साकाई : जपानमधील एक प्राचीन आणि प्रसिद्घ व्यापारी बंदर, तसेच सांप्रतचे प्रमुख औद्योगिक शहर व बंदर. लोकसंख्या ८,४२,७६० (२०११). होन्शू बेटाच्या नैर्ऋत्य भागात ओसाका उपसागर किनाऱ्यावर यामाटो नदीच्या मुखाजवळ हे शहर वसले आहे. ओसाकाच्या दक्षिणेस १६ किमी. वर असलेले साकाई ओसाकाचे उपनगर म्हणून विकसित होत असून यामाटो नदीमुळे ते ओसाका शहरापासून अलग झाले आहे. साकाई येथे प्राचीन यायोई काळातील (इ. स. पू. ३०० ते इ. स. ३००) अनेक पुरातत्त्वीय अवशेष आढळतात. त्यांत मुख्यत्वे कबरींची मृण्मय टेकाडे उल्लेखनीय आहेत. त्यांपैकी निन्तोकू सम्राटाची कबर ४८६ मी. लांब व ३७·५ मी. उंचीची असून ती जपानमधील सर्वांत मोठी कबर समजली जाते. वाकायामा प्रांतातील कुमानो प्रार्थनास्थळाला भेट देणाऱ्या यात्रेकरूंचे हे एक प्रमुख आकर्षण होते. चौदाव्या शतकाच्या मध्यापासून सतराव्या शतकापर्यंत ते एक प्रसिद्घ सागरी बंदर व व्यापारी केंद्र होते. येथील श्रीमंत व्यापाऱ्यांचा चीन, कोरिया, फिलिपीन्स, रियूक्यू बेटे व यूरोपीय देशांशी व्यापार चालत असे. केम्मू राजसत्तेच्या पुनःस्थापनेच्या काळात (१३३३–३६) साकाई हस्तगत करण्यासाठी संघर्ष उद्‌भवले आणि उत्तर व दक्षिण असे त्याचे दोन भाग पडले. साकाईचा लष्करी राज्यपाल (शूगो) औची योशिहिरो (कार. १३५६–१४००)याचा ओई बंडात पूर्ण पराभव झाला आणि साकाई शहर उद्ध्वस्त करण्यात आले (१३९९). त्यानंतर ते विधिवत क्योटोच्या मुरोमाची शोगूनच्या आधिपत्याखाली आले.

जपानमधील ओनिन युद्घानंतर (१४६७–७७) साकाईची भरभराट झाली आणि चीन व इतर देशांशी चालणाऱ्या व्यापारात वृद्घी झाली. १५३० मध्ये त्याची लोकसंख्या ३०,००० झाली. त्यामुळे औद्योगिक व सांस्कृतिक क्षेत्रांत साकाईची प्रगती झाली. सागरी व्यापाराबरोबरच येथे बंदुका, मद्यार्क, तलम कापड तसेच शुभ्र केलेल्या कापडाची निर्मिती, छापखाने यांत वाढ होऊ लागली. याबरोबरच साकाई हे साहित्यिकांचे केंद्र बनले. येथे ‘रेंग’ प्रकारचे काव्य करणारे अनेक कवी होऊन गेले. तसेच जपानमधील प्रसिद्घ ‘चहापान समारंभा’चा अध्वर्यू सेन नो रिक्यू याचे येथे वास्तव्य होते. तेथील व्यापाऱ्यांनी यादवी युद्घात साकाई शहर संरक्षित राहावे म्हणून मनोऱ्यांच्या भव्य इमारती बांधल्या आणि उत्तर, दक्षिण व पूर्व बाजूला खंदक खणले तथापि टोयोटोमी हिडेयोशी या प्रबळ सरदाराने हे शहर आपल्या सत्तेचे प्रमुख स्थान केले तेव्हा तेथील अनेक कारागीर ओसाकाला गेले. तोकुगावा राजवंशाच्या काळात (१६०३–१८६७) रेशमी कपड्यांचा चीनशी व्यापार वाढला आणि अन्य धंद्यांना प्रोत्साहन मिळून शहराची कीर्ती व्हेनिस शहरासारखी झाली. धातुउत्पादन आणि वस्त्रोद्योग यांना चालना मिळाली.

मेजी शासनकाळात (१८६८–१९१२) साकाईचा विकास मंदावला. अठराव्या शतकात यामाटो नदीने पात्र बदलल्यामुळे बंदरात गाळ साठून ते निरु पयोगी झाले. ओसाकाचे व्यापारी व औद्योगिक महत्त्व वाढू लागल्यापासून साकाईचे महत्त्व घटले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ओसाकाचे एक उपनगर म्हणून साकाईचे पुनरुज्जीवन झाले. ओसाका व साकाई लोहमार्गाने एकमेकांशी जोडली गेली. तसेच बंदरातील गाळ काढण्यात आला, त्यामुळे साकाईचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील तसेच औद्योगिक महत्त्व पुन्हा वाढत गेले. साकाईमध्ये लोखंड, पोलाद, रसायने, विजेची उपकरणे, वस्त्रोद्योग, सायकली, स्वयंचलित यंत्रे, मोटारी, जहाजे व त्यांचे सुटे भाग, सुऱ्या कातऱ्या वगैरे तीक्ष्ण हत्यारे (कटलरी सामान) इत्यादींच्या निर्मितीचे उद्योग चालतात. शहराचा औद्योगिक पट्टा समुद्र हटवून तयार केलेल्या जमिनीवर असून नागरी वस्तीच्या अंतर्गत भागातील उंचवट्या च्या प्रदेशात आहे.

देशपांडे, सु. र.