या अंमलाखाली जाऊन त्याचा एक प्रांत मानला जाऊ लागाला. याचा एक परिणाम म्हणजे पुढील तीनशे वर्षे नॉर्वेतील कॅथलिक पंथ संपुष्टात येऊन तेथे ल्युथरप्रणीत प्रॉटेस्टंट पंथ दृढ झाला. तथापि डेन्मार्कची सत्ता किनाऱ्यालगत व शहरांपुरती मर्यादित होती. इतर भाग जवळजवळ स्वतंत्रच होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीस नेपोलियन विरुद्ध यूरोप या युद्धात नॉर्वेला स्वातंत्र्याची संधी मिळाली. नेपोलियनचा पराभव होताच इंग्लंड-रशिया या राष्ट्रांनी स्वीडन या दोस्त राष्ट्राला नॉर्वे बहाल केला. याचा परिणाम नॉर्वेत प्रचंड प्रक्षोभ होऊन १७ मे १८१४ रोजी नॉर्वेसाठी एक स्वतंत्र घटना स्वातंत्रप्रेमी जनतेने अस्तित्त्वात आणली. यामुळे नॉर्वे व स्वीडन यांच्यामध्ये युद्ध भडकले. पुढे उभय पक्षांत तडजोड होऊन नॉर्वेचा समान दर्जा व नॉर्वेचे स्वतंत्र कायदे, प्रशासन, सैन्य यांना स्वीडनने मान्यता दिली व स्वीडनचा राजा तेरावा चार्ल्स यास आपला राजा म्हणून नॉर्वेने मान्यता दिली. हे नॉर्वे-स्वीडनचे संयुक्त राज्य कसेबसे १९०५ पर्यंत टिकले. या काळात नॉर्वेची व्यापार व वाहतुक यांत भरपूर वाढ झाल्याने त्याने आपले स्वतंत्र प्रतिनिधी परदेशांत नेमले. यास स्वीडनच्या ऑस्कर राजाने मान्यता न दिल्याने नॉर्वेनेडेन्मार्कच्या चार्ल्स या राजपुत्रास हॉकोन सातवा (नवव्या क्रिस्त्यान राजाचा नातू) नावाने नॉर्वेचा स्वतंत्र राजा म्हणून गादीवर बसविले.

स्वातंत्र्योत्तर काळात नॉर्वेने पूर्ण अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. तरी पहिल्या महायुद्धात जर्मन पाणबुड्यांनी या देशाची बरीच व्यापारी जहाजे बुडविली. १९३० च्या जागतिक मंदीचा नॉर्वेच्याही व्यापारावर परिणाम झाला. तरीही त्यानंतर नॉर्वेची व्यापारात व सागरी वाहतुकीत झपाट्याने प्रगती झाली. दुसऱ्या महायुद्धात नॉर्वेने आपले अलिप्ततेचे धोरण पुढे चालू ठेवले. परंतु देशद्रोही फितूरीमुळे एप्रिल १९४० मध्ये नाझी जर्मन सैन्य नॉर्वेत घुसले व दोन महिन्यांत त्याने सर्व नॉर्वे व्यापला राजकुटुंब व मंत्रिमंडळ यांनी लंडन येथे आसरा घेतला. शासनाच्या हुषारीमुळे यावेळी नॉर्वेची व्यापारी जहाजे जर्मनांच्या हाती लागली नाहीत. जर्मनांनी व्हिडकुन क्व्हिस्‌लिंग या देशद्रोही इसमाला प्रधानमंत्री नेमुन पुढील पाच वर्षे नॉर्वेचे प्रशासन चालविले. क्व्हिस्‌लिंग म्हणजे सूर्याजी पिसाळ या अर्थाचा शब्द सर्व यूरोपीय राजकारणात वरील माणसावरून रूढ झाला. १९४५ मध्ये जर्मनीचा पराभव होताच ७ जून रोजी सातवा हॉकोन मायदेशी परतला व नॉर्वेचे पंचवार्षिक ग्रहण सुटले. त्यानंतर मार्शल योजनेद्वारा मिळालेली अमेरिकन मदत, जनतेचा निर्धार व परिश्रम आणि शासनाचे वस्तुनिष्ठ धोरण यांमुळे नॉर्वेचे पुनर्वसनाचे काम वेगाने पूर्ण झाले व अल्पावधीतच मच्छीमारी, उद्योगधंदे, नाविक दल, शहरांची बांधणी आदी क्षेत्रांत नॉर्वेने खूप प्रगती केली. १९४५ पासून नॉर्वेने जागतिक राजकारणातील अलिप्ततेचे धोरण सोडून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आघाडीचे व सहकार्याचे धोरण आरंभिले, संयुक्त राष्ट्रे या संघटनेचा संस्थापक सदस्य म्हणून नॉर्वे उभा राहिला व ट्र्यूग्व्हे लीसारख्या नॉर्वेच्या मुत्सद्यास त्या संघटनेचे प्रथम चिटणीसपद लाभले. १९४८ मध्ये इतर १६ राष्ट्रांसहित नॉर्वे मार्शल एड प्रोग्रॅममध्ये सामील झाला व १९४९ मध्ये नाटोचा, १९५२ मध्ये नॉर्डिक कौन्सिलचा सभासद होऊन १९५९ मध्ये यूरोपीय फ्री ट्रेड असोसिएशन (‘एफ्टा’) या संघटनेत सामील झाला. १९५७ मध्ये सातव्या हॉकोनच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र पाचवा ओलाफ यास नॉर्वेची गादी मिळाली. १९६५ च्या निवडणुकीत ३० वर्षे सत्तेवर असलेल्या मजूर पक्षाचा पराभव झाला व ‘सेंटर पार्टी ’ हा मध्यममार्गी पक्ष सत्तेवर आला. परंतु त्यानंतरच्या १९७३ च्या निवडणुकीत मजूर पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला.

