खिंड : आडवा आलेला डोंगर ओलांडून जाण्यासाठी जी कमी उंचीची आणि अरुंद वाट असते तिला खिंड म्हणतात. कधीकधी दोन डोंगरांमधील अरूंद व खोल घळईमधून वाट जाते तेव्हा तिलाही तेथे खिंड म्हणतात. खिंड ही हिमनदीच्या किंवा नदीच्या खनन कार्यामुळे तयार होते. जवळजवळ उगम पावलेल्या परंतु डोंगराच्या विरूद्ध बाजूंच्या उतारांवरून वाहणाऱ्या नद्या उगमाकडे डोंगर झिजवीत जातात आणि त्यामुळे शेवटी खिंड तयार होते. तिच्या दोन्ही बाजूंस उंच डोंगर असतात आणि एका बाजूच्या नदीच्या दरीतून दुसऱ्या बाजूच्या नदीच्या दरीत खिंडीतून उतरता येते. अशा ठिकाणी खिंडीचा डोंगरभाग दुरून खोगिरासारखा दिसतो. खिंडीला राजकीय, लष्करी किंवा व्यापारी महत्त्व असते. काही खिंडी जागतिक महत्त्वाच्या ठरतात पनामा कालवा होण्यापूर्वी तेथील संयोगभूमी ओलांडून दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडे जाण्यासाठी  स्पॅनिश लोक तेथील कुलेब्रा खिंडीवाटे खेचरांच्या पाठीवरून वाहतूक करीत असत. अफगाणिस्तानातील सफेद कोह पर्वतातून काबूल नदी सिंधूच्या मैदानाकडे वाट काढते, तेथील खैबर खिंडीला (१,०६७) मी. प्राचीन काळापासून महत्त्व आलेले आहे.

खिंड १

प्रथम आर्य लोकांनी व नंतर इतिहासकाळात शक, हूण, यवन, तार्तर, मंगोल, मोगल इ. आक्रमकांनी हीच खिंड ओलांडून सिंधूच्या समृद्ध मैदानावर धाड घातली. तिची सर्वांत कमी रुंदी सु. १५–१६ मी. आहे. ताश्कंद व बूखारा येथील लोकांना हिंदुस्थानात येण्यासाठी खैबर खिंडीच्या आधी हिंदुकुशमधील हाजीखाक खिंड (३,७१५ मी.) व पाघमन पर्वतातील उनाई खिंड (१,७५० मी.) पार करावी लागत असे. काराकोरम पर्वत ओलांडून पामीर वा सोव्हिएट आशियाकडे जाण्यास हुंझा घळईतून मिंटाका (४,७०८ मी.) आणि किलिक (४,७५५ मी.) या खिंडी आहेत तर काश्मीर व लडाखमधून तिबेटकडे जाण्यास सासेर (५,३२७ मी.) व काराकोरम (५,६७१ मी.) खिंडी आहेत. कुमाऊँ हिमालयाच्या वायव्येस झास्कर पर्वतश्रेणीतील शिपकी (४,६९४) मी., श्रीनगर-लेह रस्त्यावर श्रीनगरपासून ६४ किमी. अंतरावर झोजी (३,६३० मी.), सिक्कीममधून चुंबी खोऱ्यातून तिबेटकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील, गंगटोकपासून २५–२६ किमी. अंतरावरील जेलेप (४,३६६ मी.) व नथू (४,२६७ मी.) या हिमालयातील काही प्रसिद्ध खिंडी आहेत.

