कोमाटी : दक्षिण आफ्रिका संघराज्याचा प्रांत ट्रान्सव्हाल तसेच स्वाझीलँड व मोझँबीक राज्यांतून बारमहा वाहत जाणारी नदी. लांबी सु. ८०० किमी. ही ट्रान्सव्हालच्या अर्मेलो जिल्ह्यात सु. १,७३७ मी.  उंचीवर ड्रेकन्सबर्ग पर्वतात उगम पावते. स्वाझीलँडमधून सु. ९१४ मी. खोल दरी खोदून ती पूर्वेकडे ट्रान्सव्हालच्या सरहद्दीवरील लेबोंबो पर्वतराजीपर्यंत येते. तेथे तिला उत्तरेकडून क्रॉकोडाइल नदी मिळते. लेबोंबोत २१३ मी. खोल फट पाडून ती खाली येते. तेथे तिच्या काठी कोमाटीपूर्त गाव वसले आहे. तेथून मोझँबीकमध्ये शिरल्यावर तिला इंकोमाती म्हणतात. उत्तर, पूर्व व दक्षिण दिशांनी मोठे वळण घेऊन, सखल, दलदलीच्या प्रदेशांतून व चुआली सरोवरातून जाऊन ती हिंदी महासागराच्या डिलागोआ उपसागरास मिळते. तेथून आग्नेयीस २४ किमी. मोझँबीकची राजधानी आणि प्रमुख बंदर लोरेंसू मरकेश आहे. कोमाटीच्या परिसरात ऊस, तंबाखू, वाख, भुईमूग, केळी, रताळी, मका इत्यादींचे उत्पन्न येते.

कुमठेकर, ज. ब.