राजकीय स्थिती : नॉर्वे हा संविधानात्मक राजेशाही असलेला देश आहे. राजेशाही वंशपरंपरागत असून संविधानानुसार राजाच्या ज्येष्ठ पुत्रालाच गादी मिळते. १८१४ मध्ये मंजूर झालेले संविधान व त्यात वेळोवेळी झालेल्या दुरूस्त्या यांनुसार राज्यकारभार चालतो. राजा हा देशाचा घटनात्मक प्रमुख असून सर्व शासन त्याच्या नावाने चालते. तथापि त्याला संसद बरखास्त करण्याचा अधिकार नाही. राजा हा सेनाप्रमुख त्याचप्रमाणे प्रमुख धर्मगुरूही असतो. या देशाच्या संविधानात ब्रिटीशांच्या राजकीय परंपरेचा, अमेरिकेच्या संविधान पद्धतीचा आणि फ्रेंचांच्या क्रांतिकारी विचारांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.

संसदेला स्टॉर्टिंग म्हणतात. ही द्विसदनी असून तिच्यात १५५ प्रतिनिधी असतात. त्यांची निवड दर चार वर्षांनी, एकोणीस मतदार संघांतून पक्षांना मिळणाऱ्या मतांच्या प्रमाणात होते. वीस वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नॉर्वेजियनांना मतदानाचा, तर २१ वर्षे पूर्ण झालेल्यांना निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. स्त्रियांना हा अधिकार १९१३ पासून मिळाला आहे. स्टॉर्टिंगची निवड झाल्यावर त्यातील १/४ सभासदांची वरिष्ठ सभेसाठी (लॉगटिंगसाठी) नियुक्ती त्याच प्रतिनिधिंमार्फत होते व उरलेले ३/४ सभासद कनिष्ठ सभागृहाचे (ओडेलस्टिंग) सभासद राहतात. विधेयके प्रथम कनिष्ठ सभागृहापुढे मांडली जातात व तेथून ती वरिष्ठ सभेच्या मान्यतेनंतर राजाच्या संमतीसाठी पाठविली जातात. मतभेदाच्या वेळी अथवा घटनादुरूस्तीसाठी संसदेची एकत्र सभा घेऊन २/३ मताधिक्याने निर्णय घेतले जातात. प्रधानमंत्र्यासह १६ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ असून ते संसदेला जबाबदार असते. मंत्र्यांना संसदेच्या बैठकीस उपस्थित राहता येते पण त्यांना तेथे मताधिकार नसतो.


एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात देशात संघटित राजकीय पक्ष विकसित झाले. त्यांत मजूर पक्ष, पुराणमतवादी पक्ष, मध्यम पक्ष, ख्रिश्चन पीपल्स पार्टी, सोशलिस्ट, उदार पक्ष, अँडर्स लांगेज पार्टी असे पक्ष आहेत. सध्या (१९७७) मजूर पक्षाचे मंत्रिमंडळ आहे. शासकीय सोयीसाठी नॉर्वेचे एकोणीस फिल्कर म्हणजे परगणे केलेले आहेत. ऑस्लो, बर्गेन या मोठ्या शहरांना परगण्यांचा दर्जा आहे. चौसष्ट शहरे व सहाशेऐंशी नगरपालिकीय परिषदा यांच्यामार्फत स्थानिक कारभार पाहिला जातो. सामाजिक सुरक्षा, स्थानिक रस्ते, शिक्षण, ग्रंथालये इ. बाबी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कक्षेत येतात.

नॉर्वेच्या न्यायदान व्यवस्थेत तडजोड व लवादाच्या तत्त्वाला विशेष महत्त्व दिलेले आहे. प्रत्येक परगण्यासाठी एक लवाद-मंडळ असून किरकोळ दिवाणी तंटे प्रथम या मंडळाकडे सोपविले जातात. तेथे निर्णय अथवा तडजोड न झाल्यास ते तंटे प्राथमिक न्यायालयापुढे म्हणजे ‘हेरेड्‌सरेट’ पुढे चालविले जातात. त्याचाही निर्णय मान्य नसल्यास उच्च न्यायालयाकडे म्हणजे ‘लागमान्सरेट’ कडे दाद मागता येते. प्राथमिक दर्जाचा १०४ व उच्च दर्जाची ५ न्यायालये आहेत. सर्वोच्च न्यायालयास हॉयस्टेरेट म्हणतात. त्यात सरन्यायाधीशाव्यतिरिक्त १७ दुय्यम न्यायाधीश असतात आणि सर्व अपिले पाच न्यायाधीशांसमोर चालतात. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी या देशातील ‘ओंबुड्‌समन’ म्हणजे लोकपालाची पद्धत अभिनव आहे. लोकपालपद कायद्याने १९६३ मध्ये स्थापन करण्यात आले. या अधिकाऱ्यामार्फत शासकीय अधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीची अथवा अधिकाराच्या गैरवापराची चौकशी केली जाते. लोकपाल दरवर्षी सु. १,००० प्रकरणे हाताळतो, त्यांपैकी २०% तक्रारींत बरेचसे तथ्य आढळते. अशा तऱ्हेने शासनावर वचक ठेवता येते.