खिंड २

नथू खिंडीतून मोठी वाहतूक होते व भारत-चीन संघर्षात तिचा फारच बोलबाला झाला. काश्मीरमध्ये जम्मू-श्रीनगर रस्ता पीर पंजालमधील  बनिहाल खिंडीखालील (२,८३२ मी.) नवीन जवाहर बोगद्यातून जातो. मोगल काळातील जुना रस्ता पीर पंजाल खिंडीतून ३,४७५ मी. उंचीवरून जातो. भारत-पाकिस्तान संघर्षात हाजीपीर खिंड पूर्वेस गाविलगड व चिखलदऱ्याचे पठार तर पश्चिमेकडे असिरगढ आहे. या खिंडीच्या मार्गाने मुसलमानांच्या दक्षिणेकडे आणि मराठ्यांच्या उत्तरेकडे अनेक स्वाऱ्या झालेल्या आहेत. याच खिंडीतून मध्य रेल्वेचा मुंबई-दिल्ली मार्ग जातो. सह्याद्री व त्याचे फाटे आणि निलगिरी, अन्नमलई वगैरे पर्वतांतून पलीकडे जाण्यास जे घाट आहेत ते बहुतेक खिंडींतूनच आहेत. पन्हाळा व विशाळगड यांमधील पावन खिंड इतिहासप्रसिद्ध आहे. वाई व भोर यांच्या दरम्यानची अंबाड खिंड ही एक खचदरी असावी ती सु. ४० किमी. रुंद आहे. केरळ किनाऱ्यावरून येणारी रेल्वे तेथून पूर्वेकडे जाते व त्यामुळे दोन्ही बाजूकडील व्यापार आणि दळणवळण वाढले आहे. अगदी दक्षिणेला केरळमधील क्विलॉन व तमिळनाडूमधील मदुराई आणि तुतिकोरिन यांना जोडणारे रेल्वे फाटे शेनकोटा खिंडीतून जातात. आक्रमकाला अरुंद खिंडीत थोड्या सैन्यबळावर थोपवून धरता येते. त्याबाबतच्या यशापशयावर देशाचे भवितव्य ठरू शकते. प्रतापसिंह व अकबर यांमधील हळदीघाटची लढाई, पावन खिंडीतील बाजीप्रभूचा पराक्रम वा प्राचीन काळापासून ग्रीसमधील थर्‌मॉपिली खिंड म्हणजे उष्ण झऱ्यांची खिंड. आता त्या ठिकाणी फक्त दलदलीचा सपाट प्रदेश आहे झरेही आहेत. ही अरुंद खिंड मौंट ओएटा व मालीॲकॉसचे आखात यांच्या दरम्यान होती आणि उत्तरेकडून ग्रीसच्या दक्षिण भागात येण्याचा तोच एकमेव मार्ग होता. येथे इ.स.पू. ४८० मध्ये पर्शियन व स्पार्टनमध्ये इ.स.पू.२७९ मध्ये गॉल व ग्रीक लोकांमध्ये तसेच इ.स.पू. १९१ मध्ये सिरियन आणि रोमन लोकांत इतिहासप्रसिद्ध लढाया झाल्या. यूरोप-आशिया सीमेवरील आणि कॅस्पियन व काळा समुद्र यांच्या दरम्यानचा कॉकेशस पर्वत ओलांडण्याचा एकमेव मार्ग टेरेक नदीच्या डॅरिएल घळईच्या खिंडीतून जातो. सु. १२ –१३ किमी. पर्यंत हा मार्ग दोहो बाजूंच्या सु. १,८०० मी. उंचीच्या उभ्या कड्यांमधून जातो.


खिंड २इ.स.पू. १५० पासून हा मार्ग तटबंदीने रक्षिलेला आहे. हिमालयाप्रमाणेच पूर्व-पश्चिम पसरलेल्या आल्प्स पर्वतातही अनेक प्रसिद्ध खिंडी आहेत. त्यांपैकी ब्रेनर ही सर्वांत कमी उंचीची (१,३७० मी.), वर्षातून केव्हाही ओलांडण्याजोगी खिंड, ऑस्ट्रियातील इन्सब्रुक व इटलीतील बोलत्सानो या शहरांस जोडते. तिच्या बाजूंस सिल व इनार्को नद्यांच्या दऱ्या आहेत. रोमन लोकांनी येथे प्रथम रस्ता केला. १७७२ मध्ये चांगला रस्ता आणि १८६७ मध्ये येथून रेल्वे झाली. याही मार्गाने अनेक स्वाऱ्या झाल्या आहेत. १९४०–४२ मध्ये हिटलर व मुसोलिनी यांच्या गाठीभेटी याच खिंडीत झाल्या. इटली व स्वित्झर्लंड यांच्या सरहद्दीवरील ग्रेट सेंट बर्नार्ड खिंड (२,४७२ मी.) नेपोलियनने १८०० मध्ये ४०,००० सैन्यानिशी ओलांडली. या मार्गाने पूर्वी अनेक कॅथलिक धर्मगुरू रोमला गेले. सेंट बर्नार्ड ऑफ मेंथॉन याने या ठिकाणी स्थापिलेला मठ हा दमल्याभागल्या प्रवाशाचे आश्रयस्थान होता. तेथील शिकविलेले सेंट बर्नार्ड कुत्रे बर्फात सापडलेल्या प्रवाशाना शोधून काढीत आणि त्यांना मदत पोहोचवीत. आग्नेय फ्रान्समधील लिट्ल सेंट बर्नार्ड खिंड (२,१८८ मी.) तिच्यातून १८७१ मध्ये झालेल्या रस्त्याने ओलांडून इटलीच्या बाजूचे सृष्टिसौंदर्य पाहता येते. ज्यूलियस सीझरने व नंतर अनेक शतके रोमन अधिकाऱ्यांनी हा मार्ग वापरला. येथे ही मठ आहे व सेंट बर्नार्डचा पुतळा आहे. माँ सनी (२,०८२ मी.) ही खिंड फ्रान्स आणि इटली यांच्या सरहद्दीवर असून नेपोलियनने तेथे १८०३–१० मध्ये रस्ता बांधला. या खिंडीखालील १३·७ कीमी. लांबीचा रेल्वे बोगदा १८७१ मध्ये तयार झाला. सेंट गॉथर्ड ही स्वित्झर्लंडमधील खिंड (२,११२ मी.) मोक्याची असल्यामुळे अँडरमॅट येथे स्वित्झर्लंडची सैन्यतुकडी असते. स्विस, जर्मन व फ्रेंच सरकारांच्या सहकार्याने या खिंडीखालून १,१५४ मी. उंचीवरील १५ किमी. लांबीचा ल्यूसर्न-बेलींत्सोना रेल्वेचा बोगदा १८५२ मध्ये चालू झाला.

