तांबडा समुद्र : प्राचीन–सायनस अरेबिकस, एरीथ्रीअन समुद्र, रूब्रम समुद्र अरबी–अल् बहर अल् अहमर (बहर अल् हेजॅझ). सुएझपासून बाब–एल्‌–मांदेब सामुद्रधुनीपर्यंत २,१०० किमी. लांबीचा हिंदी महासागराचा एक महत्त्वाचा फाटा. याच्या पूर्वेस अरबस्तानचे द्वीपकल्प आणि पश्चिमेस ईशान्य आफ्रिका असून एडनच्या आखाताने तो अरबी समुद्रास जोडलेला आहे. क्षेत्रफळ सु. ४,३८,००० चौ. किमी. कर्कवृत्ताजवळ जास्तीत जास्त रुंदी ३२२ किमी. सरासरी रुंदी २९० किमी. आणि जास्तीत जास्त खोली २,९२० मी. याची कमाल खोली व रुंदी मध्यभागी असून तो उत्तरेस व दक्षिणेस उथळ व अरुंद आहे. पूर्व किनाऱ्यावरील कामारान, पश्चिम किनाऱ्यावरील ओम एल् केतेफ, झूला (आनेस्ले) व दोखना हे प्रमुख उपसागर आहेत. पश्चिम भागात स्वॅकिन द्वीपसमूह व दालॅक बेटे, पूर्व भागात फारासान बेटे, मध्यभागी झेबिरगेट बेट, अगदी दक्षिणेस झुफार व हानीश बेटे आणि बाब–एल्‌–मांदेब सामुद्रधुनीत पेरिम बेट आहे. या बेटांपैकी काही बेटे खडकाळ असून दालॅक द्वीपसमूहाच्या दक्षिणेस जागृत ज्वालामुखींचा समूह आहे. जेबेल तिएरवर मृत ज्वालामुखी आहे. कधीकधी पाण्याचा विस्तृत पृष्ठभाग समुद्री शैवालाच्या मृतबहराने आच्छादलेला असतो, त्यामुळे लांबून समुद्राच्या पाण्याचा रंग गहिऱ्या निळ्या–हिरव्याऐवजी  तांबूस तपकिरी दिसतो. यावरून याचे तांबडा समुद्र असे नाव पडले आहे.

याच्या वायव्येस ३३८ किमी. लांबीचे, २२·५ किमी. रुंदीचे व ५५ ते ६४ मी. खोलीचे रुंद किनारी मैदानाचे सुएझचे आखात आहे. ईशान्येस अरुंद किनारी मैदानाचे अकाबाचे आखात १९० किमी. लांब, १६२ किमी. रुंद व १,६७५ मी. पर्यंत खोल आहे. बाब–एल्‌–मांदेब सामुद्रधुनी ३२ किमी. रुंद असून हिंदी महासागरातून एडनच्या आखातामार्गे तांबड्या समुद्रात जाण्याचे प्रवेशद्वार आहे. येथील शिलापट्ट्यामुळे तांबडा समुद्र व एडनचे आखात वेगळे झाले असून तेथे पाण्याची खोली फक्त ११६ मी. आहे.

पूर्व अफ्रिकेतून पश्चिम आशियात जाणाऱ्या प्रचंड खचदरीचा मोठा भाग तांबड्या समुद्राने व्यापलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूंच्या प्रदेशांची उंची सु. २,००० मी. आहे. तांबडा समुद्र हा सापेक्षतः नवा समुद्र आहे. त्याची द्रोणी जटिल स्वरूपाच्या भूहालचालीने तयार झालेली आहे. ही हालचाल अजूनही होत आहे. हे ज्वालामुखी, भूकंप आणि द्रोणीतळातील उष्ण खाऱ्या पाण्याचे विभाग यांवरून निदर्शनास येते. आदिनूतन काळात सु. ५ कोटी वर्षापूर्वी आफ्रिका खंड अरबस्तानापासून वेगळे होऊ लागले. ऑलिगोसीन काळात साडेतीन कोटी वर्षांपूर्वी सुएझ आखाताची निर्मीती झाली आणि तांबड्या समुद्राच्या उत्तरेकडील भाग मध्यनूतन काळात अडीच कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाला. अकाबाचे आखात व तांबड्या समुद्राचा दक्षिण भाग ३० ते ४० लक्ष वर्षांपूर्वी निर्माण झाला.

या समुद्राच्या द्रोणीच्या तळावर २,१७० मी. खोलीची ‘अटलांटिस सेकंड डीप’ व २,२२० मी. खोलीची ‘डिस्कव्हरी डीप’ या गर्ता आणि त्यांच्याहीपेक्षा अधिक खोलीच्या गर्ता आहेत. तांबड्या समुद्रापासून विविध खनिज संपत्ती मिळण्याजोगी आहे. समुद्राच्या शेजारील देश तेल व वायू यांसाठी उत्खनन करीत आहेत. बाष्पीभवनानंतर होणारे मीठ, जिप्सम, डोलोमाइट इत्यादिकांचे निक्षेप अल्प व स्थानिक स्वरूपात उपयोगात आणले जात आहेत. ‘डिस्कव्हरी डीप’ येथील गाळ धातुयुक्त असून ‘अटलांटिस सेकंड डीप’ येथील साठ्यात लोह २९%, जस्त ३·४ % तांबे १·३ %, शिसे ०·१ % चांदी दहा लाख भागात ५४ भाग व सोने दहा लाख भागात ०·५ भाग असते. धातुयुक्त साठे द्रवरुप असल्याने ते तेलाप्रमाणे नळांनी पृष्ठभागावर आणणे शक्य आहे. या समुद्राच्या तळाशी मौल्यवान भारी धातूंच्या ऑक्साइडांचे ९ ते १८ मी. जाडीचे रूपांतरीत खडकांचे थर आहे. तांबड्या समुद्रात विविध प्रकारचे प्राणी विपुल आहेत. काही प्राणी सुएझ कालवा तयार झाल्यानंतर भूमध्य समुद्रात पसार झाले. १९६० साली या समुद्राचे संशोधन झाले असून १,९५० मी.च्या खाली पुष्कळ गरम, खाऱ्या पाण्याचे साठे आहेत. ‘अटलांटिस सेकंड डीप’ मधील पाण्याचे तपमान ६०° से. असून क्षारता दर हजारी २५६ आहे. त्यात ऑक्सिजन नाही. अशा प्रकारचे पाण्याचे साठे ‘डिस्कव्हरी डीप’ व ‘चेन डीप’ मध्येही आहेत. खालून तापणारे हे पाणी पुष्कळदा वरच्या पाण्याच्या प्रवाहचक्रात मिसळून जाते.