नॉर्वेची लोकसंख्या लहान व सरहद्द खूप विस्तीर्ण यांमुळे संपूर्ण सरहद्द सांभाळणे अवघड आहे. नॉर्वेचे आरमार व्हायकिंगकाळापासूनप्रसिद्ध आहे. हवाई दल मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित झाले आहे. भूदलात २०,००० नौदलात ९,००० व वायुदलात १०,००० सैनिक आहेत. होमगार्डांकडे स्थानिक संरक्षणाचे काम असते. त्यांची दले छोटी व विभागापुरती मर्यादित असतात. नॉर्वेमध्ये २० ते ४५ वर्षे वयाच्या दरम्यानच्या प्रत्येक पुरूषास १२ ते १५ महिने लष्करी सेवा सक्तीची आहे. १९७७ च्या अंदाजपत्रकातील ६,२८२·५ कोटी क्रोनरपैकी ५६९·३ कोटी क्रोनर संरक्षणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

आर्थिक स्थिती : आज नॉर्वे आर्थिक दृष्ट्या समृद्ध दिसतो तो मुख्यतः उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे. जलविद्युत् शक्तीचा विकास होण्यापूर्वी म्हणजे या शतकाच्या सुरूवातीस नॉर्वे हा मुख्यत: कृषिप्रधान देश होता. असमान भूपृष्ठरचना व हलक्या प्रतीची जमीन यांमुळे पुरेशी जमीन लागवडीखाली येऊ शकत नाही. आजही देशातील ७६% भूमी बिनउपजाऊ असून २१% अरण्यव्याप्त व फक्त ३% शेतीसाठी उपलब्ध आहे. यातील निम्म्याहून अधिक यॅरन व ट्रन्नलाग या प्रदेशांत आहे. शेताखालील जमीन दऱ्याखोऱ्यांतून, फ्योर्डच्या व सरोवरांच्या जवळपास आहे. सलग असा शेतीप्रधान पट्टा आढळतच नाही. बहुतेक शेते २·५ हेक्टरांपेक्षा लहान आहेत. शेती खाजगी मालकीची असून शेतमजुरांत स्त्रियांचे प्रमाण मोठे आहे. यांत्रिक शेती विशेष लाभदायक नाही. १९७५ मध्ये बटाटे ४·३५ लक्ष टन, सातू ४·४५ लक्ष टन, ओट २·५९ लक्ष टन व गहू फक्त ४८ हजार टन असे उत्पादन झाले होते. गवताचे उत्पादन पशूखाद्य म्हणून २६ लक्ष टनांपर्यंत होते. दुभत्या गाईंची संख्या ४·०२ लक्ष व एकूण गाईगुरांची ९·१५ लक्ष, मेंढ्यांची आणि बकऱ्यांची संख्या अनुक्रमे १६·३९ लक्ष व ६९,००० होती. त्याचप्रमाणे घोडे व डुकरे यांची संख्या अनुक्रमे २२,००० व ६·६९ लक्ष होती. शेतकरी पशुपालन आणि दुग्धव्यवसाय हे दोन महत्त्वाचे जोडधंदे करतात. पशुपालनात वराहपालन व कुक्कुटपालन हे व्यवसाय नवीन आहेत. कोंबड्यांची संख्या ४१·२१ लक्ष होती (१९७४). यांशिवाय लव व मऊ लोकर यांनी युक्त असलेली फर प्रकारची कातडी कमावण्याचा व्यवसाय अधिक जोम धरीत आहे. त्याला बाजारात फार किंमत आहे. १९७४–७५ मध्ये मिंक या प्राण्याच्या सु. १४·७५ लक्ष कातड्यांची निर्मिती झाली होती. शेतीसाठी अतिशय कमी भूमी उपलब्ध असल्याने नॉर्वेला प्रतिवर्षी प्रमुख अन्नधान्ये आयात करावी लागतात. दुग्धव्यवसायातील उत्पादने, अंडी व मांस या बाबतींत देश स्वयंपूर्ण आहे.

मच्छीमारी हा नॉर्वेचा प्रमुख व्यवसाय आहे. उष्ण प्रवाहामुळे नॉर्वेचा किनारा मत्स्यसमृद्ध आहे. नॉर्वेची सागरी सरहद्द १९·२ किमी. पर्यंत वाढविण्यात आली आहे. मासेमारीत १९७५ मध्ये एकूण २० हजार लोक गुंतले होते. त्यांतील ११ हजार लोकांचा हा दुय्यम व्यवसाय आहे. यांत्रिक नावांची संख्या ३१ हजार असून मासळीचे उत्पादन १४ लक्ष टन आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे कोळ्यांची संख्या कमी होत असली, तरी यांत्रिकीकरणामुळे उत्पादन दुप्पट झाले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी माशांच्या थव्याचा शोध घेतला जाऊन ती माहिती कोळ्यांना पुरविली जाते. कॉड व व्हेल (देवमासा) हे प्रमुख मासे सापडतात. आर्क्टिक महासागरातील फिनमार्क, आइसलँड, स्वालबार या केंद्रातील व्हेल माशांची संख्या घटत गेल्याने आता अंटार्क्टिकमधील प्रदेशाजवळ ही मासेमारी चालते. १९०५ पासून व्हेलवर प्रक्रिया करणारे व त्यांचे तेल काढणारे कारखाने बोटीवरच उभारले जाऊ लागले. माशांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. ते वाळविले, खारविले व डबाबंद केले जातात. त्यांचा खत म्हणूनही वापर होतो. तथापि माशांपासून तेल काढण्याचा धंदा किफायतशीर पडतो. शीतगृहांची संख्या वाढल्याने आता माशांचा अन्न म्हणून उपयोग वाढू लागला आहे.

नॉर्वेची आजची आर्थिक समृद्धी प्रमुखत: जलविद्युत्उत्पादनवाढीत आहे. विसाव्या शतकात हे उत्पादन झपाट्याने वाढले. नॉर्वेत एकूण १·५ कोटी किवॉ. वीज निर्मितीची सुप्त शक्ती आहे. तीपैकी ४९% आज वापरात आहे. औष्णिक वीज उत्पादन नगण्य म्हणजे ०·३% आहे. विद्युत्‌शक्तीचा वापर प्रामुख्याने धातु–व्यवसाय, कागद, रासायनिक आणि खतांचे उद्योगधंदे यांत होतो. घरांतूनही विजेचा वापर भरपूर आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी उद्योगधंद्यांत गुंतलेल्यांची संख्या अडीच लाख होती, ती पन्नास वर्षांत दुप्पट झाली.