खिंड ३

डीतून जाणाऱ्या रस्त्याची विलक्षण नागमोडी वळणे, रेल्वेचे बोगदे, पूल, दऱ्या आणि त्यांतील वनश्री सर्वच प्रेक्षणीय आहे.स्वित्झर्लंडमधील संप्लॉन खिंड (२,०१६ मी.) पंधराव्या शतकापासून लष्करीदृष्ट्या वापरात आहे. सेंट बर्नार्डमधून खाली इटलीत येऊन विजयी झाल्यावर नेपोलियनने या खिंडीतून १८०० मध्ये रस्ता करण्याचे ठरविले. ब्रिगहून डोमोडॉसालाला जाणाऱ्या या रस्त्यावर सु.२२५ मी. लांबीचा बोगदा आहे. या रस्त्याच्या पूर्वेला १९०६ मध्ये पुरा झालेला मुख्य रेल्वेवरील जगातील सर्वात लांब (सु.२० किमी.) बोगदा फक्त ७०५ मी. उंचीवर आहे. उत्तर अमेरिकेत रॉकी पर्वतात क्रोजनेस्ट (१,३५६ मी.) व किकिंग हॉर्स (१,६२७ मी.) या प्रसिद्ध खिंडी आहेत. दक्षिण अमेरिकेत अँडिज पर्वतातील उस्पालाता किंवा लेकूंब्र ही खिंड (३,८५६ मी.) अर्जेंटिनातून पश्चिमेकडे चिली देशात जाणाऱ्या उंच, अवघड मार्गावर आहे. १८१७ मध्ये अरजेंटिनातील मेंदोसाहून जनरल सान मार्तीनची मुक्तिसेना ही खिंड पार करून चिलीत उतरली व तिने स्पॅनिश सैन्याचा काबुकोच्या लढाईत पराभव केला.

या खिंडीखालील ३,१७२ मी. उंचीवरील ३ किमी.हून जास्त लांबीच्या बोगद्यातून ट्रान्स अँडीज रेल्वे, मेंदोसा ते व्हॅलपारेझापर्यंत जाते. खिंडीच्या वर ॲकन्काग्वा शिखराच्या पार्श्वभूमीवर क्रूस घेतलेला हात उंच केलेला आणि दुसरा हात आशीर्वाद देत असलेला, असा येशू ख्रिस्ताचा भव्य पुतळा दोन्ही देशांमधील शांतता व सीमाविषयक तहांचे स्मारक म्हणून उभा आहे. या प्रसिद्ध खिंडीशिवाय जगातील सर्व पर्वतश्रेणींतील कमीअधिक महत्त्वाच्या असंख्य खिंडी आहेत. खिंडींमुळे दोन्ही बाजूंकडील लोकांत माल, विद्या, कला, कल्पना यांची देवघेव होऊन त्यांच्यातील दुजाभाव कमी होतो किंवा एका बाजूकडील लोक दुसऱ्या बाजूकडील लोकांवर आक्रमण करून त्यांना अंकित करतात.

कुमठेकर, ज. व.