ताशकंद : एक द्दश्य.

ताश्कंद : रशियन संघराज्यातील उझबेकिस्तान प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या १५,९५,००० (१९७५). मध्य आशियातील खुष्कीच्या व्यापारी मार्गावर वसलेले हे प्राचीन मोठे शहर सिरदर्या नदीच्या चिरचिक या उपनदीवर आहे. ट्रान्स–कॅस्पियन लोहमार्गामुळे याची अधिकच भरभराट झाली. हे मोठे औद्योगिक केंद्र असून येथे शेतीची अवजारे, खाणयंत्रे, रेडिओ, विजेच्या तारा व उपकरणे, रसायने, फर्निचर, कातडीसामान, मातीची भांडी, अन्नपदार्थ यांचे मोठे कारखाने व पीठगिरण्या, कापडगिरण्या, कापूस पिंजणे, मद्ये, डबाबंद पदार्थ, मांस, तंबाखू, इ. विविध उद्योग आहेत. चिरचिक नदीवर धरणे बांधून गावात अनेक कालवे व वीज आणली आहे. येथे विद्यापीठ, औद्योगिक, वैद्यकीय, कृषी आणि शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये, उझबेक शास्त्र अकादमी, राष्ट्रीय ग्रंथालय, ऐतिहासिक संग्रहालय, नाट्यगृह इ. अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था आहेत. आठव्या ते अकराव्या शतकांतील अरब सत्तेनंतर येथे मंगोल,  उझबेक, कझाक, कोकंद वगैरे खानती (खानत–खानाच्या ताब्यातील प्रदेश) झाल्या. १८६५ मध्ये हे रशियाने घेतले. १९१७ मध्ये सोव्हिएट सत्ता आल्यावर हे प्रथम तुर्किस्तान स्वायत्त प्रजासत्ताकाची राजधानी होते. नंतर १९३० मध्ये समरकंदऐवजी उझबेक प्रजासत्ताकाची ताश्कंद ही राजधानी झाली. याच्या आसपास कापूस, धान्ये, भाजीपाला, फळे, रेशीम, कोळसा इत्यादींचे उत्पादन होते. भारत आणि पाकिस्तान यांमधील १९६६ च्या सुप्रसिद्ध ताश्कंद करारामुळे आणि त्याच वेळी झालेल्या भारताचे महामंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनामुळे ताश्कंद भारताच्या विशेष परिचयाचे झाले.

लिमये, दि. ह.