नॉर्वेची कारखानदारी प्रामुख्याने प्रक्रियात्मक आहे. मासे, वनोत्पादित वस्तू व खनिजे यांचा यात प्रामुख्याने उपयोग होतो. विजेच्या वापरामुळे रसायने व यंत्रे तयार करण्याचे कारखानेही पुष्कळ आहेत. जलविद्युत् हा सर्व व्यवसायांचा पाया होय. घनदाट अरण्यांमुळे कागद व कागदाचा लगदा हा नॉर्वेतील एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. बरेचसे शेतकरी हा जोडव्यवसाय म्हणून करतात. लेखनोपयोगी चिवट व शुभ्र कागद हे नॉर्वेचे वैशिष्ट्य आहे. निर्यातीच्या उद्देशाने कागद, कागदाचा रांधा, डबाबंद मासे, माशाचे तेल, रसायने, धातू व यंत्रे यांवर अधिक भर आहे. उत्तम प्रकारचे लोह-पोलाद आणि ॲल्युमिनियम निर्माण केले जाते. विजेची उपकरणे, सागरी तेलवाहू जहाजे, तरते सागरी कारखाने हे यंत्रोद्योगही महत्त्वाचे आहेत. पोलाद ६·५ लक्ष टन बीड लोखंड ६·५ लक्ष टन, ॲल्यमिनियम ५·५ लक्ष टन, जस्त ७३ हजार टन निकेल ४३ हजार टन व तांबे ३३ हजार टन याप्रमाणे १९७२ मधील धातूंचे उत्पादन होते. व्यवसायानुसार लोकांचे वर्गीकरण यंत्रोद्योग आणि बांधकाम ३३%, शेती व अरण्यव्यवसाय २७%, शासन व इतर १७%, व्यापार ११%, वाहतूक ९%, मच्छीमारी २% आणि खाणकाम १% असे आहे. नॉर्वेमध्ये मालक-मजूर संबंध बरेच समाधानकारक आहेत. बहुतेक मजूरसंघ देशाच्या मजूर महासंघांशी संलग्न आहेत. मजूर-मालक वाद राष्ट्रीय मध्यस्थ मंडळाकडे सोपविले जातात. तडजोडीचा हा मार्ग संपला तरच संप, टाळेबंदी इ. मार्गांचा अवलंब केला जातो. त्यानंतर संसद विशेष मंडळ नियुक्त करून वाद मिटविते. कारखाने आग्नेय भागात ऑस्लोच्या जवळपास ड्राम्मन, मॉस, फ्रेड्रिक्स्टा, साफ्योर, या उपनगरांतून व पश्चिम किनाऱ्यावर ह्यूआंगर, टिझ्‌डेल, बर्गेन स्टॉव्हांगर या शहरांतून केंद्रित झाले आहेत.

ऑस्लो, बर्गेन, स्टाव्हांगर, त्रॉनहेम या नॉर्वेच्या प्रमुख बाजारपेठा असून तेथून स्वीडन, प. जर्मनी, ग्रेट ब्रिटन, डेन्मार्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व फ्रान्स या देशांशी व्यापार चालतो. १९७५ मध्ये आयात सु. ५०·५४ अब्ज क्रोनर आणि निर्यात ३७·९२ अब्ज क्रोनर होती. आयातीत प्रामुख्याने यंत्रे व वाहतुकीची साधने, खनिजे, खनिज तेल, कापड, रसायने या वस्तू अंतर्भूत आहेत, तर निर्यातीत यंत्रे व वाहतुकीची साधने, धातू व धातूनिर्मित वस्तू, कागद व रांधा, प्राणिज अन्नपदार्थ यांचा सामावेश होतो. आयात-निर्यातींमधील तफावत बहुतांशी नॉर्वेच्या जहाजभाड्याच्या कमाईतून व हौशी प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून भरून निघते. १८७५ पासून नॉर्वेमध्ये कायद्याने दशमान पद्धतीमान्य झालेली आहे. क्रोन हे नॉर्वेचे चलन असून १ क्रोनची किंमत आपल्याकडील सव्वा रूपयाच्या आसपास येते. एका क्रोनचे शंभर भाग केलेले आहेत, त्यांना ‘ओर’ म्हणतात. नॉर्वे बँक ही १९४९ पासून राष्ट्रीय बँक झाली व तिलाच फक्त चलन काढण्याचा अधिकार आहे. याशिवाय ३२ मर्यादित खाजगी बँका आणि ४३२ बचत बँका आहेत. १९७७ च्या अंदाजपत्रकात ४,६३७·२० कोटी क्रोनर जमेच्या बाजूस व ६,२८२·५० कोटी क्रोनर खर्चाच्या बाजूस दाखविले होते.

