एल् पॅसो : अमेरिकेच्या टेक्सस राज्यातील मोक्याचे ठिकाण. लोकसंख्या ३,२२,२६१ (१९७०). हे अमेरिका व मेक्सिको यांच्या सरहद्दीवर, फ्रँकलिन पर्वताच्या पायथ्याशी, रीओ ग्रँड नदीकाठी वसले आहे, तर नदीच्या दुसर्‍या तीरावर मेक्सिकोचे स्यूदाद ह्वारेस हे शहर आहे. एल् पॅसोच्या आसमंतात गुरे पाळणे तसेच कालव्याखालील लांब धाग्याचा कापूस पिकविणे व इतर शेती हे महत्त्वाचे उद्योग आहेत. येथे तेलशुद्धी, तांबे शुद्धीकरण यांचे कारखाने असून रेल्वे यंत्रशाळा आहे. सिमेंट, काचेच्या वस्तू, कापड, बंद डब्यातील अन्नपदार्थ, मांससंवेष्टन, दूध, लोणी, मद्य यांची उत्पादने येथे असून भांडी, कापड व चामड्यावरील नक्षीकाम ही येथील कारागिरीची वैशिष्ट्ये आहेत. व्यापार व दळणवळणाचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. शहर अद्ययावत बांधणीचे असून त्यावर स्पॅनिश संस्कृतीचा ठसा दिसतो. एल् पॅसोजवळील राष्ट्रीय उद्यानांना भेट देण्यासाठी दरवर्षी सु. दहा लक्ष लोक येथे येतात.

शाह, र. रू.