 

तांबड्या समुद्राच्या प्रदेशात पर्जन्यमान अतिशय कमी असून सरासरी तापमान २५° ते २८° से. असते. उन्हाळ्यामध्ये सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण अतिउच्च असते. पश्चिमी किंवा ईजिप्शियन या नावाने ओळखले जाणारे वारे हिवाळ्यामध्ये अतिशय जोराने वाहतात आणि बरोबर धुके व वाळू आणतात. १४° ते १६° उ. अक्षांशापासून वारे बदलत असले, तरी जून ते ऑगस्टपर्यंत उत्तरेकडून ईशान्य वारे वाहतात. काही वेळा बाब–एल्‌–मांदेबपर्यंत हे वारे येऊ शकतात. सप्टेंबरपासून दक्षिणेकडून व आग्नेयीकडून वारे येऊ लागतात. तांबड्या समुद्रास एकही नदी येऊन मिळत नाही आणि शिवाय अपुरा पाऊस यांमुळे एका वर्षात २०० सेंमी. पेक्षा जास्त पाण्याचे बाष्पीभवन होते. याची भरपाई म्हणून एडनच्या आखातातून बाब–एल्–मांदेब सामुद्रधुनामार्गे पाणी आत येते. हे आत येणारे पाणी कमी क्षारतेचे असल्याने (दर हजारी ३६) वाऱ्याच्या जोरामुळे त्यास गती मिळून ते उत्तरेकडे सरकू लागते. सुएझ आखातातील पाणी ४० क्षारतेचे, जड असल्यामुळे ते खाली जाऊन दक्षिणेकडे येऊ लागते व एक प्रवाहचक्र सुरू. होते. १०० ते ४०० मी. खोलीनंतर पाण्याचे तापमान २२° से. व क्षारता हजारी ४१ कायम राहते. खालून येणारे पाणी बाब–एल्–मांदेब मधील शिलापट्ट्यावरून अरबी समुद्रात जाते व पृष्ठभागावरून तेथील पाणी तांबड्या समुद्रात येते. अशा प्रकारे दर वीस वर्षांनी तांबड्या समुद्रातील पाण्याचे नूतनीकरण होते.


इ. स. पू. सु. १००० पासून भारताकडे जाणारा जलमार्ग म्हणून याचा उपयोग केला जात होता. इ. स. पू. १५०० साली ईजिप्तची राणी हॅटशेपसूटने हा समुद्र नौकेने पार केला होता. तसेच इ. स. पू. सु. ६०० मध्ये फिनिशियनांनी याच्या किनाऱ्याचे समन्वेषण केले. बगदादचा खलीफा हारून अर्–रशीद याने भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांमध्ये एक खोल कालवा असावा, अशी पहिली सूचना इ.स. पू. ८०० मध्येच केली होती, पण शेवटी फर्डिनांद मारी दे लेसेप्स याने १८६९ साली सुएझ कालवा पूर्ण करून तांबडा व भूमध्य समुद्र जोडले.

तांबडा समुद्र जलवाहतुकीस अवघड असून त्याच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. दक्षिणेकडील किनारा प्रवाळ खडकांचा असल्यामुळे जलवाहतुकीस व बंदराच्या सोयीत अडथळे निर्माण झाले आहेत. बाब–एल्–मांदेबजवळ गाळ काढून व सुरुंगाने खडक फोडून जलवाहतूक सुरक्षित केली आहे. तरीदेखील वातावरणीय विकृती, वाळूची वादळे आणि पाण्याचे अनियमित प्रवाह इत्यादींमुळे यातील जलवाहतूक धोकादायक आहे. सुएझ कालवा झाल्यानंतर अमेरिका, यूरोप व इराणचे आखात आणि हिंदी महासागरावरील बंदरे, अतिपूर्वेकडील देश भारत, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांमधील व्यापार मोठ्या प्रमाणात चालू झाला. तांबड्या समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर सुएझ, पोर्ट सूदान, मसावा, आसाब, कुसेर, स्वॅकिन, बेलूल आणि पूर्व किनाऱ्यावर अकाबा, जेद्दा, होडेडा, ॲल वेज, मोखा, येन्बो ही महत्वाची बंदरे आणि शहरे आहेत.

संदर्भ : 1. Davies. D. Mckenzi, D. P. Molnar, P.(Eds.) Plate Tectonics of the Red Sea  and East Africa, Nature, April 1970, London, 1970.

            2. Degens, E. T. Ross, D. A. (Eds.) Hot BrinesandRecent Heavy Metal Deposits in the Red Sea, New York, 1969.

कांबळे, य. रा.