वाहतूक व संदेशवहन :लांबट आकार, तीव्र चढउतार व हिमाच्छादन यांमुळे नॉर्वेतील स्थलवाहतूक ही एक समस्याच आहे. देशात १८५४ मध्ये रेल्वेची सुरुवात झाली व १९७६ मध्ये लोहमार्गांची लांबी अवघी ४,२४१ किमी. होती व त्यांपैकी २,४४० किमी. सरकारी मार्गांचे व १६ किमी. खाजगी मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. रेल्वेचे राष्ट्रीयीकरण झालेले आहे. रेल्वेचे प्रमुख मार्ग ऑस्लोपासून निघून पश्चिमेकडे स्टाव्हांगर आणि बर्गेन या बंदरांकडे जातात. उत्तरेकडील मार्ग त्रॉनहेमवरून बोडपर्यंत जातो. देशात अद्यापही उत्तर-दक्षिण भाग जोडणारा रेल्वेमार्ग नाही. स्वीडनमध्ये जाण्यासाठी ऑस्लोहून दोन आणि त्रॉनहेमहून एक मार्ग आहे. स्वीडनमधील कीरूनापासून नॉर्व्हिक बंदरापर्यंतचा रेल्वेरस्ता हा मुख्यत्वेकरून लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी वापरला जातो. रेल्वेला १९७४ साली २५ कोटी क्रोनरचा तोटा सोसावा लागला. रेल्वेची उणीव मोटारींच्या वाढत्या संख्येने भरून निघू शकते. १९७५ मध्ये स्वयंचलित वाहनांची संख्या ९,५३,६५७ खाजगी गाड्या व टॅक्सी, १,३८,४६३ मालवाहू गाड्या, ८,७१४ बसगड्या आणि १,३४,९१२ मोटारसायकली व स्कूटर अशी आहे. एकूण रस्त्यांची लांबी ७७,११७ किमी. असली, तरी त्यांतील फक्त २४,८९७ किमी. डांबरी व पक्के आहेत.

विमानवाहतूक वाढती असून ती हिवाळ्यात जास्त असते. अंतर्गत वाहतूक खाजगी विमान कंपन्यांमार्फत चालते. देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे चार व अन्य ३४ विमानतळ आहेत. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक स्कॅंडिनेव्हियन एअऱ सर्व्हिस (एस्एएस्) या नॉर्वे, स्वीडन व डेन्मार्क या तीन राष्ट्रांच्या सहकार्याने १९५१ साली निर्माण झालेल्या कंपनीमार्फत चालते. यात नॉर्वेचा २८% हिस्सा आहे.

नॉर्वेला प्रदीर्घ व खुला सागरी किनारा लाभला असल्याने किनाऱ्यावरील व खोल समुद्रातील सागरी वाहतुकीत हा देश अग्रेसर आहे. व्यापारी जहाजांबाबत या देशाचा जगात तिसरा क्रमांक आहे. १९७६ साली यात २,८१९ जहाजांचा समावेश होता व त्यांचा एकूण टनभार २·६८ कोटी टन होता. याशिवाय छोट्या मच्छीमारी नौका, कारखानाजहाजे व बर्फफोड्या नौका यांची संख्या ७५५ होती आणि टनभार २,५६,००० टन होता. असंख्य बेटांमुळे किनारी वाहतूक अतिशय महत्त्वाची आहे. अंतर्गत जलप्रवाहांचा उपयोग मुख्यत: लाकूड वाहतुकीसाठी आणि पाणवीज उत्पादनासाठी केला जातो. जगातील कोणताच देश आपल्या सागरी वाहतुकीवर इतका निर्भर नसले.

संपर्कसाधनांपैकी १९७५ मध्ये १४,०६,९९५ (प्रत्येक १०० व्यक्तींमागे ३४) दूरध्वनी व १२,९९,५१८ रेडिओ होते. दूरचित्रवाणी संचांची संख्या १०,५१,१२५ होती.

लोक व समाजजीवन: सु. दोन हजार वर्षांपूर्वीपासून मध्य यूरोपातील नॉर्डिक वंशाचे लोक नॉर्वेत राहू लागले. गौरवर्णीय, उंच बांध्याचे, उभट चेहऱ्याचे हे नॉर्डिक वंशीय लोक बहुसंख्य असून ते व्हायकिंगांचे पूर्वज होत. दक्षिणेकडे गोल चेहऱ्याच्या अल्पाइन वंशाचे मिश्रण आढळते, तर अतिउत्तरेकडे शुद्ध लॅप वंशाचे लोक आढळतात. त्यांची संख्या फक्त २०,००० आहे. विस्ताराच्या मानाने यूरोपातील कोणत्याही देशापेक्षा नॉर्वेची लोकसंख्या कमी आहे. १९७४ साली ती ३९,७२,९९० होती. म्हणजे सरासरी घनता द. चौ. किमी. ला १२·३ पडते. उत्तरेकडे व डोंगराळ भागात ती याहून विरळ असून पश्चिम किनाऱ्यालगत व दक्षिणेकडे ती दाट आहे. नॉर्वेतील समाज सामान्यत: ग्रामीणच आहे. ऑस्लो, त्रॉनहेम व स्टाव्हांगर हीच काय ती मोठी शहरे आहेत. ग्रामीण लोकसंख्या सु. २२ लक्ष व नागरी सु. १७·५ लक्ष आहे. समानतेची व लोकशाहीची भावना नॉर्वेतील लोकांमध्ये खूप खोलवर रुजलेली आहे. उच्च-नीच, सरदारउमराव, सेवक, स्त्री-पुरुष असे भेद व्यवहारांत आढळत नाहीत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत उपजीविकेची साधने मर्यादित होती, म्हणून बरेच लोक उत्तर अमेरिकेत स्थायिक झाले. आता ही स्थिती बदलली आहे.


नॉर्वेत ल्यूथरप्रणीत प्रॉटेस्टंट पंथ हा ९७% लोकांचा व राजमान्य धर्म आहे. पण अन्य पंथांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्रॉनहेम येथे नॉर्वेतील सर्वांत जुने मुख्य प्रार्थनामंदिर असून अजूनही नॉर्वेचा राजा गादीवर येताच येथे आशीर्वादासाठी येतो.

विसाव्या शतकापूर्वी दिसून येणारी कौटुंबिक भावना आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. याचे कारण शासनातर्फेच बऱ्याच समाजकल्याणकारी गोष्टी अंमलात येतात. नॉर्वेतील लोकांचा आहार सकस व समतोल असल्याने सामान्य मनुष्य सुदृढ आणि दीर्घायुषी आहे. पुरुषांची सरासरी आयुर्मर्यादा ७१ वर्षांची व स्त्रियांची ७६ वर्षांची आहे. समाजस्वास्थ संस्थाचे २० लक्ष सदस्य असून सर्वांना सरकारी वैद्यकीय मदत स्वस्त व सुलभ रीत्या मिळते. १९६७ पासून सर्व वृद्धांना सेवानिवृत्तिवेतन देण्याचा कायदा अंमलात आला आहे. आरोग्य सुविधांमुळे रोगराईचा अभाव असून मृत्यूचे प्रमाण दर हजारी ९·८ आहे, जननप्रमाणही कमी म्हणजे दर हजारी १६·२ आहे. यामुळे लोकसंख्यावाढीचा प्रश्न भेडसावत नाही. ग्रामीण भागांतून लाकडी बांधणीची दुमजली घरे आढळतात, तर शहरांतून काँक्रीटच्या इमारती दिसतात. दुसऱ्या महायुद्धानंतर शहरांतून घरांची टंचाई भासत आहे.

भाषा व साहित्य : नॉर्वेजियन ही इंडो-यूरोपीय भाषा-कुटुंबाच्या जर्मानिक शाखेच्या स्कॅंडिनेव्हियन गटाची एक भाषा आहे. स्वीडिश व डेन लोकांना ती सहज समजते. या भाषेचे दोन प्रकार प्रचारात आहेत. पहिल्या प्रकारास बुकमाल (बुक नॉर्वेजियन) म्हणतात. यावर डॅनिश भाषेचा प्रभाव असून ती व्यवहारात अधिक वापरात आहे. हीच राज्यशासनाची भाषा आहे. दुसऱ्या प्रकारास न्यूनूर्स्क (न्यू नॉर्वेजियन) म्हणतात. ही आधुनिक वाड्‌मयीन भाषा असून ललित साहित्यात तिचा वापर आधिक आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही प्रकार शिकावे लागतात. उत्तरेकडील लॅप लोक हंगेरियन भाषेशी संबंधित लॅप भाषा बोलतात.

आधुनिक यूरोपीय भाषा-साहित्यांत नॉर्वेजियन साहित्याला महत्त्वाचे स्थान आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या सुमारास रूनिक लिपीत कोरलेले काही लेख म्हणजे ह्या साहित्याचे आदिरूप. नॉर्वेजियनांचे आरंभीचे साहित्य ओल्ड नॉर्समध्ये असून स्कॅंडिनेव्हियन मिथ्यकथांचा संपन्न वारसा त्याला लाभलेला आहे. चौदाव्या शतकात डॅनिश भाषेचा वरचष्मा वाढल्यामुळे नॉर्वेजियन भाषेतील साहित्यनिर्मिती दीर्घकाळ खुरटली आणि पेट्टर डास हा महत्त्वपूर्ण कवी उदयास येण्यासाठी सतरावे शतक अर्धे उलटून जावे लागले. अठराव्या शतकात लूद्‌व्ही हॉल्बर्ग ह्या साहित्यिकाने डॅनिश-नॉर्वेजियन साहित्यिकांना एक आधुनिक साहित्यदृष्टी दिली, तथापि स्वतःच्या साहित्यकृती डॅनिश भाषेतच रचिल्या. एकोणिसाव्या शतकात इब्सेन आणि ब्यर्न्‌सॉन हे दोन श्रेष्ठ नाटककार उदयास आले, पेटर क्रिस्टेन आस्ब्यर्नसेन आणि यर्जन मो ह्यांनी नॉर्वेजियन लोककथा जमवून त्या प्रसिद्ध केल्या. पेटर आनड्रेआस मुंक ह्याने नॉर्वेचा अष्टखंडात्मक इतिहास लिहिला. हेन्रिक व्हॅर्‌गेलान आणि योहान व्हेलहाव्हेन व व्हिन्ये हे या शतकातील काही महत्त्वाचे कवी. क्नूट हामसून हा श्रेष्ठ कादंबरीकार. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कादंबरीलेखन विशेष लक्षवेधी ठरले. सिग्री उनसेट आणि ओलाफ डून ही ह्या संदर्भातील दोन विशेष उल्लेखनीय नावे. हॅर्मान वाइल्डन्‌व्ही, ओलाफ बूल, ओलाव्ह ऑक्रस्ट, आर्नुल्फ अव्हरलान हे विसाव्या शतकातील काहीउल्लेखनीय कवी होत. कादंबरीकार सिग्गुर्ड होएल आणि नाटककार हेल्गे क्रोग हे अन्य उल्लेखनीय साहित्यिक.

शिक्षण : १८६० पासून नॉर्वेत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. मुलांमुलींना एकत्र शिक्षण देण्यात येते व त्यांना सातव्या वर्षी शाळेत घालावे लागते. तेथून पुढे नऊ वर्षे प्राथमिक शिक्षण देतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना धंदेशिक्षणाकडे किंवा उच्च शिक्षणाकडे जाता येते. प्राथमिक शिक्षणानंतर तीन वर्षे माध्यमिक शिक्षणक्रम पूर्ण केल्यावरच विद्यापीठात प्रवेश मिळतो. ग्रामीण विद्यार्थ्यांना वयाच्या सतराव्या वर्षी एक वर्षाचे विशेष शिक्षण दिले जाते. शिक्षण मोफत असून शिक्षणाचा खर्च स्थानिक स्वराज्य संस्था व फिल्कर (परगणे) सोसतात. १८११ मध्ये ऑस्लो विद्यापीठ स्थापन होईपर्यंत डॅनिश राज्यकर्त्यांनी या देशात विद्यापीठ स्थापनेस खीळ घातली होती. त्यानंतर १९४८ मध्ये बर्गेन विद्यापीठ स्थापन झाले. त्रॉनहेम येथे एक शासकीय तंत्रविद्यालय आहे. याशिवाय दोन वैद्यक, एक कृषी व एक पशुवैद्यक अशी महाविद्यालये आहेत. विश्वविद्यालयीन शिक्षण येणारे बरेच विद्यार्थी स्वावलंबनाने आपले शिक्षण पूर्ण करतात. धंदेशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अडीचपट आहे. परदेशांतील विश्वविद्यालयांतून सु. तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. नॉर्वेत साक्षरतेचे प्रमाण ९७% आहे.

कला व क्रीडा: नॉर्वेतील कलांना पारतंत्र्यामुळे विशेष उठाव मिळाला नाही, तरी नाट्य, शिल्प व संगीतादी कलांत या देशाने उल्लेखनीय भर टाकली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इब्सेनसारखे जागतिक कीर्तीचे नाटककार होऊन गेले. त्यांनी नाट्यकलेला एक नवीन वळण दिले. ब्यर्न्‌सॉन हा नाटककारही समकालीन होता. त्याने गोपालांचे व ग्रामीण जनतेचे जीवन जवळून रंगविले. या दोघांच्या प्रभावाने नाट्यकलेला बहर आला आहे. ऑस्लो, बर्गेन, त्रॉनहेम, स्टाव्हांगर या शहरांत भव्य नाट्यगृहे असून, त्यांत व्यावसायिक नाट्यमंडळांचे प्रयोग सतत होत असतात. शासकीय साहाय्य असलेली एक नाट्यसंस्था नॉर्वेच्या ग्रामीण भागासाठी वर्षाकाठी साडेसहाशे प्रयोग करते. दुर्गम भौगोलिक रचनेमुळे या देशातील ग्रामीण विभाग अलगअलग पडले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे ग्रामीण लोकसंगीत, नृत्य यांची विविधता भरपूर दिसून येते व स्थानिक अभिमानाने तेथील लोकांनी या गोष्टींची परंपरागत जपणूक केलेली आढळते. या गोष्टींनी प्रभावित होऊन ओले बूल या व्हायोलिनवादकाने व एडव्हार्ट ग्रिग या संगीतकाराने संगीतात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. हल्ली ग्रिगच्या स्मरणार्थ बर्गेन येथे दरवर्षी नाट्य-संगीतादी कलांच्या स्पर्धा होतात.

मूर्तिकला व चित्रकला यांचा ख्रिस्तपूर्व काळातही नॉर्वेत पुष्कळ विकास झाला होता. त्रॉनहेमच्या निडॅरोस कॅथीड्रलमधील अकराव्या शतकातील शिल्प उच्च दर्जाचे आहे, तर तेराव्या शतकातील गॉथिक प्रार्थनामंदिरात चित्रकलेच्या अप्रतिम कलाकृती आहेत. अर्वाचीन काळातील चित्रकार एडव्हार्ट मुंक आणि मूर्तिकार गुस्ताव्ह व्हीगेलान हे विश्वविख्यात आहेत.

विपुल मुक्त प्रदेश मिळाल्यामुळे नॉर्वेतील लोक उघड्यावरील खेळांचे भोक्ते आहेत. हिवाळ्यात बर्फावरून घसरण्याचे स्कीईंग व स्केटिंग हे खेळ लोकप्रिय आहेत. अशा प्रकारच्या खेळांत ऑलिंपिक सामन्यांत नॉर्वे अग्रगण्य आहे. यांशिवाय वनविहार, गिर्यारोहण, पोहणे, नौकाविहार, मासे पकडणे हेही विशेष लोकप्रिय आहेत.


महत्त्वाची स्थळे: १९२४ पूर्वी ज्याला क्रिस्तियाना म्हणून ओळखत असत तेच आज नॉर्वेचे प्रमुख शहर, आणि राजधानी ऑस्लो (लोकसंख्या ४,६३,०२२ : १९७६) होय. बंदर ऑस्लो फ्योर्डच्या परिसरात वसलेले हे शहर भोवतालच्या छोट्या औद्योगिक शहरांनी वेढलेले आहे. व्हीगेलान पार्कमध्ये उत्तम शिल्पकृती पहावयास मिळतात. बिगडॉय येथे प्राचीन काळापासून आजपर्यंत वापरात असलेल्या विविध प्रकारच्या सागरी नौकांचा संग्रह आहे. पश्चिम किनाऱ्यावरील बर्गेन (लोकसंख्या २,१३,५९४) हे वेगाने विकास होणारे शहर व बंदर असून, त्याला दुय्यम राजधानीचे महत्त्व प्राप्त झाले. त्रॉनहेम (लोकसंख्या २,३४,८८९) हे उत्तरेकडील सर्वांत मोठे ऐतिहासिक शहर असून, तेथील सेंट ओलाफचे प्रार्थनामंदिर म्हणजे प्राचीन गॉथिक शिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सर्वांत दक्षिणेकडील स्टाव्हांगर (लोकसंख्या ८६,६४३) हे चौथे मोठे शहर होय.

निसर्गाचे नॉर्वेला इतके श्रेष्ठ वरदान लाभले आहे की, मानवी कलाकृती त्यापुढे खुज्या वाटतात. तरीही मानवाने निसर्गावर मिळविलेल्या विजयाच्या खाणाखुणा नॉर्वेत सर्वत्र आढळत असल्याने, हौशी प्रवाशांची तेथे बेसुमार गर्दी असते. एप्रिल मध्यापासून जुलै अखेरपर्यंत बोड, ट्रॉम्स या भागांतील मध्यरात्रीच्या सूर्याचे आकर्षण, रौद्र-भयानक फ्योर्ड, बर्फाने आच्छादलेली पर्वतशिखरे, गर्द हिरवी दऱ्याखोरी आणि सर्वत्र अधूनमधून आढळणारे लहानमोठे जलप्रवाह व सरोवरे या सर्व गोष्टी प्रवाशांना आकर्षून घेतात. किनाऱ्यावरील सुरक्षित भागांत हौशी प्रवाशांसाठी २ लक्ष कुटीरे आहेत. नार्वेच्या उत्पन्नात हौशी प्रवाशांपासून मिळणाऱ्या रकमेचा मोठा वाटा आहे.

स्वालबार द्वीपसमूह:७४° उ. ते ८१° उ. व १०° पू. ते ३५° पू. यांदरम्यानचा ६२,००० चौ. किमी. चा हा द्वीपसमूह नॉर्स लोकांनी ११९४ मध्ये व डच नाविक बॅरेंट्‌स याने पुन्हा १५९६ मध्ये शोधला. सतराव्या शतकात तेथील व्हेल माशांच्या शिकारीसाठी डच, ब्रिटिश व डेन-नॉर्वेजियन लोकांत मोठे तंटे होते. अठराव्या शतकात व्हेलची शिकार बंद पडल्यावर तंटेही बंद पडले. विसाव्या शतकात तेथे कोळसा मिळू लागला. १९२० मध्ये स्वालबारवरील नॉर्वेचा अधिकार मान्य होऊन, १९२५ मध्ये द्वीपसमूह अधिकृतपणे नॉर्वेत समाविष्ट झाला. १९७४ अखेर येथील ३,४७२ लोकसंख्येपैकी ९८७ नॉर्वेजियन व २,४८५ सोव्हिएट रशियाचे होते. १९७४ मध्ये ४,११,७८० मे. टन कोळसा नॉर्वेजियन खाणींतून व ४,४१,७३३ मे. टन कोळसा रशियन खाणींतून निर्यात झाला. तेलाचाही शोध चालू आहे. पाच ठिकाणी नॉर्वेची हवामानविषयक रेडिओकेंद्रे आहेत. १९७५ मध्ये एक विमानतळ झाला आहे.

यान मायेन बेट: ७१° उ. व ८° ३० प. यांदरम्यानचे हे डोंगराळ-ज्वालामुखीजन्य व ओसाड बेट ३८० चौ.किमी. चे असून, त्याचे बीरेनबर्ग शिखर २,२७७ मी. उंच आहे. १९७० मध्ये सुप्त ज्वालामुखीक्रिया पुन्हा सुरू झाली. १६१४ मध्ये यान याक्रॉप्स मे या डच व्हेल शिकाऱ्याने याचा निश्चित शोध लावला. येथे सील माशाच्या व केसाळ कातड्याच्या प्राण्यांच्या शिकारीसाठी लोक मधूनमधून येत. १९२१ मध्ये तेथे नॉर्वेने हवामान व रेडिओ यांची केंद्रे स्तापिली. १९२९ मध्ये ते नॉर्वेत सामील करण्यात आले. तेथे विमानांसाठी धावपट्टी व लोरॅन आणि कॉन्सॉक स्टेशने अनुक्रमे १९६३–१९६८ मध्ये स्थापण्यात आली.

बूव्हे बेट: हे ५४° २६ द. व ३° २४ पू. यांदरम्यानचे ४८ चौ. किमी चे ओसाड बेट, बूव्हे या फ्रेंच नाविकाने १७३९ मध्ये प्रथम शोधले. १८२५ मध्ये कॅ. नॉरिसने तेथे युनियन जॅक फडकाविले. नॉर्वेने १९२७ मध्ये ते व्यापले व १९२८ मध्ये ब्रिटनने या बेटावरील आपला हक्क नॉर्वेसाठी सोडला. १९३० मध्ये ते नॉर्वेत समाविष्ट झाले.

पीटर १: हे ६८° ४८ द. व ९०° ३५ प. वरील १८० चौ. किमी. चे ओसाड बेट, १८२१ मध्ये एका रशियन समन्वेषकाने प्रथम पाहिले. १९२९ मध्ये येथे नॉर्वेच्या पथकाने आपले निशाणलावले. १९३३ मध्ये ते नॉर्वेचा अवलंबी प्रदेश करण्यात आले.

क्वीन मॉड लँड : अंटार्क्टिका खंडाच्या २०° प. ते ४५° पू. चा फॉकलंड बेटाच्या अवलंबी प्रदेशापासून ऑस्ट्रेलियाच्या अवलंबी प्रदेशापर्यतचा प्रदेश १९३९ मध्ये नॉर्वेचा अवलंबी प्रदेश केला गेला. हा फक्त नॉर्वेच्या लोकांनीच संशोधिलेला होता. १९४९ पासून अनेक देशांच्या पथकांनी येथे समन्वेषण केले. १९५७ मध्ये ड्रॉनिंग मॉड लँड नावाने या प्रदेशात नॉर्वेच्या अवलंबी प्रदेशाचा दर्जा दिला गेला.

संदर्भ : 1. Larsen, Karen, A History of Norway, Princeton, 1948.

           2. Sonne, Axel, Ed. The Geography of Norway, New York, 1961.

           3. Vovt, Per, Norway Today, Oslo, 1961.

आठल्ये, द. बा.


नार्वे


संसदभवन, ऑस्लो.

मध्यरात्रीचा सूर्य : नॉर्वेतील वैशिष्ट्यपूर्ण निसर्गदृश्य.

राजधानी ऑस्लो : एक दृश्य.

उत्तर नॉर्वेतील लॅप जमातीची स्त्री

स्केटिंग : नॉर्वेचा राष्ट्रीय खेळ.

पारंपरिक काष्ठशिल्प : लोण्याचा करंडक.

आधुनिक कागद कारखान्यातील एक दृश्य

विळख्यात गुंतलेल्या मानवाकृतींचे स्तंभशिल्प, व्हीगेलान पार्क, ऑस्लो.

सामाजिक उत्सवातील पारंपरिक नृत्यप्रकार

तांब्याच्या खाणीचा परिसर